अन्धारवारी आणि हृषिकेश गुप्ते

अन्धारवारी आणि हृषिकेश गुप्ते

अन्धारवारी आणि हृषिकेश गुप्ते
अंधारवारी खरं तर दोन दिवसांपासून डॉ. अरूण गद्रे यांचं ‘कैद झालेले कळप’ वाचायचं होतं, पण माझ्या पुस्तकांच्या महागर्दीत ते शोधूनही सापडलं नाही. दोन दिवस शोधून कंटाळले आणि त्याच वेळी ज्योती धर्माधिकारी या मैत्रिणीनं मला टॅगलेली अनवटवाटेवरची कविता वाचली. छानच कविता! या कवितेवरून मग आज हृषिकेश गुप्तेचं ‘अंधारवारी’ वाचावं वाटलं.

लहानपणापासूनच मला भयकथा, गूढकथा वाचायची जबरदस्त आवड होतीच. त्यातही माझा मावसभाऊ औदुंबर भुताखेताच्या अनेक गोष्टी सांगायचा. त्या वेळी खरंच भूत, हडळ, चेटकीण, मुंजा, ही सगळी एकाच कुटुंबातली मंडळी वास्तवात नक्कीच असणार अशी खात्री पटायची. पुढे मग सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, द. पां. खांबेटे, नारायण धारप यांनी ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. मला नारायण धारप खूप आवडायचे आणि आवडतात.

साधारणपणे सातवी-आठवीत शिकत असताना एक दिवस अचानक नारायण धारप या लेखकाचं पुस्तक हातात पडलं आणि त्या पुस्तकानं बघता बघता माझा ताबा घेतला. पुस्तक वाचताना अंधारून आलं, जेवणासाठी आईच्या हाका सुरू झाल्या. पण तरीही माझी तंद्री भंग पावली नाही. तहान-भूक विसरून मी वाचत राहिले. पुस्तक हातावेगळं केल्यावरही सगळे प्रसंग आणि ते वातावरण आजूबाजूला तसंच रेंगाळत होतं. त्यानंतर जिथे मिळेल तिथून नारायण धारप या लेखकाची पुस्तकं मिळवायची आणि त्यांचा वाचून फडशा पाडायचा असं सत्र सुरू झालं. मला आठवतं, कित्येकदा आई ओरडेल म्हणून रात्री जेवण झाल्यावर झोपायच्या वेळेस मी नारायण धारप यांचं पुस्तक हातात घेई. पुस्तक वाचताना सगळे गाढ झोपेत असतानाही माझं वाचन सुरूच असे. मग त्या पुस्तकातलं आणि माझ्या आसपासचं शांत वातावरण जणूकाही एकरूपच होई आणि मग पुस्तकात लेखकानं उभं केलेलं गूढ आणि भयावह वातावरण माझ्या आसपास कधी निर्माण होई याचा मला पत्ताच लागत नसे. त्या वातावरणाची मला खूपच भीती वाटे. कथानकातल्या गूढ अमानवी शक्ती कुठल्याही क्षणी आपल्यावर ऍटॅक करतील अशीही भीती वाटे. अशा वेळी देवघरात असलेल्या, रेणुकादेवीच्या सहा सात फूट उंचीच्या एका मोठया फोटोकडे पाहत मी मनातल्या मनात प्रार्थना करीत असे आणि उसना आधारही मागत असे. पण त्या भीतीपोटी पुस्तक बाजूला ठेवून देऊ आणि उद्या वाचू असं कधीही होत नसे. पुस्तक बाजूला ठेवण्याऐवजी पुढचं पान वाचायला सुरुवात करत असे. त्यांच्या पुस्तकांमधून पडके वाडे, गढ्या, विवरं, ओसाड माळरानं, विचित्र अंधार, झाडांची सळसळ, वातावरणातला गूढपणा आणि अशा या वातावरणात असलेलं अघोरी शक्तीचं अस्तित्व, अतार्किक असे प्रसंग, अंगावर काटा यावा अशी रक्त गोठून टाकणारे प्रभावी अविष्कार अनुभवायला मिळत.

त्यातही नारायण धारप यांचं ‘पारंब्यांचं जग’ हे माझं अत्यंत आवडतं पुस्तक होतं. त्यात वनस्पतींचं जमिनीखालचं मुळांच्या जाळ्यांनी विणलेलं एक गूढ अस्तित्व दाखवलं होतं. दिवस असो वा रात्र त्यांच्या कथानकातल्या त्या गूढ-रम्य वातावरणानं मला किती काळ भारून टाकलं होतं. जणू काही त्या गूढत्वाचा मीही एक हिस्सा बनले होते. पाश्‍चिमात्य साहित्यात स्टीफन किंग, एच पी लव्हक्राफ्ट, रिचर्ड मॅथेसन, एडगर ऍलन पो या लेखकांच्या साहित्यानं वाचकांच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. मात्र नारायण धारपांना आर्थर कॉनन डॉयल या लेखकाच्या शेरलॉक होम्स या पात्रानं झपाटलं होतं आणि मला नारायण धारप यांनी! कितीही भीती वाटली तरी त्यांचं पुस्तक वाचल्याशिवाय झोपायचं नाही असं मनानं ठरवलेलं असायचं. परीक्षेच्या आदल्या दिवशी देखील अभ्यासाऐवजी गोष्टीची पुस्तकं मन लावून वाचलेली आहेत.

तर आज 'अंधारवारी' वाचण्याआधी हे सगळं आठवलं. हृषिकेश गुप्ते हा या दिग्गज गूढ कथालेखकांच्या यादीतलाच एक लेखक! माझा आवडता लेखक. त्याची 'शंभर वेळा शोले पाहिलेला माणूस' ही गोष्ट तर अफलातूनच आहे. त्यावर चित्रपटही निघतोय असंही मध्यंतरी कळलं होतं. 'अंधारवारी' मध्ये विराज आणि अवधूत नावाचे दोघं जिवलग मित्र! दोघंही प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ! कुठल्यातरी कारणानं दोघांमध्ये वितुष्ट येतं आणि दोघंही पुढली १० वर्षं एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. विराजची बहीण अंजली एके दिवशी अवधूतला पत्र लिहिते. विराजनं आत्महत्या केलेली असते. ती का केली असते हे कोणालाच कळलेलं नसतं. त्याची काही कागदपत्रं, केसस्टडीचे पेपर्स आणि एक पत्र असं अवधूतच्या नावानं लिहून ठेवलेलं असतं. ते अंजली आपल्या पत्रासह अवधूतला पाठवून देते. इथूनच या गूढकथेला सुरुवात होते. ‘ज्ञ’ या व्यक्तिरेखेबरोबरचा आपला काळोखदरी आणि तिला ओलांडून पुढला प्रवास सुरू होतो. त्या प्रवासातला घाट, ती वळणं, खोपोलीनंतरची दिसणारी भातशेती, जंगल आणि अनवट वाट, विचित्र आकाराचे गूढ, भयावह असे खडक.....मग होणारे विचित्र भास, किंवा सत्य...कुणास ठाऊक खरं काय?

माझीया मनाच्या काळ्याकपारी चालतो मी आता

ही अंधारवारी संपता न संपे

ही अंधारवारी जोडतो मी

आता नवे वारकरी शेवटी

या ओळी संपूर्ण गूढ उलगडणार्‍या ठरतात. मात्र अर्पण पत्रिकेत जेव्हा लेखक, 'माझ्या अंधारवारीत सामील होणार्‍या समस्त वाचकांस.....' असं लिहितो, तेव्हा अंगाचा क्षणभर थरकाप उडतो. तो का हे ही 'अंधारवारी' वाचल्यावरच तुम्हाला समजेल. गोष्ट पूर्ण सांगायचा मोह होतोय, पण मनाला आवरावं लागणारच. कारण रहस्यमय चित्रपट बघितल्यावर जसं त्यातलं रहस्य उघड करायचं नसतं, तसंच या गूढकथांचा अर्थ प्रत्येकांनी शोधण्यात, ती अनवट वाट प्रत्येकानं तुडवण्यात एक वेगळीच मजा आहे.

हृषिकेशची आणि माझी भेट बर्‍याच महिन्यांपूर्वी स्वरूप हॉटेलमध्ये झाली होती. तो आणि किशोर कदम आमच्या टेबलाशेजारीच गप्पा मारत बसले होते......'पुन्हा भेटू' असं म्हणत आम्ही निरोप घेतला, पण आज या पुस्तकाच्या शेवटी आशिश आणि त्याच्या गप्पांमधून कशा कथा आकाराला येतात हे वाचलं आणि एकदमच ‘लै भारी’ वाटलं. आशिशनं इतकं चांगलं लिहायला उद्युक्त केल्याबद्दल त्याचा एक जंगी सत्कार ठेवायचं मनात आलं. हा झाला गमतीचा भाग, पण मनोविकास प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आणि लेखकानं आपला आळस झटकून ते लिहिल्याबद्दल दोघांचेही तितकेच आभार! शिरवळकर, मतकरी आणि धारप यानंतर या प्रकारच्या सकस कथा लिहिणारं एकमेव नाव हृषिकेश गुप्ते याचच आहे. तर जरूर वाचा - अंधारवारी!

दीपा देशमुख,

२० सप्टेंबर २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.