गवतात उगवलेली अक्षरं - महावीर जोंधळे

गवतात उगवलेली अक्षरं - महावीर जोंधळे

किती अर्थपूर्ण असं शीर्षक आहे ना….मुख्य म्हणजे यामागचा अर्थ सहजपणे उलगडून दाखवणारं अप्रतिम असं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. महावीर जोंधळे या पत्रकार/कवी/नाटककार/साहित्यिकाची आत्मकहाणी असलेलं हे पुस्तक उघडताच माझ्या आवडत्या हिरव्‍या रंगाच्या शेडनं आतली पानं फडफडली.
पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय जागेवरून उठायचंच नाही असा निर्धार करून दिवसभरात पुस्तक वाचून पूर्ण केलं. हे पुस्तक म्हणजे आत्मकहाणी नसून महावीर जोंधळे यांनी केलेलं चिंतन आहे असं मला वाटतं. नेहमीच्या ठरावीक चौकटीत असलेलं आत्मचरित्र किंवा आत्मकथन जसं असतं, तसं हे पुस्तक नसून यात प्रत्येक लेखाचं स्वैर विहरणं आहे आणि ३५ वेगवेगळ्या लेखांमधून लेखकाचं जगणं, त्याची जडणघडण, त्याचा प्रवास, त्याचे विचार, त्याचं काम वाचकासमोर येतं. पत्रकार असलेला हा माणुस वृत्तीनं कवी मनाचा आहे, त्याचा संतसाहित्याचा अभ्यास आहे, अनेक विचारवंतांचा सहवास लाभल्याने त्याच्या विचारांना खोली लाभली आहे. हाडाचा पत्रकार असल्याने आसपासच्या परिसराचं भान आणि जाण आहे. चौफेर वाचनानं मानवता हाच त्याचा धर्म झाला आहे.
लेखकाचं जगणं, विचार आणि कृती यात अंतर राहिलेलं नाही आणि ते त्याच्या लिखाणातून सतत जाणवत राहतं. पत्रकारितेमधून आलेले चांगले-वाईट अनुभव त्यानं मांडले आहेत त्यातून त्याची मूल्यं लक्षात येतात. जात-धर्म, अंधश्रद्धा, राजकारण यांचा सामना करताना तो प्रवाहाबरोबर वाहून जात नाही. 
महावीर जोंधळे यांची गवतात उगवलेली अक्षरं अनेक व्‍यक्‍तिचित्रांनाही जन्म देतात. बीडकर गुरूजी, नरहरी, अनंत भालेराव, बाबा दळवी, बाबा आढाव, नरहर कुरूंदकर, कमलाकर सोनटक्के-कांचन सोनटक्के सह ज्या ज्या व्‍यक्‍ती त्यांना भेटल्या, त्यांची चित्रं रंगवताना लेखकाला त्यांच्याकडून किती भरभरून वेचता आलं हेही लक्षात येतं.
पुस्तक वाचत असताना अनेकदा महावीर जोंधळे यांच्यातला कवी सहजपणे डोकावून जातो. त्यांचं संपूर्ण लिखाण हे ललित अंगाने जाणारं असून बिटविन द लाईन्स मधला अर्थ वाचकाला शोधावा लागतो आणि अर्थ लागताच आपल्यालाही काहीतरी गवसतंय याची जाणीव त्याला होत राहते. वाचत असताना मला अनेक वाक्यांनी जरा वेळ तिथेच थांबवलं. जसं की लेखक म्हणतो, ‘…वडानं खेळायला पारंब्या दिल्या. डोंगराळ रस्त्यानं काट्याकुट्यांतून चालायला शिकवलं. म्हणजे आपणच या सर्वांचं ऋण व्‍यक्‍त केलं पाहिजे. पारंब्या थोड्याच रागावणार? आणि कुणी रागावेल, बोलेल म्हणून का ऋण व्‍यक्‍त करायचं असतं? काही रस्ते वाकडे असतात, काही सरळ…दूरचे असोत वा लांबचे जीवन घडवण्यात तेही सहभागी झालेले असतात, ते कसं विसरावं?’ तसंच एका ठिकाणी आई मास्तरांना विचारते, मास्तर उमटला का पाटीवर अक्षराचा नादर रंग? त्या वेळी ते म्हणतात, माय पोर शहाणं होईल. अक्षरांची रांग मागं मागं येईल. मायच्या डोळयात उजेड पडला. कंदिलाचा हळूहळू सूर्य झाला….खरोखरं कंदिलाचा झालेला सूर्य वाचकाला जाणवतो.
एका आठवणीत लेखक पुण्यातल्या पेरूगेटजवळ असलेल्या दि. बा. मोकाशींच्या रेडिओ दुरूस्तीच्या दुकानात जातात. तिथे त्या दुकानाचं निरीक्षण करतात तेव्‍हाही त्यांच्या मनातल्या विचारांच्या लाटा आपल्या मनापर्यंत येऊन आदळतात. त्या दुकानातल्या भिंतींच्या रंगापासून ते दिव्‍याच्या उजेडापर्यंत सबकुछ. मोकांशींचं व्‍यक्तिमत्व अतिशय तरलपणे अगदी कमी वेळात आपल्यासमोर उभं राहतं.  मुंबईत उमेदवारीच्या काळात लेखक आणि अत्रें यांची भेट मला खूप आनंद देऊन गेली. कारण अर्थातच मला  स्वत:ला कळत्या-नकळत्या वयापासून आचार्य अत्रे आणि त्यांचं लिखाण आवडत असल्यामुळे! 
लेखकाने कधीही प्रवासाबद्दल, फिरतीबद्दल कुरकूर केल्याचं दिसत नाही. तेंडूलकरांना भटका प्रवासी म्हणत. असं सांगत असतानाच लेखक म्हणतो फिरलं तर जग कळतं, नाही तर स्वत:भोवती कोष तयार होतो. लेखकाने देशभरातच नव्‍हे तर थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, लंडन अशी परदेशातही कामानिमित्त भटकंती केली. थायलंडमधल्या ‘कृंगथेप थुराकित’ नावाच्या दैनिकाची वैशिष्टयं वाचताना वाचक म्हणून आपण चकित होतो. पण त्याहीपेक्षा मलेशियामधल्या ‘उत्सान’ या दैनिकाबद्दल वाचताना अभिमानानं ऊर भरून येतो. याचं कारण मलेशियातली पत्रकारिता तिथल्या मातीला आणि नागरिकांच्या प्रश्नाला जागणारी असल्याचं लेखकाला दिसलं. (कुठल्याही नट-नट्यांचे फोटो त्यात दिसत नाहीत.) तसंच आपल्याकडे पेपरवाला जसा पेपर फेकून जातो, तसं तिथे घडत नाही. तो दाराच्या कुंडीत पिशवी अडकवून जातो. तिथलं वर्तमानपत्र जवळजवळ तीस ते चाळीस पानांचं असून किंमत २० रूपयांच्या पुढे होती. शेती, उद्योग आणि शिक्षण यावर तिथली वृत्तपत्रं भर देताना लेखकाला दिसली.
पत्रकारिता करू इच्छिणाऱ्या तरुणाईला लेखकाच्याच भाषेत सांगायचं झालं तर – पत्रकारितेच्या वाटणाऱ्या आकर्षणाला जोड असावी लागते ती संवेदनांची. तत्वगर्भ वैचारिक परंपरेची. अन्वयार्थ लावणाऱ्या क्षमतेची. आवाहक शक्‍तीची. ही वैचारिक चिरेबंदी बांधणी चार भिंतीच्या आत बसून होत नाही. नकारात्मकता टाकून सकारात्मकता स्वीकारणारं मन तयार करण्यासाठी मेंदूच्या मशागतीचं महत्वाचं केंद्र ठरतं ते भटकंतीत मिळणारं समाजदर्शन. लेखकाचं आशावादी मन अजय कांडर या कवीच्या ओळीतून जाणवतं :
पडू नयेही आपली माती कोरडी
आणि पडू नयेही भेगा मनाला
आपण फक्‍त 
नव्‍या पहाटेची वाट बघावी
अंधश्रद्धेविषयी बोलताना - पैठणला पाऊस पडावा म्हणून आमदार बाळासाहेब पवार यांनी लाखो रूपये खर्च करून यज्ञ केला, हाच पैसा शेतकऱ्यांसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी खर्च केला असता तर असा विषय घेऊन लेखकाने ‘मनोहर’ मध्ये लेख लिहिला. इतकंच नाही तर नाशिकजवळ असलेल्या त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी प्रकरण समजून घेण्याकरता काय काय केलं, तिथलं अज्ञानाला खतपाणी घालणारं अर्थकारण समजून घेताना लेखक अस्वस्थ झाला. धर्म, परमेश्वर याविषयी लेखकानं केलेलं चिंतन वाचून त्यावर विचार करायला हवा असं आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत लेखकाला घडलेलं समाजाचं दर्शन त्यानं आपल्या लेखणीतून मांडलं आहे. ते चित्र अर्थातच खूप विदारक आहे. जात मानणाऱ्यांना माणूस कळालेला नसतो हे वाक्य बेचैन करून गेलं. तसंच आणीबाणीच्याही काळाची नोंद लेखकाने घेतली आहे. विचार मेले की स्वातंत्र्य संपतं असं म्हणणाऱ्या दुर्गा भागवत यांच्या सहवासानं लेखकाला सत्याची कास धरून जगणाऱ्या रणरागिनीचं रूप त्या वेळी दिसलं. 
गवतात उगवलेली अक्षरं यातले दोष अगदी ठरवून दाखवायचेच झाले तर ते अगदीच नगण्य आहेत, उदाहरणार्थ, काही वेळा प्रसंगांची पुनरावृत्ती झाली आहे. तसंच काही वेळा किरकोळ टायपोज दिसतात. पान क्रमांक १८२ वर भांगार असा शब्द आहे, तो शब्द भांडार असा असायला हवा. त्यानंतर लेखकाची पत्नी गेली २७ वर्षं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत अध्यापनाचं काम करते आहे असं म्हटलंय. इथे काळ तपासायला हवा. आहे च्या ऐवजी कदाचित करत होती किंवा होत्या असं म्हणायला हवं. लिखाण कदाचित कोरोनापूर्व काळात पूर्ण केलेलं असलं, तरी संपादकीय नजर टाकताना ते अपडेट व्‍हायला हवं होतं असं वाटतं.
प्रकाशनापूर्वीच माझ्या हातात ‘गवतात उगवलेली अक्षरं’ हे पुस्तक पडलं आणि मी ते लगेचच वाचलं. या पुस्तकाला सदा डुंबरे यांची प्रस्तावना लाभली आहे. कोरोनानं सदा डुंबरेंसारखा एक सच्चा पत्रकार मित्र लेखकापासून/आपल्यापासून हिरावून घेतला. हे पुस्तक सदा डुंबरे या आपल्या मित्राला लेखकानं अर्पण केलं आहे. ‘गवतात उगवलेली अक्षरं’ हे पुस्तक वाचकांची प्रतीक्षा करत उभं आहे. 
‘गवतात उगवलेली अक्षरं’ का वाचावं – माणूस म्हणून मूल्यांची रुजवणूक कशी होते हे बघाण्यासाठी, तत्वांना सोबत घेऊन ताठ मानेनं कसं जगता येतं हे अनुभवण्यासाठी, आपलं आणि इतरांचं जगणं समृद्ध करण्यासाठी अशी पुस्तकं वारंवार वाचली पाहिजेत. महावीर जोंधळेंसारखी माणसं आपल्या जगण्याला बळ देतात, योग्य दिशा दाखवतात, आपल्या जाणिवा प्रगल्भ करतात. 
जरूर वाचा – गवतात उगवलेली अक्षरं – लेखक महावीर जोंधळे – प्रकाशक मनोविकास प्रकाशन.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.