रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा
रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा
दोनच महिन्यांपूर्वी मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेलं ‘रॉ’ हे पुस्तक मला मनोविकासच्या आशिश पाटकरनं भेट दिलं. पुस्तक बघूनच वाचण्याची उत्सुकता वाढली होती. ‘रॉ’ म्हणजे 'रिसर्च अँड अॅनेलेसिस विंग'! ‘रॉ’ म्हणजे भारताची गुप्तचर संस्था! इतकंच ‘रॉ’ बद्दल ठाऊक होतं. आणखी काही किरकोळ माहिती असलीच तर ती चित्रपटांतून दाखवलेली! काही दिवसांपूर्वी पाहिलेला आलिया भटचा 'राझी' हा चित्रपट त्यातलाच! चित्रपटापेक्षाही प्रत्यक्षात वास्तवाचा थरार खूपच वेगळा होता.
आपल्यासमोर आलेलं ते सत्य आणि न आलेलं काय? असे प्रश्न या पुस्तकानं उभे केले. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांमध्ये खरंच आपल्या देशात काही घडलं नाही का? पाकिस्तानबाबत आपले निर्णय, आंतरराष्ट्रीय धोरण, संरक्षणव्यवस्था, लष्करीसाहित्याची खरेदी, भारत-पाकिस्तान फाळणी, पंजाब आणि काश्मीरमधला दहशतवाद अशा अनेक प्रश्नांबाबत निरनिराळ्या प्रकारचे लेख वाचून मनात संभ्रमावस्था तयार होते. अशा वेळी आपला देश, आपल्या देशानं या ७० वर्षांत काय काय केलं ही बाजूही भक्कमपणे आपल्याला ठाऊक असणं गरजेचं असतं. रॉ सारख्या संस्था आपल्या देशाविषयीचा अभिमान, कार्य याबद्दल आपल्याला सजग करतात. पण आपल्याला त्याबद्दल फारशी माहितीच नसते. त्यामुळेच 'रॉ' या संस्थेची निर्मिती, तिचा इतिहास, तिचं काम, तिच्या कामातली जोखीम हे सगळं सगळं रवि आमले यांच्या ‘रॉ’ या पुस्तकातून वाचकांच्या समोर यायला मदत झाली आहे.
'रॉ’ या पुस्तकाचे लेखक रवि आमले हे लोकसत्तेमध्ये वरिष्ठ संपादक म्हणून कार्यरत होतेच, शिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा यांसारख्या अनेक प्रथितयश वृत्तपत्रं, साप्ताहिकांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘रॉ’ या विषयावर त्यांना लिहितं करण्यात मनोविकासचे अरविंद पाटकर यांचा मोठा हात आहे. त्यामुळे रवि आमलेबरोबरच अरविंद पाटकर यांचेही मनापासून खूप खूप आभार! सर्वसामान्य वाचकांसमोर असे विषय येणं खूप खूप आवश्यक आहे.
मला ‘रॉ’ हे पुस्तक खूप आवडलं, याचं कारण म्हणजे एखादी गुप्तचर संस्था कशी उदयाला येते, आपल्याकडे तिची बीजं कुठे सापडतात हे या निमित्तानं ठाऊक झालं. अगदी ऋग्वेद काळापासून वरूण हा कसा आद्य गुप्तचर प्रमुख मानला गेला, अर्थववेद, तैतरिय संहिता, महाभारत, कौटिल्याचा काळ या सगळ्या वेळी गुप्तचर संस्था कशा काम करत याविषयीचा इतिहास या पुस्तकातून वाचायला मिळतो. आज आपण हम्पी हे पर्यटनस्थळ म्हणून आपण या स्थळाला भेट देतो आणि ते साम्राज्य बघून अवाक होतो. मात्र इथल्या कृष्णदेवराय राजाच्या (हरिहर आणि बुक्क यांच्या नंतरचा राजा) 'अमुक्तमाल्यद' या तेलुगू भाषेतल्या ग्रंथातही गुप्तचर संस्थेच्या कामाविषयी लिहिलं आहे. राजाला अंतर्गत शत्रू आणि बाह्य शत्रू या दोन्हींची माहिती असणं कसं आवश्यक आहे आणि त्यासाठी ही संस्था कशी सक्षमपणे काम करणारी असावी लागते याचे दाखले दिलेले आहेत. पुढे चालून शिवाजी महाराजांच्या काळात बहिरजी जाधव नाईक यांच्या हेर असण्याबद्दलचे काही पुरावे मिळतात. या हेरांना जासूद असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतावर केलेलं आक्रमण आणि त्यांच्या राज्यात त्यांनी नेमलेले विविध हेर यांचाही उल्लेख या पुस्तकात येतो. ब्रिटिश काळात ठगी अँन्ड डेकॉईटी डिपार्टमेंट हा विभाग हेरगिरीचं काम करत असे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत पाकिस्तान वेगळे झाले. स्वतंत्र भारतात इंटेलिजन्स ब्युरो अस्तित्वात आलं. या आयबीचे पहिले प्रमुख संचालक होते - टी. जे. संजिवी पिल्लै आणि त्यानंतरचे बी. एन. मलिक! यानंतरच्या १७ वर्षांच्या काळात आयबी ही यंत्रणा खूप शक्तिशाली बनली. पण त्याच काळात चीननं भारतावर आक्रमण केलं आणि याची कल्पना आयबीला आली नव्हती. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आणि नव्यानं गुप्तचर यंत्रणेत बदल करण्याची गरज भासू लागली. यातूनच 'रॉ' चा जन्म झाला आणि याचे संचालक बनले रामनाथ काव!
'रॉ' च्या निर्मितीमागची कथा देखील खूप थरारक आहे. नैतिक-अनैतिक असं या कामात काहीही नसतं. 'एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर' असं आपण म्हणतो त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं हित बघणं जास्त महत्वाचं आणि त्यासाठी मग वाट्टेल ते डावपेच खेळावे लागले तरी हरकत नाही. रामनाथ काव यांची काम करण्याची पद्धत, त्यांची बुद्धिमत्ता काही प्रसंगातून समोर येते आणि एकूणच 'रॉ' मधल्या कामात किती मोठ्या प्रकारची जोखीम आहे हे लक्षात येतं. 'रॉ’ या पुस्तकातून आपल्या मनातल्या अनेक पूर्वग्रहांना सुरूंग लावण्याचं काम लेखकानं केलं आहे. पाकिस्तानच्या फाळणीकडे सर्वसामान्य माणूस कसा बघतो, पंचावन्न कोटीचं प्रकरण काय, महात्मा गांधींची हत्या आणि नथूरामचा दृष्टिकोन यांचे अर्थ आपण कसे लावतो या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची आपली दृष्टी हे पुस्तक वाचल्यानं बदलते. यात बांगलादेशाची निर्मिती, सिक्किमचा विजय, खलिस्तान, काश्मीर, श्रीलंका, नेपाळ यांच्या कामगिरीबाबतचे अनेक नवे पैलू आपल्यासमोर उलगडले जातात. यातलं गांभीर्य, बारीकसारीक तपशील, राजकारण, समोर आलेलं चित्र आणि पडद्यामागचं सत्य हे इतकं विलक्षण नाट्य आहे की विश्वास ठेवावा की न ठेवावा अशा गोष्टी समोर येत राहतात. गुप्तचर संस्थेचं काम हे कधी न संपणारं असून फक्त युद्धकाळातच नव्हे, तर शांततेच्या काळातही ते अव्याहतपणे कसं चालू असतं आणि त्याची त्या वेळी सुरू असण्याची आवश्यकता का असते हे लेखक आपल्याला सांगतो. कोणत्याही राष्ट्राच्या जीवनातला शांतताकाळ हा भविष्यातल्या संघर्षाच्या तयारीचा काळ असतो आणि या संघर्षातलं सगळ्यात महत्वाचं शस्त्र असतं ते माहितीचं! ही माहिती आपल्याकडे आधीच असणं आवश्यक असतं. चिनी युद्धनीतीज्ञ सन त्सू यानं इसवीसन पूर्व सहाव्या शतकात या माहितीचं महत्व लिहून ठेवलंय. सन त्सू यानं म्हणून ठेवलंय, 'आपण कोण आहोत आणि आपला शत्रू कोण आहे याची ओळख तुम्हाला असेल, तर १०० लढाया झाल्या तरी त्याच्या परिणामांची चिंता करण्याचं कारण नाही. पण तुम्ही स्वतःला नीट ओळखलं नसेल, ना शत्रूला नीट जाणलं असेल तर मात्र प्रत्येक युद्धात तुमचा पराजय हा ठरलेलाच समजा.’
आपल्या शत्रूंचीच नव्हे तर आपल्या मित्रांचीही बलस्थानांची आणि कमजोरीची माहिती त्यांच्या नकळत मिळवणं हे हेरांचं काम! 'रॉ’ च्या निर्मितीपासून ते आजपर्यंतचा 'रॉ'चा इतिहास आणि काम याचा एक धावता आढावा लेखक रवि आमले यांनी या पुस्तकात घेतला आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. मात्र यंत्रापेक्षाही, अत्याधुनिक तंत्रापेक्षाही मानवी हेरांचं, बुद्धिमत्तेचं महत्व किती मोठं आहे आणि त्याला पर्याय नाही हे सांगून त्यांनी या पुस्तकाचा शेवट केला आहे.
'रॉ’ हे पुस्तक वाचल्यानंतर एकूणच या थरारनाट्यातून मला बाहेर येताच येईना. मग मी रवि आमलेंचे इतरही लेखन शोधून काढण्याचा सपाटा लावला. त्यांचे इतरही लेख वाचले. नेताजींच्या मृत्युविषयी भाष्य करणारा लेख अनेक गुंत्यांची जाणीव करणारा वाटला. वास्तवाचं भान देणारं त्यांचं लेखन मला अतिशय भावलं, अंतर्मुख करून गेलं! आपण मनोरंजनपर, वैचारिक, गूढ-रहस्यमयी, ललित, कथा-कादंबर्या, कविता अशा अनेक प्रकारातली पुस्तकं वाचतो. यातून वेगवेगळ्या रितीनं समृद्धही होतो. मात्र ‘रॉ’ हे पुस्तक या सर्व पुस्तकांपेक्षा वेगळं आहे आणि या पुस्तकाच्या वाचनानं मेंदूला एक वेगळं खाद्य तर मिळणार आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपास घडणार्या घडामोडींकडे बघण्याची वेगळी नजरही लाभणार आहे. ‘रॉ’ हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकानं जरूर जरूर आणि जरूर वाचलंच पाहिजे.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment