मनोगत - कॅनव्हास
मनोगत
कॅनव्हास
शोध सृजनाचा ः जागतिक असामान्य शिल्पकारांपासून चित्रकारांपर्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एक विलक्षण प्रवास
कला म्हणजे काय? म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अतिशय विचार करायला लावणारा गहन प्रश्न! खरंच, कोणतीही कला आपलं जगणं व्यापून टाकू शकते का? कला म्हणजे अगदी अंतर्मनातून स्फुरलेले सृजनात्मक विचार, कला म्हणजे तल्लीन अवस्थेत घडलेली विलक्षण कृती! त्या कलेनं झपाटून टाकावं आपल्याला आणि त्या झपाटलेपणात सगळ्या अडचणींची आणि अडथळ्यांची फुलंच व्हावीत, असंच काहीतरी!
या भारून टाकणार्या कलेची ओळख कशी झाली असा प्रश्न मीच मला विचारला. खरं तर कलेचा पहिला उल्लेख भरतमुनींनी त्यांच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात केल्याचे उल्लेख सापडतात. वात्सायनाच्या कामसूत्र आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये कलेचे 64 प्रकार असल्याचंही नोंदवलं आहे. तसंच पाश्चिमात्य देशांमध्ये कौशल्याच्या साहाय्यानं केलेली निर्मिती म्हणजे कला अशी ढोबळमानानं कलेची व्याख्या केली आहे. पण आपल्याला कलेची जाणीव नेमक्या कोणत्या वयात झाली असावी? हा विचार मनात आला आणि एखाद्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅकप्रमाणे मला बालपणीचा काळ आठवायला लागला. आईनं दारासमोर काढलेली सुबक रांगोळी आणि तिनं रेडिओवर लावलेली भक्तिगीतं, सकाळच्या प्रसन्न वातावरणात सात्विक भर टाकायची. भक्तिगीतांच्या सुरांमधून उमटलेल्या असंख्य तरंग लहरी आणि तांबूस-गुलाबी रंगात न्हालेली ती सकाळ सूर्याच्या कोवळ्या किरणांच्या साथीनं अधिकच प्रसन्न व्हायची.
माझ्या बालपणी किशोर, ठकठक, चंपक, अमृत, किशोर, कुमार आणि चांदोबा अशी अनेक मासिकं मला वाचायला मिळायची. विशेषतः चांदोबा वाचायला जेवढं आवडायचं तितकंच त्यातली चित्रंही खूप आवडायची. चांदोबामधला वेताळ, त्यातल्या अदभुतरम्य साहस कथा, त्यातली भोळी, कजाग आणि भांडकुदळ पात्रं, त्यातली लोभस राजकन्या आणि राजकुमार, यांच्या गोष्टी वाचणं म्हणजे एक विलक्षण दृश्य अनुभवच असायचा. याच्या जोडीलाच आईनं केलेल्या आणि शोकेसमध्ये ठेवलेल्या आकर्षक सजावटीच्या वस्तू मनाला आकर्षित करत. आई स्वच्छतेची भोक्ती असल्यानं स्वयंपाकघरातले सगळे पितळी डबे महिन्यातून एकदा घासायला काढत असे. तिनं चिंच आणि मीठ लावून सोन्यासारखे लखलखीत केलेले आणि उन्हात कडकडीत वाळवलेले डबे पुन्हा रॅकमध्ये उतरत्या क्रमानं लावणं हा देखील एक देखणेबल कार्यक्रम असायचा. घरातलं वातावरण बर्यापैकी धार्मिक होतं. त्यामुळे घरातल्या बागेत वेगवेगळ्या सीझनमध्ये येणारी स्वस्तिक, कन्हेर, जास्वंद, गुलाब आणि मोगरा अशी अनेक फुलं सकाळच्या वेळी तोडून त्या फुलांचे घरात असलेल्या देवांच्या तसबिरीसाठी हार करणं, या कामातही मला चांगलंच कसब प्राप्त झालं. नवरात्रीमध्ये देवघराला रंग देण्याचं कामही मी आणि माझा भाऊ खूप आनंदानं करायचो. देवघराच्या भिंतीवर रंग कुठला द्यायचा, ऑईलपेंट मारताना ब्रश कसा चालवायचा, बॉर्डर कुठली शोभून दिसेल यासारख्या अनेक गोष्टी आणि त्यातली तंत्रंही अनुभवातून आणि सरावातून आम्ही शिकलो. त्यातूनच रंगसंगती बर्यापैकी कळत गेली. या सगळ्या वरवर साध्या वाटणार्या गोष्टी माझ्यासाठी पोषकच ठरल्या असाव्यात. घराची सजावट असो, वा रंगसंगतीचा मेळ या गोष्टी मला बर्यापैकी जमायला लागल्या होत्या.
आमच्या घरी एक रेकॉर्ड प्लेअर होता. आम्ही भावंडं त्या रेकॉर्ड्सची मूळ कव्हर्स खराब होऊ नयेत यासाठी ब्राऊन पेपर आणून घरी कव्हर्स बनवायचो. रेकॉर्ड्ससाठीची कव्हर्स असो, वा पुस्तकाची कव्हर्स घालणं असो, त्यासाठी आई किंवा मोठ्या भावाची मदत कधी घ्यावी लागलीच नाही. दिवाळीच्या वेळी भावाबरोबर चिखलामातीनं केलेला किल्ला आणि त्यावरची सजावट यात चार-आठ दिवस जायचे. तोही कदाचित वास्तुरचनेचाच छोटासा प्रयत्न असायचा. किल्यातले खंदक, त्यातलं पाणी, त्यातनं फिरणार्या कागदी बोटी, बोगदे असं बरंच काही काही त्या वेळी केलेलं असायचं, जे मनाला आल्हाद देणारं असायचं! त्या वेळी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत व्यापार नावाचा खेळ खेळत असू. या खेळात खोट्या पैशांची देवघेव मोठ्या प्रमाणात करावी लागे. त्यामुळे खेळातल्या नोटा लवकर खराब होत. अशा वेळी आम्ही जुन्या वह्यांचे पुठ्ठे घेऊन नोटाच्या आकारात ते कापून त्यावर नोटा चिटकवत असू. तसंच हा व्यापार इंग्रजीमधून विकत मिळाल्यामुळे मग त्याचं मराठीकरण करून तो आख्खा पट इंग्रजीपटाप्रमाणे चित्रं काढून, मराठीत लिहून आम्ही आमची चित्रकारी दाखवत असू.
त्यानंतर मग खर्या अर्थानं कलेची जाणीव अधिक जोपासली गेली, ती शाळेत जायला लागल्यावर! मग शाळेतला चित्रकला विषय आठवला आणि विषय शिकवणार्या हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाच्या चित्ररेखा मेढेकर या बाईसुद्धा! त्यांची लांबसडक बोटं फळ्यावर एखादी ताण घेतल्यागत सफाईदारपणे फिरत आणि बघता बघता एक सुंदर चित्र नजरेला पडत असे. पण प्रत्यक्षात चित्रं काढताना आमची गाडी एकाच स्वरावर अडकून पडायची. पण बाईंमुळे मला चित्रकलेबद्दलची आस्था निर्माण झाली. शाळेत बर्यापैकी मूळ रंग, दोन रंगांमधून तयार होणारा तिसरा रंग, रंगचक्र, शीत रंग, उष्ण रंग याबरोबरच मुक्तहस्त चित्र, निसर्ग चित्र, स्थिर चित्र हे कळायला लागलं होतं. त्यात मजाही यायची. आम्ही चित्रकलेच्या तासाची आतुरतेनं वाट बघत असू. मग त्याच वयात घरीच दिवाळी, संक्रांत, नववर्षशुभेच्छा, वाढदिवस अशा अनेक प्रसंगांसाठी भेटकार्ड्स बनवण्याचा नाद लागला. घरातून कौतुक व्हायचं, पण इयत्ता आणि वय वाढायला लागलं आणि चित्रकलेची ओळख तिथेच थांबली. शाळेत असताना कलेशी संबंध, चित्रकलेच्या एलिमेंटरी-इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या परीक्षा, कॅम्लिनच्या चित्रस्पर्धा, इतकाच मर्यादित राहिला.
अशा एक ना अनेक गोष्टी! तेव्हा या गोष्टींना कला जाणीव वगैरे म्हणतात हे मला कळलं नव्हतं. पण आज मात्र त्या गोष्टींनी आपल्याला काय काय दिलं हे मात्र नक्कीच जाणवतं. त्यामुळेच आज कोणतीही कला आणि त्या कलेकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करण्याचं काम मात्र माझं मन अव्याहतपणे करत असावं. नंतरचा प्रवास मात्र खूप वेगानं झाला. मधल्या अनेक वर्षांत चित्रं, कला, संगीत किंवा अनेक गोष्टी बाजूलाच पडल्या. वाचन मात्र अधूनमधून चालू असे. अशा प्रवासातच अनेक विषयांवरचे लेख, कथा, कविता, गझल लिहिणं चालू होतं. पण ते स्वतःपुरतं आणि बरोबरीच्या मित्रमैत्रिणींना ऐकवण्यापुरतं किंवा एखाद्या मासिकात, वर्तमानपत्रात वा दिवाळी अंकात लिहिण्यापुरतं!
त्यानंतर मधली अनेक वर्षं वेगवेगळ्या चढउतारांमधून गेली आणि एके दिवशी अचानक अच्युत गोडबोले या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या अतिशय प्रसन्न आणि उत्साही व्यक्तीबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या एका कार्यक्रमानिमित्त ओळख झाली. त्या ओळखीतून संवाद वाढला आणि त्यातूनच एकमेकांच्या आवडीनिवडी कळत गेल्या. त्यांनी माझ्या अनेक गोष्टी आणि कविता वाचल्या. माझं मनापासून कौतुकही केलं. त्याचबरोबर मी त्यांना त्यांच्या लिखाणात मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला. सुरुवातीला सहजपणे होकार दिलेला तो प्रस्ताव माझ्यासाठी एका मोठ्या जगाचं दालन उघडवणारा ठरणार आहे याची मला त्या क्षणी खरोखरंच कल्पना नव्हती. त्यांच्याबरोबर काम करताना एकीकडे किमयागारमधले वैज्ञानिक, तर दुसरीकडे झपूर्झातले साहित्यिक, तिसरीकडे अर्थातमधले मार्क्सपासून केन्सपर्यंतचे अर्थतज्ज्ञ समोर येऊन माझ्याशी अच्युत गोडबोले यांच्या शैलीदार लिखाणामधून बोलायला लागले. कॉलेजात शिकताना इकॉनॉमिक्स विषय नकोसा वाटणारी मी आता बँका, महागाई आणि जीडीपी यांच्यात रस घ्यायला लागले. विज्ञानाची आणि गणिताची मला वाटणारी भीती तर किमयागार आणि गणिती या पुस्तकांनी घालवलीच.
एके दिवशी अच्युत गोडबोले यांनी व्हॅन गॉगबद्दल सहजपणे बोलायला सुरुवात केली. माझ्यासाठी ते नावही अपरिचित होतं आणि मी लौकिकार्थानं चित्रकलेची विद्यार्थिनीही नव्हते. पण त्यांनी सांगितलेलं व्हॅन गॉगचं आयुष्य मात्र मी विसरू शकले नाही. ते ऐकून एक प्रकारचा अस्वस्थपणा मनाला भिडून गेला. त्या वेळी अच्युत गोडबोले यांनी आपण कधीतरी या चित्रकारांवर लिहू असं मोघम बोलूनही दाखवलं. मी या विषयानं अधिक भारावले होते. त्याच वेळी ‘लस्ट फॉर लाईफ’ वाचलं. पण पुढच्या लिखाणाच्या आणि पुस्तकांच्या गर्दीत व्हॅन गॉग आणि पिकासो या जगविख्यात चित्रकारांवर लिहून काढलेली छोटी टिपणं तशीच कुठेतरी पडून राहिली.
12 ऑक्टोबर 2014 या दिवशी पुण्यात ‘झपूर्झा’ या साहित्यावरच्या दोन भागातल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि लोकसत्ताचे ज्येष्ठ माजी संपादक आणि पत्रकार, लेखक, विश्लेषक कुमार केतकर यांनी ‘ज्याप्रमाणे अॅसिमॉव्हनं इंग्रजीत अनेक विषयांत काम करून ठेवलंय, त्याचप्रमाणे अच्युत आज जगभरातलं ज्ञान मराठी वाचकांसमोर आणण्याचं काम करतोय’ असं म्हटलं. त्यांनी पाश्चिमात्य जगातलं अनेक भाषांमधलं आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्या विषयांवर लिहिलंय ते विषय सोडून आणखीनही अनेक विषयातलं ज्ञान अच्युत गोडबोले यांनी मराठीतून आणावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्याच क्षणी अच्युत गोडबोले यांनी आपण अॅसिमॉव्हपुढे आपण कोणीच नसलो, तरी येत्या काही दिवसांत आपण विदेशी साहित्याबरोबरच पाश्चात्य जगातली चित्रकला, चित्रपट, संगीत या सगळ्या विषयांवर लिहिणार असल्याचं नम्रपणे जाहीर केलं. त्यानंतर पंधरा-वीस दिवसांतच त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी त्यांना पाश्चात्य शिल्पकार अिाण चित्रकार यांच्यावर लिहायचं असून मी त्यात सहलेखक म्हणून त्यांच्याबरोबर सामील व्हावं असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. माझ्यासाठी तो क्षण खूपच आनंदाचा होता. पण मी चित्रकलेचं कुठलंही फॉर्मल शिक्षण घेतलेली विद्यार्थी नसल्यामुळे मी या पुस्तकाला न्याय देऊ शकेन का? तसंच अच्युत गोडबोले या माणसाइतकी बुद्धिमत्ता, विषयातलं मर्म जाणण्याची असोशी आणि अफाट स्मरणशक्ती आपल्याकडे आहे का? या प्रश्नांची उत्तर शोधताना मनात आलं की त्यांच्याबरोबर काम करत असताना आपल्यातली चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, थोडाफार असणारा कलात्मक दृष्टिकोन आणि लिखाणात थोडीफार भाषाशैली जपण्याचं असलेलं तंत्र यामुळे त्यांनी मला सहलेखनासाठी विचारलं असावं. माझ्यासाठी जसा हा आनंदाचा क्षण होता, तसंच खूप काही शिकण्याची संधी देखील असणार होती. कारण या पुस्तकाचं सगळं लिखाण करताना अनेक इंग्रजी पुस्तकं वाचावी लागणार होती. त्यातून हवं ते शोधावं लागणार होतं. थोडक्यात, मला खूप अभ्यास करायला मिळणार होता आणि तोही एका चांगल्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली!
अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मी गेली 9 वर्षं काम करते आहे. त्यामुळे त्यांची कामाची पद्धत खूप जवळून बघितली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंतच्या निर्मितीप्रक्रियेत त्यांच्याबरोबर काम करणं हा अतिशय आनंदाचा भाग असतो. एखादं पुस्तक लिहिताना त्यासाठी त्या विषयाशी संबंधित 100-120 पुस्तकं जमवणं, ती पुस्तकं वाचून त्यातल्या तज्ज्ञांशी चर्चा करणं, तसंच त्या विषयातली मूलतत्त्वं, त्या विषयाचा इतिहास आणि त्या विषयातल्या मुख्य नायकांची आयुष्य समजून घेणं अच्युत गोडबोले सातत्यानं करत असतात. त्यानंतर मग पुस्तकाचा कच्चा आराखडा करणं, त्यातले चॅप्टर्स, त्यात काय आणि किती सखोल असलं पाहिजे आणि त्यात काय टाळलं पाहिजे हे ठरवणं, लिहिताना साधी, सोपी आणि रंजक भाषा असली, तरीही दर्जाबाबत तडजोड नसणं, लिखाणाविषयीची चर्चा करणं हे सगळं आखताना ते खूप उत्साही असतात. पुस्तक पूर्ण होईपर्यंत त्यांचा उत्साह तसाच खळाळता असतो. त्यांच्यामुळे विषयाच्या मुळापर्यंत कसं जायचं आणि चिकाटीनं ते काम पूर्णत्वाला कसं न्यायचं हे मी शिकले. त्यांच्यात दडलेल्या शिक्षकानं माझ्यातली कौशल्यं आणि उणिवा दोन्हीही ओळखल्या. उणिवांवर बोट ठेवून इतरांना कमी लेखणं हे त्यांच्या स्वभावच नसल्यामुळे त्यांनी माझ्यातली कौशल्यं ओळखून ती कशी वाढतील यावरच सतत माझ्याशी चर्चा केली आणि अर्थातच त्याचा मला नेहमीच फायदा होत आला आहे. त्यांच्यामुळेच माझं इंग्रजीचं वाचन वाढलं आणि अनेक विषयांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर चर्चा करताना कामाकडे काम म्हणून न बघता त्यातलं सौंदर्य शोधत राहणं हा प्रवास किती आनंददायी असतो हे समजलं.
मग 5 नोव्हेंबर 2014 या दिवशी पाश्चात्य शिल्पकार आणि चित्रकार यांची आयुष्यं आणि त्यांच्या कलाकृती यावर लिहायचं एकदाचं ठरलं आणि आम्ही लगेचंच म्हणजे त्याच क्षणापासून कामाला सुरुवात केली. मग शोध सुरू झाला असे चित्रकार आणि शिल्पकार शोधण्याचा! माझी चित्रकार आणि लेखिका असलेली मैत्रीण डॉ. माधवी मेहेंदळे हिनं अनेक चांगले शिल्पकार आणि चित्रकार यांची यादीच मला फोनवरून धडाधड सांगितली. त्यानंतर माहीत असलेले आणि माहीत नसलेले सगळे चित्रकार आणि शिल्पकार एकाच वेळी आमच्या आसपास गोळा झाले. फक्त जगप्रसिद्ध आहेत म्हणूनच ते चित्रकार घ्यायचे नव्हते, तर त्यांचं आयुष्यही तितकंच मनाला चटका लावून जाणारं हवं होतं. त्यांच्या कलाकृतीदेखील तितक्याच अजोड असायल्या हव्या होत्या आणि तो प्रवास उलगडून दाखवताना आम्हाला कळत-नकळत त्या सगळ्यांचं साक्षी व्हावं लागणार होतं. आमच्या समोर असलेल्या त्या प्रचंड अशा यादीमधून लिओनार्दो दा व्हिंची, मायकेलअँंजेलो, रेम्ब्राँं, पॉल सेजान, ऑग्युस्त रोदँं, पॉल गोगँं, व्हॅन गॉग, तुलूझ लॉत्रेक आणि पिकासो अशी ठळकपणे काही नावं आम्ही निवडली आणि मग पुस्तकांची शोधाशोध सुरू झाली. पुण्यातली सगळी वाचनालयं झाली, त्यानंतर मुंबईचं एनसीपीए आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अशा अनेक वाचनालयांतल्या पुस्तकांसाठी ‘पुणे ते मुंबई’ वार्या सुरू झाल्या. तिथली ती पुस्तकं बघून आम्ही अक्षरशः खजिना मिळाल्यासारखे वेडावून गेलो. कधी एकदा लिहून होईल असं मग वाटायला लागलं.
मग लिखाण सुरू झालं. आम्ही आपसांत ठरवलेल्या वेळात फोनवरून कधी, तर कधी प्रत्यक्ष भेटून चर्चां सुरू केल्या. पुस्तकाचा आराखडा तयार झाला आणि मग मायकेलअँंजेलोपासून ते पॉल सेजानपर्यंत आणि लिओनार्दो व्हिंची पासून तुलूझ लॉत्रेकपर्यंत सगळे कलावंत आमच्याशी मूकपणे संवाद साधायला लागले. त्यांच्या कलाकृती अभ्यासताना अवाक् व्हायला झालं. त्यांचं विलक्षणपण त्यांच्या भव्यदिव्य निर्मितीतून हळूहळू कळायला लागलं होतं. मग त्या कलाकृतींना पोषक असणारा आणि नसणारा तो काळ, ते देश, तिथली परिस्थिती, ती माणसं, ती युद्धं आणि त्या वेळचे शासनकर्ते यांच्या अनुषंगानं शोध घेणं सुरू झालं. या लेखनप्रवासात त्या कलावंतांची वैयक्तिक आयुष्यं आणि त्यांच्या कलाकृतींचा प्रवास यांचा अनुभव हे शब्दातीत होतं. जगप्रसिद्ध चित्रकार पिकासो तर म्हणाला होताच, ‘माझी चित्रं हेच माझं आत्मवृत्त आहे’. किती खरं आहे त्याचं म्हणणं! एखाद्याचं काम हीच त्याची ओळख आणि तेच तर त्याच्या जगण्याचं सार असतं. शिवाय त्या कलाकाराला जाणून घेताना, त्याची कलाकृती निर्मित होत असताना त्या कलावंताचं अनेक अंगानं जगणं आपल्याला ज्ञात होतं जातं. खरं तर या कलावंतांमधल्या अनेकांचं जगणं इतकं भीषण आणि कष्टप्रद होतं की कल्पनेतही ते जगणं आपल्यासाठी अशक्यप्राय व्हावं!
अच्युत गोडबोले यांनी आत्तापर्यंत मूलभूत विषयांना स्पर्श करणारी 500ते 600 पृष्ठसंख्या असलेली अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांना ते सहजशक्य आहे. पण मी एवढं मोठं आव्हान पहिल्यांदाच स्वीकारलं होतं. मदत करणं वेगळं आणि बरोबरीनं तेवढंच ताकदीचं इंद्रधनूष्य पेलणं वेगळं! पण आजपर्यंत बरोबर केलेल्या कामामुळे कदाचित आपण हे करू शकतो या आत्मविश्वास आला असावा. तसंच अच्युत गोडबोले सुरूवातीपासून ते शेवटपयर्ंत कशा रीतीनं काम करतात हे खूप जवळून अनुभवलं होतं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर काम करताना ते कसं केलं पाहिजे हे माहीत होतं. शिवाय ते सतत बरोबर असणार होतेच आणि सगळ्यात शेवटी कलेचा इतिहास आणि त्यातले त्या त्या काळातले कलावंत हेच इतके विलक्षण होते की त्यांनी अक्षरशः त्यांच्या विश्वात मला खेचून घेतलं.
सदर पुस्तकाचं लिखाण सुरू असताना कधी आम्ही मायकेलअँंजेलोच्या साथीनं डेव्हिड बनवताना त्याचे साक्षीदार झालो, तर कधी लिओनार्दोच्या मोनालिसाच्या हास्यात स्वतःच्या जीवनाचे अर्थ शोधत राहिलो. कधी व्हॅन गॉगच्या चित्रातले गहिरे रंग बघताना कातर झालो, तर कधी रेम्ब्राँंच्या चित्रातला उजळ प्रकाश बरोबर घेऊन उत्साहानं अदृश्यपणे प्रवास अनुभवत चालत राहिलो. कधी लॉत्रेकच्या आयुष्याची उपेक्षा सहन न होऊन काही क्षण निराशेच्या दारी गेलो, तर कधी पॉल सेजान होऊन आशेचा दीप तेवत ठेवलाच पाहिजे या निष्कर्षाप्रत आलो. कधी पिकासोच्या नव्या वाटेवरचे साक्षीदार झालो, तर कधी रोदँंंची अचाट, भव्य अशी अनोखी शिल्पं बघून रोमांचित झालो. कधी मोनेच्या प्रसन्न टवटवीत चित्रकृती पाहून हरखून गेलो, तर कधी गोगँंंच्या अनोख्या रंगलेपन पद्धतीच्या सोबतीनं निसर्गात मनसोक्त न्हालो. कधी हेन्री मूरच्या अमूर्त शिल्पात गुंतून गेलो, तर कधी साल्वादोर दालीच्या बरोबर स्वप्ननगरीत जाऊन मनसोक्त भटकून आलो. एकूणच हा प्रवास खूप विलक्षण आणि चित्तवेधक होता.
या चित्रकारांबरोबर आणि शिल्पकारांबरोबर असताना कितीतरी गोष्टी समजत गेल्या. लिओनार्दोला निसर्गाची फार लुडबूड चित्रात आवडत नसे, तर सेजान आणि टर्नर यांनी निसर्गचित्रातच स्वतःला वाहून घेतलं. पॉल गोगँं आयुष्यातली शांती शोधण्यासाठी ताहितीसारख्या निसर्गरम्य बेटावर गेला खरा, पण निसर्गातल्या रंगांची मनमानी झुगारून ‘मला हवा तसा निसर्ग मी रेखाटेन’ असं तो निसर्गाला ठणकावून सांगत राहिला. मायकेलअँंजेलोसारख्या शिल्पकारानं ओबडधोबड दगडातून शिल्पं जिवंत केली, तर लिओनार्दोनं शिल्पं करण्यातल्या मर्यादा दाखवून दिल्या. पिकासोनं टाकाऊ वस्तूंमधूनही चित्रं किंवा शिल्पं कशी साकारता येतात हे दाखवून दिलं, तर व्हॅन गॉगसारख्या मनस्वी चित्रकारानं आपल्या चित्रांतून वेगळंच अनोखं सोन्यासारखं विश्व उभं केलं. रोदँंची शिल्पं जगाचा विरोध न जुमानता प्रेमाची हळुवार भावना मनात पेरून गेली.
शिल्पकार आणि चित्रकार यांची आयुष्यं आणि त्यांच्या कलाकृती यावर लिहिताना आम्हाला चित्रकलेच्या प्रवाहातले विविध प्रवाह, संकल्पना आणि इझम्स याही गोष्टी कळत गेल्या. आम्हाला समजलेल्या या संकल्पना वाचकानांही कळाव्यात, त्यांच्याबरोबर त्या शेअर कराव्यात या द़ृष्टीनं आम्ही वाचकांसमोर अतिशय मोजक्या शब्दांत कलेचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला आहे. हा इतिहास परिपूर्ण नक्कीच नाही याची आम्हाला कल्पना आहे. या पुस्तकाच्या रचनेत सुरुवातीलाच हा इतिहास संक्षिप्त स्वरूपात येणं आवश्यक होतं, पण त्याचबरोबर तो सुरुवातीला आल्यास वाचक कंटाळतील का असाही प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळेच आम्ही सविस्तर लिहिलेला कलेचा इतिहास संक्षिप्त करून अतिशय मोजक्या शब्दांत शेवटच्या भागात मांडला आहे. कारण कलाकारांना समजून घेताना त्या वेळची परिस्थिती, तो काळ, ती युद्धं, त्या वेळची माणसं, संस्कृती अशा अनेक गोष्टी समजल्या तर पुस्तक समजून घेण्याचं भान वाचकांना मिळेल असं आम्हाला वाटलं. जागतिक कीर्तीच्या कलाकारांचा हा इतिहास वाचकांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा वाटते. तसंच वेगवेगळे देश आणि त्यातले कलाकार, ती ठिकाणं, त्यांच्या कलाकृती या सगळ्यांची नावं त्या त्या देशांच्या उच्चाराप्रमाणे देण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकात केलाय. पण काही प्रसिद्ध नावं वाचकांना सोयीची वाटावीत म्हणून इंग्रजी उच्चारांप्रमाणेच ठेवली आहेत. हे पुस्तक लिहिताना ज्याप्रमाणे अनेक वाचनालयातून आम्हाला अनेक पुस्तकांचे संदर्भ मिळाले, त्याचप्रमाणे बीबीसी आणि यू-ट्यूबवरच्या अनेक फिल्मसही बघून अभ्यास करता आला. जवळजवळ 100-120 इंग्रजी भाषेतली पुस्तकं या लिखाणासाठी उपयोगी पडली.
या पुस्तकात मायकेलअँंजेलेा, लिओनार्दो दा व्हिंची यांनी केलेल्या काही कविता तसंच अनेक चित्रकारांच्या चित्रकृतींवर नामवंतांनी केलेल्या कवितांच्या ओळी सामील केल्या आहेत. पण पुस्तकाची मराठी भाषा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ओघवती असण्याच्या दृष्टीनं त्या कविता इंग्रजीतून न देता तिचा आम्ही मराठीतून अनुवाद केला आहे. वाचकांच्या वाचनात भाषेचा तो ओघ तसाच राहावा आणि वाचताना कुठेही अडसर येऊ नये या हेतूनं आम्ही जाणीवपूर्वक मराठीचा वापर केला आहे. त्या त्या भाषेचं खरं तर वेगळं सौदर्य असतं, त्यामुळे त्या त्या कविता इंग्रजीतून जेवढ्या सुंदर वाटतील, तितक्याच त्या मराठीतूनही व्यक्त व्हाव्यात हा प्रयत्न आम्ही कसोशीनं केला आहे. तसंच काही ठिकाणी आमच्याही मनात काही ओळी उमटल्या आणि त्या त्या जागी त्या आपली जागा पटकावून बसल्या. या पुस्तकात नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, वसंत बापट, सुरेश भट या कविश्रेष्ठांच्या कवितेच्या ओळी समर्पक ठिकाणी आपलं स्थान घेऊन बसल्या आहेत, पण त्याचबरोबर माझा मित्र वैभव देशमुख याच्याही काव्यपंक्तींनी बहार आणली.
तसंच या पुस्तकात आम्ही विदेशी विशेषतः युरोप खंडातले कलाकार निवडले आहेत. याचं कारण पाश्चात्य ज्ञान मराठीतून आणावं असा उद्देश त्यामागे प्रकर्षानं होता. अन्यथा भारतात प्राचीन काळी कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन किती विकसित होता हे वेरूळ, अजिंठा आणि खजुराहो इथली शिल्प-चित्र पाहून कळतं. वेरूळ आणि खजुराहो इथली शिल्पं आणि त्यातली प्रमाणबद्धता, त्यातलं सौंदर्य, त्यातलं वैविध्य बघितलं तर अवाक् व्हायला होतं. वेरूळचं कैलासलेणं प्रचंड मोठ्या डोंगरातून कोरताना ती जागा निवडणं, आपल्याला काय निर्माण करायचंय याचं प्लॅनिंग, तो आराखडा, त्याची तंत्र आणि ती दूरदृष्टी कशी असेल याचा केवळ विचारच मनाला स्तिमित करतो. तीच गोष्ट चित्रकलेच्या बाबतीतही आहे. भारतातले अनेक शिल्पकार आणि चित्रकार यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. त्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण या पुस्तकापासून स्फूर्ती घेऊन कोणी भारतीय चित्रकार आणि शिल्पकार यांचा प्रवास उलगडला, तर आमच्या या लिखाणाचं चीज झालं असं आम्हाला नक्कीच वाटेल. हे पुस्तक लिहिताना आम्ही विद्यार्थी होऊन शिकायचा प्रयत्न केला. आम्ही चित्रकार नसल्यामुळे कदाचित चित्रकाराच्या दृष्टीतून आम्हाला अनेक गोष्टी उमगल्या नसतील, जाणवल्या नसतील ही मर्यादाही आम्हाला मान्य आहे. पण आपल्याला जे समजलं, जे जाणवलं आणि जे सगळ्यांना समजावं असं आम्हाला तीव्रतेनं वाटलं, त्या भावनेतून आम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे यात काही त्रुटी असल्याच तर त्या आमच्या आहेत.
या पुस्तकावर काम करताना कला म्हणजे काय? जगताना कलेकडे गांभीर्यानं कसं बघावं? कला आपल्या जगण्यात कशी मिसळून जायला हवी, कलेमुळे प्रगल्भता कशी येते हे थोडं थोडं कळालं. बालपणीचे अनुभव माझ्या चिमुकल्या जगाला समृद्ध करणारे होते. पण त्याचबरोबर ते अनुभव माझ्यासभोवतीच फिरत होते. मागे वळून बघताना असं लक्षात येतं की माझा त्या वेळचा कॅनव्हासही खूप छोटा होता. आज हे पुस्तक लिहिताना या कलाविश्वातल्या असामान्य कलावंतांनी मला काय दिलं? याचा विचार करताना कळतं, की या कलाकारांनी माझ्या जगण्याचा कॅनव्हास क्षणात मोठा करून टाकला. आपल्या कुंचल्यांमधून रंगाचे जे स्ट्रोक्स त्यांनी माझ्या मनःपटलावर उमटवले, त्यांनी माझ्या जगण्याला नवा आयाम मिळाला. या एवढ्या मोठ्या विश्वात आपण एका बिंदूपेक्षाही लहान आहोत आणि त्याचबरोबर या विश्वाची भव्यता, या कलावंतांमधली अमर्याद प्रतिभाशक्ती जाणवली. आपल्याला खूप शिकायचंय, खूप चालायचंय ही देखील जाणीव होत गेली. या पुस्तकानं या सगळ्या कलावंतांचं जगणं उलगडलं. त्यांच्या असामान्य कलाकृतींनी आम्हाला चकित करून सोडलं. त्यांच्या विक्षिप्तपणाच्या किस्स्यांनी त्यांनी विचार करायला भाग पाडलं. तर त्यांच्यातल्या चिकाटीनं आशेला कधीही नष्ट करता येत नाही हे दाखवून दिलं. कला माणसाला किती भरभरून देते हेही या प्रवासानिमित्त समजलं. कला तुम्हाला परफेक्शनकडे नेते. स्वतः कलाकार हा बाह्यदर्शनी अस्ताव्यस्त वाटत असला तरी त्याच्यातली कला मार्ग ऑर्गनाईज्डपणेच व्यक्त होते!
खरं तर आपल्या रोजच्याच जगण्याला कलेचा स्पर्श होत असतो, इतकी ती बेमालूमपणे आपल्यात मिसळली आहे. तिचा आपल्या आयुष्यात अचानक प्रवेश होतच नाही, तर ती बालपणापासून अलगद केव्हा स्पर्श करून गेली हे कळतही नाही. मला वाटतं कला ही निसर्गाची माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची देणगी आहे. इतकंच काय पण तिचं अॅप्रिशिएशन आपण करू शकतो ही तर त्याहूनही मोठी गोष्ट आहे. कला आपला स्पर्श करताना कधीच भेदभाव करत नाही. तिचा स्पर्श श्रीमंतालाही होतो, तर गरिबालाही! अनेक ठिकाणी रस्त्यावर अतिशय विपन्नावस्थेतले कलाकार रस्त्यावर राष्ट्रमाता हे प्रतीक घेऊन तर कधी अनेक थोर पुरुषांचे खडू किंवा रांगोळी यांच्या साहाय्यानं चित्र रंगवून ती कला लोकांपुढे साकारताना आणि त्यातून थोडेफार पैसे कमावताना दिसतात. या प्रसंगावरून ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ या वादाची आठवण झाल्याविना राहत नाही.
लेखक आणि समीक्षक असलेल्या थिओफिल गॉल्टियरनं आपल्या मनात काय दडलंय आणि आपल्याला काय वाटतं हे सगळं आपल्या साहित्यातून, संगीतातून, चित्रकलेतून अथवा शिल्पकलेतून कलाकारांनी व्यक्त केलंच पाहिजे असं अनेक कलाकारांच्या मनावर ठसवलं. आपली सर्जनशीलता, कल्पकता आणि मनाच्या आतून उफाळून आलेले विचार या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपली कलाकृती निर्माण केली पाहिजे; कुठलंही सामाजिक ध्येय समोर ठेवून नव्हे असंही त्यानं सांगितलं. यातूनच ‘कलेसाठीच कला (आर्ट फॉर आर्ट सेक)’ या संकल्पेनचा जन्म झाला. सौंदर्य व्यक्त करणं आणि ती कलाकृती जास्तीत जास्त सुंदर बनवणं याच हेतूनं त्या वेळचे कलाकार चित्रं काढत होते. चित्र रोजच्या जगण्यापासून अलिप्त असलं पाहिजे. ते रोजच्या जगण्याचं एक्स्टेन्शन नसावं असंही त्यांचं म्हणणं होतं. पण पुढे त्यानंतरच्या कलाकारांनी मात्र ‘सत्य हे सुंदरच असतं’ या मतावर ठाम राहात सत्य जसं दिसतं तसंच रंगवायचं ठरवलं. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि त्यांच्या जगण्यातलं दारिद्य्राचं कठोर वास्तव आणि मागासलेपण याचं स्वरूप चित्रांतून पुढे आणलं. कधी या चित्रकारांनी जगण्यातलं थेट वास्तव समोर आणलं, तर काहींनी वास्तवाचे चटके थोडा काळ का होईना दूर सारायचे असतील तर आपल्या चित्रातून केवळ सुंदरता, रम्यता आणि स्वप्नं दाखवणंच पसंत केलं. काहींनी आपण केलेल्या नियमांना चिकटून राहत ते कुंचल्यानं साकारणंच आपलं जीवनाचं ध्येय मानलं, तर काहींनी आपल्या मनातल्या अमूर्त भावनांना त्याच पद्धतीनं चितारलं. एकूणच कलेचं व्यक्त होणं त्या त्या काळानुसार आणि त्या त्या काळाचा परिणाम होऊन आपापल्या मनःस्थितीनुसार कलाकारांनी मांडलं. निसर्गात जेवढं वैविध्य आहे, तितकंच वैविध्य कलेच्या प्रकटीकरणात आहे हेही तितकंच खरं!
‘आपल्या भावना रेखा, रंग, ध्वनी किंवा शब्द यांच्या माध्यमातून व्यक्त केल्यानंतर तेच भाव पुन्हा निर्माण होणं म्हणजेच कला’ असं टॉलस्टॉयनं म्हणून ठेवलंय. म्हणूनच शिल्पकार आणि चित्रकार यांचं आयुष्य आणि कलाकृती यांची सफर करण्याच्या निमित्तानं घडलेल्या या प्रवासात आम्ही चिंब न्हाऊन निघालो. याचं कारण हे पुस्तक लिहिण्याचं ठरलं आणि आज हे पुस्तक पूर्णत्वास येताना आम्हालाही आश्चर्य वाटतं, पण हे 560 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक आम्ही अवघ्या 4 महिन्यांत पूर्ण केलं. त्यासाठी मात्र पहाटे पाच पासून ते रात्री 11-11.30 पर्यंत आम्ही त्यात आणि त्यातच बुडून गेलो होतो. इतकंच काय, पण रात्री झोपेतही कधी रेम्ब्राँं, तर कधी गोगँं, कधी रोदँंं, तर कधी व्हॅन गॉग येऊन चक्क बोलू लागत. थोडक्यात, चोवीस तास एका वेगळ्या जगातच आमचं वास्तव्य होतं. हे घडण्याचं खरं कारण या चित्रकारांचं जगणं आणि त्यांच्या असामान्य कलाकृतीं हेच आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी आम्हालाही झपाटून टाकलं होतं!
कलेचं आपल्याबरोबर असणं
एखाद्या कवितेसारखंच तर असतं
कला निर्माण करते आत्मीयता,
कला दूर करते परकेपणा
कला देते उमेद
कला घालवते एकलेपण आणि जपते निखळ मैत्र
कला बनते शिक्षक अन् अलगद सोडते बोट,
जगायला अन् श्वास घ्यायला शिकवते स्वतंत्रपणे
कला पसरवते आनंद आणि सुगंध
कला झपाटून टाकते अन्
व्यापून टाकते आपलं अवघं आयुष्य!
कलेच्या माध्यमातून व्यक्त होणं असतो एक जिवंत अनुभव
वैश्विक सत्याचा!
हे सारं घडतं ते केवळ कलेमुळं आणि म्हणूनच या ‘कॅनव्हास’वर, माझ्या प्रत्येक पावलावर मला साथ देणार्या त्या त्या क्षणांचा आणि प्रत्यक्ष भेटलेल्या, पुस्तकांमधून भेटलेल्या आणि आजपर्यंत साथसोबत करणार्या त्या त्या व्यक्तींचा हक्क आहे. म्हणूनच त्या सार्या क्षणांना आणि त्या व्यक्तींना मी हा ‘कॅनव्हास’ कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे.
आमचा हा ‘कॅनव्हास’ या शिल्प-चित्र अनुभवण्याच्या प्रवासात आमच्याबरोबर तुम्हालाही सामील करून घेण्यास उत्सुक आहे. आम्हाला खात्री आहे या ‘कॅनव्हास’ बरोबरची तुमची प्रवासयात्रा नक्कीच अद्भुत आणि रोमांचकारी होईल यात शंकाच नाही!
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Add new comment