आनंदाचे डोही.....प्रभू ज्ञान मंदिर पुणे

आनंदाचे डोही.....प्रभू ज्ञान मंदिर पुणे

तारीख
-
स्थळ
Prabhu Dnyan Mandir Pune

आनंदाचे डोही..... आज सिंफनीचा कार्यक्रम प्रभु ज्ञान मंदिरात संपन्न झाला. मीना प्रभु, किरण ठाकूर आणि त्यांची अख्खी टीम यांनी आमचं स्वागत केलं. खरं तर प्रभु ज्ञान मंदिराचा हॉल बघून मी इतकी सुखावले. आतली रचना, रंगसंगती, लॅम्पशेड सगळं काही इतकं आपलंसं वाटणारं आणि इतकं सुरेख की नजर हलत नव्हती. अपूर्व आणि मी तिथला व्यवस्थापक तरुण मयूर आणि इतर टीमची मदत घेत आमची व्यासपीठावरची बसण्याची व्यवस्था आणि तांत्रिक व्यवस्था नीटपणे केली. लोक यायला हळूहळू सुरुवात झाली.

आज इंग्लंडबरोबरची क्रिकेट मॅच, पुन्हा भरीस भर म्हणून पाऊस असं सगळं असतानाही सुरेखसा हॉल सुरेखशा रसिक श्रोत्यांनी भरून गेला. यमाजी मालकर, प्रभाकर भोसले, स्वाती देसाई, रूद्र, राजीव आणि शुभा तांबे, डॉ. प्रकाश शेठ, सरिता आव्हाड, अरविंद पाटकर, आणि अनेक मित्र-मैत्रिणी आणि फेसबुक फ्रेंड आले होते. फेसबुक मित्र डॉ. प्रशांत पाटील यांचं लिखाण मला खूप आवडतं. आज त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. खूप मस्त वाटलं.

विशेष म्हणजे कुंभ के मेले मे बिछडा हुआ भाई २० साल बाद मिलनेके बाद जो खुशी होती है, ती खुशी मला माझ्या भावाला - राजेश मंडलिक (आणि वहिनी विभा मंडलिक) यांना भेटून झाली. खरं तर रमा नाडागौडा या मैत्रिणीमुळे राजेशचा पत्ता लागला, त्यानंतर जयंत विद्वांस या लेखकाच्या पुस्तकप्रकाशनावेळी राजेशची पुनश्च भेट झाली. पण आज वहिनीबाईला घेऊन तो आला आणि मला सुखद धक्का दिला. (माझं वजन बर्‍यापैकी वाढल्यामुळे मी त्या धक्क्यानं अजिबात पडले बिडले नाही!) समोर सगळे आवडते लोक बसलेले, मीना प्रभु आणि किरण ठाकूर आणि नंदिनी देखील समोर होत्या. त्यांच्या वतीनं आम्हा सर्वांचं स्वागत झालं.

मीना प्रभु या पर्यटनावर लिहिणार्‍या दिग्गज लेखिका, त्यांची भाषा जेवढी सुंदर, तेवढ्याच त्याही! तसंच त्यांचं कायम प्रसन्न असणं, साधेपणा आणि माणुसकी यामुळे मी नेहमीच भारावून जाते. आज त्यांनी आम्हाला खूप सुरेख, वजनदार असे पितळी दिवे भेट दिले. दिवे मला नेहमीच आवडतात. ते दिवे बघून मला आशा भांड आणि त्यांच्याकडला दिव्यांचा संग्रह आठवला. शॉल, श्रीफळ, रोपं असं सगळं या स्वागतात आलं. मी त्या दिव्यातच गुंतली गेले होते. भानावर आले, तेव्हा सुरेख सुप्रिया (चित्राव) तितकंच सुरेख सूत्रसंचलन करण्यासाठी समोर आली होती. थोडी वेस्टर्न लूक धारण केलेली सुप्रिया काळ्या पेहरावात भारीच दिसत होती. तिचा आवाजही तितकाच गोड असल्यानं ऐकायला छान वाटत होतं. तिनं अपूर्वला व्यासपीठावर बोलावून क्यूआरकोड संदर्भात प्रेक्षकांना माहिती करून द्यायला लावली. त्यानंतर सिंफनीची निर्मिती प्रक्रिया, आम्ही एकत्र हे का लिहिलं याविषयी काही प्रश्न सुप्रियानं विचारले आणि मग प्रत्यक्ष सिंफनीच्या मैफिलीला सुरुवात झाली.

भरलेला आपल्या माणसांचा हॉल बघून आम्ही बोलते झालो. सलिल चौधरीचं छाया या चित्रपटातलं इतना ना मुझसे तू प्यार बढा हे मोत्झार्टच्या ४० क्रमांकाच्या सिंफनीवर बेतलेलं गाणं पडद्यावर झळकलं...प्रेक्षक आस्वाद घेत होते आणि आम्ही मोत्झार्ट, बीथोवन, मरियम मकेबा, बीटल्स, एल्व्हिस प्रीस्ले, मायकेल जॅक्सन पासून ते भारतीय संगीतकार सी. रामचंद्र ओ. पी. नैय्यर, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, किशोर कुमार अशा अनेकांचा प्रवास उलगडला आणि अनेक पाश्चात्य संगीताच्या रचना आणि हिंदी चित्रपट संगीतातले किस्से सांगितले! सिंफनीचा प्रवास कसा संपला कळलंच नाही. खरं तर सिंफनी लिहिताना आपण असा कार्यक्रम करू असा विचारही केला नव्हता. ज्या वेळी सिंफनी लिहून झालं, त्या वेळी कार्यक्रम करण्याचा किडा डोक्यात वळवळला आणि तो प्रत्यक्षात आकारालाही आला. अहमदनगर, नाशिक, पुणे अशा शहरांत झालेल्या सिंफनीच्या कार्यक्रमानं प्रेक्षकांना जेवढा आनंद दिला, तेवढाच तो मलाही मिळाला.

संगीत वैश्विक असतं, आपल्याला आयुष्यभर सोबत करतं, आपल्या आयुष्यात आनंद भरतं....खरंच, या संगीतसरींत भिजून जायला आज खूपच मजा आली. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांशी थोडक्यात का होईना भेटीगाठी झाल्या. सिंफनीवर स्वाक्षर्‍या झाल्या, सेल्फी आणि फोटो सेशनही झालं. त्यानंतर मीना प्रभु, किरण ठाकूर यांच्याबरोबर मेनलँड चायनामध्ये मस्त जेवण झालं आणि सगळ्यांना कार्यक्रम खूप आवडल्याच्या प्रतिक्रिया आठवत अपूर्व आणि मी समाधानानं घरी पोहोचलो. मीना प्रभु, किरण ठाकूर, प्रभु ज्ञान मंदिर टीम, आणि मी बोलावलेली माझी सगळी स्नेहीमंडळी प्रेमानं आली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार!

दीपा देशमुख, पुणे 

कार्यक्रमाचे फोटो