जीनियस आईन्स्टाईन - वयम दिवाळी 2015
काही लोक या जगात जन्माला येतात आणि जग बदलवून टाकणारं असं काही अचाट कार्य करून जातात की त्यांना आपण विसरूच शकत नाही. ही सगळी माणसं ज्यांना आपण युप्रवर्तक म्हणू ती अनेक क्षेत्रांत आढळतात! विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, गणित, शिक्षण, संगीत, कला आणि साहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यानं ठसा उमटवलेली ही माणसं जेव्हा आपल्याला पुस्तकातून भेटतात तेव्हा या सगळ्याच लोकांनी आपल्यावर - आख्ख्या मानवजातीवर किती उपकार करून ठेवलेत याची खात्री पटते.
आम्ही या सगळ्याच क्षेत्रातल्या मोजक्या निवडक लोकांवर ‘जीनियस’ या मालिकेतून लिहायचं ठरवलं आणि सगळ्यात आधी आमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती आली आणि ती होती ‘अल्बर्ट आईन्स्टाईन!’ कोण होता हा अल्बर्ट आईन्स्टाईन? अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ असलेला आईन्स्टाईन हा स्वातंत्र्य, न्याय आणि समता मानणारा एक पुरोगामी विचारवंत होता. आज आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत ओलांडून पुढेच जाता येत नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्राऊनियन मोशन यामधलं त्याचं योगदान हे मूलभूत होतं. या विश्वाची निर्मिती कशी झाली आणि त्याचं कार्य कसं चालतं अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आवश्यक असलेलं प्रचंड मोठं काम आईन्स्टाईननं पुढच्या पिढीतल्या शााज्ञांसाठी तयार करून ठेवलं. विज्ञानातल्या त्याच्या कार्याबद्दल त्याला नोबेल पारितोषिकानं गौरवलं. इतकंच नाही तर १००० वर्षामध्ये होऊन गेलेला ग्रेट माणूस म्हणूनही एका सर्वेक्षणातून मांडलं गेलं.
विज्ञानाच्या क्षेत्रात अदभुत क्रांती घडवणारा असामान्य बुद्धिमत्ता लाभलेला आइन्स्टाईन तुमच्याआमच्यासारखाच माणूस होता, हे त्याचं आयुष्य उलगडून बघितलं की लक्षात येतं. खरं तर जवळजवळ २२ वर्षं गबाळ्यासारखे काडे आणि निळी टोाी घातलेला एक माणूस प्रिन्स्टन- न्यू जर्सी इथल्या ११२, मर्सर स्ट्रीटवरच्या आाल्या घरातून खाली उतरून ‘इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स स्टडी’मध्ये जायला निघायचा. त्याचा तो अवतार बघून त्याला कोणीही चक्क बागेचा माळीच समजलं असतं. त्याचे उडणारे, विस्कटलेले पांढरे वाढवलेले लांब केस आणि तोंडातला तो पाईप - हे खूपच गंमतशीर दृश्य असायचं. पण हा कोणी साधा माणूस नव्हता. तो होता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ- अल्बर्ट आईन्स्टाईन!
आईन्स्टाईनची लहान बहीण माजा हिचा जन्म झाला त्या वेळी आईन्स्टाईनला त्याची बाहुलीसारखी बहीण दाखवण्यासाठी तिच्याजवळ नेलं. त्यानं जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा त्याला ती एखाद्या खेळण्यासारखीच वाटली. त्यानं लगेच प्रश्न केला, ‘‘मस्तच आहे. पण हिची हिच्यासारखीच छोटी छोटी चाकं कुठे आहेत?’’ त्याच्या निरागस बोलण्यानं मग सगळेच कौतुकानं हसले. जसजशी माजा मोठी होत गेली तसतशी ती आईन्स्टाईनची चांगली मैत्रीणही झाली.
आईन्स्टाईनला सांघिक मैदानी खेळ मुळीच आवडत नसत. मग खेळणं टाळण्यासाठी तो ‘आपल्याला खेळताना चक्कर येते, आपण खेळलो की खूप थकतो’ अशी वाट्टेल ती कारणं देत असे. उगाचंच इकडे तिकडे हुंदडण्यापेक्षा अल्बर्टला एकटं राहणं आवडे. या एकांतवासात तो चांगली पुस्तकं वाचत असे. शिवाय संगीत ऐकणंही त्याला मनापासून आवडायचं. संगीत आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी पूरकच होत्या. अभ्यास करता करता आईन्स्टाईन मध्येच उठून सरळ व्हायोलिन घेऊन वाजवत बसे आणि त्या तंद्रीत एकदम त्याचा अभ्यासात अडथळा आलेला प्रश्न सुटे. मग तो समोर कोणी नसलं, तर जोरदार आवाजात ‘अहाहा, मला उत्तर सापडलं. मला उत्तर सापडलं’ असं ओरडत फिरायचा. आईन्स्टाईनला पत्ते खेळण्यापेक्षा त्या पत्त्यांचा अनेक मजली बंगला बांधायला खूप आवडायचं.
एकदा सुट्टीच्या दिवशी हार्मान आणि पॉलीन यांनी अल्बर्टला लष्कराचं संचलन (परेड) दाखवायला नेलं. लहानपणी अल्बर्ट खूपच एकलकोंडा असल्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी नेल्यानं त्याचं बुजरेपण कमी होईल अशी आशा त्यांना वाटत होती. मैदानावर लष्कराचं संचलन सुरू झालं होतं. वाद्यांचे आवाज, शिस्तीत ऐटबाज पावलं टाकत चालणारे ते कडक गणवेष घातलेले सैनिक पाहून अल्बर्ट खुश होईल आणि टाळ्या पिटत ते दृश्य बघेल असं हार्मान आणि पॉलीन यांना वाटलं. पण झालं उलटंच. अल्बर्टकडे बघताच त्याच्या डोळ्यात आनंद दिसण्यापेक्षा त्यांना त्याच्या गोर्या गोबर्या गालावरुन न थांबता वाहताना अश्रू दिसले. अल्बर्टचे गाल लालेलाल झाले होते. त्या सैनिकांकडे पाहून अल्बर्ट स्फुंदून स्फुंदून रडायला लागला. त्याला कसंबसं शांत करायचा प्रयत्न करत हार्मान आणि पॉलीन त्याला घरी घेऊन आले. गणवेषधारी सैनिक पाहून त्याला भीती तर नाही ना वाटली ही शंका पॉलीनच्या मनात यायला लागली. पॉलीनचं वाटणं खरंही होतं. कारण कुठलाच चेहरा नसलेले आणि एखाद्या यंत्राप्रमाणे कवायत करणारे ते संघटित लष्करी सैनिक बघून अल्बर्टला प्रचंड भीती वाटली होती. पुढेही तो ही भीती मनातून कधीच पूर्णपणे घालवू शकला नाही.
एल्सानं आईन्स्टाईनच्या अभ्यासासाठी खास दोन खोल्यांची व्यवस्था राहत्या ठिकाणी केली होती. त्या खोल्यांमध्ये कामाव्यतिरिक्त कुठल्याही शोभेच्या वस्तू भिंतीवर किंवा इतरत्र आईन्स्टाईनला चालत नसत. त्या वस्तू म्हणजे अडगळ किंवा ओझ्यासारख्या आहेत असं तो म्हणे. गालीचे, भिंतीवर लटकवलेल्या तस्विरी, फ्लॉवरपॉट्स असं काहीही ठेवलेलं त्याला आवडत नसे. त्यामुळे या दोन खोल्या सोडून एल्सा तिला हवं तसं सुशोभन करत असे. आईन्स्टाईनच्या खाण्यापिण्याचीही उत्तम बडदास्त एल्सा ठेवत असे. त्यामुळे साहजिकच आईन्स्टाईनची तब्येत चांगलीच सुधारली. घराला नीटनेटकेपण आणि घरपण आलं. पण आईन्स्टाईनच्या अनेक सवयी एल्सा बदलू शकली नाही. आईन्स्टाईन आंघोळीसाठी आणि दाढीसाठी खूप स्वस्तातला साबण वापरत असे. आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही त्याची ही सवय त्यानं बदलली नाही. केस कापण्याचाही त्याला खूपच कंटाळा येई. त्यामुळे कित्येक महिन्यांनी तो केस कापायला जात असे. विज्ञानाचा विचार डोक्यात आला की त्याला स्थळकाळाचंही भान राहत नसे. एकदा तर आईन्स्टाईन आंघोळीसाठी गेला आणि बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही. शेवटी घाबरून एल्सा आणि त्यांची मुलगी मार्गो यांनी आरडाओरडा केला, तेव्हा आईन्स्टाईन बाहेर आला आणि त्यानं प्रश्नार्थक चेहरा केला. ‘तूच आत इतका वेळ काय करत होतास?’ असा प्रश्न केल्यावर आईन्स्टाईननं आपण टबातल्या पाण्यातच आकडेमोड करून एक गणित सोडवायचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. तसंच आपण टबमध्ये नसून आपल्या टेबलापाशीच बसलो आहोत असंही वाटल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकल्यावर मात्र एल्सानं कपाळावर हात मारून घेतला.
आईन्स्टाईनविषयी बर्याच (दंत)कथा सांगितल्या जात. त्यातली एक त्याचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारी होती. एल्सा स्वभावानं छानछौकी होती. तिला खरेदी करायला खूप आवडे. एकदा आईन्स्टाईनला घेऊन ती फर्निचरच्या एका दुकानात गेली आणि तिथे गेल्यावर तिला हे घेऊ का ते घेऊ असं झालं. आणि मग मोह न आवरल्यानं तिनं भराभर अनेक वस्तू घ्यायला सुरुवात केली. ती खरेदी करत असताना आईन्स्टाईन मात्र पाईप फुंकत शांतपणे दुकानात ठेवलेल्या सोफ्यावर बसला होता. सगळी खरेदी झाल्यावर भल्या मोठ्या रकमेचं बिल झालं. एल्सा भीतभीतच आता आपला नवरा इतर नवर्यांसारखा रागावतोय की काय या विचारानं बिल घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. आईन्स्टाईननं खिशातून चेकबुक काढलं आणि चेकवर सही करून तो चेक एल्साच्या हातात दिला. एल्साला खूपच आश्चर्य वाटलं. अखेर ती त्याला म्हणाली, ‘‘अरे, इतर नवरे आपल्या बायकोला खरेदी वरून रागावतात. आणि तू मात्र मला इतकं सगळं विकत घेऊनही जराही बोलला नाहीस आणि शिवाय किती मोठं बिल झालंय हेही बघितलं नाहीस.’’ त्यावर शांतपणे आईन्स्टाईन म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस, आपल्या बँकेच्या खात्यातून एकही पैसा जाणार नाहीत.’’ आता चकित होण्याची पाळी एल्साची होती. पण काहीच काळात आईन्स्टाईनचा तर्क तिच्या लक्षात आला. कारण ज्या चेकवर आईन्स्टाईनची स्वाक्षरी असणार होती. तो चेक कुठलाही दुकानदार वटवेलच कशाला? तो चेक बँकेत वटवण्याऐवजीतो फ्रेम करून दुकानात लावेल याची खात्री आईन्स्टाईनला होती!
१९२१ साली आईन्स्टाईनला ‘फ्रेंच प्यूर ला मेरीट’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याच वर्षी त्याला नोबेल पारितोषिकही मिळालं. त्यानंतर १९२५ साली कोपले पदक आणि रॉयल अॅस्ट्रॉनॉमिक सोसायटी ऑफ लंडनच्या वतीनं सुवर्णपदक देण्यात आलं. त्यानंतर रॉयल प्रशियन अॅकॅडमीतर्फे प्लँक पदक मिळालं. आईन्स्टाईनचा ऑस्लो इथे गौरवसमारंभ आयोजित करण्यात आला, तेव्हा तिथल्या शिष्टाचाराप्रमाणे सगळेच उपस्थित मान्यवर सुटाबुटात दखल झाले. पण आईन्स्टाईन मात्र नेहमीच्या चुरगाळलेल्या कपड्यांत अंगावर जाकिट घालून सामील झाला. त्याच्या अशा पोशाखाकडे
बघून त्याच्या सहकार्यानं त्याला चांगला पोशाख का घालून आला नाहीस, असा प्रश्न केला. शांतपणे आईन्स्टाईननं ‘काय करू, माझ्याकडे सुटबूट असा प्रकारच नाहीये.’ असं सरळ सांगून टाकलं. त्याला नोबेल पारितोषिकाची ४५००० डॉलर्सची रक्कम मिळाली. पण तरीही त्यानं स्वतःला सुटबूट खरेदी केला नव्हता. आईन्स्टाईनला उंची कपडे वापरणं, विनाकारण खर्च करणं, चैन करणं या गोष्टी आवडत नसत.
आईन्स्टाईन नाइलाजानं कार्यक्रमाला जाताना जरा बर्यापैकी पोशाख करत असे. बाकी इतर वेळी त्याचे लांब केस वार्यावर उडत असत. तो मोजेही घालत नसे. काही जण तर त्याला मोजे न घालणारा माणूस म्हणून ओळखत. तो सदासर्वकाळ त्याचंच एकुलतं एक कातडी जॅकेट घालत असे. गंमत म्हणजे आईन्स्टाईनला लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे चांगलंच ठाऊक होतं. विसराळूपणात तर आईन्स्टाईनचा हात कोणी धरू शकत नसे. बसमधून प्रवास करताना अनेकदा तो हिशोबात घोळ करून ठेवत असे. पण सगळेच बस ड्रायव्हर आईन्स्टाईनला ओळखत असल्यानं ते त्याला सांभाळून घेत. आईनस्टाईन प्रचंड विसरभोळा असल्यामुळे प्रिन्स्टनमध्ये राहत असताना कित्येकदा तो स्वत:चं घरच विसरे आणि तो व्ही. व्ही. आय. पी. असल्यानं त्याचं घर कुठे आहे हे सांगायलाही कुणाला परवानगी नसायची. एकदा तो असंच स्वत:चं घर विसरलेला असताना त्यानं प्रिन्स्टन विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचा मुलगा चर्चिल आयझेनहार याला फोन करून आईनस्टाईनच्या घराचा पत्ता’ मागितला तेव्हा त्यालाही तो नाकारण्यात आला होता!
आईन्स्टाईनच्या खिशात अनेक वस्तू खचाखच कोंबून भरलेल्या असत. पेनला लावलेला चाकू, बिस्किटांचे तुकडे, नोट्स लिहिण्यासाठी केलेले कागदाचे कपटे, तंबाखू, बसची जुनी तिकिटं, त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रं, कविता, गणिताची लिहिलेली अवघड सूत्रं, राजघराण्यातल्या लोकांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू वगैरे. गंमत म्हणजे खिशात ठेवलेल्या या वस्तूही आईन्स्टाईन नीट सांभाळून ठेवू शकत नसे. त्याच्या खिशातून निघालेली महत्वाची कागदपत्रं तर ओळखूही येणार नाहीत अशा वाईट परिस्थितीत बघायला मिळत.
आईन्स्टाईननं कधीही मदतनीस ठेवला नाही. लोकांनी तसं सुचवलं तर ‘लोकांनी माझं नाही, त्यांचं काम केलं पाहिजे’ असं मत तो व्यक्त करायचा. आईनस्टाईननं ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ नावाचं पुस्तक स्वत:च लिहिलं. प्रवास करताना तो कुठल्याही अनोळखी माणसाला लिफ्ट देत असे आणि त्याच्याबरोबर मैत्री करून लगेचच हास्यविनोदाला सुरुवात करत असे. आईनस्टाईन शिकवतानाही खूप मजा करायचा. त्याच्यामध्ये चिकाटी मात्र प्रचंड होती. एखादा विचार किंवा प्रयोग वर्षोनुवर्ष केल्यावर त्यातली चूक लक्षात आली तर तो हसतखेळत त्यावरचं सगळं लिखाण ते चक्क केराच्या टोपलीत टाकून नवीन उत्साहानं नवीन गोष्टीवर विचार चालू करे. झालेल्या गोष्टींवर तो उगीच विचार करत बसत नसे.
आईन्स्टाईनकडे जेव्हा एखादी गरजू व्यक्ती येई, तेव्हा तो त्या व्यक्तीला टाळत नसे. उलट त्याची आपुलकीनं चौकशी करे. आईन्स्टाईनला जगातून असंख्य पत्रं ‘जगातला सुपरहुशार माणूस’, ‘या विश्वाचा चीफ इंजिनिअर’, ‘देवदूत’ किंवा ‘मानवतेचा सेवक’ वगैरे नावांनी कित्येकदा पत्त्याशिवाय येत आणि तरीही ती त्याच्याकडे पोहोचत. आईन्स्टाईनला वाचकांची जी शेकडो पत्रं येत त्या सगळ्यांच्या पत्राला आईन्स्टाईन आवर्जून उत्तर देत असे. एकदा त्याच्या मित्राच्या मुलीनं मार्गदर्शनासाठी आईन्स्टाईनला विनंतीवजा पत्र लिहिलं. ‘या विश्वातली प्रत्येक गोष्ट म्हणजे माणूस, झाडंझुडपं आणि तारे या सगळ्या गोष्टींवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. हे करण्यासाठी हृदयाचे सगळे कप्पे मोकळे ठेवले पाहिजेत आणि यातच खरं सुख आहे. असं आईन्स्टाईननं उलट पत्र लिहून तिला कळवलं.
‘एखादी गोष्ट तुम्हाला सोपेपणानं सांगता येत नाही याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही’ असं आईन्स्टाईन म्हणायचा. याच अल्बर्ट आईन्स्टाईन या माणसानं आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांनी जग दणाणून सोडलं होतं. आईन्स्टाईनचं आयुष्य जाणून घेताना, त्यानं लावलेल्या शोधांबद्दल ऐकताना आणि त्यानं लिहिलेल्या लिखाणाबद्दल वाचताना तो जरी सर्वसामान्यांसारखा भासत असला, तरी किती असामान्य होता ही गोष्ट आम्हाला भावली आणि तीच तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावी वाटली. आमच्याप्रमाणेच तुम्हालाही आईन्स्टाईनच्या या गमतीजमती आवडल्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. तसंच त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहीत करून घेण्याच्या कामाला सगळेच लागू या. चालेल?
(‘जीनियस’ मालिकेतून)
Add new comment