अल्बर्ट आईन्स्टाईन - जिनियस
अल्बर्ट आईन्स्टाईन - mass–energy equivalence formula E = mc2
आज 14 मार्च हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचा जन्मदिवस! तो म्हणायचा, "If you want your children to be smart, tell them stories. If you want them to be really smart, tell them more stories. If you want your children to be brilliant, tell them even more stories."
अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ असलेला अल्बर्ट आईन्स्टाईन हा स्वातंत्र्य, न्याय आणि समता मानणारा एक पुरोगामी विचारवंत होता. आज आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ओलांडून पुढेच जाता येत नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि ब्राऊनियन मोशन यामधलं त्याचं योगदान हे मूलभूत होतं. या विश्वाची निर्मिती कशी झाली आणि त्याचं कार्य कसं चालतं अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आवश्यक असलेलं प्रचंड मोठं काम आईन्स्टाईननं पुढच्या पिढीतल्या शास्त्रज्ञांसाठी तयार करून ठेवलं.
आईन्स्टाईनविषयी एक (दंत)कथा अशीही सांगितली जाते, की आईन्स्टाईनबरोबर राहून राहून त्याच्या ड्रायव्हरलाही आपल्याला आता बर्यापैकी कळतं असं वाटायला लागलं होतं. एके दिवशी आईन्स्टाईनला त्यानं आपल्या भूमिकेची अदलाबदल करूयात असं सुचवलं. आईन्स्टाईननंही त्याच्याभोवती जमणार्या गर्दीनं आणि प्रसिद्धीनं वैतागला होता. त्यानं ड्रायव्हरच्या प्रस्तावावर ताबडतोब होकार दिला आणि दुसर्याच दिवशी ज्या ठिकाणी कार्यक्रम होता, तिथे आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरनं आपण आईन्स्टाईन आहोत अशा आविर्भावात आईन्स्टाईनचं भाषण झोकात सादर केलं. तिथे जमलेले लोक आईन्स्टाईनच्या (म्हणजेच ड्रायव्हरनं केलेल्या) भाषणावर फिदा झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी आपला आदर व्यक्त केला. आईन्स्टाईनलाही आपल्या ड्रायव्हरचं कौतुक वाटलं. पण नेमकं त्याच क्षणी प्रेक्षकांमधून काही जिज्ञासूवृत्तीच्या प्रेक्षकांनी ड्रायव्हरला विज्ञानातले काही कठीण प्रश्न विचारायला सुरुवात केली. आईन्स्टाईनचं भाषण पाठ केलेल्या ड्रायव्हरची आता मात्र चांगलीच तंतरली कारण त्याला ती उत्तरं येतच कुठे होती? त्यानं प्रेक्षकात ड्रायव्हरच्या वेषात आरामात बसलेल्या आईन्स्टाईनकडे नजर टाकली आणि त्याला एकदम धीर आला. तो प्रेक्षकांकडे बघून उत्तरला, 'या प्रश्नांत काय कठीण आहे? या प्रश्नांची उत्तरं तर माझा ड्रायव्हरसुद्धा देऊ शकतो.' असं म्हणत त्यानं आईन्स्टाईनला खूण केली. आईन्स्टाईन जागेवरून उठला आणि त्यानं एकापाठोपाठ एक आलेल्या कठीण प्रश्नांची उत्तरं पटापट दिली. आता मात्र लोकांनी अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं आणि आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरला (म्हणजेच खुद्द आईन्स्टाईनला) टाळ्यांच्या गजरात महावंदना दिली आणि आपला आदर व्यक्त केला.
आईन्स्टाईनची कीर्ती दिवसेंदवस इतकी वाढत गेली की त्याची स्वाक्षरी मिळवण्यासाठी लोक प्रचंड धडपड करत. खरं तर आईन्स्टाईनला अशा गोष्टींमध्ये वेळ घालवणं नकोसं होई. पण आपण लोकांना टाळू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यानं बर्लिनमधल्या गरिबांसाठी एका फंडाची स्थापना केली आणि या फंडात रक्कम जमा व्हावी यासाठी त्यानं एका स्वाक्षरीसाठी ३ डॉलर आणि फोटोवर स्वाक्षरी हवी असल्यास ५ डॉलर अशी रक्कम ठरवली. जेव्हा स्वाक्षरीसाठी तुडुंब गर्दी जमत असे, तेव्हा तो स्वाक्षर्या करताना हसून ‘आता बर्लिनमधली गरिबी नष्ट होणार’ असं म्हणे. आईन्स्टाईनला न्यूटन, मॅक्सवेल, महात्मा गांधी आणि मोत्झार्ट यांच्याविषयी प्रचंड आदर होता.
आईन्स्टाईनची रवींद्रनाथ टागोर यांच्याशीही भेट झाली होती आणि या भेटीत दोघांनी प्रेम, सौंदर्य आणि सत्य या विषयांवर भरभरून चर्चा केली होती. सौंदर्यांचा आस्वाद घ्यायला समोर माणूसच नसेल तर मग काहीच अर्थ नाही असं त्याला वाटे. भारतातल्या ढाका विद्यापीठातल्या सत्येंद्रनाथ बोस यांनी आपल्या भौतिकशास्त्रातल्या संशोधनावर लिहिलेला शोधनिबंध आईन्स्टाईनला पाठवला तेव्हा आईन्स्टाईनला तो इतका आवडला की त्यानं ताबडतोब त्याचा जर्मन भाषेत अनुवाद करून तो जर्मन नियतकालिकाला पाठवला. पुढे बोस-आईन्स्टाईन या नावानं त्या लेखात मांडलेली ती पद्धत लोकप्रिय झाली. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्यावर पहिलं काम म्हणजे आईन्स्टाईननं आपण करत असलेली आकडेमोड केलेली गणिती कागदपत्रं मागवून घेतली होती.
आईन्स्टाईनला लिहायला खूप आवडायचं. पहाटे चार वाजता उठून तो लिहायला सुरुवात करत असे. लिहिण्यासाठी असाच कागद पाहिजे आणि तसंच पेन पाहिजे अशा काही अटी त्याच्या नसत. कित्येकदा तर तो बुटांचं बिल, बसची तिकीटं अशा कशावरही लिहीत असे. आईन्स्टाईन हा डिस्लेक्सिया विकारानं ग्रस्त असल्याचंही म्हटलं जातं. १८ एप्रिल १९५५ च्या पहाटे वयाच्या शहात्तराव्या वर्षी आईन्स्टाईनचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वीही तो डॉक्टरांची चेष्टामस्करी करत होता. ‘मला जेव्हा मरायचंय तेव्हाच मी मरेन. उगाचच कृत्रिम तर्हेनं आयुष्य लांबवण्यात काय अर्थ आहे?' असं म्हणून त्यानं जगाचा निरोप घेतला.
आईन्स्टाईन जगभर फिरल्यामुळे त्याला अनेक भाषा उत्तम प्रकारे येत. तरीही शेवटी जर्मन भाषेतच तो बोलत राहिला. पण त्याचं ते पुटपुटणं जवळ असलेल्या नर्सला कळू शकलं नाही. आईन्स्टाईनचा मृत्यू झाला, तेव्हा त्याच्या बिछान्याजवळ इस्त्रायलच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त टीव्हीवर करायच्या भाषणाचा कच्चा मसुदा त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेला होता. त्यात त्यानं लिहिलं होतं, 'आज तुमच्याशी मी संवाद साधतोय ते अमेरिकन नागरिक म्हणून नव्हे किंवा ज्यू म्हणूनही नव्हे, तर फक्त एक माणूस म्हणून...’ तसंच एका वहीत त्यानं १०-१२ पानं अनेक समीकरणं सोडवलेली होती.
आईन्स्टाईन गेला, पण त्याच्यातल्या शास्त्रज्ञाबरोबरच त्याच्यातलं धैर्य, धाडस, सतत काही ना काही काम करण्याचा कामसू स्वभाव, नम्रता आणि मिश्कीलपणा, जगभरातल्या शांततेसाठी केलेले प्रयत्न या सगळ्यांमुळे तो जिवंतपणीच एक दंतकथा बनला होता. आपल्या मृत्यूनंतर आपल्या राहत्या घराचं पुराणवस्तूमध्ये रुपांतर करू नये कारण त्यामुळे त्या वास्तुला तीर्थक्षेत्राचं स्वरूप येईल. मात्र आपल्या कामाची जागा इतर संशोधकांना त्यांचं संशोधन करण्यासाठी वापरता यावी अशी त्याची इच्छा होती.
('जीनियस' मधून )
दीपा देशमुख
Add new comment