विनम्र अभिवादन - भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री
भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री एके दिवशी आपल्या सहकार्याबरोबर बोलत होते. मधूनच ते समोर उभ्या असलेल्या आपल्या माळ्याला आपल्या संभाषणात खेचत विचारायचे, ‘‘काय रे, मी म्हणतोय ते पटतंय ना? तुझं काय मत आहे?’’ शास्त्रीजींच्या सहकार्याला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. ते संभाषण चालू असेपर्यंत किमान दोन-तीन वेळा तरी शास्त्रीजींनी त्या माळ्याला चालू असलेल्या चर्चेत त्याचं मत आणि सल्ला विचारला होता. अखेर न राहवून त्यांच्या सहकार्यानं शास्त्रीजींना ते असं का करताहेत याचं कारण विचारलं, तेव्हा शास्त्रीजींनी आपल्या सहकार्याला जी गोष्ट सांगितली ती अशी होती:
खूप खूप वर्षांपूर्वीची म्हणजे १६५३ साली घडलेली ही एक गोष्ट आहे. एका दहा वर्षाच्या मुलाचं पशुपक्ष्यांवर खूप प्रेम होतं. त्यानं कुत्रे पाळले होते. तसंच त्याच्याकडे एक मांजर आणि तिची पिल्लंही होती. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत असताना रात्रीच्या वेळी मुलाची मांजर आणि तिची पिल्लं घराबाहेरच राहिली. पावसात भिजत असलेल्या मांजरीनं दाराला धडका देत जोरजोरात ‘म्याँव म्याँव’ची बेल वाजवायला सुरुवात केली. मुलानं दार उघडताच पटकन मांजर आणि तिची पिल्लं आत शिरली. पण काही वेळातती मांजर पुन्हा बाहेर जाण्यासाठी त्या मुलाला उठवायला लागली. एकूणच ती मांजर आणि तिची पिल्लं यांचं घरात येणं आणि बाहेर जाणं असा सिलसिला रात्रभर चालू राहिला. संपूर्ण रात्र मुलगा दार उघडणं आणि बंद करणं इतकंच काम करत राहिला. दुसर्या दिवशी त्या मुलानं मग सकाळी सकाळी एका सुताराचं घर गाठलं आणि सुताराला आपल्या दरवाजाला दोन छिद्रं पाडून द्यायला सांगितलं. मोठं छिद्र मांजरीला ये-जा करण्यासाठी आणि दुसरं एक लहान छिद्र तिच्या पिल्लांना ये-जा करण्यासाठी! मुलाचं निरागसपणे सांगणं ऐकल्यावर सुतार हसायला लागला आणि त्यानं मुलाला एकाच मोठ्या छिद्रात हे काम होण्यासारखं आहे हे सांगितलं. इतकंच नाही तर त्या सुतारानं दाराला लगेच एकच मोठं छिद्र पाडून त्यातून ती मांजर आणि तिची पिल्लं हे सगळे कसे आतबाहेर करताहेत हेही दाखवलं.
गोष्ट संपल्यावर शास्त्रीजी म्हणाले, ‘‘मी माझ्या माळ्यालाही त्याचं मत का विचारतोय ठाऊक आहे? तसंच या गोष्टीतला हा मांजर पाळणारा आणि आपल्या दाराला छिद्र करून तिची जाण्यायेण्याची सोय करणारा मुलगा कोण होता हे ठाऊक आहे का?’’ त्यांच्या सहकार्यानं नकारार्थी मान हलवली.
शास्त्रीजी म्हणाले, ‘‘ ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे कधी कधी साधारण माणूसही खूप मोठी गोष्ट सांगून जातो. तसंच या गोष्टीतला हा मुलगा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध बुद्धिमान गणितज्ञ असलेला शाास्त्रज्ञ सर आयझॅक न्यु टन होता. ’’
दीपा देशमुख
(भारतीय जिनियस मधून )
Add new comment