नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

नवी व्‍यवस्‍था नवे प्रयोग

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातला मोहंजोदडो आणि हडप्पाचा धडा हा कायम लक्षात राहणारा. कारण, पाचेक हजार वर्षांपूवीर् तिथे वसलेली शहरं, रस्ते, दुमजलं घरं हे अनुभवणं थरारक होतं. हा धडा शिकताना, एकदा तरी तिथे जावं असं वाटतंच. त्‍या संस्‍कृतीचे अवशेष्‍ आज फोटोतून बघायला मिळतात. त्‍या नगररचनेविषयी मला विलक्षण कुतूहल वाटतं आणि आजही मला त्‍यावेळच्‍या समाजजीवनात केलेला सार्वजनिक विचार खूपच भावतो. सांडपाण्याची व्‍यवस्‍था आणि सगळ्यात महत्‍वाचं म्‍हणजे नगररचना करत असताना सार्वजनिक स्‍वच्‍छता आणि आरोग्य यांचा किती विचार त्‍याकाळी केलेला दिसतो.

आज या बसस्‍टँड, हॉटेल्‍स, रेल्‍वेस्‍टेशन्‍स, शाळा या ठिकाणची स्‍वच्‍छतागृहाची दुरावस्‍था भयानक आहे. ज्‍या गोष्‍टीं मूलभूत गरजेत मोडतात, ज्‍यांची नितांत आवश्‍यकता आहे अशा बाबींबाबत मात्र आपण इतके उदासिन का आहोत़  हा मोठा प्रश्‍नच आहे. महानगरपालिकेदृवारे काही तुरळक ठिकाणी सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह दिसतात. काही किरकोळ किंमत ठेवून ती सोय केलेली आढळते. पण वाढत्‍या लोकसंख्‍येच्‍या आणि विस्‍ताराच्‍या तुलनेत ती अगदीच नगण्‍य आहेत.

मला वाटतं पुन्‍हा आपण हडप्‍पा मोहंजोदडो संस्‍कृतीचा इतिहास फक्‍त अभ्‍यासापुरताच न ठेवता जर असे प्रयोग नीट राबवले तर? आज स्‍त्रीपुरुष समानतेच्‍या काळात स्त्रियाही नोकरी व्‍यवसायानि‍मित्त बाहेर पडल्‍या आहेत. पुणे मुंबई किंवा गाव ते शहर असं अपडाउनही सर्रास करु लागल्‍या आहेत. काही वेळा कामासाठी सकाळी निघून रात्री परत घराकडे असाही प्रवास होतो. अशावेळी कुठल्‍या हॉटेलमध्‍ये किंवा दूर कुठेतरी रहाणा-या नातेवाईकाकडे फक्‍त फ्रेश होण्‍यासाठी जाणं परवडण्‍याजोगं नसते. वेळ आणि व्‍यय दोन्‍हीनुसार. अशावेळी प्रत्‍येक कॉलनीला जशी बागेची जागा खास राखून ठेवलेली असते (?) त्‍याचप्रमाणे त्‍या त्‍या परिसराप्रमाणे कमर्शियल तत्‍वावर अशी स्‍वच्‍छतागृहं असावीत. किरकोळ रक्‍कम मोजून तिथे आपली आवराआवर करुन कामासाठी जाणं कोणालाही सोयीचं ठरावं. या साध्‍या वाटणा-या उपक्रमातून किती महत्‍वाची  सोय होणार आहे. त्‍याचप्रमाणे जे सोपं, सुटसुटीत, ते सर्वत्र स्‍वीकारलं जातं असं आजपय्रंत दिसून आलंय. दक्षिणेतला इडली सांबार. तसंच स्त्रियांच्‍या बाबतीत पंजाबी ड्रेस हा पेहराव.

उपयोगिता हे तत्‍व लक्षात घेतलं तर आज कामासाठी भल्‍या सकाळीच बाहेर पडणा-या नोकरदारांचा वर्ग खूप मोठया प्रमाणात आहे. आणि मग ऑफिसेसजवळ, कॉलेजेसजवळ छोटछोटया टप-या नाश्‍त्‍यासाठी उघडलेल्‍या दिसतात आणि त्‍या उत्तम व्‍यवसायही करतात. कारण आज ती अत्‍यावश्‍यक गरज झाली आहे.