शब्दांचे जादूगार शरदचंद्र चट्टोपाध्याय
बंगाली साहित्यातलं आपला वेगळा ठसा उमटवणारं एक नाव म्हणजे शरदचंद्र चट्टोपाध्याय! त्यांच्या बडी दीदी, बिराज बहू, गृहदाह, नवविधान, शेष प्रश्न, परिणिता, देवदास, चरित्रहीन, श्रीकांत, पथेरदाबी या आणि इतर अनेक कादंबर्या खूपच गाजल्या. यातल्या अनेक कादंबर्यांवर चित्रपटही निघाले आणि त्यातले देवदास, परिणिता चित्रपट खूपच लोकप्रिय झाले. कादंबर्या आणि लघुकथा यावर शरदचंद्राचं प्रभुत्व होतं. त्यांनी निष्कृती, काशिनाथ, स्वामी, छबी, हरिलक्ष्मी, रमा आणि विजया अशी अनेक नाटकंही लिहिली. शरदचंद्रांवर रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा खूप मोठा प्रभाव होता. देवदास या चित्रपटानं तर हिंदीमध्येच तीन वेळा करण्याचा मोह वेगवेगळ्या दिग्दर्शकांना आवरला नाही. देवदास, चंद्रमुखी आणि पारो या व्यक्तिरेखा काल्पनिक न वाटता खर्याच वाटतात हे विशेषा.
शरदचंद्रांच्या कांदबरीमध्ये त्या त्या पात्रांची जीवनशैली, त्यांचा संघर्ष, ग्रामीण भागातलं वास्तव, अशा अनेक गोष्टी चितारलेल्या दिसतात. शरदचंद्रांच्या लिखाणात स्त्री-पुरूष यांच्यातलं नातं, परस्परांमधले संबंध अशा विषयांना हाताळलेलं दिसात. त्यांच्या बहुतांशी कादंबर्यांतली नायिका ही पतिव्रता, निष्ठा, सहिष्णुता, आपल्या कुटुंबाची मानमर्यादा जपताना तिनं केलेला असामान्य त्याग अशा गुणांनी युक्त अशीच बघायला मिळते. मात्र त्यांच्या शेषप्रश्न या कादंबरीतली नायिका त्यांच्या इतर नायिकांपेक्षा वेगळी आहे. तिच्यावर कुठल्याही धर्माचा प्रभाव नाही. ती परमेश्वर वगैरे संकल्पना मानत नाही. तिचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. ती स्पष्टवक्ती आणि निर्भिड स्वभावाची आहे. ती रडत बसणारी नाही. तसंच ती दुबळी नाही. ती बंडखोर आहे. मनस्वी आहे. दृढनिश्चयी आहे.
शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म बंगालमधल्या हुगळी जिल्हयातल्या देवानंदपूर या एका छोट्याशा गावात 15 सप्टेंबर 1876 या दिवशी झाला. त्या दिवशी पोर्णिमा असल्यानं त्यांचं नाव शरदचंद्र असं ठेवलं गेलं. शरदचंद्रांच्या आईचं नाव भुवनमोहिनी, तर वडिलांचं नाव मतिलाल असं होतं. शरदचंद्रांना प्रभासचंद्र, प्रकाशचंद्र असे दोन भाउ आणि सुशील नावाची एक बहीण होती. घरच्या गरिबीमुळे प्रभासचंद्र घरातून निघून गेला आणि संन्याशी होवून वृंदावन इथल्या रामकृष्ण आश्रमात तो राहू लागला.
लहानपणी शरदचंद्र अतिशय खोडकर म्हणून प्रसिद्घ होते. मात्र खोड्यांबरोबरच अभ्यास करणं, चांगल्या गायकांची गाणी ऐकणं याही गोष्टी ते मन लावून करत असत. शाळेत शिकत असताना शरदबाबूंना धीरू नावाची एक मैत्रीण मिळाली होती. धीरू त्यांच्यासारखीच खोडकर पण अत्यंत गोड अशी मुलगी होती. शरदबाबू आणि धीरू एकमेकांबरोबर शाळा सुटल्यावर खूप भटकत, एकमेकांबरोबर भांडणही करत आणि मायाही करत. मासे पकडणं असो की बागेमधून फळं चोरणं असो, पतंग उडवणं असो की नावेत बसणं असो, दोघांना या गोष्टी करताना दिवसही पुरत नसे. राग आला की शरदबाबू आपल्या या बालमैत्रिणीला चक्क मारत आणि धीरू देखील त्यांचा मार निमूटपणे खात असे. ती आपल्या या मित्रासाठी फुलांच्या माळा करून देत असे.
वयाच्या 18 व्या वर्षी शरदबाबू कॉलेजमध्ये जावू लागले. या काळात त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचं सगळं साहित्य वाचून काढलं होतं. गावातल्या साहित्यप्रेमी लोकांना एकत्र करून त्यांनी एक साहित्य सभा स्थापन केली होती. इथे टागोरांच्या साहित्यावर चर्चा करण्याचा कार्यक्रम ते घडवून आणत. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना आपला लेखनगुरू मानलं होतं.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच शरदबाबूंनी लिहायलाही सुरुवात केली. मात्र त्यांनी कुठलंही लिखाण प्रसिद्घ केलं नाही. एकदा त्यांच्या एका गरीब मित्राला पैशांची खूप गरज होती. त्यानं शरदबाबूंकडे मदत मागितली. खूप प्रयत्न करूनही शरदबाबूंना पैशांची व्यवस्था करता आली नाही. अशा वेळी त्यांनी चक्क आपल्या वडिलांनी छंद म्हणून जमवलेले मौल्यवान असे दगड विकले आणि त्यातून जे पैसे आले, ते आपल्या मित्राला दिले. वडिलांना जेव्हा आपल्या मुलाचे हे पराक्रम कळले, तेव्हा त्यांनी चिडून शरदबाबूंना घरातून बाहेर काढलं.
शरदबाबूंना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं, पण ते स्वभावानं निग्रही होते. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर त्यांची एका साधूबरोबर भटकंती सुरू झाली. गावोगाव फिरताना ते आपल्या गोड आवाजात भजनं गात असतं. या भटकंतीमध्ये त्यांनी समाजातलं दु:ख आणि गरिबी खूप जवळून बघितलं. याच काळात शरदबाबूंची महादेव साहू या तरुण जमीनदाराबरोबर ओळख झाली. महादेव साहू यांच्याबरोबर राहत असताना जमीनदारीचं वैभव, नाचगाणी, सगळं काही शरदबाबूंनी खूप जवळून बघितलं. महादेव साहूसारखी अनेक श्रीमंत माणसं ह्दयशून्य आणि माणुसकी हरवलेली असतात हे त्यांनी अनुभवलं. या अनुभवांवर आधारित त्यांनी ब्रह्म दैत्य नावाची एक कादंबरी लिहिली आणि महादेव साहूकडै जपून ठेवण्यासाठी दिली. पण साहित्याचं मोल नसलेल्या त्या जमीनदारानं ती सरळ रद्दीमध्ये विकली.
त्यानंतर शरदबाबू कोलकत्याला पोहोचले. तिथे एकाकडे त्यांना इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करण्याचं काम मिळालं. इथे असताना त्यांच्या स्वभावामुळे पुन्हा नवीन मित्र मिळाले. पुन्हा एकदा साहित्य, संगीत, कला यावर चर्चा होवू लागल्या. यानंतर ते पोटापाण्याची सोय लावायला हवी म्हणून ब्रह्मदेशात जावून पोहोचले, तिथे रंगूनमध्ये काही काळ राहून त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला आणि गरिबांना ते मोफत औषधं देवू लागले.
शरदबाबूंच्या लग्नाची गोष्ट खूपच विलक्षण आहे. एकदा बाहेरून परत आल्यावर, त्यांना त्यांच्या खोलीत दिवा जळताना दिसला. आपल्या माघारी आपल्या घरात कोण आलं असावं त्यांना काहीच कळेना. दार आतून बंद असल्यानं त्यांनी वाजवायला सुरुवात केली. अखेर धक्का मारून कसंबसं त्यांनी दार उघडलं. आतमध्ये त्यांना एक तरूण मुलगी आढळली. त्या तरुणीचं लग्न तिच्या वडिलांनी एका वृद्घ दारूडयाबरोबर ठरवलं होतं. शरदचंद्रांनी तिची समजूत काढून तिला तिच्या वडिलांकडे नेलं आणि वडिलांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण गरीब असलेल्या त्या मुलीच्या बापानं शरदबाबूंना म्हटलं, माझ्या मुलीचं लग्न लावून देण्यासाठी माझ्याजवळ एक कवडीही नाही. आणि तुला इतकं जर वाईट वाटतं, तर तू का हिच्याशी लग्न करत नाहीस? त्या बापाची असहाय अवस्था शरदबाबूंनी बघितली आणि त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. चांगला संसार सुरू असतानाच रंगूनमध्ये प्लेगची मोठी साथ आली आणि बायको आणि मुलगा या दोघांचाही मृत्यू झाला.
शरदबाबूंना अतीव दु:ख झालं. इथं आपलं काहीच उरलं नाही या भावनेनं शरदबाबू भारतात परतले. परतल्यावर त्यांनी आपलं सारं लक्ष लेखनात गुंतवलं आणि एकाच वेळी अनेक मासिकांमधून त्यांच्या अनेक कादंबर्या प्रकाशित झाल्या. लोक त्यांना महान साहित्यिक म्हणून ओळखू लागले. त्यांच्या पथेरदाबी कादंबरीनं तर त्यांना खूपच प्रसिद्घी मिळवून दिली. तसंच त्यांची स्वामी ही कथा वाचकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली.
देशबंधू चित्तरंजन दास हे नारायण मासिकाचे संपादक होते. याच मासिकात शरदबाबूंची स्वामी ही कथा प्रसिद्घ झाली होती. देशबंधू चित्तरंजन दास यांना ही कथा इतकी आवडली की आपण शरदबाबूंना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी शरदबाबूंना एक कोरा धनादेश पाठवला. शरदबाबूंनी हव्या त्या रकमेचा आकडा त्यात लिहावा असा निरोपही पाठवला. देशबंधू चित्तरंजन दास हे खूप श्रीमंत होते. कितीही मोठी रक्कम शरदबाबूंनी टाकली असती, तरी त्यांना काहीच फरक पडला नसता. पण शरदबाबूंनी मात्र त्या धनादेशावर केवळ 100 रूपये एवढीच रक्कम लिहिली.
शरदबाबूंनी आपल्या आयुष्यात अनेक उपेक्षित, वंचित, विधवा, परित्यक्त्या आणि वेश्या स्त्रिया बघितल्या आणि त्यांनी आपल्या साहित्यामधून अशा स्त्रियांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक स्त्रीला आपल्या साहित्यातून समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी कुठल्याही स्त्रीचा कधी तिरस्कार केला नाही. वेश्येला देखील त्यांनी सन्मानानंच बघितलं. त्यांनी आपल्या आयुष्यात कालिदासी नावाची वेश्या बघितली होती. तिचा व्यवसाय वेश्येचा असला, तरी ती परमेश्वराची भक्ती करत असे. शरदबाबूंनी देवदास ही कादंबरी लिहिली, तेव्हा त्यातलं पारोचं पात्र हे त्यांनी आपली बालमैत्रीण धीरूवरून घेतलं असावं आणि चंद्रमुखी ही कालिदासीवरून रंगवली असावी असं अनेक लोकांचं मत आहे.
शरदचंद्र चट्टोपाध्याय यांना अनेक विद्यापीठांनी डीलीट देवून गौरवलं, अनेक सुवर्णपदकं, अनेक सन्मान त्यांना मिळाले. केवळ बंगाल साहित्यविश्वातच नाही, तर जागतिक स्तरावर त्यांच्या साहित्यानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. शरदचंद्रांची तुलना इंग्रजी कादंबरीकार डिकन्स याच्याबरोबर केली जाते. शरदचंद्र चट्टोपाध्याय या बंगाली साहित्यिकाचा मृत्यू 16 जानेवारी 1938 या दिवशी सकाळी 10 वाजता झाला. देशातल्या प्रत्येक स्त्रीला आपल्या साहित्यात गौरवणारा दुसरा कुठला साहित्यिक आढळणार नाही हे मात्र खरं!
Add new comment