सिनेमे सुलगते है अरमॉं...
'सिनेमे सुलगते है अरमॉं’ हे तलत महेमूदनं गायलेलं बैचेन करणारं गीत असो, वा ‘दूर हटो ऐ दुनियावालो’ हे प्रखर देशभक्तीपर गीत असो अनिलदांच्या संगीतस्पर्शानं त्यातलं माधुर्य वाढणारंच आहे. आज शंभर वर्ष होऊन गेली, पण तरीही भारतीय संगीताच्या इतिहासात अनिलदा म्हणजेच अनिल विश्वास या बंगाली संगीतकाराचं नाव ठळकपणे कोरलं गेलंय. १९३५ ते १९६५ या ३० वर्षांच्या कालावधीत अनिल विश्वास यांच्या दर्जेदार संगीतानं लाखो श्रोत्यांना तृप्त केलं. अनिल विश्वास नसते, तर मुकेश आणि तलत महेमूद यांचा हृदयाला भिडणारा आर्त स्वर आपल्यापर्यंत पोहोचलाच नसता. हिंदी चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून अनिल विश्वास ओळखले जातात. त्यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटांना संगीत दिलं. ते स्वतः उत्तम गायक होते, संगीतकार तर होतेच, पण एक अभिनयाची जाण असलेले उत्तम अभिनेताही होते. तसंच ते तबला अतिशय उत्कृष्ट वाजवत.
अनिल विश्वास यांचे समकालीन संगीतकार म्हणून फिरोजशाह मिस्त्री (आलमआरा), जद्दनबाई (तलाश-ए-हक), मास्टर अलीबक्क्ष, लल्लूभाई नायक, प्राणसुख नायक, ब्रजलाल वर्मा, वजीर खॉं (इंद्रसभा), सुंदरदास भाटिया, गोविंदराव टेंबे (अयोध्या का राजा, माया मच्छिंद्र, सैरंध्री-ऐतिहासिक चित्रपट), केशवराव भोळे, झंडे खॉं, बन्ने खॉं, रामगोपाल पांडे, सुरेशबाबू माने यांचा उल्लेख करावा लागेल. या संगीतकारांचं योगदानही महत्त्वाचं यासाठी आहे, की त्यांनी भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात संगीताचं चित्रपटातलं स्थान बळकट करण्यास मदत केली. त्यात जद्दनबाई यांच्याकडे पहिली महिला संगीतकार होण्याचा मान जातो. त्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गीसच्या आई होत्या. ऐतिहासिक चित्रपटांना वातावरणं उभं करण्याच्या दृष्टीनं जे विशिष्ट प्रकारचं संगीत लागतं ते गोविंदराव टेंबे यांनी दिलं. त्यामुळे त्यांचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. संगीतकारांच्या या फळीनंतर मात्र आर. सी. बोराल, पंकज मलिक, तिमिर बरन, के. सी. डे, रफिक गजनवी, एच. सी. बाली, शांतीकुमार देसाई, मास्टर कृष्णराव, अशोक घोष, सरस्वतीदेवी, ज्ञानदत्त आणि रामचंद्र पाल या संगीतकारांनी फक्त संगीतच दिलं नाही, तर अभिनय, गायन, गीतलेखन, संवादलेखन याचबरोबर दिग्दर्शनाचीही धुरा यशस्वीपणे सांभाळली. या काळातल्या ऐतिहासिक आणि भक्तीप्रधान चित्रपटाचं संगीत एकाच धर्तीवर होतं.
अनिल विश्वासचं या क्षेत्रात पदार्पण झालं आणि त्यांचं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी आपल्या संगीतात प्रथमच भारतीय वाद्यांबरोबर पियानो, व्हायोलीन, ऍकोर्डिनसारख्या पाश्चिमात्य वाद्यांचा वापर केला. भारतीय चित्रपटक्षेत्रात पाश्चात्य वृंद संगीताचा वापर त्यांनी प्रथमच केला. हिन्दी चित्रपटसृष्टीत १२ पिस ऑर्केस्ट्रा आणि वेस्टर्न सिफंनीची वापर त्यांनी प्रथम केला. संगीताच्या वापराबरोबरच त्या त्या गायकाच्या गळ्यातल गोडवा आणि त्या गाण्यातला ‘दर्द’ श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचाच प्रयत्न त्यांनी सातत्यानं केलेला दिसतो. त्यामुळेच आरामची गाणी असोत, वा किशोर आणि लताच्या अवाजातलं ‘आ मोहोब्बत की दुनिया बसा लेंगे हम’ सारखं गाणं असो. तसंच ‘जीवन है मधुबन’ या गाण्यातला ऍकोर्डिनचा वापर असो.
अनिल विश्वास यांचा जन्म पूर्व बंगालमधल्या बरिसाल मध्ये ७ जुलै १९१४ साली झाला. अनिल विश्वास यांच्यामध्ये संगीताची गोडी त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. वयाच्या चवथ्या वर्षांपासून ते गायला लागले. त्यांची आई यामिनीदेवीचा आवाज खूपच सुरेल होता. ती स्वतः संगीतरचनाही करत असे. अनिल विश्वास यांचे वडील कामानिमित्त नेहमी बाहेर असत, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला संगीत शिकण्याची मोकळीक दिली होती. याच कारणानं घरात नेहमी संगीतमय वातावरण असे. अशा वातावरणात अनिल विश्वास संगीताकडे ओढले जाणार नाहीत तर नवलच! ते लहान असताना आई जेव्हा आंघोळीला जात असे, तेव्हा ते आईची संगीताची वही काढून त्यातल्या चिजा वाचत आणि मग त्या जशाच्या तशा लोकांना ऐकवत. त्यातली ‘सॉंवरिया कोन बन मे बॉंसुरी बजाये’ हा ख्याल असो वा कुठली बंदिश! पुढे आईची ती वही हरवली, पण अनिल विश्वास यांना सगळे ख्याल आणि चिजा सगळ्या मुखोदगत असल्यामुळे तिला हळहळ करण्यापासून त्यांनी वाचवलं. आईनं लावलेला हाच संगीताचा वेलु पुढे बहरणार होता. एखादी रचना एकदा कानावर पडली, की ती जशीच्या तशी त्यांना पुन्हा गाता येत असे. त्यांची ग्रहणक्षमता कमालीची होती. कुठलीही गोष्ट ते क्षणात आत्मसात करत. त्यामुळे आसपासचे लोक अवाक् होत आणि त्यांना ‘श्रुतीधर’ म्हणत. लहान असताना अनिल विश्वास हे एकटेच माडीवरच्या खोलीत झोपत. सगळीकडे निजानीज झाली, की ते खिडकीला दोर बांधून खाली उतरत आणि खाली वाट बघत उभे असलेल्या मित्रांबरोबर नदीकाठी जात. कधी नदीकाठी, कधी बांबूच्या तराफ्यावर, तर कधी नदीच्या वाहत्या पाण्यावर. अशा तर्हेनं शांत वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात ते मोकळ्या गळ्यानं हवा तितका वेळ गात. हाच त्यांचा रियाज असे.
अकराव्या वर्षी शाळकरी वयातच अनिल विश्वास यांना देशभक्तीनं भारलं होतं. त्यामुळेच ते एवढ्या लहान वयात स्वातंत्र्य संग्रामात सामील झाले. त्या मार्गातले सगळे अडथळे आणि सगळ्या यातना त्यांनी सहन केल्या. पण ते डगमगले नाहीत. जालियनवाला बाग हे त्यांचं आवडतं पुस्तक होतं. क्रांतिकारक दलात हे पुस्तक पोहोचवण्याची जबाबदारी अनिल विश्वास यांच्याकडे होती. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे इंग्रजांनी त्यांना पकडून जेलमध्येही टाकलं. त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगातले दिवस खूपच वाईट्ट असत. एकदा तर त्यांना सात महिने तुरुंगात काढावे लागले. तुरुंगातल्या त्या सडक्या शिजवलेल्या भाज्या आणि जनावरापेक्षाही बत्तर जगणं या त्रासातून ते गेले. सात महिने खटला चालून गुन्हा सिद्ध न झाल्यानं अनिल आणि त्याच्या मित्रांना सोडण्यात आलं. विचारांनी अनिल विश्वास कम्यूनिस्ट होते. तुरुंगवासातून सुटका झाल्यावर ते कलकत्याला आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. अनिल विश्वास यांनी काही काळ छोट्या छोट्या हॉटेलमधून भांडी विसळण्याचं कामही केलं. पण त्यांची प्रतिभा लपू शकली नाही. संगीत शिकताना पुढे आईशिवाय अनिल विश्वास यांना कालीप्रसन्न नट आणि लालमोहन गोस्वामी हे दोन गुरू मिळाले. पुढे त्यांनी महफिलींमध्ये गायला सुरुवात केली. पण गायकापेक्षा त्यांची ओळख संगीतकार म्हणून होत गेली. अनिल विश्वास यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. संगीताची समग्र समज त्यांना होती. बरिसालमध्ये त्यांना संगीताची आवड निर्माण झाली आणि कलकत्यामध्ये ती अधिक परिपक्व होत गेली. बरिसालप्रमाणेच कलकत्यातल्या महफिलींमध्ये अनिल विश्वास नसतील, तर ती महफिल अधुरी वाटे.
अनिल विश्वास यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाएकाचं शिष्यत्व त्यांनी कधीच पत्करलं नाही. एका साच्यात त्यांनी स्वतःला कधी ठेवलं नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. ज्या कोणाकडून शिकायला मिळेल, तिथून ते शिकत. अगदी वेश्या, नाचणार्यांच्या कोठ्यावर देखील त्यांची पावलं संगीत ऐकण्यासाठी वळली. संगीतक्षेत्रातल्या संधी त्यांच्यासमोर येत गेल्या आणि ते स्वीकारत गेले. अनिल विश्वास कविताही करत. वयाच्या १४ व्या वर्षापासून ते संगीत समारोहात गात असत. वयाच्या १६ व्या वर्षी त्या वेळचे कलकत्त्यामधले थोर बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडे आश्रय घेतला. पन्नालाल घोष यांचा विवाह अनिल विश्वास यांची बहीण पारोल घोष हिच्यासोबत झाला होता. अनेक दिवस त्यांनी शिकवण्या घेतल्या. तसंच मेगा फोन रेकॉर्ड कंपनीत त्यांनी काम केलं. १९३० मध्ये अनिल विश्वास कलकत्यातल्या रंगमहल थिएटरबरोबर अभिनेता, गायक अिाण सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला लागले.
रंगमहल थिएटर हे कलकत्यामधलं सर्वश्रेष्ठ असं थिएटर होतं. कलकत्यामध्ये एक निहार नावाची वेश्या होती, तिला ते बहीण मानत. ती त्यांना रंगमहल थिएटरमध्ये घेऊन गेली आणि इथून त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. इथूनच त्यांच्यातला गायक, संगीतकार, कवी, अभिनेता बहरत गेला आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. संगीतक्षेत्रात लोक त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेऊ लागले. त्याच वेळी ते हिंदूस्थान रेकॉर्डिंग कंपनीबरोबरही जोडले गेले. तिथेच त्यांची कुंदनलाल सहगल आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर भेट झाली. हे तिघंही रात्री खूप उशिरापर्यंत एकत्र वेळ घालवत. गाणं, शेर आणि गप्पा यांच्यात मध्यरात्र उलटली तरी त्यांना पत्ता लागत नसे.
एकदा कुंदनलाल सहगल यांनी दादरामध्ये सांगितलेला शेर अनिल विश्वास यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला. मुंबईतलं त्यांचं पदार्पण हीरेन बोस या चित्रपट निर्माता आणि संगीतकार यांच्यामुळे झालं. हीरेन बोस यांना माहीत असलेल्या कुमार मुव्हीटोनबरोबर अनिलदा काम करू लागले. मात्र स्वतंत्र संगीतकार अशी त्यांची ओळख १९३५ साली धर्म की देवी या हीरेन बोस दिग्दर्शित चित्रपटातल्या संगीतामुळे झाली. या चित्रपटात त्यांनी एका फकिराची भूमिकाही केली. हीरेन बोस आणि अनिल विश्वास यांनी एकत्रितपणे मुंबईमध्ये एका सांगितिक प्रयोग (ऑकेस्ट्रा) केला. पण १९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘भारत की बेटी’ मधलं ‘तेरे पूजन को भगवान बना मन मंदिर अलिशान’, ‘मनमोहन’मधलं ‘तुम्ही ने मुझको पे्रम सिखाया’, तसंच ‘मै तेरे गले की माला’, बादलसा निकल चला यह दल मतवाला रे’, मै उनकी बन जाऊ रे’, काटा लागा रे साजनवा मोसे राह न चली जाए’, मै उनकी बन जाऊ रे’ ही गाणी तितकीच लोकप्रिय झाली.१९३७ मध्ये त्यांनी महेबूब फिल्मने बनवलेली ‘जागीरदार’ या चित्रपटाला संगीत दिलं आणि या चित्रपटानं त्यांना प्रसिद्धीचे दारं उघडून दिले. हा चित्रपट धूमधडाक्यात चालला. त्यांनी संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी हिट झाली. वोही पुरानी बाते, अगर देनी थी हमको हुरो जन्नत तो यहॉं देते, जिनके नैनो मे रहते है तारे, आज मेहमॉं बनेंगे हमारे ही ती गाणी होती. ‘जागीरदार’नंतर मेहबूब खॉं आणि अनिल विश्वास ही जोडी लोकप्रिय झाली. हम तुम और वतन, एकही रास्ता, औरत, रोटी या चित्रपटांना अनिल विश्वास यांनी संगीत दिलं आणि ती लोकांच्या ओठी खेळू लागली. मात्र पुढे काही कारणांनी या दोघांमध्ये कुठल्यातरी कारणानं बेबनाव झाला आणि दोघांनीही पुन्हा एकत्रित काम केलं नाही. मैत्रीचं एक पर्व संपलं.
याच दरम्यान अनिल विश्वास यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. त्या काळची गाजलेली नायिका मेहरुन्निसा मूसा भगत हिच्या प्रेमात ते पडले. तिचं चित्रपटातलं नाव आशालता हे होतं. ती दिसायला खूपच सुंदर होती. दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि १९३७ मध्ये त्यांनी विवाह केला. अनिल विश्वास यांची आई या लग्नाच्या विरुद्ध होती. पण मुलापुढे तिचं काही चाललं नाही. लग्नानंतर काहीच काळात अनिल विश्वास यांना आपण एकमेकांसाठी अनुरूप नाही आहोत हे लक्षात आलं. अनिलदांना संगीत, साहित्य, कला आणि संस्कृती यांच्यात रस होता, तर आशालताला पैसा, मद्यपान, रेस आणि जुगाराचं वेड होतं. अनिल विश्वास यांच्या आयुष्यातली आणखी एक मोठी घोडचूक म्हणजे त्यांनी ‘व्हरायटी प्रॉडक्शन’ नावाची एक चित्रपट कंपनी काढली आणि त्यांनी त्यांच्या भोळ्या स्वभावामुळे आशालताला त्या कंपनीचा निर्माता केलं. व्हरायटी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली लाडली, लाजवाब, बडी बहू, हमदर्द आणि बाजूबंद असे पाच चित्रपट निघाले. यापैकी पहिल्या चार चित्रपटांना अनिल विश्वास यांनी संगीत दिलं होतं. कंपनीचा सगळा कारभार आशालतानं हातात घेतल्यामुळे अनिलदांना मानधन किंवा आर्थिक लाभ जराही मिळाला नाही. त्याबाबत प्रश्न करताच आशालताकडून आपण तोट्यात आहोत हे एकच उत्तर मिळे. अनिल विश्वास यांना घरखर्चासाठी देखील बाहेर कामं करावी लागली. अनेकदा ती दारुच्या नशेत समोर कोण आहे याचा विचार न करता अवार्च्य भाषेत अनिलदांना शिव्या देत सुटे. तिची नजर फक्त अनिलदांच्या पैशांवर होती. अखेर स्वातंत्र्य की पैसा यात अनिलदांनी आपलं स्वातंत्र्य निवडलं आणि त्यांनी घेतलेली दोन घरं, सगळा बँक बॅलन्स आशालताला देऊन टाकला आणि ते या विवाहबंधनातून मुक्त झाले.
त्या वेळी ‘रोटी’ नावाचा चित्रपट खूपच गाजला होता. मात्र या रोटीचा प्लॉट कसा आणि केव्हा तयार झाला, याची कहाणीही खूप मजेशीर आहे. एक दिवस सगळे मेहबुब खॉं आजारी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नर्सिंगहोममध्ये गेले असताना तिथेच आपले डबे एकत्र खाऊ असं सगळ्यांनी ठरवलं. हास्यविनोद आणि गप्पा यांना ऊत आला असताना मेहबूब खॉ यांचं नसिर्ंग होममधून पातळ सूप आणि टोस्ट असं जेवण आलं. त्या वेळी वैतागून मेहबूब खॉं ओरडले, साल्यांनो, खा आणि मजा करा. मला मात्र काय मिळालंय बघा. पाणी आणि टोस्ट? शेवटी एवढा घाम गाळून आपण काम करतो ते कशासाठी? भाकरीसाठीच ना?’’ त्यावर अनिल विश्वास त्याला म्हणाले, तू काय बोलतो आहेस तुला समजलंय का? केवढा पॉवरफुल विषय आहे हा.’’ कोणाला काही समजेचना. तेव्हा अनिल विश्वास म्हणाले, अरे या भाकरीसाठी - रोटीसाठीच तर आपण सगळं काही करतो. रोटी म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आपण एकमेकांचे खिसे कापतो, एकमेकांना लुबाडतो, खोटं बोलतो, एकदुसर्याचा जीव घेतो. सगळं चांगलं वाईट हे केवळ या रोटीसाठी आहे रे बाबा.’’ मेहबूब खॉं यांनी कॅमेरामनकडे पाहिलं आणि म्हटलं, या बंगाली माणसाच्या बोलण्यात दम आहे रे बाबा.’’ अनिल विश्वास म्हणाले, मी कम्यूनिस्ट आहे आणि हा विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. दलीतपीडितांचा हक्क, रोटीसाठीचा झगडा आणि ती कशी पळवली जाते हे मला समोर दिसतंय. ’’ अनिल दा भारावून जाऊन बोलत होते आणि त्याच वेळी ‘रोटी’ या चित्रपटाचा प्लॉट तयार झाला. या चित्रपटाला अनिलदांनी संगीत दिलं होतं. हा चित्रपट आणि त्यातली गाणी खूपच गाजली.
पण याच वेळी मेहबूब खॉं, फरिदून इराणी आणि अनिल विश्वास यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. अशा वेळी बॉम्बे टॉकीजनं त्यांना महिना २५०० रु. देण्याची तयारी दाखवली होती. तिघांचा खर्च भागवण्यासाठी तात्पुरती ही नोकरी पकडावी असा अनिल विश्वास यांचा विचार होता. त्यांनी आपल्या दोघा मित्रांना परवानगी मागितली. पण अनिलदांच्या या निर्णयानं मेहबूब खॉं दुखावले गेले आणि आपल्या वाईट काळात मित्र जवळ न राहता सोडून जातोय या भावनेनं व्यथीत झाले. त्यानंतर त्यांनी मेहबूब प्रॉडक्शन लि. नावाची कंपनी स्थापन केली. त्यात पहिली सगळी टीम होती. नव्हते ते फक्त अनिल विश्वास. आपल्या मित्राचा गैरसमज झालाय याची खंत अनिल विश्वास यांना आयुष्यभर राहिली. १९४२ मध्ये अनिल विश्वास यांनी बॉम्बे टॉकीजचा प्रस्ताव स्वीकारला. सुरुवातीला तिथल्या अंतर्गत गटबाजीशी सामना करत त्यांनी आपलं पाऊल भरभक्कमपणे रोवलं. त्या वेळी ‘किस्मत’ या चित्रपटाची तयारी सुरू होती. या ‘किस्मत’नं त्यांचीही किस्मत बदलवून टाकली होती. त्यांच्या कारकीर्दीतला हा टर्निंग पॉइंट होता. इथून त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. ‘किस्मत’ या चित्रपटाची पडद्यामागची निर्मितीची कथा खूपच मजेशीर आहे. बॉम्बे टॉकीजकडून या चित्रपटाचा निर्माता म्हणून शशधर मुखर्जी यांना जो पगार मिळत होता, त्याच्या दुप्पट पगारावर देविकारानी हिने अनिल विश्वासला संगीतकार म्हणून निमंत्रित केलं. या अशा विचित्र निर्णयामुळे त्या वेळी बॉम्बे टॉकीजमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. शशधर मुखर्जी यांच्यावर प्रेम असणार्या गटानं मग अनिल विश्वास यांना संधी मिळताक्षणी त्रास द्यायला सुरुवात केली. मिळेल त्या वेळी अनिल विश्वास यांना कमी लेखणं, टोमणे मारणं असे अनेक प्रकार त्यांच्यामार्फत सुरू झाले. ‘किस्मत’ ची गाणी संगीतबद्ध करताना अनेक अडथळे निर्माण करणंही सुरू झालं. पण अनिल विश्वास यांनी या गोष्टींचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही. त्यांनी आपलं मनोधैर्य राखून कोणाविषयी कटूता न बाळगता आपलं काम केलं.
१९४३ मध्ये त्यांनी ‘किस्मत’ चित्रपटासाठी संगीत दिलं. या चित्रपटातली सगळीच गाणी लोकप्रिय झाली. ‘किस्मत’ची गाणी गीतकार प्रदीप यांनी लिहिली होती. अनिल विश्वास यांचं अचानक टपकणं प्रदीपलाही कुठेतरी खटकत होतंच. त्यामुळे त्यांनीही अनिल विश्वासला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण प्रदीपचंच एक गाणं त्यांनी असं काही संगीतबद्ध केलं की प्रदीपचं मनच त्यांनी जिंकून घेतलं असंही बोललं जातं. धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे जा, मेरा बुलबुल सो रहा है शोरगुल न मचा...हे गाणं सात मात्रांमध्ये होतं आणि तसं ते संगीतबद्ध करण्यास कठीणही होतं. या गाण्यात अंगाईचे भावही यायला हवे होते. तसंच प्रेमभावनाही व्यक्त व्हायला हवी होती. या दोन्ही संमिश्र भावंनामधून हे गाणं साकार होणं आवश्यक होतं. अनिल विश्वास यांनी खूप विचार केला. त्यांच्यासाठी ते मुळीच कठीण काम नव्हतं. सात मात्रेतल्या या गाण्याला आठ मात्रांमध्ये त्यांनी बदलवलं आणि जे गाणं तयार झालं, ते ऐकून मात्र प्रदीप चकित झाला. कारण प्रदीप नुसता कवीच नव्हता, तर तो एक चांगला गायकही होता. कलेची उंची एवढी मोठी असते की अहंकार, असूया यासारखे भाव लुप्त होऊन जातात. शत्रू सुद्धा एकत्र येतात. गाणं जेव्हा तयार झालं तेव्हा प्रदीपला तो एक चमत्कारच वाटला. मग मात्र दोघांमधला स्नेह दृढ झाला. आणि त्यातूनच पुढे ‘दूर हटो ऐ दुनियावालो हिन्दुस्थान हमारा है’ या गाण्यानं तर इतिहास रचला. इंग्रंजाच्या गुलामीविरुद्ध आवाज मोठा करण्यासाठी या गाण्यानं खूप महत्त्वाची भूमिका बजावली.१९४३ मध्ये हे गाणं जेव्हा चित्रपटगृहात सुरू होई, तेव्हा प्रत्येक भारतवासी देशभक्तीनं रोमांचित होत असे. हे गाणं ऐकून लोक खुर्चीत उभे राहून अक्षरशः नाचू लागत. ब्रिटिश शासनाला ललकारणारं हे पहिलं गाणं होतं. या गाण्यानं स्वातंत्र्यलढ्यात आयुष्य झोकून दिलेल्या वेड्यांना उत्साहित केलं. हे गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं की चित्रपटगृहात ते गाणं झालं की लोकांच्या ‘वन्स मोअर’ मुळे ते पुन्हा एकदा लावावं लागत असे. या गाण्यानंतर पुढे देशभक्तीपर अनेक गाणी आली, पण या गीताची तुलना कुठल्याच गीताशी होऊ शकत नाही. किस्मतमधल्या ‘पपीहा रे’ या गाण्यात अनिल विश्वास यांनी कीर्तन पद्धतीचा वापर मोठ्या खुबीनं केला. या गाण्यातले करूण स्वर मनाला हलवून सोडतात. कीर्तनामध्ये ज्याप्रमाणे परमेश्वर आणि भक्ताचं नातं व्यक्त केलं जातं त्याप्रमाणे ही संगीतरचना अनिल विश्वास यांनी केली आणि पारूल घोषनं आपल्या मधुर आवाजात त्या गीताला न्याय दिला. या गाण्यात सेक्सोफोन आणि बासरीचा अप्रतिम वापर आहे. या गाण्याचे गीतकार प्रदीपच होते. ‘पपीहा रे’ प्रमाणे दुसरी जमीन यातलं अमीरबाई कर्नाटकी यांनी गायलेलं ‘अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया’ हे भजन खूपच अवीट होतं. ‘किस्मत’ या चित्रपटातली सहाही गाणी अमीरबाईंच्या आवाजात अनिल विश्वास यांनी गाऊन घेतली. हे भजन बंगाली लोकसंगीताची आठवण ताजी करतं. या गाण्यांनी अमीरबाईला खूपच महत्त्व मिळालं. यातलं ‘घर घर मे है दिवाली, मेरे घर मे अंधेरा’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. प्रदीप यांनी या गाण्याचे ५२ अंतरे लिहिले होते. प्रत्येक अंतर्यामधला भाव वेगळा होता. हे सगळे भाव गाण्यात येणं आवश्यक होतं. संगीतकारासाठी हे गाणं संगीतबद्ध करणं एकप्रकारे आव्हानच होतं. अनिल विश्वास यांनी विचार केला की हे गाणं कसं करायचं? त्यांनी शेवटी तीन भागात त्याची रचना गाण्याच्या भावाप्रमाणे केली. सुरुवातीला गाण्याच्या पहिल्या भागात शांतरस घेतला, तर मधल्या भागात पीडेनं निर्माण झालेली व्याकुळता टिपली आणि गाण्याच्या शेवटच्या भागात त्या गीताचा सर्जनशील आनंद त्यांनी भरला. अमीरबाईंनी देखील यातले बारकावे आणि चढउतार अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने सादर केले. ‘किस्मत’ या चित्रपटानं लोकप्रियतेचे सगळे निकष तोडले आणि चित्रपटगृहात सतत चार वर्षं राहण्याचा विक्रम केला. कलकत्यातल्या रॉक्सी थिएटरमध्ये तर हा चित्रपट ३ वर्ष ८ महिने चालला.
एकदा अनिल विश्वास कलकत्याला गेले असताना त्यांनी रॉक्सी थिएटरला भेट दिली आणि तिथल्या मॅनेजरला ते म्हणाले, तुमच्या थिएटरच्या प्रसिद्धीसाठी नुकसान सहन करून तुम्ही हा चित्रपट का ठेवला आहे?’ तेव्हा मॅनेजर म्हणाले, रात्रीचा खेळ सुरू होण्यास अजून वेळ आहे. हे पाच रुपये घ्या आणि तुम्ही स्वतः एक तिकीट खाली जाऊन काढून आणा.’ अनिलदा तिकीट काढण्यासाठी गेले, तिथे तिकीटासाठी लोकांची झुंबड उडाली होती. तिकीटं काळ्या बाजारात विकली जात होती. अनिलदा पुनश्च मॅनेजरच्या केबिनमध्ये आले. तेव्हा मॅनेजर म्हणाला, दादा, विश्वास ठेवा अगर ठेवू नका हेच वास्तव आहे. या चित्रपटाच्या संगीतानं लोकांना वेडं केलं आहे.’ यानंतर त्यांनी ‘मिलन’ हा चित्रपट केला. यातल्या गाण्यांमध्ये क्लोरोनेटच्या सुरांची जादू बघायला मिळते. ‘नौका डूबी’ करताना अनिलदांनी रविंद्र संगीताचा आधार घेतला होता. कुठे काही चूक राहू नये म्हणून रविंद्र संगीताचे विशेषज्ञ अनादि दस्तीदार यांना बोलावून खातरजमा केली. त्यातल्या एका प्रसंगासाठी योग्य गीत मिळत नव्हतं, तेव्हा अनिलदांना बंगालीत काही ओळी उत्स्फुर्तपणे सुचल्या आणि ‘बंदोर बंदोर भाई..’ असं गीत तयार झालं. हे गाणंही खूपच लोकप्रिय झालं. पुढे सी. रामचंद्र यांनी अनिल विश्वास यांचा सहाय्यक म्हणून काही काळ काम केलं. अनिल विश्वास यांना ते म्हणत, तू माझा खर्या अर्थानं बाप आहेस.’
एकदा इंदोरला त्यांच्या स्वाक्षरीसाठी कोणी चाहता आला, तेव्हा त्यांनी म्हटलं, मी तर स्वाक्षरी देईन पण आधी तू लिही की मी अनिल विश्वास यांचा सहाय्यक आहे. मग त्याखाली मी माझी स्वाक्षरी करेन.’’ अनिल विश्वासचा सहाय्यक असणं हे सी. रामचंद्र यांना नेहमीच गौरवपूर्ण वाटत असे. संगीतकार नौशाद देखील अनिल विश्वास यांना आपला गुरू मानत. खरं तर अनिल विश्वास यांनी प्रत्यक्ष नौशाद यांना काही शिकवलं नव्हतं. लता मंगेशकर यांनी तर आपण अनिलदांकडून खूप काही शिकलो याचा जाहीरपणे स्वीकार केला होता. अनिल विश्वास एक प्रयोगशील संगीतकार होते. त्या काळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. देशभक्तीपर गाणी संगीतबद्ध करताना बंधनं येत. अशा वेळी अनिल विश्वास यांनी देशभक्तीपर गाण्यांमध्ये कोरसचा वापर मोठ्या खुबीनं केला. त्यामुळे लोकसंगीताला स्थान मिळालं. भावनेचा अविष्कार उत्कट रीतीनं करण्यासाठी अनिल विश्वास पियानोचा वापर करत. बसंत चित्रपटातलं, एक दुनिया बसा ले, ‘आराम’ मधली सगळीच गाणी, आकाशमधलं भिगी भिगी रात आयी, ‘लाडली’ मधलं तुम्हारे बुलानेको जी चाहता है, तसंच याच चित्रपटातलं गीत, पपिहा रे मेरे पिया से कहियो जाये’, ‘जासूस’मधलं जीवन है मधुबन, ‘ज्वारभाटा’मधलं, भूल जाना चाहती है, ‘फरेब’मधलं हुस्न भी है, ‘नाज’मधलं झिलमिल सितारोंके तले, आ मेरा दामन थाम ले या गाण्यांमधला पियानोचा वापर किती सौंदर्यबद्ध तर्हेनं केलाय. गाण्याची सुरुवात पियानोनं करून हळूहळू रिदममध्ये बदल करत त्या मूडचं वातावरण अतिशय कलात्मकरीतीनं करण्यात अनिल विश्वास यांचा हातखंडा होता.
अनिल विश्वास यांच्या काही गीतांमध्ये अरबी संगीताचाही प्रभाव जाणवतो. लताचं ‘लूटा है जमानेने’ हे गाणं ऐकलं तर संगीतकाराचं कसब काय असतं ते या गाण्यातून लक्षात येतं. सेक्सोफोनचा वापर देखील त्यांनी खूप अनोख्या तर्हेनं गीतांना संगीत देताना स्वतंत्रपणे केला. १९४० साली आसरा या चित्रपटासाठी अनिल विश्वास यांनी मुकेशला ‘सांझ भई बंजारे’ हे गाणं गाण्यासाठी संधी दिली. मुकेशच्या आवाजातलं सामर्थ्य त्यांना मोहून गेलं. पण प्रत्यक्ष गाताना त्याची तयारी त्यांना कमी वाटत होती. त्यामुळे अनिलदांनी आपल्या आवाजात त्याला ते गाणं गाऊन दाखवलं. मुकेशनं अनिल विश्वास यांच्या आवाजातलं गाणं ऐकल्यावर त्यांना म्हटलं, ‘‘ दादा, तुम्ही असं स्वर्गीय सुरात गायलात तर आमच्यासारख्या नवोदितांना गाण्याची संधी मिळणं शक्य तरी आहे काय काय?’’ मुकेशचं हे वाक्य अनिल विश्वास यांना रात्रभर अस्वस्थ करून गेलं. सकाळ झाली आणि त्यांनी मनाशी निश्चय केला. वयाच्या चवथ्या वर्षांपासून सुमधूर गात असलेले अनिल विश्वास यांनी संगीत द्यायचं पण व्यावसायिक स्तरावर गायचं नाही हे ठरवलं आणि हा निश्चय त्यांनी आयुष्यभर पाळला.
१९४५ साली ‘पहली नजर’ या चित्रपटात अभिनेता मोतीलाल काम करणार होते. त्यांनी अनिल विश्वास यांना गाणी कोण गाणार आहे असं विचारलं, तेव्हा अनिल विश्वास म्हणाले, तुम्हीच गाणार आहात.’’ त्या वेळी मोतीलाला म्हणाले, छे, छे, हे गाणं मी गाऊ शकणार नाही.’’ त्या वेळी अनिल विश्वास म्हणाले, ‘‘तर मग हे गाणं मलाच गावं लागेल.’’ तेव्हा मोतीलाल म्हणाले, माझा मुकेश नावाचा एक मित्र आहे. तो गायक म्हणून चित्रपटक्षेत्रात आपलं नशीब आजमावायला आला होता. पण त्याला कुठेच काम न मिळाल्यानं तो हताश होऊन परत जातोय. तुम्ही त्याला एक संधी देऊन बघा.’’ अनिल विश्वास यांनी मुकेशला ती संधी दिली. ते गाणं होतं, ‘दिल जलता है तो जलने दे.’ नेमकं गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मुकेश पसार झाला होता. नर्व्हस होऊन तो दारू पीत बसला आणि किती पितोय याचं त्याला भानच राहिलं नाही. आता प्यालेल्या अवस्थेत अनिल विश्वास यांच्यासमोर कसं जायचं हेच त्याला समजेना. अनिल विश्वासला हे कळताच ते तिथे गेले आणि नशेत धूत असलेल्या मुकेशला खेचत त्यांनी बाथरूमध्ये उभं केलं. त्याच्या डोक्यावर पाण्याचा नळ सोडला. मुकेशनं भानावर येत म्हटलं, अनिलदा मी चांगलं गाऊ शकणार नाही.’ तेव्हा अनिल विश्वास म्हणाले, ‘आज जर गायला नाहीस, तर सगळ्या वादकांसमोर तुला मारीन.’ शेवटी मुकेशला गावं लागलं आणि तेही एकाच बैठकीत. मुकेशनं ते गाणं इतकं करूण स्वरात गायलं होतं, की लोकांना ते गाणं सहगलनंच गायलं आहे असं वाटे. मुकेशनं आनंदात ही बातमी अनिदांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले, सहगलची नक्कल करून तू सहगल बनू शकणार नाहीस. त्या नादात तू मुकेशपणही घालवून बसशील. तू मुकेश आहेस हे लोकांना दाखवून दे’ अनिलदांचा सल्ला मुकेशनं मानला आणि त्यानं फिरून मागं वळून बघितलं नाही. ‘दिल जलता है तो जलने दे’ या गाण्यानं अफाट लोकप्रियता मिळवली. या गाण्याची सुरुवात पुरी मिश्र दरबारीत आहे. त्यानंतर शुद्ध गंधार दिसतो. दरबारी रागात गाणं कंपोज करण्याचं धैर्य अनिलदांनी दाखवलं होतं. अनिलदांनी मुकेशला आपल्या लहान भावासारखंच सांभाळलं. मुकेश आपल्या अस्तित्वाचा एक भाग होता असं अनिल विश्वास यांनी म्हणून ठेवलंय.
मुकेशप्रमाणेच अनिल विश्वास यांनी तलत महेमूद यांनाही अशीच संधी दिली. तलत महेमूद यांना गायनक्षेत्रात नाव कमवायचं होतं, त्या वेळी ते अनिल विश्वास यांचं नाव ऐकून त्यांना भेटायला गेले. अनिल विश्वास यांनी तलत महेमूदवर विश्वास दाखवला. त्यांना त्याच्या आवाजातलं कंपन खूप भावलं. पण त्या वेळी तलतदा आवाज कापतो वगैरे अफवा त्यांच्याबाबत पसरल्या होत्या. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास जात चालला होता. रेकॉर्डिंगच्या वेळी आपल्या आवाजात कंपनं येणार नाहीत याची दक्षता तलत महेमूद घेत होते आणि अनिल विश्वास यांना त्यांच्या सावध गाण्यात हवा तो परिणाम मिळत नव्हता. शेवटी त्यांनी तलत महेमूदला सांगितलं, ‘आपण उद्या रेकॉर्डिंग करू’ त्या वेळी तलतनं त्यांना घाबरून विचारलं, माझं काय चुकतं आहे?’ तेव्हा अनिलदा म्हणाले, ‘‘अरे, तुझ्या आवाजातलं ते नेहमीचं कंपन गेलं कुठे? ते मला हवं आहे.’’ तलत महेमूद यांनी अनिलदांना त्या कंपनामुळे होणारी त्यांची बदनामी सांगितली. तेव्हा अनिलदांनी हसत सांगितलं, अरे त्यातच तुझं वेगळेपण आहे. चल निश्ंिचतपणे गा. तलत महेमूदला अनिल विश्वास यांनी केवळ संधीच दिली नाही, तर त्यांचा कमी झालेला आत्मविश्वासही त्यांना मिळवून दिला. पण अनिल विश्वास यांनी त्यांच्या आवाजातले गुण जोखले होते आणि यातूनच ‘सीने मे सुलगते है अरमान’ आणि ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल’ ही गाणी त्या काळात खूपच गाजली. अनिल विश्वास यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मुकेश आणि तलत महेमूदसह अनेक गायकांना लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्यासाठी साहाय्य केलं. अनिल विश्वास यांना ‘अनोखा प्यार’ या चित्रपटातल्या ‘जीवनसपना टूट गया’ या गाण्यासाठी कुंदनलाल सहगलला डोळ्यासमोर ठेवलं होतं. पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच सहगल यांचं निधन झालं आणि हे गाणं मुकेशच्या आवाजात गायलं गेलं. गाणं ऐकतानाही हे गाणं मुकेशसाठी नव्हतं हे जाणकाराला जाणवत राहतं. या चित्रपटातलं ‘तुम्हारे बुलानेको जी चाहता है, मुकद्दर बनानेको जी चाहता है’ हे लताचं गाणं खूपच मनाला गुंगवून टाकणारं आहे. फरेब या चित्रपटातल्या ‘मेरे सुख-दुखका संसार तेरे दो नैननमे’ आणि ‘हुस्न भी हे उदास उदास इश्क भी है गमसे चूर’ ही गाणी त्यांनी किशोरकुमारकडून गाऊन घेतली. त्या वेळी अनेकांनी किशोरकुमार या गाण्यांना संवेदनशील आवाज देऊ शकणार नाही, या गाण्यातलं गांभीर्य त्याला व्यक्त करता येणार नाही असं अनिलदांना सांगितलं. पण अनिलदांनी लोकांचं म्हणणं किती चुकीचं आहे हे या गाण्यांवरून दाखवून दिलं.
स्वतंत्र संगीतकार म्हणून अनिल विश्वास यांनी १९४७ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘भूख’ या चित्रपटाला संगीत दिलं. यातली गीतं गीता दत्तनं गायली होती. ‘ऑखोमे अश्क लब पे रहे हाय’ या गाणं त्या वेळी सुपरडुपर हीट झालं. त्यानंतर ‘नैया’ या चित्रपटात जोहराबाईच्या अवाजात ‘सावन भादो नयन हमारे’, ‘आई मिलन की बहार रे’ या गाण्यानं धूम माजवली. ‘महात्मा कबीर’ या चित्रपटातल्या अकरा गाण्यांपैकी चार गाणी मन्नाडें यांनी अनिलदांच्या संगीतरचनेवर गायली आहेत. यात कबिरांची पदं वापरली आहेत. झिनी झिनी रे चदरिया, घूँघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे, मनुआ तेरा दिन-दिन, बाबुल मोरा नैहर ही ती गाणी. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जलती निशानी’ या चित्रपटातलं अनिल विश्वासच्या संगीतावर हेमंतकुमारनं गायलेली ‘कह रही है जिन्दगी ’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. ‘ओ साकी रे ऐसा जाम पिला दे नजरोसे’ हे लता आणि हेमंतकुमारने गायलेलं आणि त्यामागे अनिल विश्वास यांनी केलेला कोरसचा अप्रतिम वापर या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अनिल विश्वास यांचा संगीतानं बहरलेला प्रवास प्रयोगशील मार्गानं सुरूच होता. हेमंतकुमार यांनी गायलेलं अनिल विश्वास यांनीं संगीतबद्ध केलेलं कमर जलालाबादी लिखित या चित्रपटातलं एक अप्रतिम गीत आहे. या गाण्याच्या कडव्याची पहिली ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजात असून दादरा तालातलं हे गाणं मनाला स्पर्शून जातं. त्याच्या ओळी आहेत, रुठ के तुम तो चल दिए, अब मै दुआ को क्या करू जिसने हमे जुदा किया, ऐसे खुदा को क्या करू जीने की आरजू नही, हाल न पूछ चारागर दर्द ही बन गया दवा, अब मै दवा को क्या करू सुनके मेरी सदा ए गम रो दिया आसमान भी तुम तक न जो पहूँच सके, ऐसी सदा को क्या करू १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेसी’ या चित्रपटात बलराज सहानी आणि नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यातलं लताचं गौडसारंग रागाचा प्रभाव असलेलं गाणं अप्रतिम आहे. तसंच ‘रसिया रे मनबसिया रे’ हे मीना कपूरनं मधुर आवाजात गायलेलं गाणंही खूपच लोकप्रिय झालं. या गाण्यात पन्नालाल घोष यांच्या सुमधूर बासरीचे स्वर आहेत. या गाण्यावर जयजयवंती रागाची मोठ्या प्रमाणात छाया दिसते. हे गाणं श्रोत्यांच्या मनावर आणि मेंदूवर राज्य गाजवत होतं असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. यातलंच हिंदुस्थान है प्यारे हे मन्नाडेंनी गायलेलं गीत लोकगीतांवर आधारलेली सशक्त अशी रचना होती. ‘फिर मिलेंगे जानेवाले यार’ हे गाणं कव्वाली शैलीत कोरसचा वापर करून रचलं होतं. तेही त्या वेळी श्रोत्यांच्या ओठांवर खेळत असे.
याच दरम्यान अनिल विश्वास यांच्या कारकिर्दीबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्यातही एक सुखद घटना घडणार होती. एकीकडे त्यांनी दिलेलं संगीत हिट होत होतं आणि दुसरीकडे त्यांचं मन मीना कपूर या त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या गायिकेकडे खेचलं जायला लागलं. या विवाहाला मीना कपूर यांच्या घरून खूप विरोध झाला. पण अखेर सगळ्या अडथळ्यांवर मात करत मीना कपूर आणि अनिल विश्वास यांचा विवाह झाला. अशालताबरोबरच्या पहिल्या विवाहातून त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच आलं होतं. त्यांच्या आयुष्यात मीना कपूर आल्या आणि त्यांच्याबरोबरचं त्यांचं पुढलं वैवाहिक आयुष्य मात्र सुखात गेलं. अनिल विश्वास यांची सगळ्यात श्रेष्ठ संगीतरचना कोणती असं म्हटलं तर कदाचित वाद-चर्चा होऊ शकतील. पण त्यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांनी गायलेलं १९५८ सालच्या ‘संस्कार’ या चित्रपटातलं ‘दिल शाम से डुबा जाता है’ हे गाणं म्हणजे शब्दातीत आहे. या गाण्यात जयजयवंतीचा छाया दिसते, जोडीला बंगाली गीतरचनेची झाक आणि तबल्याचा नितांत सुंदर वापर केलेला आहे. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘सौतेला भाई’ या चित्रपटात अनिल विश्वास यांनी ठुमरीचा प्रयोग केला. या चित्रपटात नायकाची भूमिका गुरुदत्तने साकार केली होती. या चित्रपटात नायकाचा सावत्र लहान भाऊ आपल्या बिघडलेल्या मित्रांबरोबर नाचणारीच्या कोठ्यावर जातो. या प्रसंगात ती नर्तिका एका ठुमरीवर नृत्य करताना दाखवली आहे. अनिल विश्वास यांनी या ठुमरीचा स्थायी परम्परागत ठुमरी असते तसाच ठेवला आणि अंतरा दाखवताना त्यातल्या काही ओळी त्यांनी कवी शैलेंद्र यांच्याकडून लिहून घेतल्या. अंतर्यात अनिल विश्वास यांनी मूळ ठुमरीच्या स्वरात फरक करून चंचंल प्रकृतीचा अडाणा रागातले स्वर घेऊन एकतालामध्ये रचना केली. ‘सौतेला भाई’ मधली ही ठुमरी लता मंगेशकर यांच्या आवाजात रसिक श्रोत्यांना खेचून तर घेतेच, पण त्यांच्या काळजाचा ठोकाही चुकवण्यात यशस्वी होते. अनिल विश्वास यांनी त्यांच्या काही गीतांमध्ये बसंत रागाचा फार खुबीनं वापर केलेला दिसतो. ‘आ मोहोब्बत की बस्ती’ हे गाणं यमनकल्याणमध्ये रचलं असताना त्यात मध्येच वसंत रागाचा केलेला वापर त्या गीताचं सौंदर्य अधिकच वाढवतो. आपल्या अनेक गीतांमधून त्यांनी बिहाग, बसंत, खमाज आणि आसावरी थाटातल्या रागांचा बहारदार रीतीनं वापर केलेला दिसतो. तसंच ‘हमदर्द’ या चित्रपटातलं मन्नाडे आणि लतानं गायलेलं ‘ऋतू आये ऋतू जाये’ या गाण्यात हेमंतरागाचं वातावरण खूप सुरेख रीतीनं उभं राहतं.
ख्यातनाम संगीतकार नौशाद यांनी अनिल विश्वास यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. एकदा ते म्हणाले, ‘‘अनिल विश्वास एकमेव असे बंगाली संगीतकार आहेत, की ते जेव्हा पंजाबी चित्रपटाला संगीत देतात, तेव्हा पंजाबचा माहोल उभा राहतो. ते जेव्हा गुजराथी चित्रपटाला संगीत देतात, तेव्हा गुजराथी वातावरण तयार होतं आणि ते जेव्हा मोघल फिल्म्सला संगीत देतात तेव्हा मोगलाई वातावराण तयार होतं. या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. कीर्तन असो वा जत्रेमधलं संगीत, वा रविन्द्र संगीत - या सगळ्यांची त्यांना जेवढी जाण होती, तितकीच जाण त्यांना हिंदुस्थानी संगीताची होती.’’ गालीब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रपती भवनमध्ये होणार्या समारंभात जाण्याचा योग अनिल विश्वास यांना एकदा आला. तेव्हा त्यांनी बंगाली पद्धतीचा धोती-कुर्ता, खांद्यावर शॉल ओढून त्या पेहरावात बंगाली अंदाजात प्रवेश केला. तिथे जमलेल्या लोकांना वाटलं, की अनिल विश्वास गजल गाऊ शकणार नाहीत, या प्रसंगी ते नक्कीच बंगाली गीत सादर करणार असावेत. पण लोकांचा अंदाज पूर्णपणे चुकला. बंगाली वेशातल्या अनिल विश्वास यांनी गालीबची फारशी भाषेतली एक गजल गायली. त्या वेळी जाकिर यांनी न राहवून उदगार काढले, वा, वा अनिल विश्वास यांनी खरी गजल गायली, आम्ही तर केवळ गजल वाचतो.’ अनिल विश्वास यांनी मुंबई सोडायची ठरवलं. याचं कारण अनिल विश्वास यांचे बालमित्र आणि मेव्हणे पन्नालाल घोष, भाऊ सुनिल विश्वास आणि मुलगा प्रदीप यांच्या एकापाठोपाठ एक मृत्यूने त्यांना कोलमडून टाकलं. त्यामुळे शेवटी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातून निवृत्ती घेउन अनिल विश्वास दिल्ली आकाशवाणीत रुजू झाले. तिथे त्यांनी १९६३ ते १९७५ या कालावधीत काम केलं. १९८६ साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवलं गेलं. या काळात एक नॅशनल ऑव्रेस्ट्रा बनवण्याच्या विचारानं त्यांना झपाटलं होतं. पण थंड सरकारी यंत्रणेकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यानं ती योजना तशीच बारगळली. दिल्ली आकाशवाणी वर अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मां यांच्या रचना मन्नाडेंच्या आवाजात गाऊन घेतल्या. त्यातली ‘नाच रे मयुरा’ ही शााीय बंदिश इतकी श्रवणीय आहे की त्या काळी ती खूपच गाजली होती. ते जवाहरलाला नेहरू विश्वविद्यालयातही संगीत सल्लागार म्हणून कार्यरत होते. काही काळ त्यांनी संगीताचे वर्गही चालवले. हम लोग’, बैसाखी’, ‘फिर वही तलाश’ सारख्या उत्कृष्ट टीव्ही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं. ‘हम लोग’चं शीर्षक गीत आजही सगळ्यांना आठवत असेल, आईए हाथ उठाये हम भी’ या ओळींची रचना केली होती फैज यांनी. या एक ओळीला दिलेलं संगीत आणि त्यामागचा कोरस आजही विसरता येत नाही. तसंच अनिल विश्वास यांनी ‘गजलेर रंग’ हे गजलवर आधारित बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिलं. ‘गजल’ या विषयावरचं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण आहे. अनिल विश्वास यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना सन्मानित केलंच, पण मध्यप्रदेश सरकारनेही त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं गौरवलं.
अनिल विश्वास एक महान कलावंत होते. भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा अतिशय कुशल प्रयोग त्यांनी चित्रपटसंगीतात केला आणि भारतीय चित्रपटसंगीताला एक दर्जेदार संगीताचा मान मिळवून दिला. त्यांना ऑकेस्ट्राचं जे वेड होतं, त्यामुळेच त्यांनी बॅले संगीतावर उल्लेखनीय काम केलं. त्यांनी उर्दु गजलांचा अनुवाद बंगाली भाषेत केला. तीन दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीताच्या जगात त्यांनी आपला ठसा उमटवला. संगीताची नवी भूमी तयार करणारे सर्जनशील संगीतकार म्हणून अनिल विश्वास यांचं नाव घ्यावं लागेल. मिलन, ज्वारभाटा, लाडली, अरमान, अनोखा प्यार, आरजू, छोटी छोटी बाते, सौतेला भाई या चित्रपटांचं संगीत अजरामर आहे. अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुकेश, तलत महेमूद, लता मंगेशकर, बेगम अख्तर, मीना कपूर अिाण अमीरबाई कर्नाटकीसारख्या एकूण ७६ हस्तींनी गाणी गायली. नाट्यसंगीत आणि भक्तीसंगीताचीच त्या वेळी मक्तेदारी होती, अशा वातावरणात ती चौकट भेदून अनिल विश्वास यांनी संगीताला खरं भारतीय व्यक्तित्व दिलं. अखिल भारतीय स्तरावर संगीताला वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. चित्रपट संगीतामध्ये अनिल विश्वास यांनी जे प्रयोग केले, ते पुढे चालून मुख्य स्रोत बनले. अशा या थोर संगीतकाराचं निधन ३१ मे २००३ साली वयाच्या ८८ व्या वर्षी झालं.
दीपा देशमुख
Add new comment