जेम्स वॉट
जेम्स वॉट एका (दंत)कथेप्रमाणे एकदा अॅग्नेस नावाच्या एका स्त्रीनं चूल पेटवून चहाच्या एका मोठ्या किटलीत पाणी उकळायला ठेवलं. आपल्या जेम्स नावाच्या मुलाला तिनं चुलीवरच्या किटलीकडे लक्ष द्यायला सांगितलं. पाणी उकळायला लागल्यावर किटलीवरची झाकणी वाफेमुळे सरकते आहे असं जेम्सला दिसलं. मग जेम्सनं त्या उडणार्या झाकणीवर वजन म्हणून एक दगड ठेवला. तरीही काही वेळानं त्याला आतून येणार्या वाफेनं त्या झाकणीला दगडासहित उडवून लावलेलं बघितलं आणि तो थक्क झाला. उकळलेल्या पाण्याच्या वाफेमध्ये प्रचंड शक्ती असल्याचं त्याच्या लक्षात आलं. या वाफेच्या शक्तीचा उपयोग करता आला तर मोठमोठी यंत्रही त्यावर चालवता येतील असे विचार त्याच्या मनात घोळायला लागले. पुढे वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे जेम्सला जगभर जेम्स वॉट या नावानं ओळखलं गेलं.
जेम्स वॉट कोण होता? तो एक स्कॉटिश संशोधक, मेकॅनिकल इंजिनिअर, रसायनशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता. खरं तर जेम्स वॉटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला नसून खरा शोध थॉमस न्यूकॉमन यानं लावला. मात्र जेम्सनं त्या वाफेच्या इंजिनात आश्चर्यकारक बदल करून इतक्या गोष्टींमध्ये त्याचा उपयोग केला की वाफेचं इजिन म्हटलं की ओठांवर जेम्स वॉट हेच नावं येतं.
जेम्स वॉटचा जन्म स्कॉटलँडमधल्या ग्रिनोक नावाच्या बंदर असलेल्या गावात १९ जानेवारी १७३६ या दिवशी अॅग्नेस मिरहेड आणि जेम्स वॉट या दांपत्याच्या पोटी झाला. गंमत म्हणजे वडिलांचं आणि मुलाचं नाव एकच होतं. काहीच दिवसांत त्यांचं कुटुंब इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम मध्ये राहायला गेलं. जेम्सचे वडील जहाज बांधणीचा व्यवसाय करायचे. लहानपणापासूनच जेम्सला अनेक गोष्टींबद्दल कुतूहल वाटत असे. तो जन्मतःच नाजूक असल्यानं त्याच्या प्रकृतीच्या अनेक बारीकसारीक कुरबुरी होत्या. सुरुवातीच्या काळात अॅग्नेस जेम्सला घरीच शिकवायची. काही दिवसांनी जेम्सचं नाव ग्रिनोक ग्रामर नावाच्या शाळेत टाकण्यात आलं. शाळेत असताना इंजिनियरिंगचे विषय आणि गणित या विषयांमध्ये जेम्सनं प्रावीण्य मिळवलं होतं. लहानपणापासून जेम्सला त्याच्या वडलांनी आपल्याबरोबर कामाच्या ठिकाणी नेल्यामुळे जेम्सला तिथल्या यांत्रिक वस्तूंविषयी आकर्षण निर्माण झालं. त्यातली प्रत्येक वस्तू तो उघडून बघायचा आणि त्यानंतर ती तशीच पुन्हा जुळवता येतं का तेही बघायचा. त्याला खेळण्यासाठी त्याच्या वडलांनी छोटी छोटी अवजारंही दिली होती. जहाजबांधणीच्या कामात असल्यामुळे जेम्सच्या वडलांना सुतारकामही चांगलं जमत असे. त्यांच्यामुळेच जेम्स या अवजारांच्या साहाय्यानं आपली खेळणी तयार करत असे. जेम्सचं गणित चांगलं असल्यानं गणिताच्या साहाय्यानं यंत्राचं योग्य मोजमाप समजून घेऊन त्याआधारे वैज्ञानिक उपकरणं तयार करणं देखील जेम्सला जमायला लागलं होतं. जेम्स चित्रं देखील खूप चांगली काढायचा.
जेम्स १७ वर्षांचा असताना त्याच्या आईचा अचानक मृत्यू झाला. याच वेळी जेम्सच्या वडलांना व्यवसायात खूप मोठं अपयश सोसावं लागलं. या दोन घटनांनी जेम्सचं आयुष्य ढवळून निघालं. मग उदरनिर्वाहासाठी जेम्सनं घड्याळ तयार करण्याच्या एका दुकानात काम सुरू केलं. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी त्यानं स्वतःचंच वर्कशॉप सुरू केलं आणि तिथं तो छोट्यामोठ्या यांत्रिक वस्तू दुरुस्त करायला लागला. वयाच्या १८ व्या वर्षी जेम्सनं ग्लासगो विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं उपकरणं बनवण्याच्या कामात त्याला आणखीनच रस निर्माण झाला. तो काळ संशोधनाचा असल्यानं उपकरणांना सतत मागणी असायची. एकलव्याप्रमाणे स्वतःच प्रत्येक गोष्ट शिकत असताना जेम्सला डॉ. रॉबर्ट डिक नावाचे प्राध्यापक भेटले आणि पुढे तेच त्याचे मार्गदर्शक बनले. त्यानंतर त्यानं लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. पण लंडनला गेल्यावर त्याला तिथे कोणीच नोकरी देईना. शेवटी नाइलाजानं जेम्सला गावी परतावं लागलं. गावी परतल्यावर डिकच्या ओळखीनं त्याला उपकरण दुरुस्ती करणार्या एका दुकानात नोकरी लागली; पण ती तात्पुरत्या स्वरुपाची होती.
ही नोकरी संपल्यानंतर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी जेम्स वॅटनं विद्यापीठाकडे परवानगी मागितली. मात्र सात वर्षांचा अनुभव आणि प्रमाणपत्र यापैकी काहीच हाती नसल्यानं त्याची ही मागणी विद्यापीठानं फेटाळली. सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत असतानाच जेम्स वॅटच्या मदतीला डॉ. रॉबर्ट डिक धावून आले. विद्यापीठात येणार्या यंत्रांच्या दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर असल्यानं नुकतंच त्यांच्याकडे एका श्रीमंत माणसाचं समुद्रसफरीत नादुरुस्त झालेलं खगोलशास्त्रीय उपकरण दुरुस्तीसाठी आलं होतं. हे उपकरण दुरुस्त करणं अतिशय कठीण होतं. अशा वेळी जेम्स वॅटनं मात्र काहीच क्षणात जेव्हा ते दुरुस्त केलं, तेव्हा डॉ. डिकसह सगळेच चकित झाले! त्यांनी त्याला पाच पौंडाचं बक्षिसही दिलं. आता मात्र विद्यापीठानं त्याला आपल्या आवारात वैज्ञानिक उपकरणं दुरूस्त करण्याची परवानगी दिली आणि इथेच त्याचं आयुष्य पालटलं. ते साल होतं १७५७! विद्यापीठाला लागणारी गणिती उपकरणं तो आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्य यांच्या जोरावर बनवायचा. त्यामुळे हळूहळू त्याची गणना चक्क वैज्ञानिकांत व्हायला लागली. जेम्स वॉटच्या खिशात आता बर्यापैकी पैसाही खुळखुळायला लागला होता.
१७५९ साली व्यापारी दृष्टिकोन असलेल्या क्रेग याच्याबरोबर वॉटनं भागीदारीत व्यवसाय सुरू केला. या दोघांचा केवळ दोन पौंडांवर सुरू केलेला व्यवसाय पाच वर्षांत चक्क सहाशे पौंडापर्यंत पोहोचला!! एकदा एका हॉटेलमालकानं वॉटला एक ऑर्गन बनवायला सांगितला. ऑर्गन या वाद्याविषयी कुठलीच माहिती नसतानाही वॉटनं ती ऑर्डर स्वीकारली. त्यानं ऑगर्नविषयीचा अभ्यास तर केलाच, पण त्यासाठी संगीताचं चक्क शिक्षणही घेतलं. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यानं ऑर्गन तयार केला. हॉटेलमालक वॉटवर प्रचंड खुश झाला. कुठलंही यंत्र असो वा वस्तू, ती कशी बनलीये याचा खोलवर अभ्यास करणं आणि प्रयत्नपूर्वक ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं हे जेम्स वॉटचं वैशिष्ट्य होतं. काम करताना अपयश आलं तरी परिश्रम आणि प्रयत्नांची कास त्यानं कधीच सोडली नाही. लवकरच वॉटनं स्वत:चं घर आणि दुकान घेतलं. १७६५ साली मार्गारेट मिलर हिच्याबरोबर वॉटनं लग्न केलं. त्यांना ५ मुलं झाली पण त्यातली फक्त दोनच जगली. मार्गारेटची साथही त्याला फक्त ७ वर्षंच लाभली. १७७२ साली पाचव्या मुलाला जन्म देत असतानाच ती मृत्युमुखी पडली. यानंतर मुलांकडे बघायचं की व्यवसाय सांभाळायचा अशी त्याची तारांबळ उडायला लागली. याच दरम्यान वॉटनं ग्लासगोमधल्या साचे बनवणार्या एका तंत्रज्ञाची मुलगी अॅना हिच्याबरोबर लग्न केलं आणि पुढली ४२ वर्षं दोघांनी सुखाचा संसार केला. जेम्स वॉटमधल्या अस्वस्थ संशोधकाला लवकरच आणखी एक आव्हानात्मक काम करण्याची संधी चालून आली.
१७६३ साली एके दिवशी त्याच्या रॉबर्ट अँडरसन नावाच्या एका मित्रानं त्याच्याकडे विश्वविद्यालयातलं न्यूकॉमननं शोधलेल्या वाफेच्या इंजिनचं मॉडेल दुरुस्तीला पाठवलं. वाफेचं हे इंजिन दुरुस्त करून ते वापराला उपयुक्त ठरेल असे त्यात बदल करायचे असं त्यानं ठरवलं. वॉटला हे काम मनाजोगतं करण्यासाठी तब्बल ११ वर्षं लागली! कारण हे सगळं करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. याच दरम्यान जेम्स वॉटची ओळख मॅथ्यु बॉल्टन याच्याशी झाली. त्यालाही आपल्या उद्योगामध्ये एका चांगल्या वाफेच्या इंजिनाची आवश्यकता होती. त्यानं वॉटला ते काम काहीही करून पूर्ण करावं म्हणून गळ घातली. बॉल्टनच्या प्रोत्साहनामुळे वॉटमध्ये पुन्हा उत्साह संचारला. अखेर वाफेच्या इंजिनातले उपयुक्त बदल करण्यात वॉटला यश आलं.
१७६९ साली वॉटनं त्याचं रीतसर पेटंटही मिळवलं. यानंतर ‘बॉल्टन अँड वॉट कंपनी’ वाफेच्या इंजिन निर्मितीसाठी उभी राहिली. बॉल्टनकडे उद्योजकता होती, तर वॉटकडे संशोधन आणि कौशल्य! वॉट आणि बॉल्टन या जोडगोळीची घौडदोड वेगानं सुरू असतानाच खाणकामगारांना आपल्या वाफेच्या इंजिनाचा खूप मोठा फायदा होईल ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. स्कॉटलंडमधल्या कॉर्नवॉल इथल्या खाणीमधलं वातावरण प्रचंड दमट असायचं. तसंच तिथे कोळसाही उपलब्ध नसायचा. अशा परिस्थितीत आपलं वाफेचं इंजिन त्यांना उपयोगी पडेल, या विचारानं वॉट आणि बॉल्टन खाणमालकाला भेटले आणि त्या खाणीमध्ये आपलं वाफेचं इंजिन बसवण्याची परवानगी त्यांनी त्याच्याकडे मागितली. न्यूकॉमनच्या पहिल्या वाफेच्या इंजिनाचा त्या सगळ्यांचाच अनुभव फारसा चांगला नसल्यानं खाणमालकानं काहीशा नाखुशीनंच वॉटला परवानगी दिली. वॉटनं आपलं नव्या स्वरुपातलं वाफेचं इंजिन खाणीत आणून बसवलं आणि सुरू केलं. नव्या इंजिनाची क्षमता बघून खाणमालक आणि कामगार चकितच झाले. कमी इंधन लागणारं, वेळ वाचवणारं आणि न्यूकॉमनच्या इंजिनापेक्षा चौपट जास्त क्षमता असलेलं हे नवं इंजिन लोकांना प्रचंड आवडलं. वॉट आणि बॉल्टन या दोघांना आता श्वास घ्यायलाही फुरसत मिळेनाशी झाली होती. रात्रंदिवस वाफेची इंजिनं तयार करण्याच्या कामात वॉट गुंतलेला असायचा, तर बॉल्टन विक्रीच्या कामात! वॉटच्या संशोधनातून १७८१ साली दळणवळणाच्या इतिहासातलं चाकांना गती देणारं पहिलं यंत्र तयार झालं.
वॉटची लोकप्रियता आणि बुद्धिमत्ता बघून १७८४ साली रॉयल सोसायटीचं सदस्यत्व वॉटला देण्यात आलं. १७९४ साली वॉट आणि बॉल्टन यांच्या वाफेच्या इंजिननं संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. वाफेच्या इंजिनाच्याच तत्वात थोडेफार फेरफार करून जॉर्ज स्टीफन्सननं बनवलेली वाफेवर चालणारी रेल्वे मँचेस्टर ते लिव्हरपूल यामध्ये धावली. औद्योगिक क्रांतीला इथूनच खरी चालना मिळाली. वॉटनं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एकूण ५०० यंत्रं तयार केली. त्याला अफाट लोकप्रियता तर लाभलीच पण अनेक ठिकाणी त्याला सन्मानपूर्वक गौरवण्यात आलं. वयाच्या ८३ व्या वर्षी म्हणजेच २५ ऑगस्ट १८१९ या दिवशी जेम्स वॉटचा मृत्यू झाला. जेम्स वॅटनं आपल्याला मिळालेला सगळा पैसा आयुष्यभर संशोधनासाठीच वापरला. त्याच्या कामाची कृतज्ञता म्हणून पॉवर किंवा शक्तीच्या एककाला 'वॉट' या नावानं संबोधलं गेलं!
Add new comment