बर्टोल्ट ब्रेख्त
शेक्सपिअर इतकाच ताकदीचा एक बैचेन नाटककार, एक संवेदनशील कवी आणि एक राजनैतिक बुद्धिमान कार्यकर्ता म्हणून जर्मनीचा बर्टोल्ट ब्रेख्त ओळखला जातो. वयाच्या २० वर्षांपासून मार्क्सवादी विचारांनी प्रभावित झालेल्या ब्रेख्तनं मार्क्सवादाची साथ आयुष्यभर सोडली नाही. ‘द थ्री पेन्नी ऑपेरा’, ‘लाईफ ऑफ गॅलिलिओ’, ‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’, ‘द गूड पर्सन ऑफ शेजवान’ आणि ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ ही त्याची नाटकं खूपच गाजली.
आपल्या आयुष्यात एकूण ५०० सशक्त ताकदीच्या कविता ब्रेख्तनं केल्या. ‘मी कविता प्रकाशित करण्यासाठी लिहीत नाही, तर माझं नाटक जास्त दमदार आणि जास्त चांगलं करण्यासाठी मी लिहितो.’ असं त्यानं एके ठिकाणी म्हणून ठेवलंय. त्यानं भारत आणि चीन नाटकांच्या परंपरांचा अभ्यास केला. आपल्या नाट्यचिंतनामधून परंपरागत थिएटरच्या चौकटीबाहेर पडून ब्रेख्तनं एपिक थिएटर आणि एलियनेशन थिएरीला जन्म दिला.
ब्रेख्तच्या वेळची सामाजिक स्थिती खूपच विदारक होती. हुकूमशाहीनं उच्छादाचं वातावरण सर्वत्र होतं. अशा वेळी ब्रेख्तनं आपल्या लेखणीचं शस्त्र हातात घेऊन बंडाचा झेंडा फडकवला. हिटलरनं त्या वेळच्या त्याच्या विरोधात लिखाण करणार्या अनेंक लेखकांच्या पुस्तकांवर बंदी घातली होती. मात्र हिटलरच्या तीक्ष्ण नजरेतून कसं कुणास ठाऊक पण ब्रेख्तचं पुस्तक सुटलं होतं. त्या वेळी ब्रेख्तनं स्वतःच हिटलरला एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यानं म्हटलं, ‘मी देखील तुझ्या विरोधात आहे. माझ्या पुस्तकावर कृपा करून बंदी घालं नाही तर इतिहास असं समजेल की मी तुझ्या बाजूनं होतो किंवा असं समजलं जाईल की मी इतकी महत्वाची व्यक्ती नव्हतो की तू माझ्या पुस्तकांकडे लक्ष देऊन त्यावर बंदी घालावीस.’
ब्रेख्तसारखा प्रभावशाली नाटककार दुसरा जर्मनीमध्ये झाला नाही. ब्रेख्तचं पहिलं नाटक ‘बाल’ आहे. ते पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे १९१८ साली प्रदर्शित झालं. दुसरं नाटक १९२२ साली ‘ड्रम्स इन द नाईट’ प्रकाशित झालं. याशिवाय ‘मदर करेज’ हे त्याचं अत्यंत प्रसिद्ध नाटक आहे. या नाटकात ब्रेख्तनं युद्धाच्या दरम्यान भांडवलशाही व्यवस्थेमध्ये एक सैनिक आणि एक साधा नागरिक यांच्यातल्या संबंधांबद्दल सांगितलंय. यात त्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये घडणार्या भावनांचं, विचारांचं, संकल्पनांचं आणि सवयींचं चित्र चितारलं आहे. ब्रेख्तचं ‘द लाईफ ऑफ गॅलिलिओ’ हे नाटक सृजनात्मक आणि अप्रतिम आहे. त्यात त्यानं खूप परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. सामाजिक आणि राजनैतिक मूल्यांची घसरण इतकी झाली आहे की त्यावर तो सतत उपहासात्मक टीका करतो. या नाटकात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चर्च यांच्यामधलं वैचारिक द्वंद्व चितारलं आहे. ब्रेख्तचं ‘जर शार्क मनुष्य असता....’ हे नाटक 'स्टोरीज ऑफ मिस्टर क्यूनर' या त्याच्याच पुस्तकावर आधारित आहे.
ब्रेख्तनं आपल्या नाटकामधून युरोपीय रंगमंचाला यथार्थवादाचा रस्ता दाखवला. नाटक लिहिताना ब्रेख्त केवळ नाटक म्हणून किंवा साहित्यिक कृती म्हणून आपल्या लिखाणाकडे बघत नसे. उलट या माध्यमातून एक विचार त्यातून पेरला जाण्यावर त्याचा भर असायचा. त्याच्या नाटकांना नाट्यसमीक्षक राजनितिक आवाज म्हणत. खरं तर ब्रेख्तनं आपल्या नाटकाकडे ब्रेख्त देखील एक शस्त्र म्हणूनच बघत असे. नाटकाच्या माध्यमातून तो आपली वैचारिक लढाई लढत होता. त्याच्या नाटकातून नेहमीच एक सूत्रधार किंवा निवेदक समोर येत असे. त्याची नाटकं बघितल्यावर प्रेक्षकानं केवळ बघ्याच्या भूमिकेत न राहता त्याच्यावर त्या विचारधारेचा परिणाम होऊन तो निणर्याच्या दिशेनं झुकला पाहिजे अशी मानसिक तयारी ब्रेख्तची नाटकं प्रेक्षकांची करत.
ब्रेख्तचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं आपल्या कलेच्या अविष्कारासाठी आपल्या मूल्यांचा त्याग केला नाही. कुठल्याही परिस्थितीशी सामना करत तो ठामपणे आपलं म्हणणं मांडत राहिला. आपल्या नाटकांमधून त्यानं मार्क्सवादी विचारधारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याला 'एपिक थिएटर' असं नाव दिलं. ज्याला आपण लोकनाट्य असं म्हणून शकतो. प्रेक्षकांमधला विवेक जागृत करणं, उच्च कोटीचं बौद्धिक मनोरंजन करणं, अतिभावनेत वाहू न देता प्रेक्षकाला तटस्थपणे विचार करण्यास भाग पाडणं ब्रेख्त करत असे. माणसाला त्याच्या आतल्या मर्यादांपासून खेचून बाहेर काढायचं काम आपल्या नाटकानं केलं पाहिजे असं ब्रेख्तला वाटायचं.
‘जेव्हा लेनिन गेला’ या कवितेत ब्रेख्त म्हणतो ः
लेनिनचं जाणं असं होतं जसं
झाडानं पानांना म्हणावं मी जातोय
त्याच्या कविता क्रांतिवर असल्या तरी तो एक हळुवार आणि हळवा प्रेमकवीही होता. आपले विचार आणि आपली मूल्य यांच्याशी अप्रामाणिकपणा बर्टोल्ट ब्रेख्तनं कधीच केला नाही.
जर्मनीमधला गेटे, रिल्के आणि ब्रेख्त हे तीन नावं खूप महत्वाची होती. या तिघांच्या कविता एकदुसर्याला समजायला मदत करतात. गेटे अठराव्या शतकात जन्मला. (१७४६-१८३२). १९ व्या शतकात त्याची कविता बहरली. गेटेनं दोन महायुद्धांची भीषणता न बघितली न अनुभवली. रिल्के (१८७५-१९२६) यानं पहिल्या महायुद्धाची विनाशकारी स्थिती बघितली. साम्राज्यवादी देशांनी हा विनाश कसा इतरांवर थोपला याकडे त्याचं लक्ष मात्र कधीही वेधलं गेलं नाही. त्यानंतर आलेल्या ब्रेख्त हा या दोन्ही कविंपेक्षा वेगळा होता. तो एक योद्धा कवी म्हणून ओळखला गेला.
बर्टोल्ट ब्रेख्तचा जन्म १० फ्रेबुवारी १८९८ या दिवशी जर्मनीच्या बावेरिया प्रांतात झाला. त्याचे वडील कागदाच्या कारखान्यात काम करत. ते शेतकरी कुटुंबातले होते. आई-वडील दोघंही धार्मिक होते. त्याचं प्राथमिक शिक्षण जन्मठिकाणी झालं आणि त्यानंतर १९१७ साली तो म्यूनिक विश्वविद्यालयात पुढल्या शिक्षणासाठी दाखल झाला. तिथं त्यानं चिकित्साशाा या विषय अभ्यासासाठी निवडला. गंमत म्हणजे त्याला या विषयांत रस वा्टेनासा झाला. या काळात ब्रेख्त कविता आणि नाटक यात विशेष रस घ्यायला लागला. त्या वेळच्या स्थानिक वर्तमानपत्रात त्याच्या रचना प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा सैन्यात जाण्याची संधी ब्रेख्तला मिळाली. त्याला सैन्याच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी पाठवलं गेलं. त्याच्या जन्मठिकाणाच्या जवळच त्याची नियुक्ती झाली होती.
सैन्यात राहिल्यानं त्याच्या प्रतिभेवर आणि त्याच्यातल्या हळव्या कवीमनावर युद्धाच्या विनाशकारी स्वरुपाचे खूप खेालवर पडसाद उमटले. त्याच्या मनात युद्धाविषयी घृणा आणि तिरस्कार निर्माण झाला. ब्रेख्त आपल्या कवितांमधून आणि नाटकांमधून युद्धाविषयी लिहिताना ते कसं मानवविरोधी आणि नरसंहार करणार आहे हेच मांडायचा. प्रखर विरोध ही त्याच्या आतून येणारी प्रचंड मोठी ऊर्मी होती. हे सगळं सांगितलं की मग तो शांतता किती महत्वाची आहे हे पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न आपल्या रचनेतून करत असे.
युद्ध होत राहिली तर मोठे देश लहान देशांना अंकित बनवत राहणार, शस्त्रांचा व्यापार वाढत राहणार, युद्धामुळे साम्राज्यवादाचा उन्माद वाढणार वातावरण निर्माण होतं. यात आर्थिक समता असत नाही. चंगळवादी भांडवलवादी, व्यवस्था निर्माण होते आणि ब्रेख्तला या गोष्टीचा विरोध होता. ब्रेख्तला वाटायचं की युद्ध माणसालाच संपवून टाकत नाही तर आपल्या हजारो संसाधनांनाही उदध्वस्त करत असतं. युद्धाची सगळ्यात जास्त झळ ही गरीब माणसाला बसते. युद्धामुळे आपली सभ्यता, संस्कृती, श्रम आणि मानवीय मूल्य देखील नष्ट होतात. १९२४ साली ब्रेख्त बर्लिनला आला आणि त्या वेळी जर्मनीमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला होता. तो डाव्या विचारसरणीचे नेते, नाट्यकलावंत आणि राजनैतिक नेते यांच्या संपर्कात आला. त्या लोकांमध्ये तो त्याच्या प्रतिभेनं लोकप्रिय देखील झाला.
ब्रेख्त हा लोकांचा कवी होता. ब्रेख्तच्या कवितेत आणि नाटकात जीवनातल्या विकृती, कामोन्माद, हिंसा, युद्ध आणि युद्धाचे पडसाद, लालूच, स्वार्थ, अराजकता आणि भांडवलशाही व्यवस्था यांचं दर्शन दिसतं. ब्रेख्तच्या कवितेत कुठेही अलंकारिक सुंदर शब्दांना स्थान दिसत नाही. मनोरंजन हा त्याचा हेतू नाही. त्याच्या कवितेतून ऊर्जा शक्ती यांचाच प्रत्यय येतो. ब्रेख्तला राजनितिक कवी असंही संबोधलं गेलं. कारण त्याच्या कवितांमधून नेहमीच प्रजेचा, लोकांचा संघर्ष त्यानं मांडला. श्रमिकांचा आक्रोश त्यानं मांडला आणि शेतकर्यांची परिस्थिती देखील मांडली. त्याच्या कवितांमध्ये निसर्ग येतो. संगीतामुळे, ध्वनीमुळे माणसानंतरही कला जिवित राहते असं तो म्हणायचा. ब्रेख्त खूप खुल्या विचारांच्या असल्यामुळे ब्रेख्तचे अनेक स्त्रियांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच्या प्रेमकविताही तितक्याच हळुवार आणि उत्कट आहेत. ३० जानेवारी १९३३ या दिवशी हिटलरनं जर्मनीवर ताबा मिळवला तेव्हा ब्रेख्तसाठी मोठंच संकट उभं राहिलं.
आपले मार्क्सवादी विचार बरोबर घेऊन आता जर्मनीमध्ये राहणं शक्यच नव्हतं. या घटनेनं ब्रेख्तच्या आयुष्यातलं निर्वासिताचं जगणं सुरू झालं. खरं तर ब्रेख्त हा मार्क्सवादाचा त्याग करून हिटलरचं गुणगान करत आनंदानं जगू शकत होता. अनेक लेखक आणि कवी हेच करत आलेले होते. पण ब्रेख्त आणि नेरूदा यांच्यासारख्या कवींनी मात्र आपली मूल्यं निभावली. तो निर्वासित म्हणून डेन्मार्क इथं गेला. त्यानंतर १९४१ साली ब्रेख्त अमेरिकेला गेला. त्याला अमेरिका आवडली नाही. त्यामुळे तिथून स्विर्त्झलंडला तो जाऊन राह्यला लागला. १९४९ साली तो झूरिकला पोहोचला. १९५० साली त्यानं ऑस्ट्रियाचं नागरिकत्व घेतलं.
‘सिनेमा बदलल्यानं लोक बदलणार नाहीत, तर लोकांचं जीवन बदललं तर सिनेमा बदलेल.’ असं ब्रेख्त म्हणायचा. आपल्याकडे गिरीश कर्नाडनं आपल्या लिखाणावर ब्रेख्तचा प्रभाव असल्याचं मान्य केलंय. गिरीश कर्नाडचं हयवदन, विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल, सर्वेश्वर दयाल सक्सेनाचं बकरी या नाटकांवर ब्रेख्तचा प्रभाव स्पष्टपणे बघायला मिळतो. ब्रेख्तची नाटकं भारतातही बसवली गेली. हबीब तनवीरनं गूड वुमेन ऑफ सेत्जुआन, अमाल अल्लानाने मदर करेज, एम. के. रैनाने थ्री पैनी ऑपेरा, एम. एस. मॅथ्युनं काकेशियन चाक सर्किल ही नाटकं केली. ब्रेख्तियन पद्धतीमध्ये कार्ल वेबर आणि फ्रित्झ बेनेवित्ज सारख्या विदेशी दिग्दर्शकांनी भारतात येऊन ब्रेख्तची नाटकं सादर केली. ‘सगळे आनंदाच्या पाठी धावतात, पण त्यांना ठाऊकच नसतं की आनंद त्याच्या स्वतःच्या पायाखालीच आहे.’ असं म्हणणार्या ब्रेख्तचा मृत्यू १४ ऑगस्ट १९५६ या दिवशी वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यानं झाला. आयुष्यभर त्याला ओसीडीनं त्रस्त केलं होतं. तो हायपरऍक्टिव्ह होता. आपल्यातल्या कलाकाराची ताकद त्यानं कविता, नाटक आणि विचारांतून कायम ठेवली आणि आपल्या कार्याचा एक अमीट ठसा जगावर उमटवला!
दीपा देशमुख.
Add new comment