व्हिक्टर फ्रँकेल
डॉ. व्हिक्टर फ्रँकेल हा एक ऑस्ट्रियन न्यूरॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि हिटलरच्या छळछावण्यातून वाचलेला कैदी होता. ‘लोगोथेरपी’ या संकल्पनेचा जनक म्हणून फ्रँकेल ओळखला जातो. त्याचं सर्वात गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘मॅन्स सर्च फॉर हिमसेल्फ’. हे त्याच्या छळछावण्यांतल्या अनुभवांवर आधारित होतं. त्यानं अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी वापरलेल्या सायकोथेरपीबद्दल या पुस्तकात लिहिलं होतं. त्यानं छळछावणीतही समुपदेशन करुन हजारो सहकार्यांना धीर दिला होता!
२६ मार्च १९०५ या दिवशी व्हिएन्नामध्ये व्हिक्टर फ्रँकेलचा जन्म झाला. त्याचे वडिल गॅब्रिएल हे कठोर आणि शिस्तप्रिय होते. सरकारी स्टेनोग्राफर पासून ‘मिनिस्टरी ऑफ सोशल सर्व्हिसेस’चे संचालक होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्याची आई एल्सा ही प्रेमळ आणि धार्मिक वृत्तीची होती. तीन भावंडांतला व्हिक्टर प्रचंड चौकस होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपण डॉक्टर होणार हे त्यानं ठरवलं होतं. शाळेत असल्यापासून त्याला समाजकार्याची आवड होती.
माणसांमध्ये रुची असल्यानं तो मानसशास्त्राकडे वळला. शॉपेनहॉवर या तत्वज्ञावर त्यानं शाळेच्या शेवटच्या वर्षात निबंध लिहिला होता. तेव्हाच व्हिक्टरचा फ्रॉइडबरोबर पत्रव्यवहारही चालू झाला होता. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी त्यानं १९२४ मध्ये तयार केलेला अभ्यासक्रम खूपच गाजला. तसंच आत्महत्येची प्रवृत्ती असणार्या रुग्णांना त्यानं स्वत: समुपदेशन केलं होतं.
१९२५ साली व्हिक्टर फ्रॉईडला भेटला. १९२६ मध्ये व्हिक्टर फ्रँकेलनं ‘लोगोथेरपी’ हा शब्द प्रथमच जाहीरपणे वापरला. १९३० साली व्हिएन्ना विद्यापीठात तो मेडिसिन, न्यूरॉलॉजी आणि नंतर मानसोपचार शिकला. १९३३ ते १९३७ च्या दरम्यान फ्रँकेलनं आत्महत्येची प्रवृत्ती असलेल्या ३०,००० स्त्रियांवर उपचार केले. मात्र नाझींनी १९३८ मध्ये ऑस्ट्रियावर कब्जा मिळवल्यावर तो ज्यू असल्यामुळे त्याच्यावर आर्यन वंशाच्या रु्ग्णांवर उपचार करण्यावर बंदी घातली गेली. काही वर्षं खाजगीरीत्या वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर तो रॉथचाइल्ड हॉस्पिटलमध्ये रुजू झाला. तिथं त्यानं न्यूरॉलाजीचा विभाग सांभाळून ब्रेन सर्जन म्हणून काम केलं. ज्यूंना प्रवेश असलेलं व्हिएन्नामधलं तेव्हा ते एकमेव हॉस्पिटल होतं. रोगानं पछाडलेल्या लोकांना मारुन टाकण्याच्या हिटलरच्या अमानुष कृत्यापासून फ्रँकेलनं उपचार करुन बरं केल्यामुळे बरेच रोगी बचावले होते.
२५ सप्टेंबर १९४२ रोजी फ्रँकेलला छळछावणीत पाठवलं गेलं. छळछावणीत दाखल झाल्यावर त्याचं ‘द डॉक्टर अँड द सोल’ हे आत्मचरित्रात्मक लिखाण शोधून नष्ट करण्यात आलं. चोरलेल्या कागदांवर लिखाण करत फ्रँकेलनं स्वत:ला जिवंत ठेवलं. त्याच्यातल्या आशावादानं तो जिवंत राहू शकला. छळछावणीत दाखल झालेल्या लोकांना दु:ख आणि मानसिक आघात यातून बाहेर काढण्यासाठी त्यानं वेगळा विभाग सुरू केला. एक मानसोचपचारतज्ज्ञ आणि एक न्यूरॉलॉजिस्ट या दोन्ही भूमिका त्यानं या काळात बजावल्या. निद्रानाश, आत्मा आणि शरीर अशा विषयांवर तो भाषण देई. १९ ऑक्टोबर १९४४ मध्ये त्याला कुप्रसिद्ध ऑशविझ छळछावणीत हलवलं. तर २५ ऑक्टोबरला तुर्केमच्या छळछावणीत त्याची रवानगी झाली. इथं त्यानं ६ महिने काढले. त्याला तिथं मजुराचं काम दिलं गेलं.
अशा दोन छळछावण्यानंतर त्याला टॉयफॉईड झाला. दरम्यान त्याच्या बायकोचा बर्जेनबेस्लेन छळछावणीत मृत्यू झाला आणि त्याचे आईवडीलही छळछावणीतच मरण पावले. २७ एप्रिल १९४५ रोजी अमेरिकन सैन्याकडून फ्रँकेलची सुटका झाली. छळछावणीतून सुटका झाल्यावर फ्रँकेल व्हिएन्नाला परतला. १९४६ मध्ये अतिशय उदास मन:स्थितीत असताना त्यानं ‘व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिक’ मध्ये संचालकपद स्वीकारलं. नंतर ते पद त्यानं २५ वर्ष भूषवलं. त्यानं स्वत:चं आत्मचरित्र पूर्ण करुन अखेरीस त्यानं ते प्रकाशित केलं. ते खूप गाजल्यानंतर त्यानं केवळ ९ दिवसात जर्मन भाषेत दुसरं पुस्तक लिहिलं! या पुस्तकाच्या जर्मन भाषेतल्या नावाचा अनुवाद ‘सेईंग येस टू लाईफ इन स्पाईट ऑफ एव्हरीथिंग’ असा आहे. या पुस्तकाचा ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ हा इंग्रजीतला अनुवाद नंतर जगभर गाजला. छळछावणीतल्या सामान्य कैद्याचं आयुष्य मानसोपचारतज्ञाच्या नजरेतून त्यानं यात रंगवलंय.
फ्रँकेलचा मृत्यू होण्यापूर्वी या पुस्तकाच्या १५ कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या! त्यातल्या ५ कोटी तर अमेरिकेतच विकल्या गेल्या होत्या! फ्रँकेलच्या नावावर ३२ पुस्तकं असून त्यांचा २७ भाषेत अनुवाद झाला आहे! फ्रँकेलची एलेनॉर (एली) नावाच्या तरुण मुलीची सहाय्यक म्हणून या दरम्यान ओळख झाली. तिच्या तो प्रथमदर्शनीच प्रेमात पडला. त्याच्याहून वयाने निम्म्या असलेल्या एलीने फ्रँकेलला परत जगात उभं रहायला मदत केली. १९४७ मध्ये त्यानं एलीसोबत दुसरं लग्न केलं. नंतर त्यांना गॅब्रिएल ही मुलगी झाली.
मानसशास्त्रातलं फ्रँकेलचं महत्त्वाचं योगदान म्हणजे लोगोथेरपी ! तो तिचा जनकच मानला जातो. ‘लोगॉस’ या ग्रीक शब्दाचा अर्थ अभ्यास, शब्द, आत्मा, देव किंवा मीनिंग असा होतो. या शब्दाच्या शेवटच्या अर्थावर फ्रँकेलनं लोगोथेरपीसाठी लक्ष केंद्रित केलं. फ्रॉइडनं आनंद मिळवण्याची इच्छा (विल टू प्लेझर) तर अॅडलरनं अधिकार मिळवण्याची इच्छा (विल टू पॉवर) हे माणसाच्या प्रेरणेला कारणीभूत असतं असं मांडलं होतं तर फ्रँकेलची लोगोथेरपी आयुष्याचा अर्थ शोधायची इच्छा (विल टू मीनिंग) ही माणसाला प्रेरणा देते असं सांगते. फ्रँकेल स्वत:ला एक्झिस्टँशिअल मानसशास्त्रज्ञ मानत असे. आयुष्याला अर्थ नसणं म्हणजे अस्तित्वच धोक्यात येणं आहे असं त्याचं म्हणणं होतं. संडे न्यूरॉसिस हा वाक्प्रचार फ्रँकेलचाच आहे. आठवडाभर काम करुन झाल्यावर लोकांना रविवारी आयुष्य एकदम पोकळ वाटायला लागतं. हा पोकळपणा अस्तित्वाचा अर्थच न समजल्यामुळे येतो. हे एक्झिटँशिअल फ्रस्ट्रेशन कंटाळा, एकटेपणा यातून प्रतीत होतं. त्यावरुन हा शब्द फ्रँकेलनं वापरला.
नाझी छळछावण्यात फ्रँकेलची थिअरी उदयाला आली. त्याला छळछावणीतल्या त्या मर्यादित जगातही फक्त दोन प्रकारची माणसं आढळली. एकतर जबाबदार आणि दुसरी बेजबाबदार, जीवनविषयक मूल्यं नसलेली, अकारण, अर्थशून्य जगणारी असं फ्रँकेल म्हणतो! जगण्याच्या अर्थाबद्दलचं तत्वज्ञान फ्रँकेलला जेव्हा सुचलं त्या क्षणाबद्दल त्यानं म्हटलं होतं, सरतेशेवटी जे मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो ते सर्वोच्च ध्येय म्हणजे प्रेम ! माणसाच्या अभ्युदयाची एकमेव आशा म्हणजे प्रेम..! ज्या माणसाचं जगात काहीही उरलं नाही तोही त्याच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या क्षणभराच्या आठवणीने देखील आनंदात राहू शकतो. ते प्रेमच आयुष्याला अर्थपूर्णता देतं.’ फ्रँकेलनं शरीराच्या आजाराबरोबरच त्यांचा संबंध मनाशी जोडला होता. तसंच जेनेटिक गोष्टींनाही त्यानं विचारात घेतलं होतं. चंगळवादी वृत्तीमुळे माणूस नैराश्य, आक्रमकता आणि व्यसनाधीनतेकडे वळतो असं फ्रँकेलनं म्हटलं होतं. माणूस स्वत:साठी अशक्य असं ध्येय ठरवतो आणि मग ते ध्येय गाठता न आल्यामुळे भविष्यकाळ अंध:कारमय होऊन नैराश्य येतं असं फ्रँकेलचं मत होतं. मनोविकारांचा मानवतावादी पद्धतीनं विचार करून त्यांची कारणं शोधण्याचा प्रयत्न फ्रँकेलनं केला.
ओसीडी, स्किझोफ्रेनिया, फोबिया अशा अनेक मनोविकारांचं मूळ कशात आहे याचंही विस्तृत वर्णन फ्रँकेलनं केलं. नॉर्मल लोकांना एखादी गोष्ट करुन पूर्ण झाली, की काम संपलं अशी जाणीव होते. तशी जाणीव ओसीडी असलेल्या लोकांना होतच नाही. रात्री झोपताना दार लावलंय का? अशा साध्या गोष्टीतही त्यांना प्रचंड निश्चिती लागते. अशा रुग्णांना अनिश्चिततेची थोडीतरी सवय लावणं गरजेचं असतं असं फ्रँकेलनं सुचवलंय. सर्वसामान्य माणूस आपल्या मनातून येणारे विचार आपले आहेत हे ओळखतो. स्किझोफ्रेनिक माणूस त्याच विचारांकडे त्रयस्थासारखं बघतो. त्यांना तो आपल्यापेक्षा वेगळे असणारे आवाज समजतो. यातून शेवटी तो स्वत:लाच ओळखेनासा होतो. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना आतून ऐकू येणार्या आवाजांकडे लक्ष न देता काहीतरी अर्थपूर्ण कामं करत राहाण्याकडे हळूहळू वळवलं तर उपयोग होऊ शकतो. असं ‘विल टू मीनिंग’ शोधणारी फ्रँकेलची लोगोथेरपी सांगते. आयुष्याचा अर्थ कला, संगीत, लेखन, यापैकी कशातूनही शोधता येतो असं फ्रँकेल म्हणतो. या सगळ्या गोष्टी बळजबरीनं नाही तर आपल्या अंतःकरणातून घडल्या पाहिजेत असंही त्याला वाटतं.
जगण्याचा अर्थ शोधताना योग्य प्रवृत्ती आणि मूल्यं यांची जपणूक करणं, समोरच्याबद्दल सहानुभूती वाटणं, आत्मविश्वास असणं, अशा स्वभावामुळे माणसाचं आयुष्य अर्थपूर्ण आणि आनंदी होतं आणि या गोष्टी माणसापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं फ्रँकेल ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ या त्याच्या पुस्तकात मांडतो. सार्त्रसारख्या विचारवंतांपेक्षा फ्रँकेलची मतं काहीशी वेगळी होती. जीवनाची अर्थशून्यता मान्य करावी असं सार्त्र म्हणायचा; तर आयुष्याला अर्थ प्राप्त करुन देण्याची क्षमता जर एखाद्यात नसेल तर ती क्षमता आपल्यात आणावी अशा मताचा फ्रँकेल होता. आपल्या आयुष्यातले छळछावण्यातले वेगवेगळे अनुभव त्याला त्याची मतं बनवायला कारणीभूत ठरले. जगण्याचा अर्थ शोधताना येणारे अनुभव, माणसातली सर्जनशीलता शेवटी लौकिक जगाच्या पलीकडचा अनुभव देतात असं फ्रँकेलचं म्हणणं होतं. फ्रँकेलनं परमेश्वर आणि अध्यात्म यांचाही विचार आपल्या विचारांतून देण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांना तो अमान्य होता.
१९४८ मध्ये फ्रँकेलला तत्वज्ञानात डॉक्टरेट मिळाली. ‘मानसशास्त्र आणि धर्म’ या विषयात त्यानं ‘द अनकॉन्शस गॉड’ हा प्रबंध लिहिला होता. १९५० साली त्यानं ‘ऑस्ट्रियन मेडिकल सोसायटी फॉर सायकोथेरपी’ स्थापन केली आणि त्याचा संचालक म्हणून काम पहायला सुरुवात केली. १९५५ मध्ये त्याला व्हिएन्ना विद्यापीठानं न्यूरॉलॉजी आणि मानसोपचाराचा प्राध्यापक म्हणून निमंत्रित केलं. तेव्हाच तो अमेरिकेमधल्या हार्वर्डला व्हिजिटिंग प्रोफेसर होता. प्राध्यापक म्हणून पूर्णवेळ काम करायला लागल्यावर व्हिएन्नाबाहेरही त्याची बरीच प्रशंसा व्हायला लागली. अनेक विद्यापीठांनी त्याला देऊ केलेली प्राध्यापकाची जागा, पारितोषिकं, सन्मान हे सगळं या दरम्यान सुरू झालं. जगभरातल्या २९ विद्यापीठांनी त्याला डॉक्टरेट बहाल केली. नोबेल पारितोषिकासाठीही त्याची शिफारस झाली होती. तो गिर्यारोहक होता आणि वयाच्या ६७व्या वर्षी त्यानं वैमानिक म्हणून लायसेन्स मिळवलं होतं. व्हिएन्ना विद्यापीठात तो १९९० पर्यंत म्हणजे वयाच्या ८५व्या वर्षापर्यंत शिकवत होता. १९९२ साली त्याच्या मित्रपरिवारानं ‘व्हिक्टर फ्रँकेल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. १९९७ साली फ्रँकेलनं आपलं शेवटचं पुस्तक ‘मॅन्स सर्च फॉर अल्टिमेट मीनिंग’ लिहिलं. २ सप्टेंबर १९९७ या दिवशी फ्रँकेलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. फ्रँकेलनं मानवी मनाकडे आणि आयुष्याकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी दिली हे मात्र नक्की !
Add new comment