एरिक फ्रॉम
आईविना वाढलेल्या एका मुलीचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. पुढे काही कारणांनी तिचं स्वतःचं लग्न मोडलं आणि लग्न मोडल्यानंतर ती आणि तिचे वडील दोघंच एकमेकांच्या सोबतीनं राहायला लागले. खरं तर तिचे वृद्ध वडील खूपच कंटाळवाण्या, रुक्ष स्वभावाचे होते. पण तरीही तिची ते सोबत होते. एके दिवशी तेही मृत्यू पावले आणि त्या मुलींनं वडिलांपाठोपाठ आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. दुसर्या एका प्रसंगात पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैनिक म्हणजे उच्च दर्जाचे आणि इंग्लिश सैनिक म्हणजे कमी दर्जाचे असं जर्मन सैनिक अभिमानाने सगळ्यांसमोर मोठ्या गुर्मीत म्हणत. या दोन्ही प्रसंगांनी एका १२-१४ वर्षांच्या मुलाच्या मनावर खूप मोठा परिणाम केला होता. पहिल्या प्रसंगातल्या मुलीच्या अतार्किक वागणुकीचा आणि दुसर्या प्रसंगातल्या वॉर हिस्टेरियाचा या मुलाच्या आयुष्यावर झालेला परिणाम त्यानं आपल्या ‘बियॉँड द चेन्स ऑफ इल्युजन’ या आत्मचरित्रात लिहून ठेवलाय. या मुलाचं नाव होतं - एरिक फ्रॉम!
एरिक फ्रॉमनं समाज आणि मनोविकार यांचा संबंध उलगडून दाखवून मानसशास्त्राच्या दुनियेत अभूतपूर्व योगदान दिलंय. माणसांचे आर्थिक, सामाजिक स्तर आणि त्यावरुन बनणारे व्यक्तिमत्वाचे प्रकार यावर त्यानं संशोधन केलं. एरिक फ्रॉम हा जर्मन-अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता. फ्रॉम आयुष्यभर माणसाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहिला. त्याचा माणसाचं स्वातंत्र्य आणि प्रेम करण्याची क्षमता यावर प्रचंड विश्वास होता. माणसांच्या वैयक्तिक समस्या आणि त्यातून घडणारा समाज या दोन्हीकडे बघण्याची त्याच्याकडे मानवतावादी दृष्टी होती. माणसाच्या भवितव्याचा शोध घेण्याचा त्यानं आपल्या लिखाणातून सतत प्रयत्न केला. प्रसन्नपणे आणि चांगलं कसं जगावं याचा अभ्यास करणार्या संशोधकांचा आजही तो आवडता मानसशास्त्रज्ञ आहे. तो एकाच वेळी फ्रॅाईडवादी, मार्क्सवादी आणि बुद्धिस्टही होता.
२३ मार्च १९०० साली जर्मनीमधल्या फ्रँकफर्ट इथं एरिक फ्रॉम याचा जन्म एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे उद्योगपती असलेले वडील अतिशय लहरी होते. त्याच्या आईला अनेकदा नैराश्यानं पछाडलेलं असायचं. एकूणच फ्रॉमचं बालपण काही फारसं आनंददायी नव्हतं. त्याच्या घरातलं वातावरण कट्टर धार्मिक होतं. त्यानं लहानपणी ज्यू धर्माचे कायदे आणि चालीरीती असलेला तालमुड हा ग्रंथ शिकायला सुरुवात केली. ज्यू धर्माचे रुढीजात संस्कार त्याच्यावर होत असले तरीही नंतर तरुण वयात स्वतंत्र विचारांच्या बुद्धिमान ज्यू लोकांचा आदर्श त्याच्यासमोर होता. हरमान कोहेन, नेहेमिया नोबेल अशा लोकांच्या त्याच्यावर असलेल्या प्रभावामुळे तो मुक्त विचारांचा, ठाम आणि चिकित्सक मनोवृत्तीचा बनला. याच वृत्तीतून १९१८ साली पहिलं महायुद्ध संपल्यावर, युध्द कशी होतात? माणसांच्या क्रूर वागण्याचा अर्थ काय आहे? याची उत्तरं शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधांचा मागोवा घेण्याची गरज फ्रॉमला तीव्रतेनं जाणवायला लागली.
१९२० साली फ्रँकफर्ट विद्यापीठात फ्रॉम दाखल झाला. १९२२ साली हायडेलबर्गमधून त्यानं समाजशास्त्र विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आणि १९२४ मध्ये सायकोऍनालेसिसचा अभ्यास सुरू केला. १९२६ साली त्यानं फ्रीडा राईशमन या त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या स्त्रीशी लग्न केलं. हे लग्न चारच वर्षं टिकलं. पण घटस्फोटानंतरही त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले. १९२६ नंतर फ्रॉम ज्यूईश विचारांकडून सर्वधर्मसमभावाकडे वळला. याच काळात नीतिमत्तेच्या जुनाट संकल्पना सोडून त्यानं स्वतंत्रपणे विचार आणि कृती करायला सुरुवात केली.
१९२८ ते १९३८ या काळात फ्रॉमनं अधिकारशाहीतला उद्दामपणा आणि धर्मव्यवस्था या सगळ्यांचा वेध घेतला. १९३० साली फ्रॉमनं मनातल्या सुप्त आणि दबलेल्या इच्छा याच्याशी माणसांचे मनोविकार निगडित असतात या फ्रॉइडच्या संकल्पनेपासून फारकत घेतली आणि माणसं ज्या संस्कृतीचा, समाजाचा भाग असतात त्यातल्या चालीरीती आणि नीतीनियम यांच्यावर त्यांच्या प्रेरणा, इच्छा आणि आकांक्षा ठरतात; त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनोविकार जन्म घेतात; यावर फ्रॉमचे विचार केंद्रित झाले. फ्रॉइड आणि मार्क्स यांच्या तत्त्वांचा अभ्यास करुन त्यानं स्वत:चं असं एक विश्लेषण तयार केलं होतं. मार्क्सवादाच्या प्रभावाखाली येऊन जर्मन कामगारांवर त्यानं याच काळात केलेलं काम नंतर १९८४ साली प्रसिद्ध झालं.
१९४१ साली फ्रॉमचं ‘एस्केप फ्रॉम फ्रीडम’ हे पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. सरंजामशाही ते भांडवलशाही या प्रवासात माणसं स्वत:च्या जमिनीपासून, समाजापासून दुरावली. सरंजामशाहीत एकत्र कुटुंबपद्धत होती. ती जाचक असली तरी त्यात सुरक्षितता होती. कुठल्याही संकटाच्या प्रसंगी अनेकजण मदतीला, धीर द्यायला असत. पण त्याच बरोबर लोकांना त्यात स्वातंत्र्य नव्हतं. त्यांनी कसं राहायचं, कुठे जायचं, कुणाशी लग्न करायचं, अशा गोष्टी वडीलधारी मंडळीच ठरवत. यानंतर आलेल्या भांडवलशाहीमध्ये शहरं वाढली, एकत्र कुटुंबपद्धती मोडून माणूस स्वतंत्रपणे राहायला लागला. आता त्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्याची सुरक्षितता गेली आणि त्याला एकटं, एकाकी वाटायला लागलं. आपापल्या गावातून शहरांकडे, औद्योगिक जगाकडे नोकरीच्या ठिकाणी स्थलांतर करायला लागल्यामुळे माणसांना अधांतरी आणि एकटं वाटायला लागलं. तसंच भांडवलशाही समाजव्यवस्थेतली जीवघेणी स्पर्धा, स्वार्थ, यश-अपयश याची सततची टांगती तलवार निर्माण झाली. माणसं संशयी, चिंताग्रस्त बनली. अशा रीतीने, आपल्या मूळ स्थानापासून, समाजापासून दुरावलेला माणूस असुरिक्षततेच्या आणि भीतीच्या छायेखाली वावरायला लागला. मध्ययुगातल्या जाचक रुढींपासून विसाव्या शतकात माणसाची सुटका झाली, हे खरं असलं तरी नवीन समाजरचनेनं माणसांना एकाकी बनवलं आणि एकमेकांपासून अलग केलं, अशा प्रकारच्या विचारांची मांडणी या पुस्तकात फ्रॉमनं केली होती.
या दरम्यान १९४४ साली हेनी गरर्लँडसोबत फ्रॉमनं दुसरं लग्न केलं. या काळातच तो अमेरिकेतल्या भोगवादी आणि चंगळवादी व्यवस्था निर्माण करणार्या बाजारपेठेच्या विरुद्ध आवाज उठवणारा प्रेषितच ठरला. अमेरिकतल्या संस्थांचे कारभार आणि अमेरिकन लोकांची जीवनमूल्यं यावर त्यानं घणाघाती प्रहार केले. यानंतच्या काळात त्यानं फ्रॉइडच्या विचारांशी घेतलेल्या फारकतीमुळे न्यूयॉर्क सायकोऍनालेटिक संस्थेनं फ्रॉमला काढून टाकलं. यानंतर त्यानं त्याची आधीची पत्नी फ्रीडा, क्लारा थॉम्पसन आणि स्टॅक सुलिव्हन अशा काही लोकांसोबत ‘विल्यम ऍलनसन व्हाइट इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. तिचा तो १९४६ पासून १९५० पर्यंत संचालक होता.
१९४७ साली फ्रॉमनं ‘मॅन फॉर हिमसेल्फ’ हे पुस्तक लिहिलं. फ्रॉमनं व्यक्तिमत्वाचे रिसेप्टिव्ह, एक्सप्लॉयटेटिव्ह, होर्डिंग, मार्केटिंग, प्रॉडक्टिव्ह आणि नेाोफिलस हे सहा मुख्य प्रकार मांडले. ‘मॅन फॉर हिमसेल्फ’ या पुस्तकात पहिल्यांदा या प्रकारांचं विवेचन फ्रॉमने केलं. या सहा प्रकारांची विस्तृत माहिती ‘टु हॅव ऑर टु बी’ या फ्रॉमच्या १९७६ साली आलेल्या त्याच्या शेवटच्या पुस्तकात आली. माणसाच्या अस्तित्वाचे दोन प्रकार एकमेकांशी सतत स्पर्धा करत असतात हे यातलं तत्त्व होतं.
फ्रॉम अमेरिकन राजकारणात सिाय होता. १९५० साली तो अमेरिकन सोशॅलिस्ट पार्टीचा सदस्य झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, अणुयुद्धाविरुद्ध आणि व्हिएटनाम युद्धाविरुद्ध लढा ही फ्रॉमच्या आयुष्याची मुख्य उद्दिष्टं होती. १९५३ साली फ्रॉमनं ऍनिस फ्रीमनशी तिसरं लग्न केलं. नंतर तो अमेरिका आणि मेक्सिको अशा दोन्ही ठिकाणी शिकवत होता.
१९५५-५६ साली फ्रॉमनं लिहिलेलं ‘दी सेन सोसायटी’ हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं. चंगळवादाचं विश्लेषण या पुस्तकात त्यानं केलं. खरं तर त्या वेळी चंगळवाद आजच्या इतका फोफावला नव्हता. कल्याणकारी राज्य असलेला तो केन्सवादी अर्थशास्त्राचा काळ होता. मात्र फ्रॉमनं आपल्या दूरदृष्टीनं भविष्यातल्या गोष्टी जोखल्या आणि स्पर्धात्मक भांडवलशाहीतून मक्तेदारी आणि प्रचंड बडे उद्योग निर्माण होतील आणि कालांतरानं युद्धखोरी आणि चंगळवाद बळावेल असं भाकीत केलं. या चंगळवादी आणि भोगवादी समाजात प्रचंड मनोविकार निर्माण होतील असं एरिक फ्रॉमनं म्हणून ठेवलं होतं. ते आज तंतोतंत खरं ठरलं आहे.
‘दी सेन सोसायटी’ मध्ये आपण किती सुस्वभावी, सुसंस्कृत, मानवतावादी, विवेकवादी, विनम्र आणि सहिष्णु आहोत म्हणजे खर्या अर्थानं मानवतेला किती उपयोगी आहोत (यूज व्हॅल्यू) यापेक्षा आपला बाजारभाव काय आहे (एक्स्चेंज व्हॅल्यू) म्हणजेच आपण किती पैसे कमावतो यावरुन मग ‘इतर’ लोक आपली ‘किंमत’ करायला लागतात. आणि आपण स्वतःचं मूल्यमापन ‘इतरांच्या’ आपल्याविषयीच्या मतामुळे करायला लागतो. थोडक्यात, आपण एक क्रयवस्तू (कमॉडिटी) बनतो. आपणही मग इतरांना तसंच वागवायला लागतो. थोडक्यात, माणसांमाणसांमधले संबंध बाजारी होतात, असं फ्रॉमनं म्हटलंय. शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढते गुन्हे, मनोविकार, आत्महत्या, व्यसनाधीनता यांचा खूप खोलवर विचार फ्रॉमनं केला होता. युद्धं कशी घडवून आणली जातात इथंपासून स्वार्थासाठी चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेचं विश्लेषण फ्रॉमनं यात केलं होतं. १९५७ मधलं ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ आणि १९५९ मधलं ‘सिग्मंड फ्रॉइडस मिशन’ ही फ्रॉमची पुस्तकं देखील लोकप्रिय झाली. १९६० साली फ्रॉम पाश्चिमात्य समाजातल्या काही मूलभूत गोष्टी उलगडायच्या मागे लागला.
खरं म्हणजे चंगळवाद आणि मानसिकता किंवा मनोविकार यांचा संबंध एरिक फ्रॉमनं ५० वर्षापूर्वीच दाखवून दिला होता. मनोविश्लेषणाचा सामाजिकतेशी सांगड घालणारा एरिक फ्रॉम हा एक खूप मोठा मानसोपचारतज्ज्ञ होता. ‘एस्केप फ्रॉम फ्रीडम’, ‘मॅन फॉर हिमसेल्फ’, ‘दी सेन सोसायटी’, ‘आर्ट ऑफ लव्हिंग’, ‘टु हॅव ऑर टु बी’, ‘सायकोऍनालेसीस अँड झेन बुद्धिझम’ ही त्याची खूप गाजलेली पुस्तकं आहेत. कुठलीही सामाजिक परिस्थिती समजावून घ्यायची असेल तर त्यासाठी मनोविश्लेषण किती उपयोगी पडतं आणि मनोविश्लेषण करताना भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचं आकलन किती महत्वाचं ठरतं अशा दोन्ही गोष्टी फ्रॉमनं प्रभावीपणे सांगितल्या. फ्रॉमनं ‘ह्युमॅनिस्टिक सायकोऍनॅलेसिस’ ही संकल्पना मांडली. माणसाची सामाजिक वागणूक आणि भोवतालची परिस्थिती ही माणसाला घडवण्यात खूप महत्त्वाची ठरते असं फ्रॉम म्हणायचा.
न्यूनगंडाची अतिशय अप्रतिम अशी व्याख्या एरिक फ्रॉमनं केलीय. ‘न्यूनगंड म्हणजे असं वाटतंय, की मला काही येत नाही असं नसून न्यूनगंड म्हणजे ‘मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला काही येत नाही’, असं एरिक फ्रॉम म्हणायचा. मानवी स्वभावाचं आणि परिस्थितीचं अचूक विश्लेषण करणारा थोर मानसशााज्ञ एरिक फ्रॉम म्यूरॉल्टो या ठिकाणी १९८० साली हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावला. अखेरच्या क्षणापर्यंत तो लिहीत होता!
Add new comment