अल्फ्रेड नोबेल (21 October 1833 - 10 December 1896)
एकदा एका माणसानं सकाळी उठल्याबरोबर नेहमीच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचायला घेतलं. त्यात आपल्याच नावानं प्रसिद्ध झालेला मृत्यूलेख बघून तो अक्षरशः गडबडून गेला. नावातल्या साधर्म्यामुळे गफलत होऊन त्याच्या मृत्यूची बातमी चुकून प्रसिद्ध झाली होती. त्या लेखात लिहिलं होतं, ‘ इमारती, रस्ते, पूल सगळं काही क्षणात उद्धवस्त करणार्या विध्वंसक स्फोटकाचा जनक मरण पावला. जगभरातल्या अशांततेचा फायदा घेऊन आपल्या उत्पादनानं गब्बर झालेला धनाढ्य...’ वगैरे वगैरे. आपण खरोखरंच मेल्यावर आपल्यामागे आपली हीच ओळख असणार आहे का? असा विचार तो करायला लागला. आपण गेल्यावर आपलं नाव लोकांनी चांगल्या रीतीनं घेतलं पाहिजे असं आपण काहीतरी करायला हवं असा त्यानं निश्चय केला आणि मग त्यानं जगामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी आपल्या अंतर्मनाला साद देत काम करायला सुरुवात केली. त्या माणसाचं नाव होतं अल्फ्रेड नोबेल!
अल्फ्रेडनं नायट्रोग्लिसरीन हा स्फोटक पदार्थ सुरक्षितपणे कसा वापरता येईल याबद्दलचे प्रयोग सुरू केले होते. खरं पाहता नायट्रोग्लिसरीन द्रव स्वरूपात हाताळणं अतिशय धोकादायक होतं. त्याला जरा देखील धक्का लागला तर स्फोट होण्याची भीती होती. अल्फ्रेडचं सगळं लक्ष नायट्रोग्लिसरीन ठिबकणार्या पात्राकडे होतं. त्या पात्रातून एकाएकी काड्, कडाड् कड असा आवाज यायला लागला. आता स्फोट होणार या भीतीनं जो तो जीव मुठीत धरून बाहेर पळायला लागला. अल्फ्रेड मात्र तिथेच एका मोठ्या कपाटाआड दडून बसला आणि त्या पात्रातून स्फोट होण्याची अतीव उत्सुकतेनं वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी स्फोट काही झाला नाही. अल्फे्रडनं त्या पात्राच्या जवळ जाऊन बघितलं, तेव्हा पात्राच्या आतल्या बाजूला असलेल्या सिलिकाच्या सच्छिद्र पॅकिंगमुळे नायट्रोग्लिसरीन शोषलं जात होतं आणि म्हणूनच स्फोट होण्याचा धोका टळला होता. तो इतर सहकार्यांसारखाच बाहेर पळून गेला असता, तर त्याला या स्फोटक द्रव्याला शोषून घेणार्या पदार्थाचा शोध लागलाच नसता. यातूनच पुढे डायनामाईटचा जन्म झाला. या डायनामाईटचा जनक होता हाच तो तरूण अल्फ्रेड नोबेल!
जगभरातून प्रचंड मागणी असलेलं डायनामाईट हे एक प्रमुख विस्फोटक असून डायनामाईटच्या निर्मितीमध्ये नाइट्रोग्लिसरीन हे प्रमुख रसायन असतं. याच्यामुळे डायनामाईट जास्त सुग्राही होतं. आजकाल नायट्रोग्लिसरीनच्या जागी नायट्रोग्लाइकोलचा उपयोग केला जातो. डायनामाईटचा अनेक चांगल्या कामांसाठी उपयोग होतो. पर्वतात बोगदे तयार करण्यासाठी, तेलविहिरींची खुदाई करण्यासाठी, खडकाळ भूभाग सपाट करण्यासाठी डायनामाईट जादुच्या कांडीसारखा चमत्कार करतं.
२१ ऑक्टोबर १८३३ या दिवशी स्टॉकहोम इथे इमॅन्युअल आणि कॅरोलिना अँड्रियॅट या दांपत्याच्या पोटी अल्फ्रेडचा जन्म झाला. आठ मुलांपैकी रॉबर्ट, ल्यूडविक, एमिल ही तीन भावंडं वाचली होती. इमॅन्युअल हा मिलिटरी इंजिनिअर होता. स्फोटक द्रव्यांचा शोध लावल्यामुळे त्यांचा सर्वत्र नावलौकिक होता. अल्फ्रेडची आई खूप बुद्धिमान आणि कणखर स्वभावाची स्त्री होती. संसाराला मदत व्हावी म्हणून ती किराणा सामानाचं छोटंसं दुकान चालवत होती. त्यांची घरची परिस्थिती हलाखीचीच होती. त्या काळी स्टॉकहोम देखील गरीबच शहर होतं.
पुढे इमॅन्युअलनं १८४२ साली रशियात नोकरी मिळवली आणि नोबेल कुटुंब रशियाची त्यावेळची राजधानी सेंट पीटर्सबर्ग (आताचं लेनिनग्राड) इथे राहायला गेलं. इमॅन्युअल तिथे रसायशास्त्रातला तज्ज्ञ वैज्ञानिक म्हणून ओळखला जायला लागला. जमिनीवर आणि समुद्रात वापरायचे सुरुंग तयार करून तो रशियन सरकारला पुरवत असे. इमॅन्युअलचा सेंट पीटर्सबर्ग इथे स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीच कारखाना असल्यानं अल्फ्रेडचा मोठा भाऊ आणि अल्फ्रेड त्यांना कामात मदत करायला जात असे.
अल्फ्रेडचं आपल्या आईवर खूपच प्रेम होतं. एखाद्या मांजरीसारखा तो तिच्या अवतीभवती घोटाळत असे. लहानपणापासून अल्फ्रेड अशक्त आणि किडकिडीत होता. त्याची प्रकृती इतकी नाजुक होती की तो सतत कुठल्यातरी कारणानं आजारी पडायचा. अल्फ्रेड आणि त्याच्या भावांचं प्राथमिक शिक्षण घरीच झालं. अल्फ्रेडचा स्वभाव खूप विचित्र होता. तो एकलकोंडा होता. तसंच अल्फ्रेडला आपल्या मनातल्या भावना इतरांजवळ व्यक्त करणंही जमत नसे. याच काळात त्याला वाचनाची गोडी लागली होती. त्याला इंग्रजी, रशियन, फ्रेंच आणि स्वीडिश अशा अनेक भाषा येत असल्यानं त्याचा वाचनाचा आवाकाही वाढला होता. इतकंच नाही तर तो कविताही करायला लागला होता. इमॅन्युअलनं अल्फ्रेडला कसेबसे पैसे जमा करून हवापालटासाठी म्हणून युरोप अणि अमेरिका यांचा प्रवास करायला पाठवलं. हॅम्बर्ग, कोपेनहेगन, पॅरिस, लंडन, रोम आणि न्यूयॉर्क अशा ठिकाणी अल्फ्रेडनं दोन वर्ष प्रवास केला. या प्रवासात त्या त्या ठिकाणचे उद्योग आणि तिथले वैज्ञानिक यांचा त्यानं अभ्यास केला. अमेरिकेत त्यानं जॉन एरिकसन याच्या हाताखाली काम केलं. स्वीडनला परत आल्यावर अल्फ्रेडनं आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करायला सुरुवात केली.
याच दरम्यान अल्फ्रेडनं नायट्रोग्लिसरीनसारख्या स्फोटक द्रव्यावर काम करायला सुरुवात केली. १८६३ साली त्याला स्वीडिश सरकारकडून स्टॉकहोमजवळ नायट्रोग्लिसरीनचा कारखाना सुरू करण्याचा परवानाही मिळाला. नायट्रोग्लिसरीनच्या उत्पादनाला सुरुवात होऊन काही दिवस झाले आणि एके दिवशी तिथे प्रचंड मोठा स्फोट होऊन संपूर्ण कारखाना बेचिराख झाला. या अपघातात अल्फ्रेडचा लहान भाऊ एमिल आणि कारखान्यातले चार कामगार मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर अल्फ्रेडच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी हे काम करणं थांबवलं. अल्फ्रेडनं मात्र या प्रसंगानं खचून न जाता नॉर्वे, जर्मनी आणि इतर अनेक ठिकाणी नायट्रोग्लिसरीनच्या निर्मितीचे कारखाने आणि फ्रान्स, इंग्लड, अमेरिका, कॅनडा आणि जपान या देशांमध्ये दारूगोळा बनवण्याचे कारखाने सुरू केले. त्यानं निर्माण केलेल्या स्फोटकांना भरपूर मागणी होती. अधूनमधून होणारे अपघात अल्फ्रेड गृहीत धरत असे. एकदा पनामा इथे स्फोटक द्रव्यानं भरलेलं एक जहाजच फुटलं, तर सिडनी इथं एका अपघातात अनेक माणसं मरण पावली. सॅन फ्रान्सिकोमध्ये एक घर स्फोटात बेचिराख झालं. हॅम्बर्ग इथला अल्फ्रेडचा कारखाना जळाला. या सगळ्या दुर्घटनांमुळे लोकांनी चिडून नायट्रोग्लिसरीनचं उत्पादन बंद करावं अशी मागणी केली.
आलेल्या संकटाला सामोरं जाऊन मार्ग काढणं किंवा त्या संकटाला शरण जाणं असे दोनच मार्ग अल्फ्रेडसमोर होते. उद्योग सुरू ठेवण्यासाठी स्फोट होणार नाही यासाठी त्या द्रावणाची पावडर बनवणं आवश्यक होतं. त्याचं लक्ष त्या वेळी काइसेलगार या नायट्रोग्लिसरीनला शोषून घेणार्या खनिज मातीकडे गेलं. ही माती त्यानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वापरली आणि यातूनच पुढे डायनामाईटचा शोध लागला आणि अल्फ्रेडला त्याचं पेटंटही १८६७ साली मिळालं. त्यानं धूर निर्माण न होणारी स्फोटकं तयार केली. तसंच अधिक शक्तिशाली पण वापरायला सुरक्षित अशी स्फोटकं तयार केली. या सगळ्या शोधांमुळे अल्फ्रेड नोबेल हे नाव जगभर पोहोचलं आणि पैशाचा प्रचंड ओघ त्याच्याकडे सुरू झाला. या सगळ्या प्रकारात अल्फे्रड नोबेलनं अनेक देशांमधली साडेतीनशे पेटंट्स मिळवली.
यानंतर जगभरातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये अल्फ्रेड नोबेलचं नाव घेतलं जायला लागलं. त्यानं पॅरिसजवळ सॅन रोमो इथं एक बंगला आणि प्रयोगशाळा उभी केली. मात्र अल्फ्रेड नोबेलचं वास्तव्य एकाच ठिकाणी कधीच नसायचं. पायाला भिंगरी बांधल्यासारखा तो सतत वेगवेगळ्या कारखान्यांना भेटी देत फिरायचा. तो आयुष्यभर अविवाहित राहिला. बार्था नावाच्या तरुणीच्या एकतर्फी प्रेमात तो काही काळ पडला होता. पण तिचं दुसर्यावरच प्रेम असल्यामुळे अल्फ्रेडची मन की बात मनातच राहिली.
‘स्फोटक दारूचा जसा विध्वंसक कामासाठी उपयोग होतो, तसा तो विधायक कामासाठीदेखील करता येतो. तो कशासाठी करायचा हे माणसानं ठरवायचं आहे’ असं अल्फ्रेड नोबेल म्हणायचा. सतत जगभराचा प्रवास, अनियमित खाणं-पिणं, पुरेशी विश्रांती न घेणं यामुळे होणारी सततची डोकेदुखी यामुळे त्याच्या प्रकृतीच्या कायम कुरबुरी चालत. निद्रानाश, श्वसनेद्रियाच्या तक्रारी, छातीत दुखणं यानंही तो त्रस्त असायचा. शेवटी या सगळ्याचा परिणाम होऊन १० डिसेंबर १८९६ या दिवशी त्याचा मृत्यू झाला. नोबेलच्या डायनामाईटच्या शोधाबद्दल १०२व्या मूलद्रव्याचं नाव नोबेलियम असं ठेवून समस्त वैज्ञानिकांनी अल्फ्रेड नोबेलच्या कामगिरीबद्दल जणू आदरांजलीच व्यक्त केली!
जगप्रसिद्ध झालेला अल्फ्रेड नोबेल आयुष्यभर साधेपणानं राहिला. प्रसिद्धी आणि संपत्तीचं प्रदर्शन यापासून तो नेहमीच लांब राहिला. त्याला स्वतःचे फोटो काढायलाही फारसं आवडत नसे. जिवंत असताना त्यानं आपल्या आईला तिच्या दानधर्मासाठी हवा तेवढा पैसा दिला. त्याला अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली. जगभरात अनेक मानसन्मान त्याला मिळाले. आपण वैज्ञानिक प्रगतीला हातभार लावल्यानं त्याचा उपयोग मानवाच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी होईल असंच त्याला वाटायचं. पण आपण निर्माण केलेल्या डायनामाईटमुळे विध्वंसच जास्त प्रमाणात होतोय हे लक्षात येताच त्याला अतोनात वाईट वाटलं. त्यामुळे बेचैन होऊन शांततेसाठी आपण काय करू शकतो या विचारातूनच नोबेल पारितोषिकाचा जन्म झाला. नोबेल पारितोषिकामध्ये सर्वात श्रेष्ठ पारितोषिक हे शांततेविषयीचं समजलं जातं.
अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूपत्राचं वाचन केलं, तेव्हा त्यानं आपली सगळी संपत्ती नोबेल पारितोषिकासाठी ठेवली. प्रत्येक वर्षी बँकेतून मिळणार्या व्याजाच्या रकमेतून साहित्य, शांतता, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना १९०१ पासून नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात येऊ लागलं. मदर तेरेसा (शांतता), रवींद्रनाथ टागोर (साहित्य), सी.व्ही. रामन, चंद्रशेखर,डॉ. हरगोविंद खुराणा (विज्ञान), अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) आणि कैलास सत्यार्थी या भारतीयांनी नोबेल पारितोषिक प्राप्त करून सन्मान मिळवला. नोबेल पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो.
Add new comment