डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 April 1891 - 6 December 1956)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 April 1891 - 6 December 1956)

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा भीम आणि त्याचे दोन भाऊ अशी तिघं भावंडं बैलगाडीतून हसत, खिदळत आणि गप्पा मारत प्रवास करत होती. एकाएकी त्या गाडीचालकानं भीमला त्याचं नाव आणि जात विचारली. या मुलांची जात ऐकताक्षणी गाडीवानानं जणू काही अंगावर पाल पडल्यासारखा चेहरा केला आणि अर्ध्या रस्त्यात त्या लहान लहान मुलांना आपल्या गाडीतून उतरवलं. ही मुलं चालत चालत मुक्कामी पोहोचली. ही घटना, हा प्रसंग त्यांच्याबाबतीत पहिल्यांदा घडला नव्हता. एकदा खूप जोराचा मुसळधार पाऊस पडत होता. भीम स्वतःला पावसापासून वाचवत एका घराच्या आडोशाला थांबला. तेवढ्यात त्या घरमालकानं भिजणार्‍या भीमाकडे बघत त्याची जात विचारली आणि जात कळताच इथे का उभा राहिलास असं म्हणून समोरच्या चिखलात ढकलून दिलं. शाळेत गेल्यावर तिथेही ही जात आडवी येई. शिक्षकांपासून इतर विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच त्याच्याशी वाळीत टाकल्यासारखं वागत. एवढंच नाही तर अस्पृश्य म्हणून न्हावी देखील भीमचे केस कापत नसे. सामाजिक विषमतेची झळ पदोपदी सोसणार्‍या या मुलानं आपल्यावरचाच नव्हे तर आपल्यासारख्या अनेकांवरचा हा अस्पृश्यतेचा कलंक दूर करायचं ठरवलं. माणसाला माणसारखं वागायला लावणारी व्यवस्था निर्माण केली पाहिजे याचा त्यानं निर्धार केला. अन्याय सहन करत असलेल्या अस्पृश्यतेचा शाप घेऊन जगणार्‍या लाखो लोकांना या मुलानं सन्मानानं जगायला शिकवलं. या मुलाचं नाव होतं - भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

अर्थशास्त्र, समाजशास्त्र , कायदा, इतिहास, संविधान, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र, संशोधन, पत्रकारिता, लेखन, सामाजिक कार्य, पाली, बौद्ध , संस्कृत, हिंदी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास, राजनीती, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय, शिक्षण, संघटन, अशा अनेक क्षेत्रांत संपूर्ण आयुष्यभर अचाट असं काम करणारा माणूस कोण असा प्रश्न समोर आला की त्याचं निर्विवादपणे उत्तर एकच मिळतं. ते म्हणजे सर्व जातिधर्माच्या लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! दूरदृष्टीनं विचार करणारे, मानवतावादी आणि सत्याचं आचरण करणारे बाबासाहेब भारताची आन आणि शान आहेत. भारतीय अस्मितेचे ते प्रतीक आहेत. सर्वसामान्य, तळागाळातल्या, गरीब आणि उपेक्षित समाजासाठी त्यांच्या अधिकारासाठी त्यांनी दिलेलं योगदान अभूतपूर्व आहे. 

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ या दिवशी मध्यप्रदेशातल्या महू या  लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर या दांपत्याचं हे १४ वं अपत्य होतं. हे कुटुंब खरं तर महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबवडे गावातलं. भीमरावांच्या वडिलांना ब्रिटिश सैन्यातल्या नोकरीमुळे मराठीबरोबरच इंग्रजी भाषेचंही शिक्षण मिळालं होतं. रामजींना स्वतःला वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या घरात त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह होताच, पण ते आपल्या मुलांनाही चांगली पुस्तकं वाचायला आणून देत. रामजींमुळे भीमरावांना वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे भीमरावांच्याही वैयक्तिक ग्रंथालयात ५० हजारापेक्षा जास्त पुस्तकं होती. आपल्या मुलांनी खूप शिकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. रामजींवर कबीराच्या विचारांचा खूप प्रभाव होता. 

आपल्या मुलाला शाळेत दाखल करताना रामजींनी आपलं गाव अंबावडे असल्यामुळे अंबावडेकर असं आडनाव शाळेत लावलं. त्या शाळेतले कृष्णा महादेव आंबेडकर हे शिक्षक खूप चांगले होते. त्यांनी भीमरावांमधली बुद्धिमत्ता हेरली होती. त्यांनी अंबावडेकर हे नाव काढून त्या जागी आंबेडकर असं लिहिलं आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर याच नावानं भीमराव जगभर ओळखले गेले. 

१९०७ साली बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी बीए,एमए, एमएससी, डीएससी, पीचडी या पदव्या संपादन केल्या आणि पुढे १९२२ साली ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. बाबासाहेब रोज १८-१८ तास अभ्यास करत. १९१३ साली बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं होतं. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशाा, राज्यशाा आणि अर्थशाा या विषयांचाही सखोल अभ्यास केला. भारतात परत आल्यावर त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत अशी वर्तमानपत्रं चालवली आणि त्यांच्यामधून अस्पृश्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. १९२३ ते १९३७ या काळात बाबासाहेबांनी मुंबईतल्या सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि नंतर प्राचार्यपद भूषवलं. 

१९२७ साली बाबासाहेबांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं अस्पृश्यांना तिथल्या तळ्यातलं चवदार पाणी पिण्यासाठी मिळावं यासाठी सत्याग्रह केला. बाबासाहेब स्वतः देव-देवतांना मानत नसले तरी १९३० साली नाशिक इथल्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्यांचा लढा प्रत्येकाला माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी, मानवी हक्कांसाठीचा होता. याच कारणासाठी त्यांनी ‘मनुस्मृती’ या वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारा हिंदूच्या ग्रंथाचं जाहीर दहन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ एका विशिष्ट समाजाच्या विकासाचा विचार करत नव्हते, तर त्यांना सर्व समाजातल्या स्त्रियांचं शिक्षण, अंधश्रद्धा, अर्थकारण, या सगळ्या गोष्टींचं भान होतं. १९३२ साली झालेेल्या गोलमेज परिषदेत त्यांनी अस्पृश्यांना न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे म्हणून आपलं म्हणणं प्रखरपणे मांडलं. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यता नाहिशी करण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडताहेत, धर्मात सुधारणा करण्यासाठी विरोध होतोय ही गोष्ट लक्षात येताच बाबासाहेब आंबेडकरांनी १९३५ साली ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा येवला या ठिकाणी केली आणि पुढे १९५६ साली त्यांनी पाच लाख अस्पृश्य बांधवांना बरोबर घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 

१९३६ साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. तर १९४२ साली त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. बाबासाहेबांवर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा खूप मोठा प्रभाव होता. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्यालेला माणूस गुरगुरायला लागतो, असं बाबासाहेब म्हणत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून १९४६ साली मुंबई इथे सिद्धार्थ महाविद्यालय आणि १९५० साली औरंगाबाद इथे मिलिंद महाविद्यालय यांची स्थापना केली. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पं. नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि नेहरूंच्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी शपथ घेतली. त्याच वर्षी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. पं. नेहरू, रामगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि घटना समितीतले इतर सभासद यांच्याशी चर्चा करून बाबासाहेबांनी आदर्श अशी भारतीय राज्यघटना तयार केली. हिंदू समाजातल्या स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, शिक्षण, संपत्तीत हक्क, घटस्फोट या गोष्टी मिळाव्यात म्हणून संसदेत हिंदू कोड बिल मांडलं. ‘समाजाची प्रगती ही त्या समाजात असलेल्या महिलेची स्थिती आणि गती यावरून ठरत असते’ असं बाबासाहेब म्हणत असत. राज्यघटनेच्या निमिर्र्तीनं भारतीय लोकशाहीचा पाया भक्कम करण्याचं काम केलं. संविधानाद्वारे बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकाला व्यक्तिगत स्वातंत्र्याची सुरक्षा प्रदान केली. २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला. 

बाबासाहेबांचं शेतीमधलं योगदानही खूप मोलाचं होतं. ‘शेतीचं चित्र बदललं पाहिजे आणि विखुरलेला ग्रामीण भाग एकसंध केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून न बघता तो राष्ट्रीय उत्पनाचा स्त्रोत म्हणून बघितलं गेलं पाहिजे. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करायचा असेल तर शेतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. शेतकरी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला तर ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडेल आणि शहराकडे येणारे बेरोजगारांचे लोंढे थांबतील’ असं बाबासाहेब म्हणत. 

बाबासाहेबांनी समाजप्रबोधनासाठी विपुल लेखन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दी अनटचेबल्स, शूद्र पूर्वीचे कोण होते, बुद्धा अँंड हिज धम्म, थॉट्स ऑन पाकिस्तान , रिडल्स इन हिंदूइझम, महाराष्ट्र अ‍ॅज अ लिंग्विस्टिक स्टेट, स्टेट्स अँंड मायनॉरिटिज, भारतातील जाती, पार्टिशन ऑफ इंडिया, हिंदू कोड बिल, भारताचे संविधान, अशा ५८ ग्रंथांची निर्मिती केली. बाबासाहेबांना ६ भारतीय आणि ४ विदेशी भाषांचं ज्ञान होतं. इंग्रजी, हिंदी, मराठी, पाली, संस्कृत, गुजराथी, जर्मन, फारसी, फ्रेंच आणि बंगाली भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांचे ग्रंथ जगभर प्रसिद्ध आहेत. भारतीय संविधान तर भारताचा राष्ट्रग्रंथ मानला जातो. 

मधुमेहानं ग्रासलेले आणि कमकुवत दृष्टी झालेले बाबासाहेब १९५४ साली खूपच आजारी पडले. तरीही शेवटच्या श्वासापर्यंत ते काम करत राहिले होते. पांडुलिपी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे लिखाण पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीमध्ये आपल्या राहत्या घरात या जगाचा कायमचा निरोप घेतला. ७ डिसेंबर १९५६ या दिवशी मुंबईतल्या दादर चौपाटीवर बौद्धपद्धतीनुसार त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्या वेळी आंबेडकरांचे लाखो अनुयायी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक सामील झाले होते. त्यांच्या अंतिम प्रवासाला निरोप देताना एक लाख लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, हे असं इतिहासात पहिल्यांदाच घडलं!

१९९० साली त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आजही मुंबईमध्ये १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर या दिवशी पंधरा लाख लोक, तर नागपूर इथे १४ ऑक्टोबर (धम्मचक्र परिवर्तन दिन) या दिवशी आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करायला एकत्र येतात! 

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.