पुणे आयपीएच प्रारंभ! - २४ मार्च २०१८

पुणे आयपीएच प्रारंभ! - २४ मार्च २०१८

मन थार्‍यावर, जग जाग्यावर
मन कसकसलं, जग विस्कटलं
मन उभारलं, जग विस्तारलं
मन विहरलं, जग बहरलं

......अनिल अवचट

पुण्यात आयपीएच संस्था सुरुवात करते आहे. त्यानिमित्त आयपीएचनं पुणेकरांशी जाहीर संवाद केला. डॉ. आनंद नाडकर्णी यांना महाराष्ट्र नव्हे तर अख्खा भारत ओळखतो. त्यांनी मनोविकारांकडे मनोविकार म्हणून न बघता मनोविकास म्हणून बघितलं. वेडा अशी हेटाळणी न करता शुभार्थी-शुभंकर असं नातं त्यांच्याशी जोडलं. रोज नवे उपक्रम - कधी बालकांसाठी, कधी किशोरवयीन मुला-मुलींसाठी, कधी युवांसाठी, तर कधी ज्येष्ठ नागरिकांसाठी, कधी स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेल्यांसाठी तर कधी एखाद्या प्रश्‍नाच्या गर्तेत सापडलेल्या मदतकर्त्यासाठी - सुरू केले. आज २८ वर्षं आयपीएचनं महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांना स्वतःशी जोडून घेतलंय. 

पुण्यातल्या मॉर्डन कॉलेज, शिवाजीनगरच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता पुणेकरांनी गर्दी केली होती. आयपीएचची कोअर टीम पुणेकरांचं स्वागत करत होती. सभागृहात लावलेल्या पडद्यावरून डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. सुखदा चिमोटे मनोविकासासंबंधी बोलत होते. यातून अनेक उपक्रम उलगडले जात होते. 

कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिल्पा जोशी हिनं सर्व उपस्थितांचं स्वागत करत प्रास्ताविक केलं. यानंतर पुण्याची धुरा सांभाळायची जबाबदारी घेतलेल्या डॉ. सुखदा चिमोटे हिनं माईक हातात घेतला. शिष्याकडे बघून गुरू कसा असेल हे कळतं किंवा गुरूकडे बघून त्याचे तयार झालेले शिष्य कसे असतील हे कळतं. इथं सुखदाकडे पाहून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी किती योग्य व्यक्तीच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलीय हे लक्षात आलं. सुखदाची बुद्धिमत्ता, मनमिळाऊ स्वभाव, विषयांतलं सखोल ज्ञान आणि कौशल्य, संवाद साधण्याची हातोटी सगळं सगळं खूप स्वाभाविक आणि नैसर्गिक असल्याचं लक्षात येतं. सुखदानं आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केलाच, पण त्याचबरोबर पुणेकरांना आपलंसं करत आपल्या मनातल्या नाजूक कोपर्‍यांमध्ये साठलेल्या भावना तिनं व्यक्त केल्या. तिच्या आयुष्यातल्या खडतर प्रसंगी डॉ. आनंद नाडकर्णी यांचं मार्गदर्शन आणि तिच्यात जागवलेली जगण्याची असोशी तिनं सांगितली. डॉ. आनंद नाडकर्णी तिचे वडील झाले आणि त्यांनी आपल्या मनातलं आणि वास्तवातलं घर तिला देऊ केलं. सुखदाला मिळालेल्या या प्रेमानं तिच्यातल्या ऊर्जेनं तिला इतकी साथ दिली की तिनं आपल्यावर आक्रमण केलेल्या कॅन्सरलाही दूर पळवून लावलं. व्यासपीठावर सुखदा आणि डॉक्टर यांचं नितळ पाण्यासारखं सात्विक वात्सल्यमय नातं बघताना जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवरचा विश्‍वास दृढ झाला!

व्यासपीठावर पोलिस अधिकारी सदानंद दाते, विकास आमटे, मृणाल कुलकर्णी आणि सानिया यांचं आगमन झालं. मन थार्‍यावर असणार्‍या या चौघांशी डॉ. आनंद नाडकर्णी संवाद साधणार होते. सगळ्यांचे कान प्रत्येकाचं बोलणं ऐकण्यासाठी सज्ज झाले. सभागृह इतकं तुडुंब भरलं होतं की बाहेर शेकडो लोक उपस्थित होते आणि त्यांच्यासाठी खास दोन पडद्यांची (स्क्रीनची) व्यवस्था बाहेर वेगळी करण्यात आली होती. 

मी व्यासपीठावरच्या मान्यवरांकडे बघत होते. सदानंद दाते...(मॅनेजमेंटमधली पीएचडी), एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी...सव्वीसअकराच्या बॉम्बहल्ल्याच्या वेळी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अतुलनीय कामगिरी बजावणारा साहसी अधिकारी ही त्यांची खास ओळख! आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांची जबाबदारी बाबा आमटेनंतर अतिशय समर्थपणे पेलणारे विकास आमटे, आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांची अभिरूची गुणवत्तापूर्ण करणारी गुणी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि घराघरातल्यापर्यंत आपल्या लिखाणाबरोबरच आपला ठसा उमटवणारी, स्त्रीलाच नव्हे तर प्रत्येकाला सजग करणारी, विवेकनिष्ठ विचार करायला प्रवृत्त करणारी साहित्यिका सानिया! 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उपस्थितांचं आणि पाहुण्यांचं स्वागत करत आयपीएचबद्दल बोलताना प्रयत्नांची प्रयत्नांची अखंड वीणा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हा देण्याचा क्षण असल्याचं सांगितलं आणि त्या क्षणाचे अर्थातच जमलेले सगळे साक्षीदार होते! व्यासपीठावर असलेल्या विकास आमटे, मृणाल कुलकर्णी, सदानंद दाते आणि सानिया यांच्याशी आयपीएच आणि आपलं असलेलं नातं त्यांनी व्यक्त केलं. 

या चौघांना बोलतं करताना मन म्हणजे काय इथंपासून डॉक्टरांनी सुरुवात केली. मनाची सोपी व्याख्या म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचा त्रिकोण म्हणजे मन. विचार, भावना आणि वर्तन हे जेव्हा समभूज असतात, समतोल असतात, तव्हा त्याला आरोग्य म्हणायचं. खेचाखेच चालू असली की त्याला म्हणायचं विसंवाद. आणि तो त्रिकोण फाटला की त्याला म्हणायचं विकार. विचार, भावना आणि वर्तन यांच्या मार्गात विकास आहे. विचारांच्या मध्ये विकास करून घेणं म्हणजे ज्ञानमार्ग, भावनांचा विकास करणं महणजे भकितमार्ग आणि वर्तनाचा विकास करून घेणं म्हणजे कर्ममार्ग. डॉक्टरांनी मनाची सांगितलेली इतकी सोपी व्याख्या ऐकून उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. 

या प्रसंगी विकास आमटे, मृणाल कुलकर्णी, सदानंद दाते आणि सानिया यांनी आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, मनाकडे कसं बघावं, मॅच्युरिटी म्हणजे काय, कसोटीच्या प्रसंगी मनाला थार्‍यावर कसं ठेवावं इथंपासून अनेक गोष्टी सांगितल्या. 

विकास आमटे - विकास आमटेंनी सुरुवातीलाच नरहर कुरुंदकरांविषयीची आठवण सांगितली. परीक्षेत ते प्रश्‍न लिहिताना उत्तर इतकं लांबायचं की त्याचं एक स्वतंत्र पुस्तक तयार व्हायचं. किंवा आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांची लग्न लावताना त्याचं पौरोहित्य करण्यासाठी गोनिदा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांना श्रमाची सवय लावली. तसंच आपण सेवा जितकी जास्त करू तितकी मॅच्युरिटी वाटते असं विकास आमटे म्हणाले. माणसानं आपलं मन, भोवतालंच जग आणि मानसिक आरोग्य याकडे आईच्या नजरेतून किंवा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून बघावं असं सांगितलं. तसंच आजच्या युवांनी दिवसातल्या चोवीस तासंपैकी आठ तास सामाजिक कामासाठी द्यावेत असंही ते म्हणाले.  

मृणाल कुलकर्णी -
मृणाल कुलकर्णी हिनं आयपीएचच्या कामाला शुभेच्छा देत ठाण्याच्या दुप्पट प्रतिसाद पुणेकर आयपीएला देतील अशी खात्री व्यक्त केली. तिनं आपल्या आजोबांच्या गोनिदांच्या गडावरच्या आठवणी आपल्या मनात कशा कोरल्या गेल्या आहेत याबद्दल सांगितलं. गोनिदा राजगडावर जात तेव्हा उपस्थितांना शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातल्या घटना, तिथला परिसर याविषयीचं अप्रतिम वर्णन करायचे आणि आपण ते आजही विसरू शकलो नाहीत असं तिला वाटतं. कोणत्याही परिस्थितीत मनाची शांतता अबाधित ठेवता येणं म्हणजे मॅच्युरिटी असं ती म्हणाली. 

आपलं काम करताना आपण भूमिकेचा सखोल अभ्यास करतो, त्यावर विचार करतो असं तिनं याप्रसंगी सांगितलं. सुमित्रा भावेंच्या वेलकम होम या येत असलेल्या चित्रपटाचा तिनं आवर्जून उल्लेख केला. स्त्रीचं खरं घरं कोणतं - तिच्या वडिलांचं की तिच्या नवर्‍याचं की दोन्हीही नाही हा प्रश्‍न या चित्रपटातून समोर आला आणि आपण यातून अनेक स्त्रियांशी बोललो असं ती म्हणाली. 

काम करताना तडजोडीचे, कसोटीचे प्रसंग आपण जाणीवपूर्वक येऊ दिले नाहीत कारण कलाकार असण्यापेक्षा आपल्याला माणूसपण जपण्यात जास्त आनंद असल्याचं ती म्हणाली. माझे आई-वडील, सासू-सासरे, नवरा, मुलगा यांच्यासमोर बसून जे बघता येईल तेच मी करणार ही माझी स्पष्टता होती. मला 'धकधक' करायचंय का तर नाही इतकी स्पष्टता असल्यानं आपण निःसंकोचपणे काम करू शकलो, त्यात आनंद घेतला असं तिनं सांगितलं. 

एखादी भूमिका केल्यानंतरही ती मनात काही काळ रेंगाळत राहते. मात्र आपल्या मनावर असतं की त्यांना किती काळ रेंगाळू द्यायचं असंही मृणाल म्हणाली. अनेकदा प्रेक्षकच त्या अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला त्याच भूमिकेच्या नावानं ओळखत राहतात. त्यामुळे लोकांना सांगावं वाटतं की ती मी नव्हे, पण ती मी कधीतरी होते.

माणसाचं मन, भोवतालचं जग आणि मानसिक आरोग्य याचं नातं कसं असायला हवं, याबद्दल बोलताना मृणाल म्हणाली की आपण ओपन असायला हवं. आपल्या मुलांशी असो वा इतर नात्यांशी आपण संवादी असलं पाहिजे, बोललं पाहिजे तरंच आपलं नातं बळकट होऊ शकेल. तन्मयता म्हणजे काय यावर ती म्हणाली, आपपर  भाव संपून आपण झोकून देऊन काम करतो ती तन्मयता असते. 
नातं जपण्यासाठी थोडंसं भांडण असावं कारण त्यामुळे आपण आपल्यालाच तपासू शकतो. आपण आपल्याला किती मिळतं पेक्षा भरभरून दुसर्‍याला दिलं पाहिजे आणि कायम सकारात्मक राहिलं पाहिजे. माणसं चांगली असतात, त्यांच्यातल्या चांगल्या भागाकडेच पाहावं. तसंच यशाकडे अलिप्तपणे पाहावं  असं मृणाल म्हणाली. 

सदानंद दाते -
सदानंद दाते पुण्यातच जन्मले आणि इथल्याच मॉर्डन कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतली पदवी घेतली. सदानंद दाते हुशार विद्यार्थी नव्हते. मात्र मॉर्डन कॉलेजमधल्या एका प्रसंगानं आपल्या आयुष्याला एक वळण मिळालं असं त्यांनी सांगितलं. आपल्याला शिक्षणाची, अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. त्यामुळे जेमतेम गुण मिळायचे. त्याची खंत आपल्यालाही नव्हती, ना आपल्या आई-वडलांनाही! एकदा एका वर्क्तृत्व स्पर्धेत यश मिळालं आणि ज्या प्राध्यापकांना सदानंद दातेंनी आपलं बक्षीस दाखवलं तेव्हा त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्याच्यातल्या हुशारीला जागवलं. 'तू हे करू शकतोस' असा विश्‍वास दिला आणि त्यानंतर सदानंद दाते जे वर्गात पन्नासावे येत असत ते तिसरे येऊ लागले. त्यानंतर चांगलं ते करायची चटकच लागली. त्याचं अक्षर इतरांना कळायचं नाही, तेव्हा त्यांनी सुलेखन पाटी आणून पंधरा दिवसांत अक्षर सुवाच्य केलं. आपण काम मन लावून केलं की यश मिळतंच ही शिकवण या कॉलेजनं दिली असं सदानंद दाते म्हणाले. 

आपली मनस्थिती, आपल्याला काय हवंय आणि आपल्या मार्गातले अडथळे कोणते आणि आपल्याला कुठे पोहोचायचंय याचा विचार करून आपल्या अडचणींचा बाऊ न करता आशावादानं पुढे जात राहणं याला मॅच्युरिटी म्हणतात असं सदानंद दाते यांनी सांगितलं. आपल्या आयुष्यातले चित्तथरारक अंगावर काटा येईल असे प्रसंग सदानंद दाते यांनी सांगितले. २६/११ च्या बॉम्बस्फोटाच्या वेळी त्यांनी कर्तव्याचं पालन करताना जिवाची पर्वा केली नाही. कर्तव्यापुढे प्राण गेला तरी हरकत नाही असा विचार त्यांनी केला. त्यांच्या आयुष्यातल्या या प्रसंगांनी मन नतमस्तक झालं. 

काम करताना कसोटीचे प्रसंग येतात. महत्वाकांक्षा की मूल्यांची जपणूक या दोन्हीत संघर्ष सुरू होतो. अशा वेळी एकाच वेळी आपल्याला दोन्हीही घोड्यांवरची सवारी करता येणार नाही हे ओळखून सदानंद दाते यांनी महत्वाकांक्षेला प्राधान्य न देता मूल्यांना महत्वाचं मानलं. सदानंद दाते यांनी विपश्यनेचा कोर्स केला. त्यांचं वाचन प्रचंड असलं तरी बुद्ध आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. यशानं हुरळून जायचं नाही आणि अपयशानं कोलमडून पडायचं नाही ही गोष्ट त्यांनी अंगी बाणली. सदानंद दाते यांचा परमेश्‍वरावर विश्‍वास नाही आणि पुनर्जन्मावरही नाही. ताण दूर ठेवण्यासाठी रनिंग आणि वॉक करणं त्यांना महत्वाचं वाटतं. 

माणसाचं मन, भोवतालचं जग आणि मानसिक आरोग्य याचं नातं कसं असायला हवं, याबद्दल विचार करताना सदानंद दाते म्हणतात, समाज म्हणून व्यक्ती म्हणून आपण सजग असलो पाहिजेत. जगाबरोबर जोडून स्वतःला गुंतवून ठेवत काम करत पुढे गेलं पाहिजे. कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यातून जाण्याचा मार्ग असतोच हा आशावाद असला पाहिजे. आपल्याला जे काम दिसतंय पण ते करावंस वाटत नसेल तर तो आपला आळस असं ते म्हणाले. चांगली सवय अंगी बाणवायची असेल तर सराव, सातत्य आणि अट्टाहास महत्वाचा असतो, दुःख उगाळण्यापेक्षा आपल्याजवळचा पेला किती रिता आहे हे बघण्यापेक्षा तो किती भरलेला आहे हे बघावं आणि माणसातला चांगुलपणा बघण्यासाठी, त्याचं दुःख समजून घेण्यासाठी आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघवं असंही दाते म्हणाले. 

सानिया - 
आपल्या मनावर कोरल्या गेलेल्या आठवणीबद्दल बोलताना सानियानं वडलांची सतत होणारी बदली आणि सततचा प्रवास याविषयी सांगितलं. थोडं स्थिरावल्यासारखं वाटत असतानाच पुन्हा सामानाची बांधाबांध, नवीन शाळा, नवीन गाव, नवीन मैत्रिणी यातून नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती तयार झाली असं सानियानं सांगितलं. साधी राहणी आणि साठवण न करणं या दोन्ही गोष्टी आपल्या अंगात रुजल्या गेल्याचंही ती म्हणाली. 

मॅच्युरिटी म्हणजे प्रगल्भता, मॅच्युरिटी म्हणजे शहाणपण! कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाताना कशा तर्‍हेचा समतोल विचार करतो या प्रक्रियेला ती मॅच्युरिटी म्हणते. आपण लिखाण करताना आपल्या मनातली माणसं दिसत जातात आणि मग ती काय करताहेत, त्यांच्यातलं नातं काय, त्यांच्यातले ताण कुठले हे सगळं घडत जातं. यात गुंतून पडायचं नसतं. कारण ही माणसं आपणच रचलेली असतात. ती मी नव्हे, जणू काही ती मीच आहे अशा नजरेनं सगळं बघायचं असं सानिया म्हणाली. हीच गोष्ट आपल्याला समुपदेशन करताना कामी येते असा तिनं अनुभव सांगितला. आपल्याला कामाचा थकवा कधीही येत नाही कारण हा सगळा प्रवास आनंदाचा असल्याचं ती सांगते. झोकून देऊन काम केलं की थकवा जाावत नाही असं ती म्हणते. 

माणसाचं मन, भोवतालचं जग आणि मानसिक आरोग्य याचं नातं कसं असायला हवं, याबद्दल बोलताना सानियानं माणसांमध्ये मैत्रीचं नातं असावं आणि ते सहज, समान, न्यायाचं असावं असं म्हटलं. आपण विश्‍वाचा एक अतिशय सूक्ष्मसा भाग असून आपण वस्तूंशी, माणसांशी, निसर्गाशी, प्राण्यांशी अनेक गोष्टींशी जोडले गेलेलो असतो. तेव्हा परस्परातले संवादाचे पूल सांधलेच पाहिजेत असंही ती म्हणाली. हे पूल जोडलेले असतील तर अनेक कठीण वाटा ओलांडता येतात असं तिला वाटतं. 

आपल्या आयुष्यात आजारपण, मृत्यू असे अनेक कसोटीचे प्रसंग अनेक आले, मन त्या त्या प्रसंगी सैरभैरही झालं. पण अशा वेळी मनाला तपासून बघण्याची सवय लागली. विवेकनिष्ठ विचारांपासून आपण कधीही ढळलो नाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही सोडला नाही हा अनुभव सानियानं सांगितला. या सगळ्यांतून कणखर भावनिक आधार मिळतो आणि समतोलपणा साधता येतो असं ती म्हणाली.
एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेणं म्हणजे त्या गोष्टीत पूर्णपणे रमून जाणं, मग ते गाणं असो, प्रेम असो, पुस्तक असो वा मैत्री असो. समाधान टिकवून ठेवण्यासाठी माणसानं आपल्याकडे काय आहे ते बघावं. नको असलेल्या व्यक्तीला टाळायचं असेल तर हसून नमस्कार करून पुढे निघून जावं. एखाद्याला क्षमा करायची असल्यास तीन पायर्‍या पार कराव्यात. ती गोष्ट मोठ्या परिपेक्ष्यातून बघणं, आपण काय केलं पाहिजे याचा विचार करणं आणि मनात समोरच्याविषयी क्रोध किल्मिष न ठेवणं (कारण मनात किल्मिष ठेवलं तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो.) यातून क्षमा करता येते आणि आपण मुक्त होतो. प्रौढत्वामध्ये बालपण जपाायचं असेल तर जगाकडे सतत कुतूहलाच्या नजरेनं बघावं असं सानिया म्हणाली. 
..........
कार्यक्रम संपताना सदानंद दाते यांनी सर्वांच्या वतीने आयपीएचसाठी शुभेच्छा दिल्या.वेळ संपली होती, पण मन मात्र सभागृहाच्या बाहेर पडायला तयार नव्हतं....डॉक्टर, डॉ. शुभा थत्ते, सुखदा, आलेले पाहुणे, स्वयंसेवक कार्यकर्ते सगळ्यांना शुभेच्छा देत तृप्त मनाने घरी परतले. 

दीपा देशमुख २४ मार्च २०१८.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.