विद्याताईंना आठवताना......

विद्याताईंना आठवताना......

आमची गोव्याची सुविद्य मैत्रीण उज्ज्वला आचरेकर हिनं पुढाकार घेऊन २९ फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या मिळून सार्‍याजणीच्या परिवारातल्या सगळ्या प्रतिनिधी मैत्रिणींनी पुण्यात एकत्र जमायचं असं फर्मान काढलं. गीतालीनं आपलं घर आम्हा सार्‍याजणींसाठी खुलं करून दिलं. ठरल्याप्रमाणे सकाळी ११ च्या आधीच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मैत्रिणींनी गीतालीच्या घरात प्रवेश केला. खूप दिवसांनी भेटल्यामुळे सगळ्यांचं एकमेकींना कडकडून भेटणं सुरू होतं. उज्ज्वला, नीता आणि गीताली यांनी दिवसभराच्या कार्यक्रमाची सूत्रं मी हाती घ्यावीत असं सांगितलं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन पाच ते सात मिनिटांच्या वेळात पहिल्या फेरीत प्रत्येकीनं बोलावं असं मी सांगितलं. या वेळात विद्याताईंबद्दलच्या भावना, त्यांच्या आठवणी आणि आता आपण करायचा असलेला संकल्प यावर बोलायला सांगितलं. प्रत्येकीला खूप बोलायचं हेातं. मनातल्या भावनांना वाट करून द्यायची होती.

 
गीतालीनं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला केलं. विद्याताईंचा विचार आपण सगळ्यांनी मिळून पुढे नेऊया आणि त्यासाठी आणखी काय काय प्रयत्न करता येतील याचा विचार करू असं सांगितलं. छपाईचं माध्यम मासिकासाठी जास्त सशक्त असून हळूहळू त्याचं महत्व लोकांना जास्त वाटेल अशी आशा तिनं व्यक्त केली. ग्रामीण भागातल्या बचतगटाच्या महिलांसाठी मिळून सार्‍याजणीची वर्गणीची योजना गीतालीनं सांगितली. ५०० रुपयांऐवजी अशा स्त्रियांकडून आपण ३५० रुपये वर्गणी घेऊ आणि त्यादृष्टीने वर्गणीदार वाढवण्याचा प्रयत्न करू असं ती म्हणाली. मिळून सार्‍याजणीच्या यूथ कनेक्ट या गटाविषयी सांगत, आता तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही तिनं सांगितलं. मिळून सार्‍याजणीचा महिन्याला येणारा एकूण खर्च आणि आपण करायचे असलेले प्रयत्न यांची सांगड घालू असाही विचार बोलण्यातून समोर आला. निधी संकलनासाठी काय प्रयत्न करता येतील या मुद्दयावर चर्चा झाली. 

समाज माध्यमाची प्रतिनिधी प्रिती हिनं बोलायला सुरुवात केली. विद्याताईंविषयी बोलताना ती म्हणाली, कधी कधी आपल्या माणसाविषयी खूप भावना दाटून आलेल्या असतात, मात्र बोलायला गेलं की शब्द साथ देत नाहीत. आपण दर महिन्याला किमान ५ तरी नवे वर्गणीदार मिळवू असं ती म्हणाली. त्यानंतर सातार्‍याच्या तनुजा भोसले हिने महिलांच्या दृष्टीने सध्या भयावह वातावरण होत चाललं आहे आणि अनेक नवीन प्रश्न समोर उभे राहून भेडसावत आहेत. अशा वेळी आपण त्यावर उत्तर शोधण्याचं काम करावं लागणार आहे आणि ते आपण करूयात अशी आशा तिनं व्यक्त केली. तसंच आता या वर्षात नवे देणगीदार मिळून सार्‍याजणीला मिळवून देण्याचा संकल्प तिने केला. 

गोव्याहून आलेल्या उज्ज्वला आचरेकर हिला सार्‍याजणींसोबत विद्याताईंच्या खूप आठवणी शेअर कराव्या वाटत होत्या. दिशा, लग्ना तुझा रंग कसा आणि पुरुषांसाठी सुरू केलेले पाककलेचे क्लासेस या तिन्ही उपक्रमात विद्याताईंनी दिलेलं प्रोत्साहन आणि त्यामुळे आपण ते काम कसं करू शकलो याबद्दल उज्ज्वला भरभरून बोलली. दिशाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आपण येऊ असा शब्द विद्याताईंनी दिला होता आणि त्यांनी तो पाळला. मिळून सार्‍याजणीमुळे आपल्या विचारांशी जुळणार्‍या मैत्रिणी मिळाल्याचं तिनं सांगितलं. तसंच कोणतीही गोष्ट करायची असेल तर विचार ठाम असेल तर मार्ग हा सापडतोच आणि तसा आपल्यालाही तो मार्ग सापडला. विद्याताईंमध्ये काम करण्याची प्रचंड ऊर्जा होती. त्या म्हणालेलं एक वाक्य उज्ज्वलाला खूपच भावलं आणि ते तिनं स्वतःच्या जगण्यातही रुजवलं. विद्याताई म्हणत, कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि तोंडात साखर ठेवून वागलं तर लोकांपर्यंत पोहोचू शकाल. आपल्या मृत्युपत्रात आपण मिळून सार्‍याजणीच्या नावे काही रक्कम ठेवणार असल्याचा संकल्प तिने सांगितला. आजच्या भेटीत आपण १२ हजारांची रक्कम देत आहोत असंही तिनं जाहीर केलं.

तासगावच्या मीनल कुडाळकर हिने मिळून सार्‍याजणीतर्फे बचतगटाच्या जत्रांचं आयोजन करता येईल का आणि त्या महिलांना मिळून सार्‍याजणीशी कसं जोडता येईल यावर आापलं मत व्यक्त केलं. बचतगटाच्या स्त्रियांनी केलेलं उत्पादन खूप चांगलं असलं तरी वितरणाचा प्रश्न त्यांच्यासाठी खूपच आवश्यक आहे आणि अशा वेळी आपण त्यांच्या उत्पादनाचं मार्केटिंग करू शकतो का आणि ते विकत घेण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का याबद्दल चर्चा केली. मीनलनं विद्याताईंवर एक कविता केली होती ती तिनं सादर केली. 

मुलुंडहून आलेल्या रजनी करंदीकर हिनं मिळून सार्‍याजणीला मिळालेला पुरस्कार स्वीकारला होता. विद्याताई गेल्यावर आपलं काहीतरी अनमोल असं गमावलं असल्याची भावना तिनं व्यक्त केली. आपल्या आईचा आणि विद्याताईंचा जन्म १९३७ या एकाच वर्षांतला आणि ते साधर्म्य आपल्याला खूप जवळचं वाटत असल्याचं तिनं सांगितलं. आपल्या आईनं आपल्याला जगण्याची जशी वाट दाखवली, तशीच वाट विद्याताईंनी दाखवली. अगदी मंगळसूत्र घालावं की नाही अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळून सार्‍याजणीच्या प्रवासात मिळत गेली. हे सगळे बदल लहान असले तरी ते माणूसपणाच्या प्रवासात खूप आवश्यकही होते. विद्याताईंनी समोरच्याचं कसं ऐकावं याचे धडे नकळत दिले. आज मी पुन्हा एकदा माझ्या आईला गमावलं असं रजनीनं भावनाविवश होऊन व्यक्त केलं. वुई नीड यू या गटासाठी आपण मिळून सार्‍याजणीचे अंक देऊ आणि त्याचं वाचन करू असा संकल्प तिनं व्यक्त केला. 

ठाण्याहून आलेल्या चित्रा राजेंद्र जोशी हिने आपण कॉलेजमध्ये असताना विद्याताईंचं भाषण पहिल्यांदा ऐकलं आणि आपण कशा प्रभावित झालो याची आठवण सांगितली. विद्याताईंमुळे वैशाली माडे असेल किंवा वीणाताई गवाणकर यांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली आणि आपण कशा तर्‍हेनं लिहित्या झालो याचे अनुभव सांगितले. आज आपण लिहितो त्याचं सगळं श्रेय तिनं विद्याताईंना दिलं. विद्याताईंच्या पुस्तकामुळेच सार्वजनिक जीवनात काम करणं हे किती कठीण असतं आणि कायम रिजेक्शन किंवा नकार घेऊनच पुढे जावं लागतं हे कळलं. सखी सार्‍याजणीचं काम पुढे नेण्याचा मानस तिनं व्यक्त केला. 
बेळगावच्या मनिषा सुभेदार हिनं विद्याताईंमधली पत्रकार कशी भावली आणि तिचा प्रभाव आपल्यावर कसा पडला याविषयी सांगितलं. २० वर्षांपूर्वी आपण पहिल्यांदा विद्याताईंना ऐकलं आणि ते ऐकणं कधी विसरलोच नाहीत. आपण एका हळदीकुंकू, सोवळंओवळं पाळणार्‍या वातावरणात वाढलो होतो आणि, अशा वेळी आपण विद्याताईंमुळे कशा बदलत गेलो हे सांगितलं. विद्याताईंच्या स्पष्ट आणि परखड भूमिकेमुळे आपण आज पत्रकार म्हणून तसंच काम करण्याचा प्रयत्न करतो असंही ती म्हणाली. विद्याताईंमुळेच आपल्याला पत्रकारितेमधलं वेगळेपण शोधता आल्याचं तिनं सांगितलं. हळदीकुंकवाच्या ऐवजी आपण बेळगावमध्ये तिळगुळ कार्यक्रम स्त्रियांसाठी सुरू केला आणि हळदीकुंकू कार्यक्रम बेळगावमधून जवळजवळ हद्दपार केल्याचं तिनं सांगितलं. विद्याताईंनी आपलं म्हणणं शांतपणे पोहोचवता येतं, आक्रस्ताळेपणाची गरज नसते असं सांगितलं आणि ते आपण कायम लक्षात ठेवलं असं ती म्हणाली. पुरुषी मानसिकतेच्याविरोधात आपला लढा असल्याचं ती म्हणाली. आज मि. सा. जणीनं दिलेल्या विचारांमुळे नवर्‍याची मानसिकता बदलण्यात आपण यशस्वी झालो असल्याचं ती म्हणाली. मिळून सार्‍याजणीनं काय दिलं, तर मी स्वतः बदलले, स्वतःवर प्रेम करायला लागले आणि स्वतः समृद्ध झाले अशी भावना तिनं व्यक्त केली. विद्याताईंचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हाच आपला संकल्प असल्याचं तिनं सांगितलं. 

मालगुंडच्या अस्मिता रुग्गे हिनं विद्याताईंमधलं कार्यकर्तेपण आपल्यावर कसा प्रभाव टाकून गेलं याविषयी आठवणी सांगितल्या. त्यांच्यातलं साधेपण, कुठल्याही गोष्टीचा बडेजाव नाही, चटकन कोणाशीही जोडलं जाणं आपल्याला भावलं असं ती म्हणाली. पहिल्या भेटीत आपण जेव्हा त्यांना वाकून नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आपल्याला चटकन मिठीत घेतलं. ती मिठी आणि तो स्पर्श आपण विसरू शकत नसल्याचं ती म्हणाली. अस्मिताचा तुला अमेय यालादेखील विद्याताईंचा तितकाच लळा लागला होता आणि त्या गेल्यावर तो कसा धाय मोकलून रडला याविषयी तिनं सांगितलं. आपण मि. सा. जणीसाठी आर्थिक मदतीचे प्रयत्न करू असा संकल्प तिनं सांगितला. 

सोलापूरच्या नीला मोरे यांनी विद्याताईंनी आपल्या सगळ्यांनाच हळूहळू कसं बदलवलं याबद्दल सांगितलं. एखाद्या जत्रेत लहान मुलाची आई हरवावी आणि मग त्याचं काय व्हावं तसंच माझं विद्याताईंच्या जाण्यानं झालंय असं त्या म्हणाल्या. विद्याताईंच्या आठवणी सांगताना विद्याताईंचे खूप मोठे आपल्याकडे आहेत आणि विद्याताई आपल्याच आसपास असल्याची भावना मनात असते आणि आहे असं त्या म्हणाल्या. विद्याताईंनी दिलेली शिदोरी आयुष्यभर पुरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण आजीव सभासद करू आणि आपल्या मृत्युपत्रात मिळून सार्‍याजणीसाठी काही तरतूद करू असा संकलप नीला मोरेंनी सांगितला.

जळगावहून आलेल्या शमा सुबोध हिनं आपल्या आयुष्यात आधी गौरी देशपांडे कशी आली याबद्दल सांगत असताना आपली आई स्त्री मासिकाचे अंक कशी वाचत असायची आणि तिला विद्याताई कशा आवडायच्या हेही सांगितलं. एके दिवशी आपण विद्याताईंचं लिखाण वाचताना गौरी आणि विद्याताई यांच्यात काहीच फरक नसल्याचं आपल्याला जाणवलं आणि आपल्याला खूप बरं वाटलं असं ती म्हणाली. विद्याताईना बरं नाही कळल्यावर खूप अस्वस्थता आली होती, त्यांची इच्छामरणाची चळवळ, या सगळ्या काळात गीतालीचं खंबीर राहणं यांचाही उल्लेख तिनं केला. बचतगटांना कौन्सिलिंग करतानाच त्यांच्यातली उद्योजकता ओळखून त्यांना साहाय्य करण्याचा संकल्प तिनं बोलून दाखवला. 

ठाण्याच्या रेवती गोगटे हिनं आपण आधी मि. सा. जणीच्या वर्गणीदार होतो आणि आपण मि.सा. कडे कशा खेचल्या गेलो, मिळून सार्‍याजणीच्या कुठल्याही कार्यक्रमाला आपण धावत यायचो याच्या आठवणी सांगितल्या. आपण जेव्हा लायब्ररी सुरू करायचं ठरवलं तेव्हा विद्याताईंनी झालेलं बोलणं, त्यांचं प्रोत्साहन आणि त्यामुळेच संवादघर, मेळावे, गावोगावी पोहोचणं हे सगळं आपण करू शकलो असं ती म्हणाली. या सगळ्या उपक्रमांसाठी विद्याताई आल्या, त्यांनी कधीही जमत नाही असं म्हटलं नाही. आपण प्रत्येक महिन्याला मिळून सार्‍याजणीचे १० अंक नेऊ आणि त्याचं वितरण करू असा संकल्प तिनं केला. 
पुण्याच्या सरिता आवाडनं विद्याताईंविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक कविता सादर केली. तर दौंडच्या अरुणानं आपण विद्याताईंना शेवटचं बघायचं ठरवलं. ती धावपळ करत हॉस्पिटलमध्ये आली, तेव्हा हॉस्पिटलमध्ये विद्याताईंना न भेटण्याविषयीचा बोर्ड बघितला, तेव्हा मनातं खट्टू झाली. मात्र अथक प्रयत्नांनी अखेर आपल्याला विद्याताईंना बघता आल्याचं समाधान तिनं व्यक्त केलं. विद्याताई दौंडला आल्या. त्यांच्यामुळे कामवालीपासून ते अनेक कष्टकरी महिलांचं जगणं समजून घेता आलं. आपण कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी त्यांचं शोषण कसं करतो हेही समजलं असं अरुणा म्हणाली. अरुणानं पीएचडी करतानाचा विद्याताई आणि गीताली यांचा आलेला अनुभव सांगितला. आपण आज मिळून सार्‍याजणीसाठी ५००० रुपये देत असल्याचं सांगत दर महिन्याला ५ अंक जास्त घेऊन त्याचं वितरण करणार असा संकल्प तिनं व्यक्त केला. 

बीडहून आलेल्या हेमलता पाटील यांनी शैला लोहियांमुळै विद्याताई समजल्या आणि मग आपण त्यांच्या संपर्कात कशा आलो याच्या आठवणी सांगितल्या. आपल्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्याताई अनेक वेळा आल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. तसंच कामातून विद्याताई आपल्याबरोबर असतीलच असंही त्यांना वाटतं. विद्याताईंचं बीडमध्ये इच्छामरणावर झालेलं जाहीर व्याख्यान आणि त्यानंतर झालेली वादचर्चा याबद्दलच्या आठवणी हेमलता यांनी सांगितल्या. बोरकरांच्या ‘जीवन त्यांना कळले हो’ या ओळींचा उल्लेख करून विद्याताईंचं काम आणि त्यामागचं त्यांचं ४० वर्षांचं मनन, चिंतन याविषयी त्या बोलल्या. आपलं काम आपण करत पुढे चालत राहू असा संकल्प त्यांनी जाहीर केला. 

पार्ल्याहून आलेल्या विनिता हाटे हिनं आपल्या घरातल्या पुरोगामीपणाच्या काही आठवणी सांगितल्या. घरातल्या वातावरणामुळे स्त्री, किलोस्कर आणि मनोहर ही तिन्ही मासिकं घरी कशी यायची आणि त्यांचा पडलेला प्रभाव सांगितला. खरं तर पुरोगामी असल्यामुळे समाजात बहिष्कृत होण्याची शक्यता खूप मोठी असते, पण ते विचार मात्र खंबीर बनवतात असं ती म्हणाली. त्या वेळी विद्याताई स्त्रीमध्ये लिहायच्या, आपण खूप लहान होतो, पण आपल्याला स्त्रीमध्ये लिहिण्याची संधी मिळाली त्याचं खूप अप्रुप आपल्याला त्या वेळी असल्याच्या आठवणी तिनं सांगितल्या. १९७३-७४ साली सांगलीमध्ये विद्याताईंनी मासिक पाळी संबंधी शिबीर घेतलं आणि या शिबीरात काही पुरुषही होते. ज्या वेळी हा विषय मोकळेपणानं बोलला जात नव्हता, अशा वेळी विद्याताईंनी मासिक पाळीचा विषय कसा निभिर्डपणे मांडला याची आठवण विनितानं सांगितली. 

आपल्याकडे विद्याताईंची खूप पत्रं असून तो आपल्यासाठी एक अनमोल ठेवा असल्याचं विनितानं सांगितलं. काम करणार्‍याचं तोंड भरून कौतुक करणं हे विद्याताईंचं वैशिष्ट्य विनितानं सांगितलं. तसंच माणसामाणसांना जोडणं हाही त्यांच्यातला गुण तिनं अधोरेखित केला. तर्कशुद्ध आणि तर्ककर्कश्श यातला फरक आपण विद्याताईंकडून शिकलो असं ती म्हणाली. तसंच आज जे बोलायचं ते ठामपणे हेही आपल्याला विद्याताईंनीच शिकवलं, आपलं सांगणं कधी थांबवायचं नाही हेही आपण शिकलो असं विनिता म्हणाली. त्यांनी एका कुटुंबासाठी काही करायला सांगितलं आणि आपण त्या कुटुंबाला आपण अ‍ॅडॉप्ट केल्याचं ती म्हणाली. आज त्या नाहीत हे पचवायला खूप कठीण जातंय, शोक व्यक्त करावा असं वाटतंय मात्र अशा वेळी आपण नवीन पिढीपर्यंत मिळून सार्‍याजणी पोहोचवू शकलो, आपली सूनच दुबईमधली मि. सा. जणीची प्रतिनिधी झाली याबद्दलचं समाधानही तिनं व्यक्त केलं. यापुढेही आपण जाहिराती, वर्गणीदार आणि देणगीदार मिळवत राहू हा संकल्प तिनं व्यक्त केला. 

महाबळेश्वरच्या नीता भिसेनं विद्याताईंना शेवटचं बोलायचं राहिलं याची खंत व्यक्त केली. विद्याताईंमुळेच आपण आता थोडं थोडं मोठे होत आहोत याची जाणीव होते आहे असं सांगितलं. वैकुंठमध्ये असताना विद्युतदाहिनीत विद्याताईंना शेवटचं बघितलं त्या वेळीच्या भावना तिनं व्यक्त केल्या. आपल्या चढउताराच्या प्रवासात विद्याताईंच्या विचारांनी आपल्याला बळ दिल्याचं तिनं सांगितलं. सुंदर असण्यापेक्षा सुंदर जगणं कसं असायला हवं हा विचार त्यांच्यामुळे मनात रुजला असं नीता म्हणाली. विद्याताईंविषयीच्या अनेक आठवणी तिनं सांगितल्या. मिळून सार्‍याजणीच्या सगळ्यांमध्ये आपल्याला विद्याताईच दिसताहेत अशा हृद्य भावनाही तिनं व्यक्त केल्या. विजय तेंडुलकरांनंतर विद्याताईच स्पष्ट आणि निर्भिड विचारांची मांडणी करणार्‍या होत्या असं नीता म्हणाली. मिळून सार्‍याजणीचे जास्तीत जास्त अंक आपण वितरित करू असा संकल्प नीताने सांगितला. 

कणकवलीच्या अर्पिता उंबरकर हिनं विद्याताईंमुळे आपल्याला कणकवलीतले अनेक गट मिळाले आणि आपण त्यांच्याशी जोडल्या गेल्याच्या आठवणी सांगितल्या. मी आधी मिळून सार्‍याजणीची वाचक झाले आणि हा अंक आपला मित्रच मला वाटायचा, असं ती म्हणाली. आपण सर्वोदय परिवारातनू आल्याचं सांगत, अर्पितानं केलेला विचार कृतीत कसा आणायला हे विद्याताईंनी शिकवल्याचं सांगितलं. पुरुषसत्ताक वातावरण आसपास असताना समतेचा विचार रुजवण्याची ताकद आपल्याला विद्याताईंनी दिली असंही ती म्हणाली. ग्रामीण भागात काम करणार्‍या अर्पितानं मिळून सार्‍याजणीचा विचार अंक वाचून, त्यांच्यापर्यंत पोहोचून पसरवण्याचा संकल्प जाहीर केला. तसंच  प्रत्येक महिन्याला दोन नवे वर्गणीदार आपण तयार करू असंही ती म्हणाली. 

डॉ. मीरा कुलकर्णी यांनी विद्याताई म्हणजे सावली देणारं झाड होतं आणि आज ते नाही, म्हणजे आपण पोरके झालो आहोत असं वाटतं अशा भावना व्यक्त केल्या. विद्याताईंमुळे काम करताना आपल्यात ठामपणा आला. परिणामांचा विचार न करता काम करत राहायचं हेही मी शिकले आणि आपली आई जशी विद्याताईंशी जोडलेली होती, तशाच आपणही विद्याताईंशी जोडल्या गेलो असं त्या म्हणाल्या. काळाचं भान असणारी ती एक स्त्री होती, असं विद्याताईंबद्दल बोलून आपण दरवर्षी मिळून सार्‍याजणीसाठी एक ठरावीक रक्कम देणगी म्हणून देण्याचा संकल्प मीरा कुलकर्णी यांनी जाहीर केला. 
पुण्याच्याच सुनिता भागवत हिने काम करत असताना उद्विग्नता आली आणि कधीही विद्याताईंना फोन केला की आपल्याला त्यातून मार्ग सापडायचा असं सांगितलं. एक्स्टेंडेड फॅमिलीचा त्यांचा विचार आपल्याला बळ देऊन गेला. त्यांनी अनेक नाती दिली, अनेक कल्पना दिल्या त्यामुळेच आपण सखी मंडळ सुरू करू शकलो असं सुनिता भागवत हिने सांगितलं. विद्याताईंचे विचार पुढे घेऊन जात राहणार अशा भावना सुनिता भागवत यांनी व्यक्त केल्या. आपलं काम हाच आपला संकल्प असं तिनं सांगितलं.

 
पुण्याहून दीपा देशमुख म्हणजे मी बोलायला सुरुवात केली. विद्याताई गेल्यावर एक बधिरपण मनाला आलं होतं, मात्र मॅक्स महाराष्ट्रला ताबडतोब लेख हवा असल्यानं आपण लिहीत गेलो आणि विद्याताईंच्या अनेक आठवणी जाग्या होत गेल्याचं सांगितलं. कुठलंही द्वंद्व मनात असलं की विद्याताईशी बोलत असे. माझ्या चढउताराच्या प्रवासात विद्याताईंनी अपूर्वला आणि मला 'माझं घर हे तुमचच आहे' हा आधार दिला. विद्याताईंनी मिळून सार्‍याजणींच्या प्रत्येकजणीमध्ये आपला थोडा थोडा अंश ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकीतच विद्याताई आहेत. विद्याताईंनी आशा साठे, सुहासिनी आणि गीताली या मैत्रिणी दिल्या. खरं तर त्या मार्गदर्शक मैत्रिणी! आपल्या मूल्यांशा तडजोड न करता ठामपणे कसं वागायचं हे विद्याताई, आशा साठे आणि गीताली यांनी शिकवलं. 
त्यामुळे विद्याताई नाहीत असं वाटतच नाही. विद्याताई आहेत, सगळ्यांमध्ये आहेतच हीच भावना मनात आहे. 

छपाई माध्यम हे आवश्यक असलं तरी काळाशी अपडेट राहावं लागेल आणि त्यासाठी नव्या माध्यमांना बरोबर घ्यावं लागेल. त्यासाठी काय करता येईल आणि त्यात आपण मि. सा. सोबत सक्रिय राहू असं मी सांगितलं. आपल्या कामातून आपली मूल्यं जपणं आणि तोच विचार मांडणं हाच माझा संकल्प मी जाहीर केला. 
विद्याताईंच्या आठवणीत वैभव देशमुखच्या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्याः

सांज घराशा घुटमळताना आठवते का काही
भवताली कोणी नसताना आठवते का काही
मावळतीचे उन जळाच्या खोल तळाशी गेले
पाण्यावरच्या लहरी मोजत कोण तिथे बसलेले
काठ नदीचा किलबिलताना आठवते का काही

जेवणानंतर दुसरं सत्र सुरू करताना मार्च २०२० चा मिळून सार्‍याजणीचा विद्याताईंचं बोलक मुखपृष्ठ असलेला अंक मिळून सार्‍याजणींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर विद्याताईंचं शेवटचं एक जाहीर आवाहन मार्च २०२० च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. विद्याताई ३० जानेवारीला सकाळी गेल्या. मात्र जाण्यापूर्वी २९ च्या संध्याकाळी त्यांनी जे सांगितलं तेच जाहीर आवाहन म्हणून प्रसिद्ध करण्यात आलं. सगळ्यांच्या आग्रहामुळे मी विद्याताईंचं ते अखेरचं बोलणं, मनोगत, सगळ्यांना वाचून दाखवलं. त्यानंतर शोभा भागवत यांनी त्यांचे पती अनिल भागवत मागच्या वर्षी गेले, त्या वेळी आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देण्यासाठी त्यांनी एक कविता रचली. ती कविता एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर मनात काय कल्लोळ उठतो, काय काय घडतं या भावना व्यक्त करणारी होती. विद्याताईंच्या जाण्यानंही मिळून सार्‍याजणीच्या परिवारात हेच घडलं होतं. त्यामुळे शोभाताईंची ही कविता देखील मी सादर केली.

एक माणूस जातं म्हणजे 
आठवणींचं वादळ उठवून जातं 

या प्रसंगी जमलेल्या प्रत्येकीच्या मनात विद्याताईंचं जाणं धक्कादायक होतं, नेमकं काय घडलं हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. याबद्दल मग गीतालीनं तो महिनाभराचा कालावधी आणि त्यात विद्याताईंच्या बाबतीत काय काय घडलं ते सगळं सांगितलं.
या प्रसंगी मिळून सार्‍याजणीच्या मैत्रिणींतर्फे मनिषा सुभेदार हिनं काही रक्कम मिळून सार्‍याजणीसाठी गीतालीच्या हाती सुपूर्त केली. कबूल केल्याप्रमाणे काही मैत्रिणींनीही काही रक्कम गीतालीला दिली. तसंच मिळून सार्‍याजणीला मिळालेला पुरस्कार रजनी करंदीकर हिनं मुंबईत स्वीकारल्यामुळे तो पुरस्कार (प्रमाणपत्र) तिनं गीतालीच्या हाती सुपूर्त केलं. 
उत्पल आता मिळून सार्‍याजणीच्या ऑनलाईन संपादनाची जबाबदारी सांभाळतो आहे. त्यानं ऑनलाईन अंकाविषयी काही माहिती सांगितली आणि त्यात आणखी काय काय करता येईल याबद्दल चित्रा राजेंद्र जोशी आणि मी उत्पल बरोबर बोललो. 

त्यानंतर विद्याताईंची संशोधक मुलगी विनीत आम्हाला भेटायला आली. तरुणपणीच्या विद्याताईच समोर असल्याचा भास अनेकजणींना झाला. मात्र आपली आई आणि आपल्यात काय साम्य होतं आणि काय विरोधाभास होता हे अगदी मोजक्या शब्दांत विनीतनं सांगितलं. आपल्या आईच्या कॉटनच्या साड्या आम्हा प्रतिनिधी मैत्रिणींना हव्या असल्यास त्या भेट द्याव्यात असा विचार तिनं बोलून दाखवला. आम्ही सगळ्याजणी विनीतसोबत विद्याताईंच्या घरी गेलो. 

विद्याताई नसताना घर रिकामं रिकामं वाटत होतं. अपूर्व आणि मी विद्याताईंकडे गेल्यावर त्यांनी केलेला दलिया आणि काहीतरी गोड त्या कशा आग्रहानं खाऊ घालायच्या, मग त्यांच्याशी मनातल्या सगळ्या गप्पांना कशी वाट करून देता यायची ते सगळं सगळं आठवलं. विद्याताईंच्या आठवणीदाखल त्यांची साडी, एक जाकीट आणि त्यांचा एक टॉप असं घेऊन मी नचिकेतचा निरोप घेतला.
विद्याताई गेल्यानंतर साऱ्याजणीनी एकत्र भेटणं किती गरजेचं होतं हे भेटल्यानंतर कळलं. त्यामुळे ही भेट घडवून आणणाऱ्या उज्वलाचे आणि गीतालीचे खूप खूप आणि खूप आभार!!! 

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.