जोसेफ मेलॉर्ड टर्नर - पुरुष उवाच दिवाळी 2014

जोसेफ मेलॉर्ड टर्नर - पुरुष उवाच दिवाळी 2014

आकाशात ध्रुवतार्‍याचं जसं अढळस्थान आहे, तसंच चित्रकलेमध्ये टर्नरचं अढळस्थान आहे. टर्नर हा चित्रकार ‘द पेंटर  ऑफ लाईट’ म्हणून ओळखला जातो. त्यानं काढलेली निसर्गचित्रं बघताना आपण एका जादुई दुनियेत प्रवेश केल्याचा भास होतो. वयाच्या ७८व्या वर्षापर्यंत त्यानं ५५० तैलचित्रं, २००० जलरंगातली चित्रं आणि ३००० रेखाटनं इतक्या संख्येनं चित्रं काढली. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल!  
जोसेफ मेलॉर्ड टर्नर याचा जन्म  १४ मे१७७५ मध्ये इंग्लडमध्ये मेडनलेनमध्ये झाला. पण त्याची ही जन्मतारीख थोडी वादग्रस्त समजली जाते. जोसेफचे वडील विल्यम गे टर्नर यांचं केस कापण्याचं दुकान होतं. विल्यम हा अतिशय हसरा, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेला पण अत्यंत कंजूष वृत्तीचा माणूस होता. तसंच तो अत्यंत बडबड्या आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता. बोलताना त्याला इतकी घाई होत असे की त्याच्या तोंडातून शब्द भराभर बाहेर पडत आणि ती वाक्यांची एक्स्प्रेस इतक्या वेगानं जात असे की समोरच्याला तो काय बोलला यातलं शब्दही कळत नसे. वडिलांच्या कंजूष वृत्तीचे परिणाम जोसेफलाही भोगावे लागत. जोसेफचे कुठलेही चांगले गुण त्याच्या वडिलांना दिसत नसत. मात्र जोसेफनं कुठेही काटकसर करून एक पैसाही वाचवला तरी त्यांना इतका आनंद होई, की तो दिवस ते फक्त आपल्या मुलाची स्तुती करायला थकत नसत. त्याचे आणि त्याच्या बायकोचे-मेरी मार्शल हिच्याशी वारंवार खटके उडत. मेरी हिला नेहमी वेडाचे झटके येत. मेरीचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्यास एक घटना कारणीभूत ठरली होती. जोसेफची लहान बहीण हेलन हिचा १७८६ साली अकाली मृत्यू झाल्यानं मेरीला तो धक्का सहन झाला नाही. घरातल्या या वातावरणामुळे त्याच्या आई-वडिलांची नेहमीच भांडणं होत. काहीच काळात म्हणजे १७९९ मध्ये मेरीला वेड्यांच्या इस्पितळातच दाखल करावं लागलं. या सगळ्या कारणांमुळे जोसेफचा स्वभाव एकलकोंडा बनला होता. 

जोसेफ मेलॉर्ड टर्नर हा दिसायलाही फारसा चांगला नव्हता. काटकुळं शरीर, लांबसडक नाक, निळसर रंगाचे पिचके डोळे, पोपटासारखं नाक आणि समोर आलेली हनुवटी असा त्याचा एकूण अवतार होता. थोडक्यात, तो कुरूपच होता. त्यामुळे त्याला इतरांमध्ये मिसळावं असं वाटत नसे. जास्तीत जास्त एकटं राहण्याचाच तो प्रयत्न करे. एकदा टर्नरच्या वडिलांना एका श्रीमंत माणसानं केस कापण्यासाठी त्याच्या घरीच बोलावलं. टर्नरही आपल्या वडिलांबरोबर त्या माणसाकडे गेला. वडील त्या माणसाचे केस कापत असताना तो तिथेच बसून असल्यामुळे साहजिकच तो घरातल्या इतर गोष्टींना न्याहाळायला लागला. अचानक त्याची नजर तिथल्या भिंतीवर असलेल्या एका चित्राकडे गेली आणि तो मंत्रमुग्ध होऊन कितीतरी वेळ ते चित्र बघत बसला. घरी परतल्यावर टर्नर तडक आतल्या खोलीत निघून गेला. त्याच्या वडिलांना आपल्या मुलाला अचानक काय झालंय हेच कळेना. थोड्याच वेळात टर्नर बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात एक कागद होता आणि त्यावर एका सिंहाचं सुंदर असं चित्र चितारलेलं त्याच्या वडिलांना दिसलं. ते चित्र बघून टर्नरचे वडील इतके खुश झाले की आपल्या मुलाचा कल नेमका कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं.

त्यानंतर टर्नर त्याच्या मामाकडे म्हणजेच लंडनमधल्या थेम्स नदीच्या काठावर असलेल्या ब्रेन्टफोर्ड या लहानशा गावी राहायला गेला. तिथे असलेल्या शाळेत तो जायला लागला. शाळेत जाण्यापूर्वीच टर्नरला वाचता यायला लागलं होतं. पण लिहिता मात्र काही केल्या त्याला जमत नव्हतं. इथे असताना लहानग्या टर्नरला निसर्गाचं इतकं सुंदर दर्शन झालं की त्याचं मन चित्रकलेकडे जास्तच ओढ घेत गेलं. या काळात टर्नरनं अनेक चित्रं काढली. कदाचित टर्नरच्या एकटेपणानं त्याला चित्रकलेकडे नेलं. तो लहानपणापासूनच चित्रं रंगवायला लागला. ही चित्रं दाखवायची तरी कुणाला? कारण चित्रं दाखवायची तर लोकांशी संपर्क येणार, त्यांना चित्रं दाखवल्यानंतर बोलावं लागणार. पण त्याचा हा प्रश्न आपोआपच सुटला.

टर्नरचे वडील केसांचे विगही बनवत असत. त्यामुळे त्यांच्या दुकानात वेगवेगळ्या गिर्‍हाइकांची चांगलीच वर्दळ असे. टर्नरच्या वडिलांनी मग एक युक्ती केली. त्यांनी आपल्या मुलानं  काढलेली चित्रं दुकानात भिंतीवरती लावून टाकली. टर्नरच्या वडिलांच्या दुकानात येणार्‍या लोकांचं सगळ्यात आधी लक्ष त्या चित्रांकडे जायला लागलं. ती चित्रं खरोखरंच अप्रतिम अशीच होती. मग लोक त्याच्या वडिलांना विचारत, ‘‘ही इतकी अप्रतिम अशी निसर्गचित्रं कोणी बरं काढली? अशी चित्रं कुठे मिळतात? ही चित्रं डेन्मार्कमध्ये मिळतात का? या चित्रकाराचं नाव काय?’’ असे एक ना अनेक प्रश्न विचारून ते टर्नरच्या वडिलांना भंडावून सोडत. जोसेफचे वडील हसून लोकांना सांगत, ‘‘माझ्या मुलानं ही चित्रं काढली आहेत.’’ टर्नरच्या वडिलांना हे सांगताना अर्थातच आपल्या मुलाचं कौतुक वाटत असे. पण लोकांचा काही केल्या त्यांच्या शब्दांवर विश्वासच बसत नसे. मग शेवटी टर्नर कधी तिथे आलाच तर त्याला लोकांसमोर आणून उभं करत. लोक मग टर्नरलाही प्रश्नांवर प्रश्नं विचारून सळो की पळो करून सोडत. टर्नरला तर त्यांच्या प्रश्नांचं काय उत्तर द्यावं तेच कळत नसे. याचं कारण तो कुठेही ही चित्रकलेची तंत्र शिकला नव्हता, ना त्याचा कोणी गुरू होता. त्यामुळे तो तरी काय उत्तर देणार. ‘मला ही चित्रं निसर्गानेच शिकवली’ असं मनातल्या मनात म्हणून तो चालता होई. 

१७८९ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी टर्नर रॉयल स्कूल अ‍ॅकदमीमध्ये प्रवेशासाठी गेला असता, त्याचा प्रवेश नाकारण्यात आला. पण नंतर त्या वेळचा रॉयल अ‍ॅकॅदमीचा अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड यांनी एका वर्षानंतर त्याची चित्रकलेतली रूची बघून त्याचा प्रवेश निश्चित केला. रॉयल अ‍ॅकॅदमीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस टर्नरला वास्तूशााा (आर्किटेक्चर) मध्ये खूपच रस वाटायला लागला. पण त्या वेळचा विख्यात वास्तूशिल्पी (आर्किटेक्ट) थॉमस हार्डविक यानं टर्नरमधली चित्रकलेली गोडी लक्षात घेऊन त्यानं आपलं लक्ष चित्रांवर (पेटिंगवर) जास्त करून केंद्रित करावं असा सल्ला दिला. रॉयल अ‍ॅकॅदमीमध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेतल्या अभ्यासाचं वर्ष होतं ना होतं तोच टर्नरचं जलरंगातलं एक चित्र उन्हाळी (समर) प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आलं. १७९६ मध्ये टर्नरचं तैलरंगातलं समुद्रातल्या मच्छीमाराचं चित्र त्यानं भरवलेल्या प्रदर्शनात खूपच वाखाणलं गेलं. त्यानंतर मात्र टर्नरला मागे वळून कधी पाहावंच लागलं नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत रॉयल अ‍ॅकॅदमीची प्रत्येक वर्षी जेवढी प्रदर्शनं भरली, त्या त्या प्रदर्शनांमध्ये टर्नरची चित्रं नाहीत असं कधीच झालं नाही. 

याच काळात टर्नर आपल्या वर्गमित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडला. दोघांच्या वारंवार भेटी आणि लग्नाच्या आणाभाका सुरू झाल्या. टर्नरच्या प्रेमाची कुणकुण लागताच त्याच्या मित्रानं त्याला स्पष्ट विचारणा केली, तेव्हा टर्नरनंही आपलं प्रेम कबूल केलं. टर्नरच्या मित्राला आपल्या बहिणीसाठी टर्नर हा जोडीदार म्हणून योग्यच वाटला आणि त्यानं त्यांच्या लग्नासाठी ग्रीन सिग्नल दिला. टर्नरनं आपल्या प्रेयसीला स्वतःचंच एक पोट्रेट तिच्या आठवणीसाठी भेट दिलं आणि पुढच्या प्रवासासाठी तो निघाला. पुढली दोन वर्ष तो भटकंती करत राहिला. टर्नरची प्रेयसी मात्र त्याची आणि त्याच्या पत्राची चातकासारखी वाट पाहत राहिली. पण ना तो आला, ना त्याची पत्रं! अखेर किती दिवस वाट बघणार असा नातेवाइकांनी प्रश्न उभा केल्यानं आपल्या प्रेमभंगाचं दुःख मनातच दडपून तिनं दुसर्‍या मुलाबरोबरच्या लग्नाला होकार दिला. पण नियतीचा खेळ असा की तिनं लग्न करताच आठच दिवसांत टर्नर आपल्या वर्गमित्राच्या घरी परतला. त्याची नजर आपल्या प्रेयसीला शोधत राहिली. पण काहीच क्षणात त्याला तिचं लग्न झाल्याची बातमी कळाली. तिचं लग्न दुसर्‍या कुणाबरोबर झालंय ही बातमी पचवणं खूप कठीण जात होतं. अखेर न राहवून टर्नरनं आपल्या नवविवाहित प्रेयसीला गाठलं आणि तिनं आपली वाट का बघितली नाही असा प्रश्न उपस्थित केला. इतकंच नाही तर त्यानं तिचं लग्न झालं असलं तरी तिनं ते मोडावं आणि त्याच्याबरोबर पुढचं आयुष्य काढावं अशी विनवणीही केली.  पण या  दोन वर्षांच्या भटकंतीत टर्नरनं एकदाही मागं वळून बघितलं नव्हतं आणि आपल्या प्रेयसीशी संपर्क साधला नव्हता. त्याच्या अशा बेजबाबदार वागण्याकडे तिनं बोट दाखवताच टर्नर सर्द झाला. तो गेल्यापासून त्यानं कितीतरी पत्रं तिला पाठवली होती. प्रत्येक पत्रात त्यानं आपल्या भावी संसाराची चित्रं रंगवली होती. एक एक पत्र जणू काही आजही त्याच्या मनात जागा करून होतं. तो त्या पत्रात व्यक्त केलेल्या भावना पुन्हा एकदा तिच्यासमोर व्यक्त करत राहिला. आता मात्र टर्नर आणि त्याची प्रेयसी दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिच्या सावत्र आईनं टर्नरची आलेली सगळी पत्रं तिच्यापर्यंत पोहाचूच दिली नव्हती.  आता काय करायचं हा प्रश्न होता. पण नुकतंच झालेलं लग्न मोडून आणि आपल्या नवर्‍याला फसवून पुन्हा टर्नरकडे परतायची तिची तयारी नव्हती. अखेर हताश होऊन टर्नरला परतण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण प्रेमातलं अपयश टर्नर कधीच पचवू शकला नाही. त्याचा स्वभाव त्यानंतर जास्तच विक्षिप्त होत गेला. 

त्यानंतर वयाच्या २४ व्या वर्षी टर्नर रॉयल सोसायटीमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवायला लागला. या काळात त्यानं स्वतःला कामात खूप गुंतवलं. टर्नरला शिकवताना चित्रांमधलं गणित हा प्रकार खूप अवघड वाटत असे. कारण लहानपणापासून त्याचा गणिताशी छत्तीसाचा आकडा असल्यामुळे त्याला ते जमतच नसे. त्यातच टर्नरचा स्वभाव इतरांमध्ये मिसळण्याचा नसल्यामुळेही शिकवताना त्याला अडथळे येत असत. पण टर्नरनं आपल्यामधल्या या दोन्हीही उणिवांवर मात केली आणि जो विषय त्याला अवघड जात होता, तोच विद्यार्थ्यांना शिकवताना मात्र त्याला चांगलाच जमायला लागला. तसंच विद्यार्थ्यांशी संभाषण करणंही त्याला यायला लागलं.

टर्नरनं युरोपमधली अनेक ठिकाणं पालथी घातली. १८०२ मध्ये फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमध्येही तो गेला. त्याच वर्षी पॅरिसच्या लुव्र संग्रहालयात जाऊन त्यानं तिथल्या चित्रांचा अभ्यासही केला. तो अनेकदा व्हेनिसलाही गेला. जरी टर्नर हा तैलरंगातल्या चित्रांसाठी प्रसिद्ध असला, तरी जलरंगातली लँडस्केप करण्यातला तो ‘दादा’ माणूसच होता. त्याला ‘प्रकाशाचा चित्रकार’ म्हणून संबोधलं जातं ते उगाचंच नाही. त्याची तैलरंगातली अनेक चित्रं खूपच प्रसिद्ध आहेत. ‘दी फायटिंग टेमरेअर टग्ड टू हर लास्ट बर्थ टू बी ब्रोकन अप’ हे १८३८ सालचं त्याचं चित्र अतिशय विलक्षण असं आहे. आज ते लंडनच्या नॅशनल गॅलरीत दिमाखात लटकत आहे. 

या काळी ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रंच मुख्यत्वे काढली जात. चर्चमध्ये लावण्यासाठी चित्रं काढली जात. त्यातही येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातले प्रसंग चितारण्यावर जास्त भर असे. तसंच व्यक्तिचित्रं काही प्रमाणात काढली जात. पण निसर्गाला पकडून ते कॅन्व्हासवर चित्रित करणं ही कल्पनाही कोणी त्या वेळी करत नसे. चित्राबरोबर जेवढा काही आवश्यक आहे तेवढा निसर्ग चित्राच्या बॅकग्राउंडला कुठेतरी येत असे तेवढाच. बाकी निसर्गाला चित्रात मुख्य स्थान नसेच. निसर्ग हा चित्राचा स्वतंत्र विषय होऊ शकतो यावर कोणाचा विश्वासही बसला नसता असा तो काळ होता. एखाद्या जागेबद्दल चित्रं काढली जात, किंवा नकाशेही काढले जात. यापलीकडे काही नाही.

जोसेफला मात्र इतर चित्रांपेक्षा निसर्गचित्रं काढण्यातच पराकोटीचा आनंद मिळे. रोज बदलणारा निसर्ग किती वेगवेगळी रुपं दाखवतो. त्याचं ते बदलतं रूप न्याहाळणं आणि ते चित्रांत बंदिस्त करणं हे किती सुंदर आहे असंच त्याचं मन त्याला सांगे. जोसेफची काही चित्रं धुक्यात हरवलेली असत, तर कधी ती धुक्यात न्हालेली असत. धुक्यातून हळूहळू उगवणारी रम्य पहाट आणि येणारं वादळ, तर कधी बर्फाचा झिमझिमणारा वर्षांव, त्यातून येणारा वातावरणातला दमटपणा तर कधी सळसळत येणारा पाऊस अशी असत. टर्नरच्या चित्रांमधून उनसावलीचा अदभुत खेळ आपल्याला बघायला मिळतो. पूर्वी निसर्गचित्रं वॉटरकलरमध्ये रंगवली जात. काळ्या शाईनं ही चित्रं रेखाटली जाऊन मग त्यात पुसट स्वरूपात रंग भरले जात. पण जोसेफ टर्नरची चित्रं कधी लख्ख उन्हात चकाकत, तर कधी अलगद धुक्यात पुसट होत. ती कधी तैलरंगता असत तर कधी इतर माध्यमांच्या बरोबर चालत. टर्नरच्या चित्रांतून कमालीचा ताजेपणा बघायला मिळतो. त्याच्या चित्रांमध्ये तोचतोचपणा आढळत नाही, तर प्रत्येक चित्र नवीनतेची भाषा बेालत राहतं. 

टर्नरनं श्रीमंत जहागीरदार, अमीर-उमराव यांच्याकडे जाऊन त्या त्या ठिकाणची निसर्गचित्रं रेखाटली. एवढं करून तो थांबला नाही, तर त्या चित्रांवर त्यानं पैसाही कमावला. एवढंच काय पण नकाशात देखील बॅकग्राऊंडला चित्र काढावी लागत, तर कधी निसर्ग दाखवावा लागे. तीही कामं अचूकतेनं करून टर्नरनं त्यातूनही पैसा मिळवला. गंमत म्हणजे विविध प्रकारची, वैविध्यानं नटलेली निसर्गचित्रं काढणं यात टर्नरला खूप आनंदही मिळत होता आणि पैसाही.

टर्नर स्वभावानं खूपच विचित्र आणि विक्षिप्त होता. पण कलावंतांबद्दल मात्र त्याला खूपच प्रेम आणि आस्थाही होती. इतरांच्या कलेची तो कदर करत असे आणि त्यांना मदतही करत असे. एकदा तर एका प्रदर्शनात त्या वेळचा नावाजलेला चित्रकार थॉमस लॉरेन्स याचं चित्र लावलं होतं. नेमकी त्याच्या चित्राच्या शेजारीच टर्नरलाही आपलं चित्र लावायला जागा मिळाली. गंमत अशी झाली की मुळातच टर्नरची चित्रं ताजी, टवटवीत असत आणि दिसत. त्यामुळे लॉरेन्स एवढा प्रख्यात आणि प्रसिद्ध असूनही टर्नरच्या चित्रापुढे लॉरेन्सचं चित्र काहीतरीच दिसायला लागलं. ही गोष्ट लॉरेन्सच्या लक्षात आली, पण तो बिचारा गप्प बसला. पण टर्नरच्याही लक्षात जेव्हा ही गोष्ट आली, तेव्हा त्यानं काय करावं? तो उठला आणि आपल्या चित्रात काही सुधारणा राहिल्यात असं पुटपुटत त्यानं आपलं चित्र कॅन्व्हासवर लावून त्यात काही बदल करायला घेतले. टर्नर नेमकं आणखीन चित्रात कुठलं कौशल्य ओतणार आहे याविषयी लॉरेन्सलाही उत्सुकता निर्माण झाली. कारण मुळातच टर्नरचं चित्र उठावदार आणि छान झालेलं होतं. बघता बघता टर्नरचं काम पूर्णत्वाला गेलं आणि त्यानं आपलं चित्र प्रदर्शनातल्या मूळ जागी लावलं. ते चित्र पाहून लॉरेन्सला धक्काच बसला. टर्नरनं निरर्भ, स्वच्छ, ताजतवानं वाटणारं आकाश चक्क काळसर आणि मळकट करून टाकलं होतं. टर्नरनं केवळ लॉरेन्सचं चित्र जास्त उठावदार दिसावं यासाठीच हा उपद्व्याप केला असं लॉरेन्सच्या लक्षात आलं आणि दुसर्‍या कलावंतासाठी स्वतःची कला बिघडवण्यास मागेपुढे न पाहणार्‍या टर्नरला काय बोलावं हेच लॉरेन्सला कळेना!

टर्नरला मात्र आपण यात काही विशेष काही केलंय असं मुळीच वाटलं नाही. तो पुन्हा आपल्या चित्रांमध्ये गुंग झाला. ज्या निसर्गाचं चित्र रंगवायचं आहे, त्या जागेवर त्या परिसरात टर्नर तासनतास जाऊन बसत असे. त्या वेळी त्याला तहान-भूक कशाचीही शुद्ध राहत नसे. त्या निसर्गाची वेगवेगळ्या अँगलमधून तो मनाचं समाधान होईपर्यंत अनेक रेखाटनं करत असे. निसर्ग जसा आहे तसा तो चित्रांतून प्रभावीपणे दिसला पाहिजे यासाठी तो जे कष्ट घेई, त्याला तोड नाही. एकदा टर्नरनं काय करावं? त्याला एक समुद्राचं चित्र रेखाटायचं होतं. समुद्रात वादळ आलंय आणि त्या वादळी, गगनचुंबी लाटा उग्र रूप धारण करून तांडवनृत्य करताहेत हे त्याला दाखवायचं होतं. पण असं दृश्य बघायला हवं आणि अनुभवायलाही हवं या हेतूनं मग टर्नरनं रौंद्र रूप धारण केलेल्या समुद्रात चक्क स्वतःला होडीतल्याएका डोलकाठीला बांधून घेतलं आणि प्राणाशी खेळून त्यानं तो भीषण समुद्राचा अनुभव घेतला. धुमसणार्‍या आणि भेडसवणार्‍या या लाटा बघून तो स्तिमित झाला. शांत असतानाच समुद्र त्याला आठवायला लागला. शांत असतानाचं त्याचं धीर, गंभीर आणि एखाद्या ध्यानस्थ त्रषीसारखं रूप कुठे आणि आत्ताचा एखाद्या सूडाने पेटलेल्या अतिरेक्याचा रुद्रावतार कुठे सगळंच विलक्षण होतं! टर्नरनं आपल्या चित्रामधून जेव्हा हे सगळं रेखाटलं तेव्हा बघणारे त्याहीपेक्षा थक्क होऊन गेले. त्यांच्यासाठी देखील तो न अनुभवताही अनुभवाला येणारा जिवंतपणा होता. या चित्रानं टर्नरला अफाट लोकप्रियता मिळाली. 
 १८३४ साली टर्नरनं काढलेलं ‘बर्निंग ऑफ पार्लमेंट (Burning of parliament)’ हे चित्र खूपच गाजलं. त्याची जलरंगातली अशी अनेक चित्रं त्यानंतर एकामागोमाग एक अशी आली. सूर्याची किरणं, पाऊस आणि धुकं ही तरी त्याच्या चित्राची वैशिष्ट्यं होतीच, पण उसळता, उफळता, तुफानी समुद्र टर्नरला चित्रासाठी आकर्षित करत  असे. त्याचं १८४० मध्ये चितारलेलं ‘डॉन आफ्टर द रेक (Dawn after the wreck)’ आणि ‘द स्लेव्ह शिप (The Slave Ship)’ ही देखील अतिशय अप्रतिम चित्रं म्हणून उल्लेख करावा लागेल. 

 टर्नरला चित्रं काढताना तो त्यात इतका रममाण होऊन जात असे की त्याला वेळेकाळेचं भानही राहत नसे. त्यामुळेच त्यानं काढलेल्या चित्रांची संख्या अफाट आहे. त्याचं प्रत्येक चित्र त्याच्याच दुसर्‍या चित्रापेक्षा वेगळं असे. तोचतोचपणा त्याला स्वतःलाच आवडत नसे. एवढ्याशा वितभर चित्रामध्ये मैलभर अंतर असल्याचा भास निर्माण करण्याचं कौशल्य टर्नरच्या कुंचल्यात होतं. त्याच्या प्रत्येक चित्रात एक नवा प्रयोग जन्म घेत असे. नद्या, नाले, दर्‍या, डोंगर, सरोवरं, समुद्र येऊन आपापली हजेरी दिमाखानं लावत असत. टर्नर २६ वर्षांचा असताना चित्रकला अ‍ॅकॅदमीमध्ये त्याचं चित्र लावलं गेलं. त्या वेळच्या टीकाकारांनीही त्यात आपल्या स्वभावानुसार काही खोट काढता आली नाही. त्यांनी भरभरून मुक्तकंठानं टर्नरच्या चित्राची प्रशंसा केली आणि म्हटलं, टर्नरसारख्या प्रतिभावंत चित्रकाराला चित्रकार न म्हणता जादुगारच म्हणायला हवं आणि त्यांचं म्हणणं अक्षरशः खरं होतं. कारण जिवंतपणीच टर्नरचं आणि त्याच्या चित्रांचं दर्शन घेण्याकरता अनेक होतकरू चित्रकार त्याला भेटण्यासाठी चित्रकला अ‍ॅकॅदमीमध्ये येत. जॉन रस्कीन.....यालाह तर टर्नरची चित्रं खूप आवडत. तो जाहीरपणे टर्नरचं कौतुक करत असे. टर्नरनं त्याची विक्री झालेली अनेक चित्रं पुन्हा स्वतःच विकत घेऊन कला अ‍ॅकॅदमीला भेट म्हणून दिली. हेतू हा की ती चित्रं सगळ्यांना बघता यावीत आणि ती कोणाएकाच्या मालकीची झाली तर ती सगळ्यांना बघता येणार नाहीत असं त्याला वाटे.
दिसायला कुरूप असल्यामुळे टर्नरने स्वतःला तसंही जगापासून दूरच ठेवलं होतं. त्यातच त्याचा प्रेमभंगही झाला असल्यानं मग त्यानं आपण लग्नाच्या फंदात पडायचंच नाही असं ठरवून टाकलं आणि त्यानं तो निश्चय जन्मभर पाळला. त्याला एकूणच माणसांमध्ये मिसळण्याविषयी तिटकारा निर्माण झाला. पहिल्या प्रेमाला टर्नर कधीच विसरू शकला नाही. पण साराह डॅन्बी या त्याच्याकडे काम करणार्‍या बाईपासून त्याला १८०१ आणि १८११ साली दोन मुली झाल्या. तिला त्यानं हवं तसं गृहीतच धरलं होतं. साराहनं टर्नरला ४० वर्ष त्याचं घर सांभाळून साथ दिली. पण म्हणूनच त्यानं तिच्याबरोबर शारीरिक संबंधही प्रस्थापित केले, पण तेही त्याला वाटेल तेव्हाच. 

टर्नरचं घर गंमतशीरच होतं. त्याच्या घराची दारं तो कधीच उघडी ठेवत नसे. माणसांवरच्या तिरस्कारातून ती दारं त्याला उघडी ठेवावी वाटत नसत की काय कोणास ठाऊक! त्याच्या विचित्रपणाची कमाल अशी की जर घरात माणसंच नको असतील तर मग खुर्च्या हव्यातच कशाला? पण त्याच्या घरात दोन-चार खुर्च्या होत्या आणि त्यातल्या एकाही खुर्चीचे पाय धड शाबूत नव्हते. ते तुटलेल्या अवस्थेत होते. मग येणारा बसणार कसा आणि कुठे? टर्नरला आणखीन विचित्रपणा म्हणजे तसाही तो त्याच्या घरात चुकूनही कोणाला बोलावत नसे. चित्रं काढण्यासाठी कोणी गिर्‍हाईक आलंच तो दार किलंकिलं करून त्यांच्याशी बोलत असे आणि बाहेरच्या बाहेरच त्याला कटवत असे. त्यानं त्याच्या कामवालीला सांगूनच ठेवलं होतं. त्याच्या सांगण्यानुसार दार वाजलं तर तीही पढवल्याप्रमाणे येणार्‍याला ‘ते भेटणार नाहीत’ असं ऐटीत सांगत असे. याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याची तमा टर्नरला अजिबात वाटत नसे. असं असलं तरी टर्नरला कीर्ती चांगलीच मिळत होती. पण मिळणार्‍या कीर्तीबरोबर टर्नर जास्तच स्वतःच्या कोषात राहायला लागला. त्याच्या लोकप्रियतेबरोबर त्याच्यातला विक्षिप्तपणाही वाढतच गेला. तो जेव्हा रस्त्यावरून जात असे, तेव्हा लोक आपसात, ‘ तो बघा जगप्रसिद्ध चित्रकार टर्नर’ असं म्हणून कौतुकानं बघत, तेव्हा त्याच्याकडे बघून साधं हसणं तर सोडाच, पण हे महाशय चक्क आपण न ऐकल्यासारखं दाखवून तिथून चालते होत. खरं तर लोकांना टाळूनच आपले सगळे व्यवहार व्हावेत अशी त्याची इच्छा असे. 

१८२६ साली टर्नरनं काढलेल्या या निसर्गचित्रात तळ्याकाठी असलेली झाडं ठळकपणे दिसताहेत. उन्हाळ्यातल्या एका सकाळचं चित्रण यात असून झाडांवर पडलेली उन्हाची तिरीप आणि स्थितप्रज्ञ माणसांसारखी उभी असलेली झाडं यात टर्नरनं रेखाटली. 

टर्नरला फारच कमी मित्र होते. जवळजवळ नाहीच म्हटलं तरी चालेल. त्याचा स्वभाव आपल्या कोषात राहणारा असा होता. (सिके्रटिव्ह). त्याचे वडील हेच त्याला समजून घेणारे एक मित्र होते. त्याच्या या स्वभावाशी जुळवून त्यांनी टर्नरबरोबर ३० वर्ष एकत्र काढली. गंमत म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याच्याच स्टुडिओत अगदी एखाद्या मदतनीसाची भूमिका निभावली. १८२९ साली विल्यमचा म्हणजेच टर्नरच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर टर्नरला खूपच नैराश्य आलं. आयुष्याच्या शेवटच्या काळात लोकांचा ससेमिरा नको म्हणून आणि प्रसिद्धीपासूनही दूर राहावं म्हणून टर्नरनं काय करावं, तर तो चेलसी इथल्या एका हॉटेलमध्ये गेला आणि त्यानं त्या हॉटेलमध्ये राहायचं बुकिंग केलं. हॉटेलमधल्या रिसेप्शनिस्टने टर्नरला त्याचं नाव आणि पत्ता नियमाप्रमाणे विचारला. विचित्र स्वभावाच्या टर्नरनं स्वतःचं नाव सांगायचं सोडून त्या बाईला तिचंच नाव विचारलं. तिनंही तिच्या व्यवसायाला साजेसं गोड हसून ‘मिसेस बूथ’ असं उत्तर दिलं. तेवढ्या वेळात टर्नर साहेबांच्या डोक्यातली चित्रं वेगानं फिरली आणि त्यानीं आपलं नाव जोसेफ टर्नर ऐवजी मिस्टर बूथ असं ऐटीत सांगितलं. एवढंच नाही तर त्यानं आपण नौदलातला एक बडा अधिकारी असल्याचंही सांगायला कमी केलं नाही आणि त्यानंतरचे अनेक  दिवस तो त्या हॉटेलमध्ये ‘मिस्टर बूथ’ याच नावानं राहिला. तिनं बिचारीनं तशीच नोंद केली. एके दिवशी साराह टर्नरला शोधत शोधत चक्क त्या हॉटेलपर्यंत पोहोचली, पण तिला पोहोचायला थोडा उशीरच झाला. कारण ती पोहोचण्यापूर्वीच टर्नरचं निधन झालं होतं आणि साराहमुळे त्या हॉटेलमधल्या कर्मचार्‍यांनाही हा सर्वसामान्यांप्रमाणे राहणारा मिस्टर बूथ हाच जगप्रसिद्ध चित्रकार टर्नर होता हे कळलं! 
टर्नरच्या शेवटच्या इच्छेनुसार सर जेशुआ रेनॉल्ड्स यांच्याच शेजारी सेंट पॉल कॅथीड्रलमध्ये त्याचं दफन करण्यात आलं. रॉयल अ‍ॅकॅदमीमधल्या सहभागाचं १८५० साल हे टर्नरसाठी अखेरचं वर्ष ठरलं. आर्किटेक्ट फिलीप हार्डविक हा टर्नरचा मित्र असल्यामुळे टर्नरच्या शेवटच्या अत्यंसंस्काराच्या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्या. त्याच्या अत्यंविधीच्या वेळी आपण त्याला गमवलंय हे कळवणं मला भागच होतं असं तो म्हणाला. निसर्गाची लहर आपल्या चित्रात पकडून मोठ्या कौशल्यानं दाखवणारा कलावंत म्हणून जॉन रस्किननं टर्नरचं कौतुक केलं. 

टर्नरच्या अनेक चित्रांमधून त्याचं माणुसकीप्रती असलेला ओढा कळतो. पुढे क्लोद मोने या चित्रकारावर टर्नरच्या चित्रशैलीचा प्रभाव दिसतो. २०१४ साली टर्नरवर ‘मि. टर्नर’ नावाचा चित्रपटही निघाला. माईक लेग यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं अनेक पुरस्कार मिळवले. 

१९ डिसेंबर १८५१ साली आपल्या कुंचल्यानं निसर्गाला बंदिस्त करणारा निसर्गवेडा चित्रकार काळाच्या पडद्याआड गेला. मरताना त्यानं शेवटचे शब्द उच्चारले तेही निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करणारेच. तो म्हणाला, ‘सूर्य हाच परमेश्वर आहे.’ त्याच्या मृत्यूनंतर त्याला शेवटपर्यंत साथ देणारी, त्याच्या वागणुकीविषयी कधीही तक्रार न करणारी साराह देखील दोनच वर्षात मरण पावली.

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.