माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड - इत्यादी दिवाळी 2013
मासवण हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यातलं 2000 वस्तीचं चिमुकलं आदिवासी गावं, मासवणच्या आदिवासी भागात ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेत (15 गावांमधल्या 78 पाड्यांसाठी) शिक्षण विभाग प्रमुख म्हणून मी काम करत होते. आदिवासींची भाषा, त्यांच्या वागणुकीतला प्रेमळपणा आणि तिथल्या निसर्गाने मला केव्हाच आपलंसं केलं होतं. कमी होती फक्त माझ्या शहरी मित्र-मैत्रिणींच्या संवादाची. कारण त्या भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसे. त्याच दरम्यान यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, मुंबईच्या, औरंगाबाद इथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात माझी अच्युत गोडबोले या व्यक्तीशी ओळख झाली. त्या वेळी मी मासवणसारख्या आदिवासी भागात काम करते म्हटल्यावर त्यांनी माझं कौतुक केलं.
या ओळखीतून एकदा अच्युत गोडबोले त्यांचं त्या भागात व्याख्यान असताना, माझं काम बघायला म्हणून पालघरला आले. त्यांना समुद्र आवडतो म्हणून जवळच असलेल्या केळवा बीचवर मी घेऊन गेले. पालघरहून केळवाबिचचं अंतर फक्त 20 मिनिटांचं. तो रस्ता इतका निसर्गरम्य आहे की, सार्या जगाचं भान हरपून जावं. आसपासची दुतर्फा गर्दी केलेली नारळांची दाट झाडी चित्रात रेखाटावी तशी आणि त्या पलीकडे भातांची हिरवीगारं रोप लहरत असलेली भातशेती मनाला हिरवंगार करून टाकत असे. त्यांना गाडीवरून नेताना मी माझ्या कामाविषयी बोलत होते. आजूबाजूच्या वातावरणानं मनात उमटलेल्या कविता आणि गाणीही म्हणून दाखवत होते. तोपर्यंत मला त्यांच्याविषयी एक संगणकतज्ज्ञ आणि एक उत्तम वक्ता आहे इतकंच ठाऊक होतं. मात्र त्या वेळी ते एक उत्तम लेखक असून त्यांनी ‘संगणकयुग’, ‘बोर्डरूम’, ‘नादवेध’ अशी पुस्तकंही लिहिली आहेत हेही समजलं. खरं तर माझ्या आदिवासीभागातल्या कामाच्या प्रवासापर्यंत मधली काही वर्ष तर मी वाचन, लेखन यापासून खूप दूर गेले होते. जगात काय घडतंय याच्याशी माझा फारसा संबंधच राहिला नव्हता.
नेटवर्कच्या परिसरात आल्यावर फोन आणि ई-मेलद्वारा आमचा संवाद होत होता. माझं आदिवासींसाठी काम करणं या माणसाला का कौतुकाचं वाटतं याचं कारणही मला त्या संवादातून समजलं. आपलं आयआयटीतलं शिक्षण संपताक्षणीच गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची स्वप्नं न पाहता हा माणूस तडक धुळे जिल्ह्यातल्या शहादा गावी पोचला होता. तिथल्या आदिवासींसाठी काही काळ काम केलं होतं. आमच्यातल्या आवडीच्या गोष्टींमधल्या अनेक दुव्यांपैकी हा एक जोडणारा महत्त्वाचा दुवा होता.
त्या वेळी मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ‘सामाजिक कार्यकता’ अभ्यासक्रमाचं समन्वयाचं काम करत होते. मी पालघरहून मुंबईला दर शनिवार रविवार जात असे. दादरच्या श्रमिकच्या हॉलमध्ये मुक्काम करून सोमवारी पहाटे पुन्हा कामावर परतत असे. तेव्हा पालघर ते मुंबई हा प्रवास करताना मुंबई मला घाबरवणारी आणि रडवणारी वाटत असे. पण अच्युत गोडबोले यांनी माझी मुंबईची भीती घालवली. माझ्या मुंबईच्या वास्तव्यात त्यांनी मला एका सुंदर मुंबईचं दर्शन घडवलं. जुहूचा समुद्रकिनारा असो, एअरपोर्ट कॉलनी असो, माहिमचं रंगशारदा वा आरे कॉलनीतल्या इवल्याशा पाउलवाटांचा निसर्गरम्य परिसर...या मित्राने मला मुंबईत राहणार्या माणसांमध्ये भरलेली अफाट ऊर्जा दाखवली.
याच मैत्रीतून संवाद वाढला आणि माझं लिखाण, मी लिहिलेल्या कथा-कविता वाचल्या, माझं कौतुकही केलं. ‘तुझी भाषा किती सुंदर आहे. मला असं लिहिता आलं असतं तर?” या त्यांच्या शब्दानं माझा हुरूप वाढे. आमच्या या मैत्रीत अच्युतचं मोठेपण कधीही आडवं आलं नाही. कर्मकांड, रुढीपरंपरा, रोजची जगण्याची चौकट ते मानत नसल्यामुळे अनेक विचारांमध्ये आमचं एकमत होतं. माझ्या सामाजिक कार्याबरोबरच माझं स्वतःचं लिखाणही अधूनमधून चालून असे. कथा, लेख, परीक्षणं, मासिकाचं संपादन अशी छोटीमोठी कामं चालू असत. “तुझी टाईप करण्याची स्पीड खूप छान आहे आणि भाषाही चांगली आहे, माझ्या कामात मदत करशील का?” असं अच्युतनं विचारताच मी लिखाणाच्या कामात त्यांना मदत करू लागले.
खरं तर त्यांच्या बरोबर झालेला हा कामाचा प्रवास खूपच वेगळा आणि अनोखा आहे. समोरच्या माणसाची क्षमता ओळखण्याचं उत्तम कसब या माणसाकडे आहे. मी केवळ पंधरा मिनिटांत उत्कृष्ट स्वयंपाक करू शकते याचं अनेकदा कौतुक होतं. समोरच्या माणसाच्या क्षमतांबरोबरच त्याच्यातल्या कमतरताही त्यांना चांगल्या कळतात. मात्र त्याबाबतीत त्या व्यक्तीला ते कधीच कमी लेखत नाहीत. पण समोरच्याला त्याच्या क्षमता माहीत करून देत वर त्याला ते काम करण्याबाबत प्रोत्साहित करणं अच्युतना चांगलं जमतं.
हळूहळू मी मेलने आलेलं त्यांचं हस्तलिखितही टाईप करू लागले, त्या त्या विषयांवरच्या नोट्स काढू लागले. त्यानंतर लेखांचा सिक्वेन्स लावणं, प्रुफं चेक करणं, तयार झालेला लेख तीन वेळा तरी तपासून बघणं, एखाद्या शब्दाबाबत मनात शंका आल्यास डिक्शनरीचा वापर करून कंटाळा न करता पुन्हा पुन्हा तपासून बघणं, केलेल्या फाईलला तारीख वेळ आणि शब्दसंख्या टाकणं, पंधरा मिनिटांनी जरी त्या लेखात एका अनुस्वाराचा जरी बदल केला तर पहिली फाईल तशीच सेव्ह करून दुसर्या फाईलमध्ये पुन्हा नवी तारीख आणि वेळेसह बदल टिपणं, आकृत्या हव्या तशा फोटोशॉपमध्ये तयार करणं, मुखपृष्ठ तयार करणं आणि ती फाईल पुन्हा अपडेट करणं, ही कामं करायला मी शिकले. त्यांनतर लेख कसा तयार करायचा, त्याचा मूळ आराखडा, भाषेची शैली, लागणार्या माहितीचं संकलन, त्याचा योग्य तो वापर कसा करायचा, सुरुवातीला आपल्याजवळच्या माहितीच्या आधारे, आपल्याला पटलेल्या विचारांच्या आधारे तो लेख कसा लिहून काढायचा, भले तो कितीही मोठा होवो...त्यानंतर मात्र अपेक्षित शब्दसंख्येत बसवण्यासाठी त्याचं संक्षिप्तिकरण कसं करायचं, पुस्तक तयार होण्याच्या कालावधीत त्या त्या तज्ज्ञांना भेटणं, त्यांच्या सूचना घेणं, पुस्तक तयार झाल्यावर त्या त्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेणं, त्या एडिट करणं, प्रकाशकांसोबतचा समन्वय, वाचकांच्या प्रतिक्रियांना उत्तरं देणं, व्याख्यानाचे कार्यक्रम निश्चित करणं अशा अनेक गोष्टी या सगळ्याच गोष्टी मी टप्प्याटप्प्यानं शिकत गेले.
हे सगळं शिकत असताना माझ्याकडून चुकाही अनेकदा होत असत. कधी कधी पेनड्राईव्हमधला डाटाच व्हायरसमुळे नष्ट होत असे. मग त्यावर न रागावता “यापुढे रोजचं काम रोज स्वत:ला आणि मला मेल करत जा” असा हळुवार भाषेत सल्लाही मिळायचा. त्यामुळे एकच आर्टिकल अनेक ठिकाणी बॅकअप घेऊन ठेवायचं लक्षात आलं. हे सगळं करताना माझं अनुभवविश्व किती तरी विस्तारलं.
अच्युत गोडबोले यांना रोजच्या दैनंदिन चौकटीतल्या गोष्टीत मुळीच रस नसतो. तसंच हा माणूस कोणाच्याही खाजगी आयुष्यात नाक खुपसत नाही. त्यांचे विषयच मुळी खूपच वेगळे असतात. सतत स्वतःला समजलेल्या, माहीत झालेल्या, वेगवेगळ्या विषयांवर भरभरून ते बोलत असतात. भरारून खळाळत वाहणार्या भरधाव नदीप्रमाणे त्यांच्या माहितीचा संवाद अखंडपणे वाहत असतो. कधी व्हॅन गॉघबद्दल, तर कधी पिकासोबद्दल, कधी अमेरिकेतल्या बबल्सवर मला ते सांगत. सुरुवातीच्या काळात मला ही एरिक फ्रॉमपासून ते व्हॅनगॉघपर्यंतची नावंही लक्षात राहत नसत. मी दुसर्या भेटीत बोलताना व्हॅन गॉघचं जॉन वाघ करे आणि नावागावाचे संदर्भ देताना सगळाच गोंधळ उडवून देई.
कधी कधी मासवणला माझ्या राहत्या ठिकाणी विंचू तर कधी साप निघत. मला खूप भीती वाटे, कधी कधी तीन तीन दिवस त्या इवल्याशा गावातली लाईट गायब होत असे. अशा वेळी अच्युतनं भरभरून दिलेला संगीताचा खजिना धावून येई आणि सगळी भीती पळून जात असे. हा खजिना हा माणूस ज्या कोणाला संगीताची आवड आहे त्याला अगदी मोफत देत असतो. जे जे अच्युतचे मित्र आहेत त्या त्या सगळ्यांना अच्युतने दिलेल्या सीडीज आहेतच आहेत. अच्युतसोबत प्रवास करताना गाडीत तर संगीत असतंच. ते आपल्या बरोबर असणार्याच्या आवडीच्या सीडी आवर्जून लावतात. मग मध्येच थांबून लावलेला राग किंवा गझल किंवा चित्रपटातलं गाणं असेल तर त्यामागच्या त्यांच्या जाग्या झालेल्या आठवणी शेअर करतात. तर कधी त्या रागातलं गाणं ऐकून त्या गाण्याची आलापी सुरु करतात. कधी कधी एखादा राग गाऊन आणि ओळखायलाही सांगतात. बरोबर ओळखला की शाबासकीही देतात. राग चुकला की त्याचं स्वरूप नीट समजावून सांगतात.
त्या दिवसांत आदिवासी भागात आदिवासींच्या बैठका घेताना काही वेळा खूप चालून जावं लागे. तो डोंगराळ रस्ता, तर कधी कधी पाऊस पडल्यानंतर मांडीपर्यंतच्या चिखलातून वाटचाल करून पाड्यापाड्यापर्यंत जावं लागे. पण हे सगळं सुसह्य झालं ते केवळ अच्युत गोडबोले यांच्यासोबतचं काम आणि त्यांनी दिलेल्या संगीतामुळेच.
माझा मोबाईल मासवणला पोचताच निकामीच होत असे. मात्र त्यात अच्युत यांनी दिलेली गाणी फिल्डवर फिरताना कामी येत आणि जिवंत होऊन बोलू लागत. त्या गाण्यातले शब्द, भाव नव्याने माझ्याशी हितगुज करत. ती गाणी, तो निसर्ग आणि त्या आदिवासी भागातली साध्या मनाची माणसं यांचा खूप सुरेश मेळ होत असे. मी आमच्या संस्थेच्या बालवाड्या तपासायला आलेल्या अधिकार्यांना ‘किमयागार’च्या प्रास्ताविकातल्या गमती सांगत असे. तर कधी आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात अच्युतच्या बोर्डरूमच्या गोष्टी सांगताना मुलींचा आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होई. माझ्या कामांमध्ये अनेक बदल होत गेले. मी काही कोर्स डिझाईन करू लागले. ट्रेनिंग घेऊ लागले. तेव्हा त्या विषयांवर सुसंगतपणे वास्तवाला धरून ते मॉड्यूल तयार करताना आणि तयार झालेला तो कोर्स बघताना त्या क्रिएटिव्हिटीचा आनंद मनाला पुढच्या कामासाठी पुन्हा उत्साहित करत असे.
मासवण - पालघरहून मी नंतर विरारला रहायला आले. मुंबईतला खर्च आपल्याला कसा झेपेल या विचारानं मी चिंताग्रस्त झाले होते. माझी शंका बोलून दाखवताच अच्युत यांनी मला विरारमधली 15 रूपयात भाजी पोळी पासून संपूर्ण जेवण 22 रू. पर्यंतची अनेक ठिकाणं दाखवली. तसंच मुंबईत कोणत्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त काय मिळतं याची यादीही मला दिली. मला अच्युत गोडबोले या वल्लीचं खाद्यप्रेमही कळत गेलं. दोन गोष्टींबद्दल अच्युत गोडबोले ही व्यक्ती अगदी लहान मुलासारखी आहे. एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे पुस्तकं! पुस्तकं बघताना एखादं खेळणं मिळाल्यासारखे ते खूप वेडे होतात. खूप वेळ त्याची पानं चाळत त्या पुस्तकाचा वास घेत राहतात. इतर बाबतीत स्वतःला काही विकत घ्यायचं असेल तर खूप काटकसरीनं वागणारा हा माणूस पुस्तकांच्या बाबतीत आणि इतरांना मदत करण्याच्या बाबतीत याचा हात खूप सढळ होतो.
अच्युतचा स्वभाव खूपच मिश्किल आणि हजरजबाबी आहे. त्यांना अनेक ज्योक्स तोंडपाठ असतात. कितीतरी प्रसंगी ज्योक्सचा वापर करून त्या प्रसंगाची शान वाढवण्याचं काम ते करतात. अगदी त्यांच्या लिखाणातसुद्धा त्यांचा हा मिश्किलपणा जागोजागी जाणवतो. बोर्डरूमध्ये हॉटमेलच्या बाबतीत असो किंवा नादवेधमध्ये संगीताच्या जाणकारांबाबत असो, वा अर्थातसारख्या गंभीर विषयातसुद्धा अर्थतज्ज्ञांवरच्या विनोदी कॉमेंट्स असो किंवा मुसाफिरमध्ये स्वतःच्या बाबतीतसुद्धा हिंदीविषयी असो वा गड्ड्याच्या जत्रेतल्या दोन भावांच्या ताटातुटीविषयीच्या त्याच्या कोपरखळ्या असोत. ते ज्या रीतीनं आपल्या ओठांवर हासू पेरतात, त्यात कोणालाही न दुखवता अतिशय मार्मिक, व्यंगात्मक पण सौम्यपणे ते वास्तव समोर ठेवतात.
अच्युत यांच्या अनेक जाहीर कार्यक्रमांची प्रेझेंटेशन्स तयार करताना, त्यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थिती लावताना, कार्यक्रम आयोजित करतानाही एक वेगळा अनुभव असतो. या सगळ्या प्रवासात अच्युतचे अनेक चाहते भेटतात. ते त्यांच्या लिखाणाची भरभरून पावती देतात. अच्युतचं वेगळेपण म्हणजे ते आपल्यासोबत सो कॉल्ड मोठेपणाची झूल बाळगून कधीच फिरत नाहीत. कधी हा माणूस पायात चप्पल, खादीचा झब्बा पायजमा आणि खांद्याला झोळी घेऊन लोकल ट्रेनमध्ये धक्के खात प्रवास करतो, गाडीवरचा वडापाव आवडीने खातो. भराभरा चालत कधी कधी बेस्टची डबलडेकर धावत पकडतो आणि त्यातून मुंबईदर्शन करवतो आणि या प्रवासात कुठेही काही अडचणी आल्या तरी तो त्या परिस्थितीवर, माणसांवर कधीही आपला राग काढत नाही. खूप शांतपणे त्यांना हाताळतो. कधी तो मराठवाड्यातल्या सेलू, हिंगोली सारख्या लहानशा गावातल्या लोकांना मराठीतून हसवत असतो, तर कधी पंचतारांकित हॉटेल्समधल्या चकचकित व्यासपीठावरून अस्खलित इंग्रंजीतून तास-दीडतास भारतभरातून आलेल्या अर्थतज्ज्ञांना, डॉक्टर्संना गाईड करत असतो. या दोन्ही प्रसंगांची मी साक्षीदार असते. ते ‘मि. पर्फेक्शनिस्ट’ आहेत!
मी मुंबईतच रहायला आल्याने माझं अच्युत यांच्यासेाबतचं माझं कामही वाढतच गेलं. त्याच दरम्यान एकदा जुहूला पुस्तकं विकत घ्यायला गेलो असताना कॉफीसाठी “सी व्ह्यू” रेस्टारंटमध्ये गेलो. तिथून समुद्राचा व्ह्यू खूपच सुरेख दिसतो. खळाळणार्या समुद्राच्या लाटांना बघत असताना अच्युतनं अचानक “आपण सायकॉजीवर लिहिलं तर?” असा प्रश्न केला आणि मी एकदम उडालेच. ‘किमयागार’, ‘अर्थात’ नंतरचा हा दणदणीत विषय होता. माझ्या वडिलांना मी सायकॉलॉजी घेऊन मी डॉक्टरेट करावं असं वाटे. आता अच्युतसोबत सायकॉलॉजीवरचा प्रॉजेक्ट करताना वडिलांची इच्छा आणि माझं शिक्षण नव्याने होणार होतं.. त्याच वेळी तिथलाच पेपर नॅपकिन घेऊन आनंदात ते बोलत असलेले कितीतरी मुद्दे मी भराभरा लिहून काढले.
परतताना माझ्या डोक्यात ‘मन’ या विषयाला अनुरूप कितीतरी गाणी घुमायला सुरुवात झाली होती. कधी बहिणाबाई तर कधी रामदास, कधी ज्ञानेश्वर तर कधी हिन्दी चित्रपटातली गाणी रेंगाळू लागली होती. लहानपणी आईसोबत भगवद्गीतेच्या वर्गांना लावलेली हजेरी आणि त्या वेळी न कळलेल्या कितीतरी मनाला उकलणार्या गोष्टीचे संदर्भ लागू लागले होते. मग फ्रॉईड केव्हा आला कळालंच नाही. फ्रॉईडपासून सुरुवात झाली. सुरुवातीला मिळालेल्या माहितीच्या आधारे कच्च्या नोट्स काढताना हळूहळू फ्रॉईडनं आपलं साम्राज्यच आमच्या सभोवती निर्माण केलं. त्याच्याच सोबत अॅडलर आला, युंग आला, एलिस आला, मोनालिसाचं चित्र आलं. त्याच्या स्वप्नांचे अर्थ उलगडण्यासाठी आम्हीही त्याच्याबरोबरीनं सरसावलो.
सायकॉलॉजी करताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मला या प्रॉजेक्टवर मेजॉरिटी काम मला करायचं होतं आणि माझा हा हट्ट अच्युत यांनी पुरवला. हे काम करताना मला खूपच शिकायला मिळालं. सकाळ वर्तमानपत्रात ‘मनात’ या नावाने सायकॉलॉजीची मालिका सुरू झाली. मालिकेचे लेख संक्षिप्त करून श्रीलिपीतही तयार करून मी सकाळला देत असे. त्या निमित्ताने ‘श्री लिपी’ चांगल्या पद्धतीने आत्मसात करता आली. सुरूवातीपासूनच्या वर्तमानपत्राचा लेख तयार करताना खूप धमाल येई. शब्दांना पकडलं तर अर्थ पळत. अर्थ पकडून ठेवावा तर सगळेच शब्द गिरक्या घेत ‘आम्हीही बरोबर येणारच’ म्हणत. मग दोघांच्या या मारामारीत शब्दसंख्या वाढे. 1200 शब्दांचा लेख तयार करण्याची कसरत करणं म्हणजे सुरुवातीला खूपच कठीण काम असे. अशा वेळी अगदी मेंदूवरचा लेख तयार करताना कधी एखादी कथा तर कधी कविता मनात आकाराला येत असे. अशा कविता लेखात समाविष्ट करण्यासही अच्युतचं प्रोत्साहनच असे.
वाहतो व्यथांचे मी भारे,
एक मेंदू झेलतो हे दुःख सारे
मेंदूसारख्या विषयावर कविता होऊ शकते याविषयी अनेकांनी एसएमएस करून प्रतिक्रिया त्या दिवसांत दिल्या. डिप्रेशनचा लेख संक्षिप्त करतानाही अशीच एक कविता धावत आली आणि तीही अलगद त्या लेखात आपली जागा करून बसली. अच्युतनं तिचंही विशाल मनानं स्वागतच केलं.
नैराश्याच्या वाटेवर हरएक चेहरा जुना आहे,
खोल गर्तेतला प्रवास सारा फिरून पुन्हा पुन्हा आहे
ही मालिका चालू असताना आठवड्याचा तो लेख, त्याचं पीडीएफ, त्याचा क्रम, सकाळशी संपर्क आणि नंतर तो प्रसिद्ध झाल्यावर वेबसाईटवर अपडेट करणं असं काम सुरू झालं.
डॉ. अभय बंग यांच्यासोबत काम करताना मुंबईहून ट्रान्स्फर होऊन मी पुण्यात आले. पुण्यात आल्यावर एकीकडे ‘मनात’चं मालिकेचं काम आणि त्याच वेळी अच्युत गोडबोले यांच्या वेबसाईटचंही काम मी सुरू केलं. वेबसाईट करताना पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. वेबसाईट पूर्ण होताच नेहमीप्रमाणे माझं भरभरून कौतुक केलं. या सगळ्या दरम्यान मला फोटोशॉपमध्ये लुडबूड करायचा नादच लागला. त्यातूनच ‘चंगळवादाचे थैमान’,‘बोर्डरूम’ (नवी आवृत्ती), ‘नॅनोदय’ आणि ‘मुसाफिर’ यांची मुखपृष्ठही तयार करता आली.
सकाळमधली ‘मनात’ची मालिका संपली आणि पुस्तकाच्या तयारीसाठी नव्याने फोल्डर उघडल्या गेलं. ते सगळे दिवस मी मुक्काम पोस्ट अंधेरीच होते. त्या वेळी अच्युत यांनी नीट समजावून सांगितलं, “तू खूप वेंधळी आहेस. टोपण हरवल्यासारखी वागत असतेस. आता नीटपणे काम कर. थोडा जरी अपडेटेड डेटा गेला तर आपली वाट लागेल.” मी होकारार्थी मान हलवत होते. मग काय प्रत्येक वेळी काम केलेलं फोल्डर वेगळं बनत गेलं. मला स्वतःला लेआउट छान असावं हा ध्यास असल्यामुळे वेगवेगळ्या फोल्डर्सऐवजी मी सलग एकामागोमाग एक चाप्टर्स गुंफले.....मात्र यात एक अडचण होत असे. आम्ही यातले अनेक चाप्टर्सचा क्रम बदलला, की सगळा क्रम खालीवर करावा लागत असे. कधी मेंदू शेवटी तर कधी सुरूवातीला काही चाप्टर्स वाढत्या शब्दसंख्येमुळे नाइलाजाने कमीही केले....मग त्यातल्या आकृत्या, त्यांना मराठीतून नावं देणं, त्या क्लिअर करणं (पिक्सेल वाढवणं), त्याच्या खाली योग्य ती कॅप्शन्स देणं हे कामही वेगानं झालं.....आर्टिकल तयार झालंय असं वाटत असतानाच त्यात नव्यानं काहीतरी माहिती अॅड करावी वाटे...मग पुन्हा पळापळ...!
अंधेरीत असताना आमचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होई. सकाळी फिरायला जाताना आमच्या ‘मनात’ल्या क्रमाविषयी, चाप्टरविषयी चर्चा होत. त्या काळातला महत्त्वाचा एकच विषय होता आणि तो म्हणजे ‘मनात’! फिरून येताच मी कम्प्युटरचा ताबा घेई. नाश्ता असो, वा आंघोळ - शोभाताईने तीन-तीन वेळा हाका मारल्यावर मग तेवढा वेळ आम्ही कसेबसे कम्प्युटरसमोरून हटत असू. रात्री 11 वाजो वा 12, शेवटी शोभाताई वैतागून म्हणत, “ दीपा, बस करा आता. अगं मानेचं - पाठीचं दुखणं मागे लागेलं अशानं.... ” शोभाताईंना त्यांच्या कुठल्याही कामात आमची काडीचीही मदत होत नसे. आमचा पसारा आणि एकच एक काम बघूनही त्या कधी चिडत नसत. उलट काळजीनंच वेळेवर झोपण्याच्या, वेळेवर जेवणाच्या सूचना करत.
‘मनात’चं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. फक्त प्रास्ताविक आणि समारोप राहिलं होतं. अच्युत गोडबोले यांच्या सगळ्याच पुस्तकांची प्रास्ताविकं आणि समारोप हे वाचनीय असतात असं वाचक सांगत असतात. मला स्वतःला किमयागारचं ‘प्रास्ताविक’ आणि ‘नाही रे उजाडत’ खूप आवडतं. पण ‘मनात’चं प्रास्ताविक आणि समारोप खूप उत्कृष्ट झाले पाहिजेत अशी माझी तीव्र इच्छा होती आणि त्याच वेळी ‘नादवेध’ आणि ‘माझी शोधयात्रा’ हे कार्यक्रम मिरज आणि सांगलीला होते. सुलभाताई, पुष्पाताई, अच्युत आणि मी असे आम्ही पुण्याहून मिरजेला निघालो. नेहमीप्रमाणे लॅपटॉप कुठेही माझ्या सोबत असतोच. जाताना गाडीतच मी लॅपटॉप ओपन केला आणि अच्युतनं बोलायला सुरुवात केली. वेळ मिळेल तेव्हा आम्ही काम करत होतो.
सायंकाळी नादवेधचा कार्यक्रम - लोकांची तुडुंब गर्दी... मी मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी लॅपटॉप उघडून अच्युतनं सांगितलेल्या अनेक मुद्दयांवर काम सुरु केलं होतं. ‘नादवेध’ची गाणी ऐकत ऐकत मी माझं कामही एकीकडे करत होते आणि अचानक काहीतरी गडबड ऐकू आली. इतका छान कार्यक्रम चालू असताना काय झालं म्हणून मी मान उंचावून बघितलं, तर काय लोक उभे, अस्वस्थ, पळायच्या बेतात....त्याच वेळी कळालं की प्रेक्षकांमध्ये साप निघालाय....त्या वेळी अच्युतनं कार्यक्रम थांबवून लोकांना ‘आहात तिथेच शांत उभं राहावं’ असं सांगितलं, लोकांनी ते ऐकलंही. त्यामुळे कुठेही धावाधाव, चेंगराचेंगरी झाली नाही. कार्यक्रम ऐकायला आलेला एक सर्पमित्र प्रेक्षकांमध्येच होता. त्यानं लगेच सापाला पकडलं आणि काहीच क्षणात कार्यक्रम पुन्हा त्याच रंगतदार पद्धतीनं पुढे सुरू झाला. कार्यक्रम संपताच आम्ही रात्री 9 वाजता परत पुण्याच्या प्रवासास लागलो.
गाडीमध्ये चर्चा करत पुनश्च काम सुरू झालं. पुण्यात आम्हाला पोचायला रात्रीचे अडीच वाजले होते. नेहमीप्रमाणे 5 वाजता उठून मॉर्निंगवॉक झाला आणि त्याचबरोबर ‘मनात’चं प्रास्ताविक आणि समारोपही पूर्ण! मनातचं प्रास्ताविक आणि समारोप हे अत्यंत वाचनीय असं झालं आहे. एका प्रवासात जाताना आणि येतानाचा जो वेळ होता तोही अच्युत अशा पद्धतीने उपयोगात आणतात ही देखील त्यांची पुन्हा एक वेगळी खासियत! अच्युतसारखा शिक्षक असल्यावर त्या शिकण्यातलं कुतूहल वाढतं. करत असलेलं काम हे काम म्हणून न उरता ते जीवनशैलीचा एक भाग बनून जातं ही किमया केवळ अच्युतच करू जाणे. आपण करत असलेलं काम किती आनंददायी आहे याची प्रचिती काम करताना येते.
आम्ही 17 डिसेंबर 2011 ला ‘मनात’ पूर्ण करून मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आणि आशीश पाटकर यांच्या हाती दिलं. मी त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पुस्तक पूर्ण होईपर्यंत मदत करायचं असंही आमचं ठरलं होतंच. मनोविकासचे अरविंद पाटकर हे मार्क्सवादी विचारांचे कार्यकर्ते. काम करताना त्यांच्यासोबत आणि आशीशसोबत विविध विषयांवर गप्पा होत. मी चहा, कॉफी घेत नसल्यामुळे मग भजी येत...पेज मेकरमध्ये ‘मनात’चं काम करताना मी पेज मेकरमधली कितीतरी तंत्रं मनोविकासचे सहकारी गणेश दिक्षित यांच्याकडून शिकले. हे सगळं करून कधी कधी रात्रीचे 9 वाजत. वेळ कुठे गेला कळत नसे...घरी आल्याबरोबर अच्युतना मी दिवसभराच्या कामाचं रिपोर्टिंग करी. कधी कधी त्यांच्याकडून काही बारीकशा पण महत्त्वाच्या सूचना येत. मग दुसर्या दिवशी आधी त्या सूचना लक्षात घेऊन पुढच्या कामाला सुरुवात होई.
आणि असं करत करत एक दिवस पुस्तक हातात पडलं. तो क्षण खूप आनंदाचा होता....म्हणजे त्या पुस्तकाच्या कल्पनेचा जन्म होण्याच्या क्षणापासून ते त्याचा प्रत्यक्षात आगमन होणं या सगळ्यांत मी किती महत्त्वाची साक्षीदार होते.... ‘मनात’ हे पुस्तक मला अर्पण केलं. माझ्यासाठी ही खूपच आनंदाची आणि सन्मानाची घटना होती. कारण त्या घरातली एक सदस्य मी केव्हाच झाले होते. तो पूर्ण दोन अडीच वर्षांचा काळ मी ‘मनात’मध्ये पूर्णपणे बुडाले होते. या सगळ्या प्रक्रियेचा आनंदही तितकाच शिगोशिग मला मिळाला होता.
‘मनात’नं प्रकाशित होताच त्यानं विक्रीचे उच्चांक गाठायला सुरुवात केली होती. नुकताच आलेला एक अनुभव. आम्ही ‘मनात’ घेऊन डॉ. समीर कुलकर्णींकडे जाताना रस्त्यात एक सदगृहस्थाने थांबून आश्चर्याने अच्युत कडे पाहत म्हटलं, “तुम्ही अच्युत गोडबोले तर नाही ना....” अच्युत नम्रपणे ‘हो’ म्हणताच त्याच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलत गेले. त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, “अहो, मी तुमच्या सगळ्या प्रुस्तकांची पारायणं केली आहेत. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्यासमोर आहात.” तो सद्गगृहस्थ पुढे म्हणाला, “माझी बायको आणि सानिया (लेखिका) खूप जिवलग मैत्रिणी होत्या. माझी बायको काही दिवसांपूर्वी कॅन्सरने वारली. तिला तुमचं ‘नादवेध’ खूप आवडायचं. ती गेली आणि मी कविता करू लागलो. सर, तुम्हाला वेळ आहे, तिच्यावर केलेली एक कविता ऐकवू?” अच्युत यांच्या जागी इतर कोणीही असता तर “पुन्हा केव्हातरी” म्हणून त्याला कटवला असता...पण तसं न करता अच्युत समोरच्याच्या सुखदुःखाशी समरस होतात. ते त्याला म्हणाले, “ऐकवा ना....”. तो कविता ऐकवत राहिला, एकामागून एक....समोरच्या वर्दळीच्या रस्त्याचं भानही त्याला नव्हतं. तो त्याच्या बायकोच्या आठवणीत रमून गेला होता...आणि त्याच्यासोबत अच्युतही....
मी या आणि अशा अनेक उत्कट प्रसंगाचीही साक्षीदार असते. किती कमी वेळात हा माणूस लोकांना बांधून घेतो! या सगळ्यांमध्ये तितकाच समरस होतो. यात अनेक कॉलेजचे युवा असतात, वृद्ध असतात, कष्टकरी असतात आणि बुद्धिजिवीही असतात.
‘मनात’ पूर्ण होताच अधून मधून ‘मनोविकास’मधून गणेश, आशीश यांचा फोन येई. ‘मनात’ नंतर आता आपण लवकरच पुढचं पुस्तक कधी हातात घेणार अशी ‘मनोविकास’ टीमकडून विचारणा होई. याच दिवसात ‘माझी शोधयात्रा’ म्हणून व्याख्यानातून सुरू झालेलं अच्युतचं आत्मचरित्र आकाराला येत चाललं होतं. त्याही कामात पुन्हा अंधेरीतलं इंदुकपामधलं माझं वास्तव्य वाढलं आणि मग पुन्हा पुस्तकाचा क्रम, चाप्टर्सची योग्य शीर्षकं रचणं, पुन्हा नव्याने एडिटिंग, प्रुफं तपासणं असं काम जोरात सुरु झालं. इतर पुस्तकांच्या नावांप्रमाणेच एका शब्दाचंच सोपं, सुटसुटीत असं नाव याही पुस्तकाला असावं असं अच्युतला वाटू लागलं. ‘चंगळवादाचे थैमान’, ‘नॅनोदय’ आणि ‘मनात’ नंतर आता याही पुस्तकाचं नाव “तूच सुचवू शकतेस” असं म्हणताच माझ्या अंगात मूठभर मांस चढलं. अच्युत यांचं आयुष्य मुसाफिराप्रमाणंच तर आहे असं वाटून गेलं. तो नायक ज्या वाटेवरनं चालतो, त्या वाटेवरची माणसं त्याची होतात. तो त्यांना जीव लावतो. आनंद देतो आणि त्यातूनच स्वतःही आनंद घेत पुढचा प्रवास करतो. या प्रवासात तो त्या प्रवासातल्या प्रत्येक ठिकाणी रमतो तरीही अलिप्त असतो. तो सगळ्यांमध्ये असतो पण तरीही कुठेच नसतो. असा हा असामान्य प्रवासी! आनंदी, उत्साही, जगण्याची पॉझिटिव्ह ऊर्जा भरभरून पसरवत फिरणारा...! परिचय चित्रपटातलं गुलझार यांनी लिहिलेलं ‘मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना....” हे गाणं माझ्या ओठावर आलं. मी ते गुणगुणू लागले. मी ‘मुसाफिर’ हा शब्द जोरात उच्चारताच अच्युत यांनी ‘डन’ असा आनंदाने ताबडतोब ग्रीन सिग्नल दिला.
लगेचंच मनोविकाससोबत ‘मनात’ नंतर पुन्हा ‘मुसाफिर’वर काम करता आलं. पूर्वीप्रमाणंच आता आख्खी टीम उत्साहात आली होती. कुठल्या चाप्टरला कुठला फोटो असावा? कव्हर कसं असावं? ले आउट कसं असावं? शीर्षकाचा फॉन्ट कसा असावा? पासून आम्ही पुन्हा नव्या उत्साहात कामाला भिडलो होतो. ‘मनात’प्रमाणेच ‘मुसाफिर’च्या निर्मिती प्रक्रियेची साक्षीदार होताना पुस्तक निर्मितीच्या प्रवासातली अनेक तंत्रं शिकले.
‘मुसाफिर’ प्रिंटिंगला गेलं. ‘पुस्तक हातात पडताच, कितीही वाजो आणि कोणतीही वेळ असो, मी तुम्हाला सर्वप्रथम कळवेन’ असा शब्द आशीशने मला दिला होता. त्याप्रमाणेच ते तयार होताच रात्री जेवणाच्या सुमारास आशीशचा फोन आला, “येताय? मुसाफिरसोबत मी आणि बाबा आपली वाट पाहतोय.” आम्ही जेवायची ताटं घेतलेली होती. पण मी जेवण करूच शकले नाही. अच्युत आणि मी मनोविकासच्या ऑफिसला पोचलो. पोचेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते. गाडीला विमानाचा वेग यावा असंही वाटत होतं. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीचा आनंद वेगळाच आणि नवाच असतो हे कळत होतं. ‘मुसाफिर’च्या दोन वेगवेगळ्या प्रती आम्हा दोघांच्या हातात पाटकर पितापुत्रांनी खूप आनंदानं दिल्या. त्यांना आणि आम्हाला खूप छान वाटत होतं. हा आनंद खूप वाटावा असं वाटत होतं आणि घरी पोचताच अच्युतच्या अगदी जवळच्या मित्राचा - सुधीर महाबळचा मस्कतहून फोन आला आणि मी दोन-चार उड्या मारत ‘मुसाफिर’चा आनंद त्याच्यासोबत शेअर केला!
‘मनात’नं अच्युतच्या सगळ्या पुस्तकांचे विक्रम मोडीत काढले होते. ‘मनात’ला सोनोपंत दांडेकर हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता. पण ‘मुसाफिर’नं तर सगळ्यांवर कडीच केली होती. अवघ्या दोन महिन्यात सुमारे 16 हजार प्रतींची विक्री करत ‘मुसाफिरा’नं आपली वेगानं घोडदौड चालू केली होती. त्या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अच्युतच्या लेखनप्रवासाचे कार्यक्रम झाले, होताहेत. अच्युतची लोकप्रियता अजूनच वाढली. विदर्भात तर 2-4 हजाराची गर्दी अच्युत भोवती जमा होऊ लागली. कुठल्याही शहरात कुठल्याही स्तरातले आणि वयोगटातले लोक ‘मुसाफिर’विषयी भरभरून आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले. आज ‘मनात’नं 17 महिन्यात 19 आवृत्त्या, तर ‘मुसाफिर’नं 9 महिन्यांत 25 आवृत्त्यांचा विक्रम केलाय.
नुकतंच डेक्कनवरून अच्युतसोबत जाताना एक वॉटर प्रुफिंगचं काम करणारा तरुण मुलगा घुटमळत समोर आला. त्याचं नाव सचिन. तो म्हणाला, “तुम्ही अच्युत गोडबोलेसर ना? माझा विश्वासच बसत नाहीये की मी तुम्हाला पाहतोय. गेल्या तीन दिवसांत मी ‘मुसाफिर’ वाचून संपवलं आणि मनात आलं की या लेखकाला मी कधी भेटू शकेन का? आणि बघा ना, तुम्ही माझ्या समोर चक्क उभे आहात.” तो पुढे म्हणाला, “सर, मला वाचनाची अजिबात आवड नाही. दहावीत गेल्यावर आम्हाला कळालं की आमच्या शाळेलाही मोठी लायब्ररी आहे. जिच्यासमोर आम्ही रोज खेळायचो. लायब्ररी नुसती मोठी असून काही होत नाही. ती पुस्तकं हातात पडावी लागतात, कोणीतरी सांगावं लागतं, हे वाच. बघ, किती छान आहे. सर, माझ्या मित्राकडे चाळता चाळता तुमच्या या ‘मुसाफिर’नं माझा ताबाच घेतला. मी ते पूर्ण केल्याशिवाय दुसरं काहीही करू शकलो नाही. रोजच्या कामातले, अपयशाचे, अडचणींचे अनेक प्रसंग रोजच दिवसाची सुरुवात होताना समोर भेडसावत उभे असतात. तुमचं पुस्तक वाचल्यावर ते खूप क्षुल्लक आहेत आणि आपण त्यातूनही मार्ग काढून पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सर, ‘मुसाफिर’नं दिला. आता मी तुमची सगळीच पुस्तक वाचणार आहे. एवढंच नाही तर तुम्ही पुस्तकात दिलेली पुस्तकांची यादीही मी लिहून घेतली आहे. सर, शाळेकडून राहिलेलं वाचनवेड ‘मुसाफिर’नं मला लावलंय. सर, मी तुमचा खूप आभारी आहे.” सचिन खूप भाऊक होऊन बोलत होता. आम्हाला काय बोलावं खरंच सुचेनासं झालं. असे एक ना अनेक अनुभव रोजच येतात.
अच्युतच्या सगळ्याच पुस्तकांनी आणि कामानं, त्यांच्याबरोबरच्या समृद्ध संवादानं भरभरून आनंद दिला आहे. काम माणसाला कार्यमग्नता तर देतंच पण जगण्याला आनंददायीही बनवतं. खुजे विचार जवळपासही फिरकत नाहीत. ‘मनात’ नंतरच्या ‘मुसाफिरा’सोबतचा हा प्रवास असा अखंडपणे चालूच राहणार आहे. प्रकाश, पंचमहाभूतं, तत्त्वज्ञान, साहित्य, शेती, शिक्षण आणि आरोग्य असे अनेक विषय प्रतीक्षेत उभे असतात. त्यांचं भविष्यातलं नियोजनही अच्युत बोलून दाखवत असतात. कधी पर्यावरण, तर कधी आर्थिक अरिष्ट, कधी तंत्रज्ञान तर कधी टेलेकम्युनिकेशनमधून! अच्युत मधला शिक्षक जो आजपर्यंत बोट धरून चालत होता त्याने आता माझं बोट सोडून चालायला शिका हा मंत्र देत पुढचं आणखी मोठ्या व्याप्तीचं शिक्षण सुरू केलं आहे. अच्युत सोबत नव्या प्रोजेक्टवरचं काम आता नव्या अनुभवाची दारं उघडून स्वागताला उभं आहे. या पुढच्या प्रवासातही माझा हा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड प्रसन्नपणे तितक्याच उत्साहाने माझ्या सोबत आहेच!
दीपा देशमुख
adipaa@gmail.com
Add new comment