शीख धर्माची/ गुरु नानकजींची शिकवण- काळाची गरज
ब-याच दिवसांनी दोघं जीवलग मित्र भेटले. काही वेळातच त्यातल्या एका मित्रानं दुस-याच्या डोळ्यात धूळ टाकून त्याची पैशाची बॅग पळवली. पोलीस तपासानंतर हा दुसरा चोर मित्र सापडला. तो आपल्या मित्राच्या पैशांवर जिवाची मुंबई साजरी करीत होता. हे पैसे उडवताना त्यानं जराही विचार केला नाही की आपल्या मित्रानं हे पैसे कशासाठी, कशा परिस्थितीत जमवले असतील ? वर्तमानपत्रातील ही बातमी वाचून मला धक्का वगैरे काही बसला नाही कारण अशा प्रकारच्या शेकडो बातम्या आपण रोजच तर वाचतो.
त्याच दिवशी माझा एक मित्र घरी आला. त्यानं नव्यानं लिहिलेल्या नाटकावर तो बोलत होता. एक मदारी आपल्या दोन माकडांना घेऊन खेळ करत असतो. मदारी सांगेल त्याप्रमाणे ही माकडाची जोडी आपआपल्या भूमिका पार पाडण्यात गर्क असतात. ही माकडं लग्न करतात. त्यांचा संसार सुरु होतो. एकमेकांशी प्रेमान वागताना दूध घेण्यापासून ते स्वयंपाकात एकमेकांना प्रेमानं मदत करताना त्यांना बघणं म्हणजे एक अनोखा अनुभव होता. नव्याचे नऊ दिवस संपताच त्यांची आपसात भांडणं सुरु होतात. आणि मदारी एक दिवस त्या नरमाकडाला सांगतो, “हा घे पाच लीटरचा रॉकेलचा डबा, आणि टाक रॉकेल तुझ्या बायकोच्या अंगावर, संपवूनच टाक कशी”. प्रेक्षकही आता उत्कंठतेने बघू लागतात मदारी रॉकेलचा डबा नरमाकडाच्या हाती देतो. नरमाकडानं आत्तापर्यंत मदा-यानं सांगितल्याप्रमाणे खेळ केलेला असतो पण यावेळी तो हा रॉकेलचा डबा उचलण्यास नकार देतो. आणि मदारी व प्रेक्षकांना तो फैलावर घेतो. तो म्हणतो, “हे रॉकेल टाकून मी माझ्या बायकोला जाळू ? कसं शक्य आहे ? अशी कृत्य फक्त तुम्ही माणसंच करु शकता”.
नाटक इथेच संपतं. विषय मनात तसाच रेंगाळत राहिला आणि मी गुरुद्वा-यात प्रवेश केला. मला शीख धर्माबद्दल, गुरु नानकांबद्दल तपशीलानं माहिती हवी होती. तिथं माझी जराही ओळख नसताना माझं स्वागतच झालं. मी माझं येण्याचं प्रयोजन सांगताच त्यांनी अनेक ग्रंथ अतिशय श्रध्दापूर्वक माझ्यासमोर ठेवले. आता त्यातले कुठले घेऊ आणि कुठले नको असं मला होउन गेलं. माझी ही अवस्था बघून त्यांनी मला हवे तेवढे ग्रंथ घेऊन जाण्यास परवानगी दिली. मी निवडलेले ग्रंथ त्यांनी पुनश्च मखमली आवरणात गुंडाळून माझ्या स्वाधीन केले. या ग्रंथाचे पैसे किती द्यायचे हा प्रश्न मी करताच त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं, “तुम्ही हे ग्रंथ घेऊन जा. तुमचं काम होताच परत आणून द्या. आम्ही कोणतंही मूल्य आकारणार नाही”.
आज पदोपदी व्यवहाराची जाणीव करुन देणा-या जगात हे असं घडू शकतं ? इतका विश्वास ते माझ्यावर ओळख नसताना कसा टाकू शकतात ? मला आश्चर्यच वाटत होतं. तिथूनच मला एका अनाथालयात जायचं होतं. मी तिथं जाताच पुन्हा एका प्रसन्न चेह-यानं माझं स्वागत केलं. त्या अनाथालयाच्या संचालिका होत्या त्या म्हणाल्या. “मी आणि माझी 60 मुलं आम्ही इथंच रहातो”. सगळा परिसर त्या मला दाखवत होत्या. एक स्वच्छ परिसर, चिमुकल्यांची काळजी आणि देखभाल करत असलेल्या आया, मैदानावर खेळणारी ती विविध वयोगटातली मुलं, त्यांची एकीकडे जेवणाचीही तयारी चाललेली होती. ती रंगीबिरंगी टेबलखुर्च्याची व्यवस्था...हे चित्र बघून मला आता खरोखरंच धक्का बसला. कारण अनाथाश्रम म्हटलं की ते उदास, भकास वातावरण. दया आणि सहानुभूती भरलेला परिसर, कधी कधी तर तिथल्या भोंगळ कारभाराबद्दल, व्यवस्थेच्या अनास्थेबद्दल आपण वाचतोही. पण इथं तर चित्रच वेगळं होतं. हे तर मायेची उब देणारं एक आश्वासक घरच होतं. मला नवल वाटू लागलं. मी संचालिकेला या अनाथालयाचे ट्रस्टी कोण आहेत अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी भिंतीवरील फोटोकडे निर्देश करीत माहिती सांगायला सुरुवात केली. फोटोतून एक उमद्या व्यक्तीमत्वाचा शीख बांधव मला जणूकाही हॅलो करीत स्वागत करीत होता. भारावलेल्या मनानं मी घरी परतले. शीख धर्माची ओळख मला या कार्यातून झाली होतीच.
माझ्या डोळ्यापुढं एकीकडं वर्तमानपत्रातली मित्रानं मित्राला फसवण्याची बातमी होती. आणि दुसरीकडे माकडाचं नाटक- ज्यात माणसांपेक्षा प्राणीच बरे ...आणि तिसरीकडे गुरुद्वा-यातला आपुलकीचा अनुभव तर चवथीकडे या अनाथालयातल्या ट्रस्टी असलेल्या शीख बांधवाचं मानवतेचं नातं जपणार कार्य... आज भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आम्ही आमचं माणूसपण विसरत चाललो आहोत. क्षणिक सुखाच्या मोहातून आम्ही पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकतानाही कचरत नाही आहोत. अशावेळी या बांधवाचं कार्य पुन्हा पुन्हा डोळयापुढं येत होतं. शासनाच्या ताब्यात ते अनाथालय असतानाही मी तिथं भेट दिली होती त्यावेळी तिथली अस्वच्छता, अन्नाची नित्कृष्ट प्रत, मुलांच्या डोक्यात झालेले फोड आणि जखमा...हे आधीचं चित्र आणि आताचं यात जमीनअस्मानाचा फरक होता. या कार्याची प्रेरणा या ट्रस्टीला मिळाली होती गुरु नानकजींकडून.
खरं तर गुरु नानकजींची विचारधारा मला आता अभ्यासापूर्वीच समजू लागली होती. इतर धर्म परंपरावादी विचारांना प्राधान्य देणारे आहेत पण शीख धर्माची विचारधारा वेगळी आहे. नव्या युगासोबत चालणारा हा धर्म आहे. यात वर्तमान समस्यांचं निदानही आहे.
गुरु नानक काय सांगतात ? नानकजींचा धर्म अगदी सरळ साधा आहे. पोकळ अध्यात्मवाद, रीतीरिवाज, जात-पात यांना वगळून जे जीवन जगता तोच तुमचा धर्म. जो तुम्हाला कर्तृत्व शिकवतो, पळपुटेपणा नाही. विश्वप्रसिध्द इतिहासकार आरनल टाईनबी यांच्या मते तर गुरु नानकजींचा धर्म हा वर्तमानाचा धर्म नव्हे तर भविष्याचा धर्म आहे. कितीतरी धर्मांनी मनुष्याला पाप-पुण्याच्या संकल्पनेतून अंधश्रध्देकडे वळवलंय पण नानकजी कर्मकांड, आणि अंधविश्वास यातून मनुष्याला बाहेर काढतात. ते जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेद मानतच नाहीत. लंगर काय आहे ? सगळे भेद मिटवल्याचं प्रतीकच ना !
सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर धर्मांनी स्त्रीला अपमानित केलंय. जी जगाची निर्माती तिचं आस्त्त्विचं आम्ही सतत नाकारलं. अनेक चालीरीतींतून तिच्यावर जाचक बंधन घातली. त्या स्त्रीला नानकांचा शीख धर्म बरोबरीचा हक्क देतो. गुरुद्वा-यात जाण्याचं स्वातंत्र्यच नव्हे तर प्रत्येक प्रकारच्या धार्मिक कृत्यात बरोबरीनं पालन करण्याचे हक्कही तिला आहेत. ती पौरोहित्यही करु शकते.
अध्यात्मिक ज्ञानानंही काही गोष्टींची उत्तरं जिथं मिळत नाहीत, तिथं गुरु नानकजी माणसाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. अवतारवादाच्या सिध्दांताचा ते तीव्र विरोध करतात. जन्म-मृत्यूचं कोडं, आत्मा-परमात्मा, मन म्हणजे काय...मनासंबंधी तर ते अतिशय सुंदर विवेचन करतात. ते म्हणतात, “मन जसा विचार करतं, जसं काम करतं, त्याच प्रकारे तो माणूस ओळखला जातो. दान करणारा जसा दाता तसा मागणारा भिकारीच”.
“मनु जोगी मनु भोगिआ, मनु मूरख गावारु
मनु दाता मनु मंगता, मनु सिरि गुरु करतारु”
ज्या मृत्यूची आपल्याला भीती वाटते, भय वाटतं. आपली प्रिय माणसं- त्यांना सोडून जायचं ही कल्पनाही आपल्याला अस्वस्थ, असहाय करुन सोडते त्या मृत्यूची गुरु नानकजी भीतीच नाहिशी करुन टाकतात. ते म्हणतात, “मृत्यू म्हणजे फक्त एक परिवर्तन !”
“जनम मरन के मिटे अंदेसे, साधू के पूरन उपदसे
भउ चूका निरभज होइ वसे सगल बिआधि मन ते खै नसे”
नानकजींनी मनुष्याला कुठल्याही काल्पनिक कथांचे दाखले दिले नाहीत. ना भीती दाखवली. प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटनेचं सोप्या रीतीनं निरसन केलं. ब-याच गोष्टींना मनुष्याचा अहंम कारणीभूत असतो. हा अहंकार कधी जीवनाची प्रेरणा बनतो तर कधी आजार. यामुळं प्रत्येकानं आपलं जीवन संतुलित बनवलं पाहिजे. इंद्रियांच्या आधीन न होता त्याचा उपयोग चांगल्या सत्कार्यासाठी केला पाहिजे. मनुष्य जन्मात महत्वाचं काय असेल तर ते त्याचं कर्म. आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात त्याचा दोष कुणालाही देऊ नये.
“करमा उपरि निबडै जे लोचै सभु कोई
ददै दोसु न देऊ किसै दोसु करंमां आपणिआ
जो मै कीआ सो मै पइआ दोसू न दीजै अवर जना
दोसु न दीजै काहू लोग, जो कमावनु सोई भोग
आपन करम आपे ही बंध आवनु जावनु माइआ धंध”
नानकजी म्हणतात, “प्रत्येकानं परिश्रमातून आपली उपजिविका केली पाहिजे. अंगी नम्रता बाळगणं, सगळ्यांना बरोबर घेऊन मार्गक्रमण करणं, जीवन म्हणजे काय, जीवन हा एक अनुभव आहे, वास्तव आहे, जीवन यशस्वीपणे, समाधानानं जगणं म्हणजेच परमेश्वराच्या आस्त्वित्वाची अनुभूती. सत्य हेच ईश्वररुप होय”.
“मी” हे सर्व अहंकाराचं गर्भित रुप आहे. “मी”चा विसर पडला तरच दुस-या व्यक्तीच्या आस्त्वित्वाची जाणीव होईल. अहंकार त्यागण्यासाठी दीन दुबळ्यांची सेवा करणं, त्यामुळे दुस-याचं दुःख तर हलकं होतंच पण सुखाचं मापही आपल्या पदरात पडतं. खरंच किती किती लिहावं ? ते म्हणतात,
जीवनमे संघर्ष है माना, बनकर कायर डरना कैसा ?
दो पग चलकरही थक जान नैनन गागर भरना कैसा ?
मन की सुप्ता शक्ती जगाओ स्वामी नही, मन दास हमारा ?
अपने दृढ निश्चय दुहराओ, चमकेगा फिर भाग्य सितारा !
गुरु नानकांना जपुजीसाहेब म्हणतात. या जपुजींनी जगण्याचा मार्ग किती सोपा, सुकर आणि सुलभ केलाय. यात ना कुठं कर्मकांड, ना चमत्काराच्या सुरस कथा, ना कुठलं अवडंबर. जे आहे ते स्वच्छ, सत्य, आणि वास्तव. गुरु नानकांचा प्रत्येक शब्द हा एक अनमोल संदेश आहे. शिकवण आहे. काल, आज आणि उद्यासाठीही.
दीपा देशमुख, adipaa@gmail.com
Add new comment