मन मे है विश्‍वास.......थिंक पॉझिटिव्‍ह दिवाळी 2017

मन मे है विश्‍वास.......थिंक पॉझिटिव्‍ह दिवाळी 2017

शाळेत असताना ‘मन मे है विश्‍वास’ हे गाणं अनेकदा जोषात म्हटलेलं होतं, त्यानंतर पुढे मोठं झाल्यावर सामाजिक कार्यात असताना कार्यकर्त्यांबरोबरही हे गाणं अनेकदा गायलेलं होतं! मूळ गाणं ‘वुई शाल ओव्हरकम....’ हे नागरी हक्क चळवळीतलं महत्वाचं गाणं होतं. या गाण्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘हम होंगे कामयाब एक दिन, मन मे है विश्‍वास पुरा है विश्‍वास....’ प्रयत्न केले की यश मिळतंच हा विश्‍वास या गाण्यानं दिला. आज या गाण्याच्या आठवणीबरोबरच माझं मन 'विश्‍वास' या शब्दाच्या अवतीभोवती रेंगाळत राहिलं. 

प्रत्येक आईच्या कुशीतलं बाळ मला दिसायला लागलं. किती विश्‍वासानं त्या बाळानं तिच्या खांद्यावर डोकं टेकवलेलं असतं. हा विश्‍वास खरंच येतो कुठून? रवींन्द्रनाथ टागोर यांनी एका ठिकाणी लिहिलंय, ‘उजाडण्याआधीच्या झुंजूमुंजू वातावरणात चिमणीचा चिवचिवाट सुरू होतो. ही चिमणी आता सकाळ होणार आहे हेच सांगत असते आणि तिला कसं ठाऊक असतं की आता सकाळ नक्कीच होणार आहे? कुठला विश्‍वास असतो तिच्या मनात?’

आपल्या मनाच्या अंधारातून, अज्ञानातून आणि नैराश्यातून अविश्‍वासाचा जन्म होतो, तर ज्ञानाच्या प्रकाशानं विश्‍वासाचं स्थान जास्त जास्त बळकट होतं. आपली विश्‍वासाची स्थानं कुठली किंवा आपल्यावर विश्‍वास टाकावा असं आपण काय केलं किंवा आपल्यात आहे असे प्रश्‍न मला पडले आणि त्या प्रश्‍नांचा मागोवा घेत मी निघाले. 

आपली कृती ही त्या त्या गोष्टींबद्दलचा विश्‍वास सिद्ध करते असंही मला जाणवलं. मी त्या वेळी पाचवी-सहावीत असेन. सतत होणार्‍या वडलांच्या बदल्यांमुळे त्यांनी अखेर औरंगाबादला घर स्थिर ठेवायचा निर्णय घेतला. आम्हा मुलांची शिक्षणं चांगली व्हावीत असा त्यामागे उद्देश होता. मग आई आणि आम्ही पाच भावंडं औरंगाबादला तर वडील त्यांच्या बदलीच्या ठिकाणी असं सुरू झालं. वडील महिन्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी येत. पगार झाला की आईजवळ घरखर्चासाठी पैसे देऊन जात. तुटपुंज्या पैशांमध्ये पाच मुलांसह घरखर्च चालवताना ती वैतागून जात असे. हे पैसे कमी पडतात अशी तक्रार तिनं वडलांजवळ करताच, मग वडलांनी माझ्या मोठ्या भावावर तो त्या वेळी कायद्याचं शिक्षण घेत होता, त्याच्यावर घरखर्चाची जबाबदारी सोपवली. पाचशे रुपयांमध्ये महिन्याचा किराणा सामान, दूध आणि भाजी असं पार पाडायचं होतं. मोठ्या भावानं ती जबाबदारी आनंदानं अंगावर घेतली, पण दुसर्‍या महिन्यात आपण ती पेलू शकत नसल्याचं सांगितलं. वडलांनी आम्हा सगळ्यांना आता घरखर्च चालवण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न विचारल्यावर ‘मी ही जबाबदारी घेते’ असं मी त्यांना समोर येऊन सांगितलं. वडलांना माझं कौतुक वाटलं. मीही 'आपण खूप मोठ्या झालो आहोत' अशा अविर्भावात असलेले खर्च आणि जमा असलला पैसा यांचा ताळमेळ करण्यात गुंतून गेले. प्रत्येक खर्चाच्या गोष्टीसाठी वेगळी पाकिटं केली. रोज सायंकाळी पालेभाजी आणि सकाळी फळभाजी याप्रमाणे मी खरेदी करू लागले. महिन्याचं आवश्यक सामान आणण्यासाठी यादी करून त्यातल्या अनेक अनावश्यक वस्तूंवर काट मारू लागले. स्वतः जाऊन ते सामान खरेदी करून आणू लागले. सकाळी साडेपाच-सहाच्या उजाडू लागलेल्या वातावरणात दूधाच्या स्टॉलवर दूध आणायला जाऊ लागले. कधीतरी मोठा भाऊ त्याच्या खर्चासाठी माझ्याजवळच्या पैशांची मागणी करे. पण ती त्याला दाद देत नसे. अशा रीतीनं महिना संपला तेव्हा मी वडलांनी दिलेल्या ५०० रुपयांमधली २५ रुपये शिल्लक रक्कम वडलांजवळ सुपूर्त केली होती. आपली मुलगी जिद्दी आहे आणि प्रामाणिक आहे, हातात घेतलेली गोष्ट ती पूर्ण करू शकते हा विश्‍वास माझ्या कृतीनं त्यांच्या मनात निर्माण करण्यात मी यश मिळवलं होतं. 

आयुष्य पुढे पुढे सरकत असताना हा विश्‍वास कायम मला सोबत करत राहिला. या विश्‍वासानं माझ्या मनात सकारात्मक विचारांची बीजं रुजवली. त्यामुळे कधीही माझ्या मनात ‘हे होणार नाही’ ची भाषा येत नाही. आज मी स्वतंत्रपणे लिखाण करत असले, तरी मी सुमारे दहा-अकरा वर्षांपूर्वीपासून अच्युत गोडबोलेंच्या लिखाणात त्यांना मदत करायला लागले होते. मी आदिवासी भागात तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करतेय हे बघून त्यांना माझं कौतुक वाटायचं. मात्र तिथे असणार आठ तासांचं विजेचं लोडशेडिंग, मोबाईलचे टॉवर्स नसणं आणि लँडलाईनचा असलेला फोन पावसाबरोबर, जोरदार वार्‍याबरोबर कधीही संपर्क तुटून जायचा अशा परिस्थितीत मी काय करेन, या विचारानं त्यांनी मला माझ्या आवडीची हजारो गाणी अनेक सीडींमध्ये भरून माझ्या कम्प्युटरमध्ये टाकून दिली. त्या काळात त्या गाण्यांनी माझी सोबत केली. रात्री अनेकदा विंचू किंवा साप यांच्याशी सामना करण्याचा प्रसंग येत असे. साध्या झुरळाला आणि पालीला घाबरणारी मी, अशा वेळी विंचू आणि साप हे माझ्यासाठी महाभयंकर राक्षसापेक्षा कमी नसायचे. अशा वेळी इतक्या दूर अंतरावरून मला अच्युत गोडबोले धीर देत आणि काहीतरी बोलून माझी भीती पळवून लावत. त्यांच्या ‘मै हूँ ना’ या आधाराच्या शब्दांनी मला त्या वेळी दहा हत्तीचं बळ दिलं हेही तितकंच खरं. 

अच्युत गोडबोले ही व्यक्ती संगणक, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, मानसशास्त्र, संगीत, कला, साहित्य, तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती! मी त्यांच्यासमोर अगदीच नगण्य. त्यांना मी छोटीशी मदत करू शकते याचंच मला अप्रुप असायचं. मात्र काम करत असताना, मी माझी नोकरी सांभाळून त्यांना मदत करत होते. माझे परिश्रम, कामातलं परिपूर्णत्व, वेळ पाळणं याबाबत त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्‍वास होता. त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचं स्तंभलेखन सुरू असायचं. आम्ही केलेलं लिखाण आगामी पुस्तकांसाठी असल्यामुळे मूळ लेख सविस्तर आणि त्या त्या लेखाची शब्दसंख्या जास्त असायची. त्या वेळी ते लेख वर्तमानपत्रांच्या मर्यादित शब्दसंख्येत बसवण्यासाठी संक्षिप्त करणं आणि वर्तमानपत्रांच्या संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत लेखातलं व्याकरण तपासून, योग्य छायाचित्रांसह पोहोचवणं (मेल करणं) याबाबतीत ते काम माझ्यावर सोपवलेलं असल्यामुळे अच्युत गोडबोले निश्चिंत असायचे. आजही ‘दीपा करेल ते काम चांगलंच करेल’ हा त्यांचा माझ्यावरचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास माझ्या कामातूनच निर्माण करता आला असावा आणि अर्थातच त्यांनीही तो माझ्यावर टाकला म्हणूनच! ‘कारणं सांगण्यापेक्षा ती गोष्ट कशी चांगली करता येईल याचा विचार करून तशी पावलं उचलली पाहिजेत’ या त्यांच्या वाक्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. 

मासवणसारख्या आदिवासी भागात काम करत असताना विजया चौहान यांच्यामुळे मला नर्मदा बचाव आंदोलनात मेधाताईंबरोबर (मेधा पाटकर) सहभागी होता आलं. विजयाताईंनी मला अनेक कठीण प्रसंगांमध्ये ‘बी पॉझिटिव्ह’ चा संदेश सतत दिला. एखादं काम मनाविरूद्ध करावं लागणार असेल तर त्याच्याकडे सकारात्मक नजरेनं बघून ते मनापासून करायला शिका ही गोष्ट त्यांनी मनात ठसवली. विजयाताईंच्या प्रोत्साहनामुळेच मेधा पाटकर यांना आणि नर्मदेच्या प्रश्‍नांना जवळून अभ्यासता आलं आणि त्या सगळ्या दिवसांत मेधाताईंबरोबर राहता आलं. 

मी मेधाताईंबरोबर असताना त्या सायंकाळी नदीकिनारी असलेल्या गावांजवळच्या सगळ्या सभा संपवून मेधाताईंबरोबर नर्मदेतून बोटीतून प्रवास करताना लक्षात आलं की त्यांच्यावर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत किती विश्‍वास आहे. दिवसभर निषेध मोर्चात घोषणा देऊन जीवनशाळेची थकलेली जीवनशाळेची मुलं, अनेक गावांतले पिडीत गावकरी, देशभरातून आलेले कार्यकर्ते यांनी बोट भरली होती. अंधारून आल्यामुळे आता एकमेकांचे चेहरेही दिसेनासे झाले होते. अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका वाढला की आता त्या काळ्याकुट्ट अंधारात फक्त नर्मदेच्या झेपावत येणार्‍या लाटा आणि कडाडणार्‍या विजा यांचाच आवाज ऐकायला येत होता. नर्मदेच्या त्या अजा लाटा बोटीत आमच्या अंगावर आदळून आम्हाला जणू फटके मारत होत्या. बोटीत लाटेमुळे शिरणारं पाणी मुलं उपसत होती....नर्मदा एखाद्या समुद्रासारखी अजा भासत होती. तिचं रौद्र रूप बघून अंगाचा थरकाप उडाला होता. मी अपूर्वला (माझा मुलगा) न सांगताच बडवानीला (मध्यप्रदेशातलं एक गाव) आले होते. आज ही बोट बुडाली तर माझ्यासह कित्येकांना जिवंत जलसमाधी मिळणार होती. जगाशी संपर्क तुटलेला होताच. आख्खी रात्र लाटांचे तडाखे सोसत ग्लानी आलेल्या अवस्थेत काढले. डोळे उघडले तर पहाटवारा भिजलेल्या अंगाशी झोंबत ‘चल उठ’ म्हणताना आढळला. उजाडत आलं होतं. रात्रीची खवळलेली नर्मदा शांत झाली होती. रात्रीचं तिचं ते उग्र रूप आणि आताचं तिचं शांत रूप यातलं कुठलं  रूप खरं हेच आता कळेनासं झालं होतं. बोट हळूहळू किनार्‍याकडे वळली. आम्ही त्या डोंगरावरचा चढ चढत मुलांसाठी उभारलेल्या जीवनशाळेत पोहोचलो. तिथून नजर टाकली तर नर्मदा आणि आजूबाजूचा निसर्ग आम्हाला जणू काही सांगत होता, की ‘काल तुमची एक छोटीशी परीक्षा घेतली. तुम्ही त्यात पास झालात बरं!’  नर्मदेच्या मधोमध एक नारळाचं झाडंही डोलताना दिसत होतं. सगळा निसर्ग विश्‍वास देऊ पाहत होता. त्या विश्‍वासानं माझ्या मनातली भीती कोसो दूर पळाली. हा निसर्ग आपल्या साथीला असल्यावर भिण्याचं कारणच काय असं मन म्हणालं. 

नंतर पुण्यात आले आणि त्या वेळी स्वाईन फ्ल्यूच्या साथीनं पुण्यावर आक्रमण केलं होतं. बसस्टँड, रस्ता, दुकानं सगळीकडे तोंडाला मास लावलेले लोक नजरेला पडत असत. सगळेच लोक प्रचंड घाबरलेले होते.  त्या वेळी मी शिवाजी नगरला राहत होते. माझं ऑफीस मॉडेल कॉलनीत असल्यानं पायीच जा-ये करत होते. एके दिवशी अपूर्वच्या अंगात ताप असल्याचं लक्षात आलं. डॉक्टरकडे जाण्यासाठी नेहमीच टाळमटाळ करणारी मी त्याला क्रोसीन देऊन ऑफीसला निघून गेले. हेच मी सतत तीन दिवस केलं. घरी मी सातनंतर पोहोचायची, तेव्हा अपूर्व तेवढ्याच तापात अंथरूणात पडून असलेला दिसायचा. ही गोष्ट मी माझ्या ऑफीसमधल्या वसंत टाकळकरसरांजवळ बोलताच ते म्हणाले, अहो, 'दीपा मॅडम, असं दुर्लक्ष करू नका.' त्यांनी लगेच गाडी काढली आणि अपूर्वला घेऊन आम्ही फर्ग्युसन रोडवरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे त्याची ब्लडटेस्ट करण्यात आली. त्या टेस्टमध्ये अपूर्वला डेंग्यू किंवा स्वाईनफ्ल्यू असण्याची शक्यता बोलून दाखवण्यात आली. त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. या सगळ्या काळात टाकळकर सर माझ्याबरोबर होते. जणू काही ती त्यांचीच जबाबदारी होती. ससूनमधून नंतर अपूर्वला दीनानाथ हॉस्पिटलमध्ये हलवलं. 

ससून ते दीनानाथ असा अपूर्वचा डेंग्यूवरच्या उपचारांचा एकूण कालावधी १५ दिवसांचा होता. माझा दिनक्रम काय सुरू आहे हे मलाच कळत नव्हतं. बेडवर ग्लानीत असलेला मलूल झालेला अपूर्व, भेटायला येणारी निर्माणची माझी मुलं इतकंच काय ते आठवत होतं. त्या अवस्थेत माझा मित्र यमाजी मालकर, त्याची सगळी व्यवधानं बाजूला सारून रोज हॉस्पिटलमध्ये येत होता, मी जेवलेय की नाही हे बघत होता, अनेकदा त्यानं घरून आठवणीनं डबा आणला. अपूर्वची औषधं आहेत की संपलीत हे बघून ती आणायला जाणं हेही तो करत राहिला. अपूर्व त्या जीवघेण्या दुखण्यातून उठला. ज्या वेळी हॉस्पिटलमधून अपूर्वला घरी जाण्याची परवानगी मिळाली, तेव्हा यमाजी आणि टाकळकरसर दोघंही गाडी घेऊन आले होते. या सगळ्या प्रसंगानं मला काय दिलं, असा जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला टाकळकर सर आणि यमाजी यांनी न बोलता केलेली निरपेक्ष अशी अनमोल साथ आठवते. त्यांच्या त्या कृतीनं मला जन्मभराचा त्यांच्या मैत्रीचा विश्‍वास मिळाला. त्यांच्या रुपात खरेखुरे मित्र, स्नेही मिळाले. आज टाकळकर सर नाहीत, पण त्यांची उणीव प्रत्येक आनंदाच्या, दुःखाच्या प्रसंगी जाणवते. खरं तर ते माझे कोणीच नव्हते. पण माणुसकीच्या नात्यानं मी त्यांच्याशी बांधली गेले होते. 

पुण्यातल्या वास्तव्यात सुहासिनी जोशी, आसावरी कुलकर्णी आणि आशा साठे या माझ्या मैत्रिणींनी मला मैत्रीच्या दृढ नात्याचा खूप मोठा विश्‍वास दिला. अनिल अवचट म्हणजेच माझा बाबा यानं माझं पालकत्व जाहीरपणे स्वीकारलं. मी आजारी असो, वा दिवाळी-दसरा असा सण असो, त्या वेळी घरी येऊन आपल्या वावरानं माझं घर सुरेल करून टाकणं त्यानं केलं आणि आजही करतोय. आशा साठे यांनी तर त्यांचं घर माझ्यासाठी २४ तास खुलं असल्याचं सांगितलं. मला कधीही काहीही प्रश्‍न न करता त्यांनी माझं मन जाणलं. हा विश्‍वास त्यांच्या वागण्यानं, त्यांच्या प्रेमानं आणि त्यांच्या कृतीनं मला दिला. 
आपलं जगणं, वागणं आणि बोलणं हे एक असलं तरच विश्‍वासाचं नातं निर्माण होऊ शकतं, अन्यथा नाही. शब्दांचे पोकळ बुडबुडे विश्‍वासाचा क्षणिक आभास निर्माण करतीलही, पण व्यक्तीची कृती ठोसपणे सिद्धतेचा संदेश देते. विजयाताई चौहान असो, की मेधा पाटकर असो, अच्युत गोडबोले असोत की यमाजी मालकर असो या सगळ्यांनी माझ्या मनात जो विश्‍वास पेरला त्यानं माझी जबाबदारी वाढली. जे आपल्याला मिळालं, ते इतरांपर्यंत देत गेलं पाहिजे ही विजयाताईंची शिकवण खूप काही शिकवून गेली. आपण पारदर्शी असलो तर इतरांच्या मनात जागा निर्माण करू शकतो हे कळत गेलं. म्हणूनच आज महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राबाहेरची अनेक मुलंमुली यांच्याशी माझं नातं विश्‍वासाच्याही पलीकडलं आहे. आपलं प्रेम असो, वा प्रेमभंग; आपलं करियर असो वा आपल्या चुका ही मुलं-मुली खूप विश्‍वासानं सगळं सांगत असतात. त्यांच्या सांगण्यानं, त्यांच्या जवळ असण्यानं रोजच माझी जबाबदारी वाढत असते. 

हा विश्‍वास मला माझ्या आसपास असलेल्या लोकांनी दिला, प्राण्यांनी दिला, निसर्गानं दिला आणि मी ज्यांना त्यांच्या लिखाणातून जाणलं, त्या विचारांतून जे आजही तितकेच जवळ आहेत त्या संत तुकाराम, कबीर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज,  महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोळकर, यासारख्या अनेकांनी दिला आणि देत आहेत.

आज या सगळ्या गोष्टींकडे बघताना जाणवतं, की आपलं कामही आपल्याविषयी खूप काही बोलत असतं. माझं काम, माझी आवड हे माझं लिखाण आहे. त्यामुळे माझं लिखाण हे विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारं, जात-धर्म न मानणारं, सामाजिक प्रश्‍नांचं भान करून देणारं, कला जपणारं, चांगल्या व्यक्ती आणि त्यांचं कार्य अधोरेखित करणारं प्रेरणादायी असलं पाहिजे. आणि जगण्याचा भाग असलेलं हेच माझं लिखाण माझ्याही जगण्यात दिसलं पाहिजे तर आणि तरच माझं इतरांशीच नाही, तर स्वतःशी देखील अढळ विश्‍वासाचं नातं निर्माण झालेलं असेल. 

दीपा देशमुख,
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.