नात्यांचे बदलते रंग - निरंजन दिवाळी २०१६

नात्यांचे बदलते रंग - निरंजन दिवाळी २०१६

‘नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही,
सार्‍याच चांदण्यांची जगतास जाण नाही’

कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या ओळी ....नात्याविषयीचं किती हळुवार शब्दांत वर्णन करतात. खरं तर नाती किती प्रकारची....  रक्ताची नाती - बहीण, भाऊ, आई, वडील, मुलगा, मुलगी, काका, मामा, आत्या वगैरे वगैरे....याशिवाय काही सहवासातून जुळून आलेली ...खूपच दृढ, घट्ट ...नाव नसलेली नाती.....या सगळ्या नात्यांनी माणसाचं आयुष्य विणलंय आणि ते जपत तो पुढे पुढे चाललाय... ही सगळीच नाती आपला व्यापक स्तरावरचा एक परिवार वाढवत असतात. मग या नात्यांमधल्या प्रेमाबरोबरच निर्माण होतात अपेक्षा आणि मालकी हक्काची भावना! माझ्या नात्याच्या घरट्यात मी सुरक्षित असते किंवा असतो, तर कधी हीच नाती ओरबाडून काढतात अंगावरची साल....देतात अनगिनत वेदना ....तेव्हा पुढली सगळी वाट काटेरी, रक्ताळलेली बनून जाते. मग हे नातं सुखकर कसं करावं हेच मुळीच कळेनासं होतं. अपेक्षांचं ओझं कमी करणं, मालकीहक्काची भावना झटकणं हे सगळं संस्कारांच्या गाठोड्यात गुंडाळलेलं असतं आणि ही गाठोडी अशी सहजासहजी फेकूनही देता येत नाहीत. 

आजकाल तर एखाद्या तरुणाचं आणि तरुणीचं लग्नं झालं की दोन-चार महिन्यांतच घटस्फोटाची फाईल दाखल केली जाते. एकमेकांचे विचारच पटत नसतील तर एकत्र आयुष्य काढण्यात काय अर्थ आहे, त्यापेक्षा सरळ वेगळं झालेलं चांगलं असे विचार आजकाल तरूण पिढीत बळावताना दिसताहेत. तसंच  सोशल मिडियाच्या अतिरेकी वापरामुळे आणि व्यक्तीस्वातंत्र्यामुळे देखील प्रत्येक नातेसंबंधात दुरावा निर्माण होताना दिसतो आहे.  आपल्या वागणुकीचं समर्थन प्रत्येकजण करतो आहे. ‘माझंच बरोबर, मी चुकूच शकत नाही, मीच का तडजोड करू, माझं कोणावाचून अडत नाही. पैसा फेकला की सगळं काही मिळतं.’ आज आर्थिकदृष्ट्या तो आणि ती दोघंही सक्षम असल्यानं दोघांचाही अहंकार जास्त मोठा झाला आहे. या अहंकारानं मी वाकणार नाही, मी बदलणार नाही, मी ऐकणार नाही अशा प्रकारे मानसिकता तयार होऊन नातेसंबंधात कायमची दरी किंवा तणाव निर्माण होतो आहे.

पूर्वी मोबाईल येण्याअगोदर घरात लँडलाईन फोनच असायचे. फोनची घंटी वाजली की घरातला कुठलाही सदस्य फोन उचलत असे. समोरच्या व्यक्तीशी बोलून मग ज्याच्यासाठी फोन आलाय, त्याला तो फोन दिला जात असे. इतकंच काय पण शेजार्‍यापाजार्‍यांचेही फोन येत असत, तेव्हा राग न येता निरोप देण्यासाठी घरातली छोटी मुलं त्यांना बोलावण्यासाठी पिटाळली जात. पण आता मात्र प्रत्येकाकडे स्वतंत्र इन्स्ट्रूमेंट आल्यामुळे माझं आयुष्य फक्त माझं आहे ही भावना वाढीला लागल्यामुळे आता नात्यातली पारदर्शकता जाऊन एकमेकांविषयी गैरसमज, संशय हाच वाढीला लागलेला दिसतो.  याचबरोबर टीव्ही, मोबाईल, व्हाट्सअप आणि फेसबुक यांच्या सततच्या वापरामुळे आभासी जगात माणसं जास्त रमायला लागली आहेत. फेसबुकवर आणि व्हॉटसअप यांच्यावर तासनतास रमणार्‍या माणसांना समोर बसलेली माणसं दिसेनासी झाली आहेत. म्हणजे वरवर बघताना सतत व्हाटसअप आणि फेसबुकवर प्रत्येक जण लाईक करताना किंवा चाट करताना दिसेल. पण हा खरोखरंच संवाद आहे का? उलट या अतिरेकी संवादामुळे सुसंवाद न राहता विसंवाद वाढीला लागला आहे. घरात जेवताना डायनिंग टेबलवर एकाच कुटुंबातली चार जण बसलेली असतील तर ती सगळी मोबाईलवर मेसेजेस करण्यात आणि वाचण्यात गुंगलेली दिसतील. फेसबुकवरती शेकडो मित्रं आहेत म्हणून सुखावणारी मंडळी प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीशी मित्रत्वाचं नातं जोडू शकत नाहीत हे विदारक चित्र दिसतं आहे. फेसबुकवर फक्त काही अक्षरं टाईप करून क्लिक केलं की प्रेम, काळजी, माया सगळं काही दाखवता येतं, पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्याच व्यक्तीच्या सुखदुःखात धावून जाणं, त्याच्या मदतीला उभं राहणं असं करण्याऐवजी ‘वेळच नाही रे, नाही तर आलो असतो’ असं म्हणताना दिसून येतात. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे माझ्या प्रायव्हसीत कोणीही येता कामा नये ही भावना वाढीला लागली असून नात्यांतला मोकळेपणा कमी झाला आहे. कॉर्पोरेट जगातल्या शिकवणीनुसार नात्यांमधली नैसर्गिकता जाऊन कृत्रिमता वाढली आहे. यातूनच परस्परांमधली नाती घट्ट होण्याआधीच त्यात दुभंगलेपण यायला लागलं आहे. नात्यांमध्ये कोरडेपणा वाढीला लागताना दिसतोय. सगळे मिळून एकत्रितपणे आनंद लुटू ही भावना जाऊन त्यातला ताजेपणा, टवटवीतपणा आणि रसरशीतपणा नाहिसा होत चालला आहे. 

कित्येक ठिकाणी तर हृदय धडधडत आहे म्हणून जिवंत आहोत, श्वास चालतोय म्हणून जगतोय ही निरर्थक भावना माणसाच्या डोळ्यांमधून, चेहर्‍यातून दिसतेय. अनेक कवी या अशा अर्थहीन जगण्याविषयीची खंत व्यक्त करताना दिसतात. बा. सी. मर्ढेकर यांनी या असहाय जगण्याचं वर्णन अतिशय समर्पकरीत्या केलं आहे. ते म्हणतात, नात्यांतलं नितळपण संपलं असून आापलं जगणं पिपात मेलेल्या उंदराप्रमाणेच झालं आहे. आपलं अस्तित्व कोणाच्याही खिजगणित नाही. या खोटेपणात, बुरखा पांघरलेल्या जगात कुठलंही वागणं थोडक्यात, प्रेम करणं ही देखील फक्त औपचारिकता उरली आहे.  खरं तर माणसाचं केवळ माणसाशीच नाही तर या निसर्गाशी, निसर्गातल्या प्रत्येक सजीवाशी असलेलं नातं खूपच व्यापक आहे. निसर्ग त्याच्याशी असलेल्या नात्याचं महत्व सांगत नाही तर तो परस्परातली ओढ सांगतो आणि या जर निसर्गाबरोबर संवाद केला नाही, नातं जोडलं नाही तर मग अशा जीवनाची निरर्थकताही तो दाखवतो. हाच कवी मग म्हणतो ः 

कितीतरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
कितीतरी दिवसांत 
नाही नदीत डुंबलो

या सगळ्या गोष्टींसाठी - निसर्गात रममाण होण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी आज आपल्याकडे वेळच उरलेला नाहीये. मग कुठल्यातरी क्षणी फक्त खंत करणं इतकंच आपण करतो. खलील जिब्रानसारख्या तत्वज्ञानं ‘प्रेम करा, पण त्या प्रेमावर बंधन, नियम आणि अटी लादू नका. मृत्यूनं हाक देईपर्यंतचं जीवन खूप आनंदानं एकत्र येऊन जगा, पण त्या एकत्रपणातही तुमची स्वतःची एक हक्काची जागा हवीच’ असं म्हटलंय. प्रेम आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नात्याबद्दल तो किती सुरेख बोलून जातो. व्हॅन गॉग हा जगप्रसिद्ध चित्रकार आणि त्याचा धाकटा भाऊ थिओ - या दोघांमधल्या नात्याची उंची त्यांचं आयुष्य बघितलं की लक्षात येते. एकमेकांविषयीची काळजी, माया, एकमेकांसाठी झटण्याची तीव्रता आणि अखेर व्हॅन गॉघच्या मृत्यूनंतर तो धक्का सहन न होऊन थिओचंही त्यानंतर केवळ सहाच महिन्यात या जगाला सोडून जाणं. या दोघा भावांमधलं प्रेम अर्तंमनाला हलवून सोडतं. तसंच आईन्स्टाईननंतर ज्याचं नाव घ्यावं असा शााज्ञ रिचर्ड फाईनमन याचं आणि त्याच्या वडिलांचं मेलविल यांच्यामधलं वडील-मुलामधलं मित्रत्वाचं असलेलं नातं....आपल्या मुलाबरोबर मूल होऊन वावरणं, तर कधी त्याचा मित्र बनून खांद्याला खांदा भिडवून चालणं, त्याच्यातलं कुतूहल जागं ठेवणं आणि त्या कुतूहलाच्या मागे लागताना हातात घालून ‘चल दोघ मिळून शोधूया’ म्हणणं.... बाप-लेकाच्या या अस्सल नात्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. हाच मुलगा पुढे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर बनलाच पण त्याचबरोबर एक मानवतावादी म्हणूनही ओळखला गेला. रिचर्ड फाईनमन आणि त्याची बालमैत्रीण आर्लिन हिच्यातलं प्रियकर-प्रेयसी यांचं नातं तर डोळ्यातल्या आसवांना न रोखू शकणारं....आर्लिन आता मरणाच्या दारात असल्याचं कळल्यानंतरही त्या मृत्यूला तू आमच्या प्रेमात आडवा येऊच शकत नाही असं ठणकावत सांगणार्‍या फाईनमननं आर्लिनचा हात अखेरपर्यंत घट्ट धरून ठेवला, सोडला नाही. या नात्यांना काय म्हणायचं?

लोक आपापल्या कुवतीप्रमाणे नात्यांचे अर्थ लावून मोकळे होतात. कधी कधी आपल्या भावनेशी ते गल्लतही करतात. आपल्या मर्जीनं आपल्याला हवं तसं नात्यांचं ते चित्र रंगवत असतात. खरं तर नाती हळुवारपणे निर्माण व्हायला हवीत. त्या नात्याचं चित्र त्या नात्याच्या मर्जीप्रमाणेच आपोआप रंगायला हवं. आयुष्याच्या प्रवासात नावं नसलेली अनेक नाती तयार होत जातात. अनोळखी वाटणारी वाट जशी परिचयाची होते तशीच ही माणसंही होतात. त्यांच्या साथीनं स्वप्नांचा वास्तवात येण्याचा प्रवासही सुरू होतो. आज नात्यांमधल्या दुभंगलेपणाचं खापर विभक्त कुटुंबपद्धतीवर अनेकदा टाकलं जातं. काही अंशी ते खरं असलं तरी त्याच्या मुळाशी गेल्यावर मात्र याची कारणं खूप वेगळी दिसून येतात. दोन पिढ्यांमधलं अंतर, एकमेकांसाठी वेळ नसणं, संवादाचा आणि प्रत्यक्ष जागेचा अभाव, आपल्या मनावर जमलेली धुळीची पुटं आणि आपल्या मनातूनच त्या नात्याला आलेलं कोरडेपण!

मानवी संबंधांचा विचार करत असताना अ‍ॅल्विन टॉफ्लरनं सांगितल्याप्रमाणे आपल्या इतिहासात शेती, उद्योग आणि सेवा असे तीन महत्त्वाचे टप्पे पडतात. शेतीचा टप्पा अनेक सहाकं, उद्योगाचा टप्पा काही शतकं, तर सेवेचा टप्पा म्हणजे अलिकडली काही दशकं एवढाच होता. पूर्वीच्या शेतीच्या टप्प्यात तंत्रज्ञान फारसं नव्हतंच. शेती उत्पादन हे फक्त शेतीतल्या अनुभवावरच अवलंबून असल्यामुळे चार पावसाळे बघणं यालाच महत्त्व होतं. या टप्प्यात एकत्र कुटुंब पद्धती उदयाला आली आणि मग घरातल्या जेष्ठ मंडळींना मानानं वागवणं, तो मान दाखवण्यासाठी वाकून नमस्कार करणं अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. घरातली मोठी मंडळी घरातले महत्वाचे निर्णय घ्यायला लागली. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी बाकी मंडळी झटू लागली. एकत्र असताना सगळेच एकमेकांची काळजी घेत. त्यामुळे प्रत्येक सदस्यामध्ये सुरक्षिततेची भावना होती. मात्र या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्यावर मात्र मर्यादा होत्या. स्वतंत्रपणे निर्णय घेणं एकत्र कुटुंबपद्धतीत शक्य होत नसे. 

यानंतर मात्र औद्योगिक युग सुरू झालं. तंत्रज्ञानानं माणसाच्या आयुष्यात पार उलथापालथ करून टाकली. रोजच्या आयुष्यातले कष्ट कमी करण्यासाठी अतिशय सोपी, सुलभ यंत्र घरात आली. मोबाईल आला, इंटरनेट आलं. घरातल्या जवळच्या मंडळींपेक्षा मोबाईलवरून संवाद साधताना दूरवरची मंडळी जास्त जवळची वाटायला लागली. इंटरनेटमुळे तर आभासी जगाशी जास्त संपर्क वाढला. या आभासी विश्वात मनं रमायला लागली. शहरं वाढली, एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता भासेनासी झाली. विभक्त कुटुंब पद्धती वाढीला लागली. स्वातंत्र्य मिळालं, पण सुरक्षितता गेली. मी आणि माझ्यापुरतं अशी विचारसरणी वाढली. माणसांपेक्षा यंत्रं जास्त जवळची वाटायला लागली. यातूनच वडिलधार्‍यांचा मान राखणं, त्यांना विचारून निर्णय घेणं, त्यांच्याशी संवाद करणं या गोष्टी मागे पडू लागल्या. इतकंच नाही तर दोन पिढ्यांची स्वप्नं, त्यांची रोजची जगण्याची पद्धत, आयुष्याचा भाग असलेली मूल्यं या सगळ्यातच खूप तफावत दिसायला लागली. कामांचे तास वाढल्यामुळे घरासाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणं किंवा काढणं हे कठीण व्हायला लागलं. इतरांनी आपल्या आयुष्यात काही सल्ला, सूचना दिली की तो हस्तक्षेप वाढायला लागला. माझं आयुष्य माझं आहे, ते मी माझ्या मर्जीप्रमाणे जगेन ही आत्मकेंद्री वृत्ती वाढायला लागली. 

दुसरीकडे नोकरीच्या जागी कामाचे तास वाढले आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त सुखासीन आयुष्य जगण्यासाठी जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल याबद्दलचा विचार वाढीस लागला. पैसा म्हणजे सुख ही व्याख्या तयार झाली. एकीकडे बोटावर मोजण्याइतके श्रीमंत आणि दुसरीकडे अनगिनत गरिबीच्या विळख्यात सापडलेले यांच्यातली दरी वाढत राहिली. त्यातूनच दोन्ही गटांना एकमेकांबद्दलची तुच्छता निर्माण झाली. माणसांमधली चंगळवादी वृत्ती वाढीला लागली. या चंगळवादी वृत्तीला जोपासणारी, खतपाणी घालणारी उत्पादनं निर्माण व्हायला लागली. मद्य, सिगारेट, शीतपेयं, सौंदर्यप्रसाधनं अशा अनेक अनावश्यक चैनीच्या वस्तू भरमसाठ प्रमाणात तयार व्हायला लागल्या. उपयुक्तता, टिकाऊपणा आणि आवश्यकता या गोष्टी बासनात गुंडाळल्या गेल्या. ‘वापरा आणि फेका’ हीच संस्कृती ठसली जायला लागली. श्रीमंतांना राहायला भरपूर जागा, दोन दोन ठिकाणी स्वतःची राहण्यासाठीची घरं, तर दुसरीकडे गरिबांना राहायला हवेशीर, पुरेशी जागाही नाही. एकट्या मुंबईतली ७०ज्ञ् मंडळी झोपडपट्टी किंवा चाळवजा खुराडावजा घरात राहते. एकएका टिचभर खोलीत आई-वडील, आजी-आजोबा आणि मुलं राहत असली तर त्यांना प्रायव्हसी कशी मिळणार? एकमेकांशी संवाद कसा साधणार? संवादालाच जागा आणि वेळ नसेल तर नाती दुभंगली जाणारच. असं म्हणतात, अमेरिकेत लग्नाच्या आधीच लग्न तुटलं तर काय, याचा विचार करून आधीच काही अटी घालून करार केला जातो. या करारानुसार आपण विभक्त झाल्यानंतर आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत काय निणर्य असतील याबद्दल त्यात सविस्तरपणे लिहिलेलं असतं. नाती टिकतील कशी याआधीच ती तुटतील कशी याबद्दल विचार केला जातो. 

आज टीव्हीवरच्या क्राईम पेट्रोलसारख्या मालिकांमधून नात्यांमधलं किती बिभत्स वर्णन आणि त्यातून निर्माण झालेलं क्रौर्य दाखवलं जातं. कधी जातीमुळे, तर कधी धर्मामुळे तर कधी गरीब-श्रीमंत दरीमुळे आपल्याच जवळच्या व्यक्तींचे खून केलेले वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतात. बापाने मुलीचा केलेला खून, भावाने भावाची केलेली हत्या, नवर्‍याने बायकोचा दाबलेला गळा....हे सगळं समाजातलं भेसूर चित्र मनाला विषन्न तर करतंच, पण त्याचबरोबर एका सुदृढ, समृद्ध नात्यापेक्षा इथं जात, धर्म, वर्ण, रंग, लिंग किती महत्त्वाचे आहेत हेच बघायला मिळतं. डोळ्यांसमोर उभी राहते ती खौफ पंचायत! लग्न दोन माणसांमध्ये होऊन नातं निर्माण होत नाही तर ते जातींशी, धर्मांशी, वर्णांशी लागलं जातं हे अतिशय विदारक चित्र आहे. म्हणूनच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न अगदी नगण्य प्रमाणात बघायला मिळतात. 

मनोविश्लेषणाचा सामाजिकतेशी सांगड घालणारा एरिक फ्रॉम हा एक खूप मोठा अमेरिकन मानसशााज्ञ होऊन गेला. या विचारवंतानं ‘एस्केप फ्राम फ्रीडम’, ‘मॅन फॉर हिमसेल्फ’, ‘सेन सोसायटी’, ‘आर्ट ऑफ लव्हिंग’, ‘सायकोअ‍ॅनेलेसिस अँड झेन बुद्धिझम’ ही पुस्तकं त्यानं लिहिली आणि ती प्रचंड प्रमाणात गाजली. या सगळ्याच पुस्तकांमधून त्यानं मानवी संबंधांची उकल अतिशय हळुवारपणे केली आहे. एरिक फ्रॉमनं ‘ह्युमॅनिस्टिक सायकोअ‍ॅनॅलेसिस’ ही संकल्पना मांडली. माणसाची सामाजिक वागणूक आणि भोवतालची परिस्थिती ही माणसाला घडवण्यात खूप महत्त्वाची ठरते असं तो म्हणायचा. 

एरिक फ्रॉमचं योगदान खूपच मोठं होतं. १९३४ साली फ्रॉम जर्मनीतून अमेरिकेत आला. तो एकाच वेळी फ्रॅाईडवादी, मार्क्सवादी आणि बुद्धिस्टही होता. त्याच्या मतानुसार आपण स्वतःचं मूल्यमापन ‘इतरांच्या’ आपल्याविषयीच्या मतामुळे करायला लागतो. त्यामुळे आपणही स्वतःची किंमत आपल्याला मिळणार्‍या या पैशांवरुन म्हणजेच एक्स्चेंज व्हॅल्यूवरुन करायला लागतो. थोडक्यात, आपण एक क्रयवस्तू (कमॉडिटी) बनतो. आपणही मग इतरांना तसंच वागवायला लागतो. थोडक्यात, माणसांमाणसांमधले संबंध बाजारी होतात. काही अपवाद सोडल्यास अगदी मित्रांमधले, नातेवाइकांमधले आणि आई-वडिलांमधलेही! इथेही जास्त पैसेवाल्याला मित्रांकडून, नातेवाइकांकडून आणि कित्येक वेळेला आई-वडिलांकडूनही जास्त प्रेम आणि मान, प्रतिष्ठा मिळते. त्याचा स्वभाव आणि वागणूक कशीही असली तरीही!

यातूनच पझेसिव्ह इन्सिंक्ट तयार होतं. जसं आपण आपल्या मालकीच्या एखाद्या वस्तूवर हक्क दाखवायला लागतो तसंच आपल्या नवर्‍यावर, मित्रावर किंवा बायकोवर, मैत्रिणीवर दाखवायला लागतो. हे एका तर्‍हेनं त्या व्यक्तीवरचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासारखंच असतं. आपण प्रेम आणि मालकी यात गफलत करायला लागतो आणि पझेसिव्ह वृत्तीलाच ‘प्रेम’ असं म्हणायला लागतो. हाच आपला मूळ मानवी स्वभाव आहे असंही आपण म्हणायला लागतो. खरंतर अनेक प्राण्यांमध्ये आणि मानवी इतिहासातल्याही सर्वात जास्त वर्षांमध्ये अशा तर्‍हेचे मालकी हक्क नव्हते आणि त्यामुळे असूया किंवा जेलसी फारशी निर्माण होत नसे. सगळे टोळ्याटोळ्यांनीच राहत; अनेकांचे अनेकांशी संबंध असत आणि झालेली मुलं सर्व टोळीची असं मानून ते एकत्रपणे सांभाळत. अशी शेकडो, हजारो वर्षं गेली. त्यानंतर बर्‍याच उशिरा शेती सुरु झाली आणि त्यानंतर काही काळानं जमीन आणि इतर गोष्टींवरची खाजगी मालकी सुरु झाली. आणि एकदा एखाद्या गोष्टीवर किंवा वस्तूवर माझी मालकी आहे असं म्हटल्यानंतर माझ्यानंतर ती गोष्ट किंवा वस्तू माझ्या मुलाकडे जावी असं मला अर्थातच वाटायला लागलं. पण मग माझा मुलगा ओळखायचा कसा? जर माझ्या बायकोबरोबर अनेकांचे संबंध असले, तर जी मुलं होतील, त्यातली माझी कशी ओळखायची? यावरुन मग बायकोवर हक्क दाखवणं सुरु झालं. आणि मग विवाहबाह्य संबंध अनैतिक आणि बेकायदा ठरवणं हे सगळं सुरू झालं आणि त्यामुळेच मग आपली बायको किंवा मैत्रीण दुसर्‍या कोणाला आवडते आहे हे सहन होईनासं झालं. यातूनच मग असूया, द्वेष आणि अनेक तर्‍हेचे गुन्हे, खून, कपट, कारस्थानं, छुपी प्रेमप्रकरणं, प्रेमाचे त्रिकोण अशा अनेक गोष्टी तयार झाल्या. 

नाती दुभंगण्यामागे वातावरणातल्या इतरही गोष्टींचा परिणाम होत राहतो. त्यात सातत्यानं इतरांशी होणारी स्पर्धा आणि तुलना. आज ज्या मोजक्या वर्गाचं उत्पन्न वाढतं आहे त्यांच्यामध्ये आपण कुठल्या ब्रँंडेड वस्तूच वापरल्या पाहिजेत, त्या वस्तूंच्या दर्जामुळेच आपलं समाजातलं स्थान निश्चित होणार असतं, कसं वागावं आणि कसं बोलावं (खोटं खोटं फायद्यापुरतं) याचे पद्धतशीर धडे गिरवले जातात. जी फॅशन चालू, त्या फॅशनप्रमाणेच कपडे वापरले पाहिजेत असंही मनावर ठसवलं जातं.  कुठले कपडे घातले पाहिजेत, बूट कोणत्या ब्रँंडचे हवेत, टूथपेस्ट कुठली वापरायची आणि सौंदर्यप्रसाधनं कुठली खरेदी करायची, मॅकडीमध्ये खायचं की केएफसीमध्ये, कुठल्या गाडीतून फिरायचं, कुठल्या प्रकारचं संगीत ऐकायचं हे सगळं सगळं चालू फॅशनप्रमाणे आणि इतरांना काय आवडतं याप्रमाणेच घडायला लागतं. हे सगळं नाही केलं तर आपण इतरांपेक्षा तुलनेनं कमी आहोत, आपल्याला अनेक गोष्टींची कमी आहे हे बिंबवलं जातं. मग यातून सतत समोरचा इतरांना काय आवडेल याच गोष्टी करत रहातो. ते जर जमलं नाही तर मग न्यूनगंडाची भावना मनात घर करते. स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख हेच आपल्याला ओळखू येईनासं होतं. या आभासी जगात रमण्याचे परिणाम नैराश्य, अ‍ॅडिक्शन, निद्रानाश असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. एरिक फ्रॉमचं एक वाक्य खूप सुंदर आहे. तो म्हणतो, ‘‘न्यूनगंडाचा अर्थ म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नाहीये याबद्दल खेद वाटणं असं नसून आपल्याला एखादी गोष्ट येत नाही असं इतरांना वाटतंय, असं आपल्याला वाटतंय असा असतो.’’ या इतरांशी सतत तुलना करण्याचा एक प्रचंड वाईट परिणाम होतो. तो म्हणजे माणूस स्वतःचं स्वतःविषयीचं मत इतर लोक त्यांच्याविषयी काय म्हणताहेत यावर अवलंबून ठेवतो. त्यामुळे इतरांच्या नजरेत आपण कसे चांगले ठरू याविषयी धडपडायला लागतो. यामुळेच तर तो गर्दीत असूनही एकटा असतो आणि त्या एकटेपणातून त्याचं नातं जुळतं ते नैराश्याशी! स्वतःचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारायचं असेल आणि असे विकार ओढवून घ्यायचे नसतील तर अपेक्षेशिवाय आणि हेतूशिवाय प्रेम, मैत्री जोपासावी लागेल. मनातून संवाद वाढवावा लागेल. स्पर्धा, तुलना टाळावी लागेल. तसंच संगीत असो वा साहित्य, कला असो वा क्रीडा, विज्ञान असो वा वाचन या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करण्यासाठी मदत करणार्‍या असल्यानं यांच्या सान्निध्यात राहावं लागेल. 

रिचर्ड डॉकिन्स यानं सेल्फिश जिन्स नावाचां पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकानं एकच गदारोळ उठला. सेल्फिश जिन्सचा अर्थ लोकांनी खूपच वरवर आणि स्वार्थी असा लावला. तसाच अर्थ एरिक फ्रॉमच्या ‘मॅन फॉर हिमसेल्फ’ या पुस्तकाच्या बाबतीत लोकांनी लावला. एरिक फ्रॉम म्हणतो, स्वतःसाठी जगा. आपण स्वतःसाठी जगतच नाही आहोत. नेहमीच आपण इतरांसाठी जगता आलेलो आहोत. लहानपणापासून आपल्यावर हेच संस्कार झाले आहेत. इतरांच्या नजरेतून मी काय केलं तर चांगलं हे लक्षात घेऊनच अनेक गोष्टी केल्या जातात. लोग क्या कहेंगे हेच महत्वाचं ठरतं. मला काय वाटतं, मला काय आवडतं याचा विचारच केला जात नाही. स्वतःचे मित्र, करियर, शाखा या सगळ्या गोष्टी इतरांना काय वाटतं यातूनच निवडल्या जातात. आणि या सगळ्यांमुळेच आपण आपल्यापासून दूर दूर गेलेलो असतो. आपलं आपल्याशी असलेलं नातं काय याचा विचारच मनाला शिवत नाही. आपल्यासाठी जगणं, आपल्यासाठी आनंद घेणं म्हणजे नेमकं काय हे माणूस विसरूनच जातो. कुमार गंधर्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हटलं जातं, कुमार गंधर्व एकदा व्यासपीठावर गायनासाठी आले आणि त्यांनी सभागृहात बघितलं तर फक्त चार ते पाच श्रोते समोर बसलेले. बाकी सगळं सभागृह रिकामं. जाहिरातीत बातमीत काहीतरी गडबड झाली होती. आता करायचं काय, आयोजक धास्तावलेले होते. पण कुमार गंधर्व शांत होते. त्यांनी व्यासपीठावर बैठक घेतली. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि गायला सुरुवात केली. त्या दिवशीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा होता. त्यांचं गायन अफलातून होतं. कार्यक्रम संपल्यावर लोक म्हणाले, ‘‘फक्त पाचच श्रोते समोर असताना तुम्ही कसं गायलात?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, आपण इतरांसाठी थोडीच गातो, आपण स्वतःसाठी गायचं असतं.’’ नेमकी हीच गोष्ट आणि स्वतःसाठीचं गाणं गायचं आज माणूस विसरला आहे.

पती-पत्नीचं असो, वा आई-वडिलांचं, मुलगा आणि पालक यांचं असो वा दोन मित्रांचे नातं, या प्रत्येक नात्याला नीट जोपासलं पाहिजे, परस्परांचं कौतुक करणं, मोकळं राहणं, अहंकाराला जास्त न कुरवाळणं, समोरचा बदलायचं तेव्हा बदलेल, आता मी थोडं बदलून बघण्याचा प्रयत्न करेन हा विचार आणि कृती सक्रिय झाली पाहिजे. प्रत्येकानं आपली खरीखुरी ओळख आधी स्वतःशी करून घेतली पाहिजे. माझं माझ्याशी असलेलं नातं शोधलं पाहिजे. त्याचबरोबर मग माझं इतरांशी असलेलं नातं, ज्यात माझी आसपासची माणसं, माझे नातेवाईक, माझे मित्र, माझा आसपासचा परिसर, निसर्ग, वस्तू, प्राणी आणि समाज यांचा समावेश होत होत त्याला वैश्विकतेचं परिमाण लाभेल आणि मग या नात्यांमधली गोडी, समृद्धी, ताकद, आनंद आपल्याला कळायला लागेल. संकुचितपणा गळून पडेल, मालकीहक्काची भावना लोपेल आणि नात्यानात्यांमधला भिंतींचा अडसर दूर होऊन शिल्लक राहिलं ते माणुसकीचं, कुठलंही लेबल नसलेलं नितळ नातं. आपला आपल्याशी संवाद सुरू झाला की इतरांशी आपोआपच होईल. आपण स्वतःला शोधू शकलो तर इतरांनाही नक्कीच समजून घेऊ शकू. आणि मग यातून निर्माण झालेली नाती खूपच सुदृढ, परिपक्व आणि समृद्ध असतील. अशा नात्यांमुळे आसपासचं वातावरणही तुकारामांनी म्हटल्याप्रमाणेच आनंददायी असेल. 

आनंदाचे डोही आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचे  

दीपा देशमुख, पुणे
 

Comments

Submitted by श्वॆता Thu, 05/27/2021 - 23:45

वा! मस्त लॆख आहॆ!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.