तेथे कर माझे जुळती.....घरकुल
तेथे कर माझे जुळती..... कितीतरी दिवसांपासून नाशिकच्या घरकूल संस्थेला भेट द्यायची होती, काल नाशिकला पोहोचताच लगेचच घरकूल संस्थेच्या रस्त्याला लागलो. विद्या फडके या आमच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळच उभ्या होत्या. पुणे नाशिक प्रवास करून थेट घरकूलमध्ये पोहोचल्यामुळे आईच्या मायेनं त्यांनी तयार ठेवलेलं जेवण आम्ही आधी केलं. अतिशय स्वादिष्ट असं जेवण! त्यात आमरस! जेवण झाल्यानंतर विद्याताईंबरोबर मी संस्था बघण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ निघाले. २००६ साली मानसिक आणि शारीरिक विकलांग असलेल्या मुलींसाठी निवासी संस्था विद्याताईंनी सुरू केली.
नाशिकचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट संजय पाटील यांच्या कल्पकतेतून साकारलेली घरकूलची इमारत इतकी देखणी आणि आपुलकी निर्माण करणारी आहे की मनोमन मी संजय पाटील यांना हात जोडले. भरपूर सूर्यप्रकाश, मोठमोठ्या खिडक्या आणि खेळती हवा, खिडक्या असोत, वा मोकळया जागेत लावलेल्या ग्रील्सचं डिझाईन देखील इतकं सुंदर की जणू त्या काळसर गजावर पावसाचा एक एक थेंब थबकला असावा! आज घरकूलमध्ये ५० मुली आहेत. या मुलींच्या खोल्या, त्यातल्या स्वच्छ हवेशीर त्यांची राहण्याची जागा, स्वयंपाकघर, मुलींमध्ये कौशल्य विकसित व्हावीत, यासाठी मुली करत असलेल्या वस्तू बघून मी चकित झाले. पेनचं असेम्ब्लिंग, गोधड्या, फोटो फ्रेम्स आणि वारली चित्रकला, फाईल ठेवण्यासाठीचे फोल्डर्स, गुलाबाची फुलं, शॅडो मातीचे गणपती, कागदी पण अतिशय सुरेख कापडी वाटतील अशा पिशव्या अशा एक ना अनेक उपयुक्त वस्तू या मुली बनवताना दिसल्या. या सर्व वस्तूंना बाजारपेठेत उत्तम मागणी आहे.
घरकूलवर मी नंतर सविस्तर लिहिणार आहेच, पण राहवलं नाही म्हणून एक धावती ओळख! विद्या फडके या १८ ते ६५ वयोगटातल्या सगळ्या मुलींच्या आई आहेत. मुलींचं रुसणं, मुलींची भांडणं, मुलींचा हट्ट असं सगळं अतिशय मायेनं विद्याताई बघत असतात. मी जेवण केल्याशिवाय जायचं नाही असा मुलींनी मला आग्रह केला. माझी भेट झाली, तेव्हा प्रत्येक मुलगी मला हात उंचावून आनंद व्यक्त करत होती. निघताना विद्याताईंनी मुलींनी तयार केलेल्या वस्तूंसह काही खाऊ बरोबर दिला. विद्याताईंच्या चिकाटीपुढे,संयमापुढे आणि उभ्या केलेल्या त्यांच्या या कामापुढे मी खरोखरंच नतमस्तक झाले!
दीपा देशमुख, पुणे
15 June 2019
Add new comment