थिंक पॉझिटिव्‍ह - एप्रिल २०२१

थिंक पॉझिटिव्‍ह - एप्रिल २०२१

प्रभाकर भोसले -  हा एक मनस्वी चित्रकार - आमचा मित्र....त्याच्या बोटात जादू आहे. त्यानं कागदावर आपल्या लेखणीतून अक्षरं उमटवली, की ती अक्षरं जिवंत होतात आणि आपल्याबरोबर संवाद साधायला लागतात. त्यानं काढलेल्या प्रत्येक अक्षराला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. त्याची रंगसंगतीची जाणीव आपल्याला खेचून घेते. या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा खूप अभिमान वाटतोच, पण त्याशिवाय त्याच्यातलं माणूसपण जास्त भावतं. प्रभाकरला माणसं आवडतात, बोलायला आवडतं आणि प्रत्येक वेळी त्याला एकच नव्‍हे तर अनेक कल्पना प्रत्यक्षात आणायच्या असतात. त्याच्या या कल्पकतेतूनच थिंक पॉझिटिव्‍हचा दिवाळी अंक सुरू झाला. प्रत्येक वर्षी या दिवाळी अंकांनी पारितोषिकं पटकावली. प्रत्येक वेळी सकारात्मकतेकडे नेणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना घेऊन त्यानं अंक तयार केला.
आणि आता एप्रिल २०२१ पासून त्यानं थिंक पॉझिटिव्‍ह हे मासिक महिन्याला प्रकाशित करायचं ठरवलं. प्रभाकरचं थिंक पॉझिटिव्‍हचं मुखपृष्ठ म्हणजे एक मुखवटा असायचा. एका बाजूने गंभीर तर दुसऱ्या बाजूने तो प्रसन्न वाटेल असा! मुखपृष्ठाच्या रंगात बदल व्‍हायचा, पण मुखवट्याचं स्थान मात्र ध्रुवताऱ्यासारखं अढळ असायचं. काल मासिकरूपातला एप्रिल महिन्याचा थिंक पॉझिटिव्‍ह चा पहिला अंक माझ्या हातात पडला आणि मी चकित झाले. कारण याच्या मुखपृष्ठावर तो नेहमीचा मुखवटा नव्‍हता, तर अतिशय सुरेख अशी फुलांनी लगडलेली डहाळी होती. सध्या माझ्यावर जांभळ्या रंगातल्या छटांनी मोहिनी घातलेली असतानाच मुखपृष्ठावरच्या जांभळ्या फुलांकडे बघून ‘वा, क्या बात है’ अशी दाद नकळत बाहेर पडली.
प्रभाकर भोसलेचा अंक दिसायला खूप देखणा, डिसेंट असा असतो. तसा हाही अंक आहे. विशेष म्हणजे थिंक पॉझिटिव्‍ह या मासिकाच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी माझा मित्र यमाजी मालकर यानं घेतलेली आहे. त्यामुळे दुधात साखरच. अंक दर्जेदार आणि वाचनीय कसा होईल याकडे त्याचं कटाक्षानं लक्ष असतं.  त्याशिवाय संपादक मंडळात प्रभाकर भोसले, पराग पोतदार आणि अभिजित सोनावणे हेही महत्वाची भूमिका निभावताहेत.
या अंकात डॉ. संप्रसाद विनोद यांनी खऱ्या आनंदाची अनुभूती कशात असते आणि कशी असते यावर लिहिलेलं आहे, तर डॉ. वर्षा तोडमल यांनी रुपककथांची उदाहरणं देत सज्जनांच्या सहवासाचा परिणाम कसा फलदायी असतो हे आपल्या लेखातून सांगितलं आहे. आज आपण आभासी जगात इतके गुंतलो आहोत की अशा वेळी प्रत्यक्ष संवादाचं महत्व काय आहे याची जाणीव पराग पोतदार यांनी करून दिली आहे. मन:शक्‍तीचे स्वामी विज्ञानानंद यांनी प्रार्थनेचा मनावर नव्‍हे तर शरीरावर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे. आपल्यातली नकारात्मक वृत्ती आपलाच पराभव कसा करते याविषयी आपल्या लेखातून प्रसाद कुलकर्णी यांनी सजग केलं आहे. आयुष्यात अनेकदा युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी काय करायचं याविषयी आश्विनी राक्षे यांनी आपल्या लेखातून मांडणी केली आहे. आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा सल्ला चतूर यांनी आपल्या लेखातून दिला आहे. पूजा पराग सामंत यांनी घरातल्या स्त्रीचं स्थान काय असतं याचा उहापोह केला आहे. ट्रेकिंगची आवड असणारी एक तरुणी व्‍हॅली ऑफ फ्लॉवर्स बघण्यासाठी निघते आणि हेमकुंड ट्रेक करताना काय घडलं याविषयी आपला अनुभव सांगते, तो सांगतानाच मुक्‍कामावर पोहोचणं जेवढं महत्वाचं असतं, त्यापेक्षाही त्या प्रवासाचा आनंद किती महत्वाचा असतो हे तिनं सांगितलं आहे आणि ती तरुणी म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. माझी मैत्रीण डॉ. विनया देसाई हिने आपण उन्हाळ्यातल्या उन्हाच्या नावानं जेव्‍हा कडाकडा बोटं मोडतो, तेव्‍हा हाच उन्हाळा कसा सुखकर असतो हे इतकं सुरेखरीत्या दाखवलं आहे की बस्स. जगण्यातले ताण दूर करून जगण्यासाठी काय करायला हवं याविषयी भुजंगराव शेळके यांनी मार्गदर्शन केलं आहे. सुदाम जोगदंड यांनी माणसातली सकारात्मकता काय घडवून आणते याविषयी आपले अनुभव विशद केले आहेत. प्राची गरूड यांनी लता मंगेशकर आणि गाणं यांच्यातलं नातं अतिशय सुरेखरीत्या उलगडलं आहे. आयएएस झालेल्या राजेंद्र भारूड या भिल्ल समाजातल्या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास प्राची गरूड यांनी आपल्या लेखातून सांगितला आहे. सकारात्मक अनुभवांविषयी ज्योती कुलकर्णी यांनी देखील संवाद साधला आहे. श्रीनिवास बेलसरे यांनी नॉस्टॅल्जिक करत जुन्या हिंदी गाण्यांना घेऊन एक सुरेख मैफील आपल्या लेखातून घडवली आहे. समुपदेशक स्मिता प्रकाश जोशी यांनी प्रत्येक समस्येला उत्तर असतंच, पण त्यासाठी संवाद साधायला हवा याविषयी आपल्या लेखातून सल्ला दिला आहे. कोरोनाच्या या अदृश्य राक्षसासमोर आपण हतबल झालो आहोत असं वाटत असतानाच यमाजी मालकर यांनी भारतीय समाजातल्या या काळातल्या अनेक सकारात्मक पैलूंकडे लक्ष वेधलं आहे. नीला शर्मा यांनी आईन्स्टाईनचा १८ एप्रिल हा स्मृतिदिन आणि चार्ली चॅप्लीन चा १६ एप्रिल हा जन्मदिन लक्षात ठेवून संक्षिप्त माहिती दिली तीही वाचनीय आहे.
थिंक पॉझिटिव्‍हच्या या अंकात माझाही 'मला भेटलेले पाथफाइंडर्स'  हा लेख सामील झाला आहे. आणि तो आहे सकारात्मक विचार करणाऱ्या १० पाथफाइंडर्सच्या प्रवासाचा. जरूर वाचा असं सांगेन.
शेवटाकडे जाताना, या अंकात मला आवडलेला लेख ‘हात धुवा असं प्रथम सांगणाऱ्या.... सेमेल्वाईस’ या शास्त्रज्ञाविषयीचा असून तो अतुल कहाते यांनी लिहिला आहे. आमच्या जग बदलणाऱ्या जीनियस मालिकेत लुई पाश्चर, रॉबर्ट कॉख यांनी निर्जंतुकीकरणावर केलेलं संशोधन लिहिलेलं असलं, तरी सेमेल्वाईस यानं ती बाब पहिल्यांदा जगासमोर लक्षात आणून दिली. आपल्या कामातून त्यानं मृत्यूदराचं प्रमाण कमी केलं. पण विरोधकांनी त्याला सुखानं जगू दिलं नाही. त्याच्या वाट्याला उपेक्षाच आली. विज्ञानासाठी झटणाऱ्या, विज्ञानासाठी जगणाऱ्या व्‍यक्‍तींविषयी मला कायमच आदर वाटतो आणि त्यातच कोणी विज्ञानावर इतकं सोपं आणि महत्वाचं लिहिलेलं असेल तर मला जास्तच छान वाटतं. म्हणून यातला अतुल कहाते यांचा लेख जरूर वाचावा.
आज कोरोनाच्या नकारात्मक वातावरणाने आपण वेढलेलो असताना थिंक पॉझिटिव्‍ह मनाला उभारी देणारा साथीदार आहे असं मला वाटतं.
थिंक पॉझिटिव्‍ह मासिकाचं वर्गणीदार व्‍हायचंय?
#थिंक_पॉझिटिव्ह
प्रतीक्षा संपली...
नोंदणी सुरू झाली!!
मित्रांनो,
आपला अंक आजच नोंदवा.
प्रभाकर भोसले ९८८१०९८०१०

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.