गुरुवर्य पं. नाथराव नेरलकर

गुरुवर्य पं. नाथराव नेरलकर

तारीख

काल अंजली मालकर या मैत्रिणीची पोस्ट वाचली आणि ..... खरं तर परवापासून काही जवळच्या व्‍यक्‍तींच्या मृत्यूने आधीच मनाला सुन्नता आली होती आणि या बातमीने मन हळवं झालं. मृत्यू प्रत्येकालाच एक ना एक दिवस घेऊन जाणार आहे, आपण मृत्यूकडे तटस्थ नजरेनं बघायला हवं, वृध्दापकाळात, आजारपणात, अनेक त्रासात मृत्यू हा त्या माणसाची एका परीनं सुटका करतो असं समजावं हे सगळं त्या त्या वेळी मनाला समजावलं तरी मृत्यूनं हल्ला केला की सगळी समजूत गळून पडते आणि पुन्हा हा माणूस भले तो या पृथ्वीतलावर कुठेही असो, तो आता चालता, बोलता, हसता, खेळता असा कधीच आपल्याला दिसणार नाही ही जाणीवच वेदनादायी असते/आहे.
पं. नाथराव नेरलकर हे नाव माझ्या कानावर अगदी वयाच्या आठव्‍या नवव्‍या वर्षीच पडलं. (आई आणि आमचे दादा म्हणजे वडील त्यांना ‘नाथराव’ असंच संबोधत, त्यामुळे मी इथे तसा उल्लेख केलाय. मी त्यांना काका म्हणत असे.) माझ्या आईला गाण्याची आवड, त्यामुळे औरंगाबादला देवगिरी कॉलनीजवळ असलेल्या, मला आता त्या कॉलनीचं नाव नीटसं आठवत नाही, पण तिथे बहुतेक शनिमंदिर वगैरे असावं, तिथे एका बंगल्यात नाथराव आणि त्यांचं कुटुंब राहायचं. आई गाण्याच्या क्लासला त्यांच्याकडे जायला लागली, की मीही तिच्याबरोबर हट्ट धरून अनेकदा जात असे. त्या लहान वयात माझ्या मनावर त्यांच्या व्‍यक्‍तिमत्वाची छाप पडली होती. त्यांचा मलमलचा पांढराशुभ्र झब्बा, कधी सुरेखसं जाकीट, डोक्यावरचे  खांद्यापर्यंत वाढलेले भुरभुरणारे केस, चेहऱ्यावर कायम हासू, बोलण्यात एक प्रकारचा मीश्किलपणा आणि हजरजबाबीपणा... त्यांच्या अनेक मैफिलींना आईबरोबर मी जायची. 
हळूहळू घरातल्या वाढत्या व्‍यापांमुळे क्लासला आईच्या सुट्टया पडू लागल्या आणि एके दिवशी तिचा क्लास थांबला. अर्थात क्लास थांबला, तरी नाथरावांबरोबरचं नातं मात्र तसंच होतं. एके दिवशी नाथराव आमच्या घरासमोरच घर बांधताहेत असं त्यांच्याकडूनच कळलं आणि बांधकाम सुरूही झालं. बघता बघता एक टुमदार घर बांधून तयार झालं. या नव्‍या जागेत नाथरावांचे गायनाचे क्लासेस तितक्याच जोरात सुरू झाले. आता आईऐवजी आईचं स्वप्न पूर्ण करायला मी क्लासला जायला लागले. सा रे ग म प...शिकताना मनाचं अवघडलेपण, बावरलेपण एका मिनिटांत नाथरावांनी घालवलं. मला आठवतं, मी रियाजाला बसले की माझा आवडता राग, यमनकल्याण आणि त्यातली चीज ‘पनिया भरन कैसे जाऊ सखी री अब....’ गायला सुरुवात केली, की माझा आवाज ऐकून माझा भाऊ प्रवीण किंवा नंदू तिथे येत आणि मला म्हणत, ‘नेरलकरकाकांसारखा इतका चांगला गुरू लाभूनही तुझी गाडी मात्र पनिया भरन कैसे जाऊच्या पुढे सरकतच नाही...अग पुढली ओळ गा की, आठवत नाहीये का, अशी कशी मंद ग तू....’ मला त्या वेळी त्यांचा खूप राग यायचा. ते माझी मस्करी करताहेत हे कळायचंच नाही.
नाथरावांचं मन खूप मोठं होतं आणि मी एका अल्लड, समज नसलेल्या वयात त्या वेळी होते...त्यामुळे एका टप्प्यावर मला रियाजाचा, तेच तेच गायचा कंटाळा येऊ लागला...मग मी मला पुढल्या परीक्षेसाठी बसवा असा आग्रह धरू लागले. पण माझे स्वर पक्‍के झाल्याशिवाय नुसती परीक्षा देवून काही उपयोग नाही असं ते मला समजावू लागले. पण मला मात्र काहीही करून परीक्षेला बसायचंच होतं. अशा वेळी अगदी घराजवळ असलेला नाथरावांचा क्लास सोडून मी पं. उत्तमराव अग्निहोत्री यांच्याकडे सिल्लेखान्यात असलेल्या त्यांच्या क्लासला जाऊ लागले. पुढे पं. उत्तमराव अग्निहोत्री मुंबईला राहायला गेले. आता मी गाणं शिकायला नाथरावांकडे कसं परतू असं वाटायला लागलं. खरं तर मनातून त्यांच्यासमोर जायची लाजच वाटत होती. आई मला त्यांच्याकडे घेऊन गेली, तेव्‍हा तितक्याच मोकळेपणानं माझी चौकशी करत, ते म्हणाले उद्या कशाला आजपासूनच क्लास सुरू...त्यांनी कधीही मला मी त्यांच्याशी चुकीचं वागले याची जाणीवही करून दिली नाही. त्यांचं दिलखुलास वागणं, कोणाविषयीही आकसाची भावना न ठेवणं, आज प्रकर्षानं आठवतंय. खरं तर आमचंच नाही, तर क्लासला येणाऱ्या प्रत्येक व्‍यक्‍तीचं संपूर्ण कुटुंब त्यांचं होऊन जात असे.
कुठल्याही वयोगटाशी त्यांचं पटकन जमत असे. आणि शिकवणं म्हणजे फक्त शिकवणं कधीच नसे, तर त्या त्या वेळी एखादा किस्सा, त्या रागातली वेगळी बंदिश किंवा एखादी गझल, त्यातली वैशिष्‍ट्य ते उलगडून दाखवत. त्यांचं शिकवणं, जितकं खास होतं, तितकाच खास त्यांनी उभा केलेला माहोल असायचा. विख्यात नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री नाटकाचा शुभारंभाचा एक प्रयोग त्यांच्या घरी झाला, तेव्‍हा जणू काही तो आपलाच कार्यक्रम असल्यासारखी जय्यत तयारी त्यांनी केली होती.
नाथरावांना चांगलं चविष्ट खायलाही खूप आवडायचं. माझी आई स्वयंपाकात इतकी सुग्रण की भरल्या वांग्याची भाजी केली की आधी ती नाथरावांच्या घरी पोहोचत असे. लगेचच भाजीची चव घेऊन गाण्यातल्या खास जागेला जशी दाद द्यावी तसं नाथराव आईला म्हणत, ‘वाह, मंडलिकबाई, क्या बात है’....कुठलाही चांगला पदार्थ केला की आईला आपल्या गुरूंना पाठवल्याशिवाय चैन पडायची नाही.
त्यांची हेमा माझ्यापेक्षा लहान, पण ते मला हेमाप्रमाणेच वागवत. एका तासाचा क्लास, एक तास संपला की जा घरी, असं तिथे वातावरण कधीच नव्‍हतं. तुम्ही कितीही वेळ रियाज करू शकता....आज हे असं वातावरण मिळणं कठीणच! हेमा त्यांची खास लाडकी! हेमा त्या वेळी गाणं शिकायला, रियाज करायला कंटाळा करत असे. पण त्यांचा आपल्या मुलीच्या क्षमतेवर विश्वास होता. ते म्हणायचे, एके दिवशी आपोआपच तिला गोडी लागेल आणि झालंही तसंच. खेळात रमणारी हेमा, आपल्या वडिलांचं गाणं ऐकूनच तयार झाली. आपल्या तिन्ही मुलांना त्यांनी मित्रत्वाच्या नात्यानं वाढवलं. आज हेमानं आपलं स्वतंत्र नाव, स्वतंत्र अस्तित्व गायनाच्या क्षेत्रात निर्माण केलंय, त्यामागे नाथरावांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. मला आठवतं, पद्मपुऱ्यातल्या नवयुग कॉलनीतलं उपासनी कुटुंबही नाथरावांच्या घराचा एक हिस्साच होतं. त्यातली वंदना मला जास्त आठवते. पण तिन्ही बहिणी कलेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या...
कधी कधी ते आमच्या घरी चक्कर मारत. आमच्या दादांची आणि त्यांच्या गप्पांची मैफील जमत असे. विशेषत: ज्या वेळी आमच्या घरासमोर त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं, त्या वेळी....मग ते आपल्या बायकोवरही विनोद करायचे...म्हणायचे, आमची बायको, घरासाठी इतके कष्ट घेतेय, की भर पावसांतही ती छत्री घेऊन स्लॅबवर झाशीच्या राणीसारखी पाणी टाकायला येते....काकू मात्र त्यांच्या बोलण्यावर सौम्य हसत, त्या कधीही त्यांना उलटून तावातावाने प्रत्युत्तर देत नसत. नाथरावांच्या घरात सतत पाहुण्यांची, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असे. नाथरावांच्या पत्नी म्हणजे आम्ही त्यांना ‘काकू’ म्हणत असू किंवा ‘हेमाची आई’...त्यांच्या चेहऱ्यावर पाहुण्यांची सरबराई करताना कधीही कपाळावर आठी दिसली नाही. ते म्हणतात ना, ‘दो जिस्म एक जान’ तसंच काहीसं या जोडीकडे बघून वाटायचं. आपल्या बायकोविषयी त्यांना खूप प्रेम आणि आदर होता. जाहीररीत्या ते काकूंचं कौतुक करत. मला त्यांच्यातलं हे नातं खूप आवडायचं.
कधी कधी नाथराव नांदेडला असताना आपण नाटकात काम केल्याचे किस्से सांगत. देवमाणूस का कुठल्याशा नाटकाबद्दल ते आपण त्यातली नायकाची भूमिका कशी केली होती याबद्दल सांगत. त्यांचे नाटकाचे ते फोटोही मी बघितले होते. जयंत, अनंत आणि हेमा या आपल्या मुलांना कधी रागावलेलं, ओरडून बोललेलं मी कधी बघितलंच नाही. त्यांचं कुटुंब मर्यादित नव्‍हतंच मुळी, त्यात जयराम, शिवराम, तुंगा, उपासनी कुटुंब आणि आम्ही सगळे शिष्य सामील होतोच. 
माझ्या गाण्याच्या प्रवासात नाथरावांबरोबरच त्यांचे शिष्य, तुंगा, शिवराम, जयराम या सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. हा प्रवास शास्त्रीय संगीताच्या दिशेनं फार पुढे गेला नाही, याची खंत मनाला आहे. पण पुढे सामाजिक काम करताना चळवळीतली गाणी गाताना, कार्यकर्त्यांना शिकवताना, पथनाट्यात अशी गाणी रचताना, त्या शिक्षणाचा उपयोगही झाला. अनेक चढउताराच्या प्रसंगात या गाण्यानंच मनावर हळुवार फुंकर घातली हेही तितकंच खरं.
दसऱ्याची वाद्यांची पूजा, मैफिलींच्या वेळी नाथरावांच्या हॉलमधलं सजलेलं वातावरण, पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठीची त्यांची लगबग, परीक्षेच्‍या वेळी ‘तुला सगळं येणारच, विनाकारण घाबरू नकोस’ म्हणून खांद्यावर थोपटत धीर देणारा स्पर्श, सगळं काही आज खूप स्पष्टपणे आठवतंय...खरंच गाणं म्हणजे फक्त गाणं असं झापड लावून नाथराव जगले नाहीत, त्यांनी प्रत्येक गोष्टीत कला शोधून, तिच्यातलं सौंदर्य शोधून आनंद घेतला आणि पसरवलाही...एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे पं. नाथराव नेरलकर....नाथरावकाका, तुमच्या संगीतातल्या वैशिष्टयांबद्दल, गायकीबद्दल, तुमच्या आणि कुमार गंधर्वांच्या सान्निध्याबद्दल खूप जण भरभरून बोलतील...आणि ते सगळंच खूप सुंदर आहे. आनंद कसा वाटावा, जगणं समृध्द कसं करावं, कला ही जगण्याचा भाग कशी असावी हे तुम्ही तुमच्या जगण्यातून आम्हाला दाखवलंत, आणि खरोखरं ‘पं. नाथराव नेरलकर’ या नावाभोवती फिरणारं एक विलक्षण विश्व तुम्ही शून्यातून उभं केलंत... मला आज माझ्या आठवणीतले नाथराव दिसताहेत, माझ्याकडे तसेच हसून प्रसन्नपणे बघताहेत....खरं सांगू, तुम्ही कायमचे गेला नाहीतच, कारण तुमच्यासारखी माणसं आपल्या कर्तृत्वानं अमर असतात. आजही तुम्ही मनामनात आहात आणि यापुढेही असणारच आहात! 
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.