सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि किशोर गोष्टी
किशोर आयुष्यात आला आणि कायम सोबत करत राहिला. किशोरनं मनोरंजन केलं, चांगल्या-वाईटाची जाण दिली, मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून आणि आजी म्हणून सोबत केली. हो माझ्यासाठी मला गोष्ट सांगणारी माझी आजी म्हणूनही किशोरच होता/आहे. किशोर मासिक वाचत मग इतरही पुस्तकं आली, वाचली आणि मग एके दिवशी या किशोरनं चक्क ‘ये आपल्या कुटुंबात, तुझं स्वागत आहे’ असं म्हटलं. किशोर परिवारात प्रवेश करताच गोष्ट ऐकणारी मी, त्याच्याच कडून वारसा घेऊन अनेक मुलांना गोष्टी सांगायला लागले. किशोरमध्ये चित्रकारांवर, शिल्पकारांवर, साहित्यिकांवर मालिका करताना/लिहिताना रंगून गेले. कधी प्लंबर, तर कधी पंक्चर काढणारा, कधी शेतकरी तर कधी विद्यार्थी/विद्यार्थिनी फोन करू लागले, संवाद साधू लागले, मग काय, किशोरशी जवळीक अधिकच वाढली.
आणि मग बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांच्या तोंडून ‘किशोर गोष्टी’ सुरू होत असल्याचं ऐकलं. अर्थात व्हिडीओवरून हं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातल्या साहित्यिकांच्या तोंडून समस्त किशोरांना आणि मनानं किशोर असलेल्यांना दर शनिवारी गोष्टी ऐकवायचं ठरलं. हे सगळं ठरवणाऱ्या टीमचं मला इतकं कौतुक वाटलं की कोरोनाच्या सावटातही ते आपल्या किशोरांची काळजी घेत होते, नवं काही करू पाहत होते. यात या टीममध्ये अत्यंत सर्जनशील असा आमचा लाडका किरण केंद्रे हा किशोरचा संपादक आहे. चांगले विषय शोधणं, चांगल्या कथा/कविता निवडणं, चांगले लेखक/कवी निमंत्रित करणं, प्रस्थापित आणि नवोदित चित्रकारांची गुंफण करणं असं बरंच काही किरण करत असतो. आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला, कामाला न्याय देणारा, साहित्याला कायम बरोबर घेऊन जगणारा, म्हणूनच तर त्याच्या म्हणजे किशोरच्या कार्यालयात गेल्यावर त्याच्या टेबलसमोर ढीगभर पुस्तकं रचलेली बघायला मिळतात, त्यामागून किरण केंद्रे ही व्यक्ती शोधावी लागते. पुस्तकावर मनापासून प्रेम करत असलेली माणसं असली की काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोरचा किरण केंद्रे!
तर या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ५० साहित्यिकांना निमंत्रित करून गोष्टींचा कार्यक्रम किशोरवयीन मुला/मुलींसाठी करायचं असं या मंडळींचं ठरलं आणि आता आपल्याला किती आणि काय काय ऐकायला आणि बघायला मिळणारं या विचारानं मी आनंदून गेले.
आणि त्याच वेळी माझा मोबाईल खणाणला, मला बालभारतीच्या स्टुडिओत निमंत्रित केलं होतं, या सुवर्णमहोत्सवी उपक्रमात किशोरसाठी गोष्ट सांगायला....काही बाबतीत नकार देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कारण आवडता विषय असला, की कोरोनाच्या राक्षसाची भीतीही आड येऊ शकत नाही! आणि खरंच आपल्या बालवयातल्या आवडत्या मासिकात आपलंही काहीतरी योगदान होतंय यासारखी आनंदाची, सुखाची दुसरी भावना असूच शकत नाही. मला एकदम ‘लै भारी’ वाटलं.
मी बरोबर १०.३० वाजता किशोरच्या कार्यालयात पोहोचले. सेनापती रोडवरचा बालभारतीचा हा परिसर खूप सुरेख आहे. इमारतही देखणी की परकेपणा वाटतच नाही. विशेषत: इथलं परिपूर्ण असं ग्रंथालय...आपल्याच विचारात पावलं टाकत मी प्रवेश केल्याची तिथे असलेल्या रजिस्टर मध्ये नोंद केली आणि किरण केंद्रे पाटी बघून आत प्रवेश केला...किरणने हसून स्वागत केलं, पण माझं लक्ष बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या एका पांढऱ्याशुभ्र दाढीवाल्याकडे गेलं. पॅपिलॉन या पुस्तकानं कॉलेजवयात माझ्यावर मोहिनी घातली होती, मग बँको एका दमात वाचून काढलं होतं..अर्थात पॅपिलॉन जास्त भावलं, त्या पुस्तकाचे निर्माते लेखक रवींद्र गुर्जर. त्यानंतर डरकाळी फोडत आले पुस्तकपेठेचे संभा, काय दीपा कशी आहेस? तोंडावर मास्क असला, तरी वाघोबाचा चेहरा मी ओळखला...त्यानंतर शांत, सौम्य, मृदू व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका/कार्यकर्त्या रेणू गावस्करांनी प्रवेश केला. त्यांचं लिखाण आणि सादरीकरण नेहमीच आवडतं. आता आम्ही ‘हम पाँच’ म्हणण्यासाठी पाचव्या व्यक्तीची वाट बघत होतो. तेवढ्यात गुलाबी रंगाचा लखनवी ड्रेस घातलेली उर्जिता नावाची तरुणी आत आली.
किरण केंद्रेसह आम्ही बालभारतीच्या नव्या स्टुडिओमध्ये पोहोचलो. सुरेखशा तीन वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये आमचं रेकॉर्डिंग सुरू झालं. संभा गोष्टीवेल्हाळ माणूस, तर रवींद्र गुर्जर यांनी सांगितलेली गोष्ट उत्कंठा वाढवणारी असणारच होती. रेणूताईंनी सत्यजीत रे यांचे वडील सुकुमार राय यांनी लिहिलेली गोष्ट सांगितली. गोष्ट सादर करण्याची अफाट ताकद या बाईमध्ये आहे. ऊर्जिता या तरुणीशी आजच ओळख झाली, पण परकेपण जाणवलं नाही. तिने नैराश्य या विषयावरची आपली गोष्ट सहजसोप्या भाषेत सादर केली. मीही माझ्या पोतडीतून एक भारतीय शास्त्रज्ञ काढला.
खरं तर वेळ कुठे आणि कसा गेला कळलंच नाही. तर किशोरच्या मित्रांनो, येत्या शनिवारपासून दुपारी ११ वाजता जरूर बघा/ऐका. - सुरूवातीला गोष्टी सांगायला येणार आहेत रवींद्र गुर्जर, संजय भास्कर जोशी, रेणू गावस्कर, ऊर्जिता कुलकर्णी आणि दस्तुरखुद्द दीपा देशमुख!
थँक्यू किरण, थँक्यू किशोर!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment