समाजमाध्यमं, व्यसनं आणि मुलं
माझ्या ओळखीच्या कुटुंबातला चार वर्षांचा एक मुलगा मोबाईल कसा हाताळतो, त्याला त्यातली सगळी फंक्शन्स कशी येतात याबद्दल त्याचे पालक कौतुक करताना दिसले. त्यानंतर साधारणतः हाच मुलगा आठ वर्षाचा झाला असताना संध्याकाळच्या वेळी त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला आणि त्या वेळी त्याच्या मोबाईल वेडानं वैतागलेले त्याचे पालक त्याच्यासमोरच त्याची तक्रार माझ्याजवळ करत होते. त्या मुलाच्या चेहर्यावर त्या वेळी निर्विकार भाव होते. मी त्याच्याशी बोलावं म्हटलं तर रागाने टीपॉयवर मोबाईल आपटून तो तिथून चालता झाला.
घरी परतल्यापासून हाच विषय डोक्यात थैमान घालायला लागला होता. शालेय मुलांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनांच्या अनेक बातम्या डोळ्यासमोर फेर धरून नाचत होत्या. वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलेल्या एका सर्व्हेक्षणुसार देशभरातले शहरी आणि ग्रामीण १० ते १६ वयोगटातले जवळ जवळ ७० टक्वे विद्यार्थी सिगारेट, बिडी, गुटखा, पानमसाला, तंबाखूयुक्त पदार्थ यांच्या आधीन झालेले आहेत. ही मुलं फक्त सरकारी शाळांमधली नसून महागडी फीस असणार्या शाळांमधलीही आहेत. सुरुवातीला गंमत, मग पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष, मनात तयार झालेल्या न्यूनगंडावरचा उपाय म्हणून, त्या त्या गोष्टींविषयीचं कुतूहल आणि आकर्षण यातून हळूहळू या व्यसनांची सवय मुलांना लागलेली दिसली आणि ही व्यसनं केवळ या मादक पदार्थांपुरतीच सीमित राहिली नाहीत तर आता मोबाईल आणि त्यावरून मिळणार्या अनेक गोष्टींचीही लागली आहेत. हीच व्यसनं मुलांना गुन्हेगारीकडे नेताना दिसताहेत.
शालेय वयात उज्ज्वल भविष्य घडवायचंय, उद्याचा सुजाण नागरिक बनायचंय ही जाणीव रुजवण्यात पालक आणि शाळा कमी पडत चालल्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधले संबंध केवळ शाळेपुरतेच मर्यादित दिसतात. पालक आणि शाळा यांच्याइतकाच मोठा सहभाग मुलांच्या जडणघडणीत आसपासच्या परिस्थितीचा, प्रसारमाध्यमांचा आणि समाजाचाही असतो/आहे. टीव्हीवर अनेक चॅनेल्सचा सुळसुळाट आणि त्यावर दाखवल्या जाणार्या मूल्यहीन मालिका आणि व्यसनांकडे वळावं असं वाटणार्या जाहिराती! या जाहिराती करणार्या व्यक्ती नामांकित खेळाडू, अभिनेते अशा प्रकारच्या सेलिब्रिटी व्यक्ती असतात. (न की संशोधक, वैज्ञानिक, कलाकार, साहित्यिक) आज त्याच आमचा आदर्श असल्यामुळे त्या जे करतील ते योग्यच अशी अर्धवट वयात मुलांची मनोधारणा बनते. गंमत म्हणजे ज्या घरातले पालक मुलांना 'हे चांगलं हे वाईट' असा डोस वेळ मिळेल तेव्हा देत असतात, तेच पालक व्यसन करताना मुलांना दिसतात.
हा सगळा विचार करत असताना मला त्या आठ वर्षांच्या मुलाचं मोबाईल वेड डोळ्यासमोर आलं. सुस्थितीत असलेल्या घरांमधून मुलांना मोबाईल, आयपॅड हाताळायला मिळत आहेतच, पण साधारण परिस्थिती असलेली मुलंही आपल्या पालकांचे मोबाईल फोन घेऊन खेळताना दिसतात. यात मग वेगवेगळे खेळ त्यांना आकर्षित करत असतात. इंटरनेट असल्यानं जे बघायला नको अशा अनेक गोष्टी मुलं चवीनं बघत राहतात. व्हॉट्सऍप वगैरेंमुळे फॉर्वडेड मेसेजेसचा सुळसुळाट असलेल्या गोष्टींवर कुणाचंही नियंत्रण नसल्यानं त्या मेसेजेसची शहानिशा न करता त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. सतत वापरला जाणारा मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि इतर अनेक साईट्स आणि ऍपस् यांच्यामुळे अनेक विकारांनाही निमंत्रण दिलं जात आहे. कॅन्सर, स्मृतिभ्रंश आणि वेगवेगळया प्रकारचे मनोविकार मुलांवर आक्रमण करताहेत. आभासी जगात रमण्याच्या सवयीमुळे वास्तवापासून मुलं दूर होत चालली आहेत. आभासी जगात ही मुलं गाडीची रेस असो वा खेळ त्यातल्या सगळ्या पायर्या पार करत यश मिळवतात, मात्र त्याच वेळी मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले मैदानी खेळ आता जवळजवळ मुलांच्या जीवनातून हद्दपारच झालेले दिसताहेत.
तंत्रज्ञानानं केलेली प्रगती मानवी जीवनाच्या कल्याणाकरता वापरायची आहे की नाही हेच आता सगळ्यांनी मिळून ठरवायला हवंय. या मुलाच्या हातात कौतुकानं मोबाईल देतानाच त्याच्या पालकांनी त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचं महत्व आणि जबाबदारी दोन्हीही समजून सांगितलं असतं तर? मुलांचा पहिला गुरू पालक आणि दुसरा गुरू त्याचे शिक्षक म्हटलं जातं. शाळांमधून मुलांशी हितगुज करणारे, त्यांचा मित्र होऊन त्यांच्याशी संवाद करणारे समुपदेशक मार्गदर्शक मुलांना आज हवे आहेत.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment