बॅरोमीटर आणि चार मोगॅम्बो!
सकाळी साडेनऊ वाजता 'बॅरोमीटर' या सुरेखशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही चार जण भेटलो. म्हणजे आज भेटायचं ठरलंच होतं. १०० वा वेध पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात संपन्न होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी गेले कित्येक दिवसांपासून जोरात सुरू आहे. त्यातलाच एक प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी आजची भेट आवश्यकच होती. कुठल्याही प्रसंगी ‘मै हूँ ना’ असं आश्वासकपणे सांगणारे डॉ. आनंद नाडकर्णी ठाण्याहून आले होते. मृदू हळुवार व्यक्तिमत्व लाभलेले दीपक पळशीकर नेहमीप्रमाणे वेळेत उपस्थित होतेच. आपल्या कामाला शांतपणे पण यशस्वीपणे पूर्णत्वाला नेणारा यमाजी मालकर हा मित्र तोही हसतमुखानं स्वागताला उभा होता. आणि मी - मला तर नेहमीच या तिघांना भेटायला आवडणारच होतं!
सीटीप्राईड कोथरूड जवळ असलेल्या डॉक्टरांच्या खास आवडत्या 'बॅरोमीटर'मध्ये आम्ही प्रवेश केला. मला तिथलं वातावरण एकदम आवडलं बुवा. दिल खरोखरंच खुश हो गया़. एखाद्या आदिम काळातल्या गुहेत आपण आलो आहोत, तशा काळसर करड्या भिंती, त्यावर तारेच्या साधनांची सजावट, मंद दिवे, एखाद्या युरोपियन देशात आपण आलो आहोत असा भास व्हावा असं संगीत आणि त्याला साजेसं वातावरण. लोकही तसेच, तिकडचे वाटावेत असे. मात्र रेस्टॉरंटमधला स्टाफ दिसायला स्मार्ट हायफाय असला, तरी छानपैकी मराठीत बोलत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली आणि मिटिंगची सुरुवात केली.
यमाजी, पळशीकर सर आणि मी - आमचा प्रकल्प पुढे कसा जात आहे याबद्दल आम्ही डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टरांबरोबरची मिटिंग खूप काही घडवणारी असली तरी त्या मिटिंगला औपचारिकतेचा वास नसतो. आणि कोणीही चेहरे गंभीर करून भाषणबाजी करत नाही. त्यामुळे मनावर कुठलाही ताण न घेता मस्त हसतखेळत आम्ही जणू काही गप्पा मारत होतो. मग शेवटच्या टप्प्याकडे जाताना डॉक्टरांनी हा प्रकल्प लोकांसमोर येण्यासाठी तांत्रिक बाजूंचं काय काय बघावं लागेल, सप्टेंबर महिन्याच्या वेधच्या पहिल्या दिवशी व्यासपीठावर जे कार्यक्रम आखले आहेत त्यात हाही कार्यक्रम कशा प्रकारे आपण करणार आहोत याबद्दल मस्तपैकी चर्चा केली. (वेध च्या कार्यक्रमात हा सगळा उलगडा तुम्हाला होणार आहेच!)
बघता बघता चविष्ट, स्वादिष्ट, रूचकर वगैरे वगैरे असलेला सगळ्यांचा नाश्ता आला. 'बॅरोमीटर'च्या स्टाफमधल्या गोड तरुणीनं या प्रसंगांचे आमचे फोटोही काढले. तृप्त होत आम्ही 'पुन्हा लवकरच भेटू' म्हणत 'बॅरोमीटर'चा निरोप घेतला. तिथून निघताना चारही मोगॅम्बो खुश झालेले होते!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment