मुलांना सतत शिकवू नका, शिकण्यासाठी प्रेरित करा - राजीव तांबे

मुलांना सतत शिकवू नका, शिकण्यासाठी प्रेरित करा - राजीव तांबे

तारीख

दिल्लीचे पुढचे पाऊल आणि दिल्ली मैफील यांनी आयोजित केलेला आमचा कालचा कार्यक्रम छान झाला. प्रफुल्ल पाठक, डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि निवेदिता यांनी आमचं स्वागत केलं. 
मी राजीव तांबेची मुलाखत घेतली. राजीव तांबेंनं पालकांवर, शिक्षकांवर मारलेले छट्कार बघण्यासारखे आणि ऐकण्यासारखे होते. कसं वागावं हे तो अनेक प्रसंग सांगत, हसवत, कोपरखळी मारत समोरच्याला सांगतो आणि खळखळून हसणारा समोरचा काहीच क्षणात अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो. नेमकं आपलं कुठे चुकतंय, चुकलंय हे ऐकणाऱ्याला कळतं आणि राजीव हे काम अगदी सहजतेनं करतो. कुठेही उपदेशकाचा भाव त्याच्या मनात नसतो, की मी कोणी टिकोजीराव आहे आणि माझंच ऐका असा अविर्भावही नसतो. साहित्य अकादमी ने त्याला गौरवलेल आहे, 100 पेक्षा जास्त संख्यने लिहिलेली त्याची पुस्तकं 28 भाषांमधून अनुवादित झाली आहेत.
मी आणि राजीव - आमच्या दोघांची मैत्री बालपणीची मुळीच नाही, पण ज्या टप्प्यावर मैत्री झाली त्या वेळी आम्ही ५-६ वर्षांची मुलं होऊन अक्षरश: भांडलो होतो, त्यानं अरे म्हटलं की माझं कारे तयारच असायचं. इतक्या लहान मुलांसारखं भांडणारा राजीव स्वत:मधलं लहान मूल जपताना मला दिसला. म्हणूनच तो महाराष्ट्रातल्या समस्त मुलांचा मित्र आहे. त्यांचं प्रतिनिधित्व तो करतो. 
आमच्या मुलाखतीत कुठलीही औपचारिकता नव्‍हती. सहजगप्पा होत्या. मी सुरुवातीलाच त्याला विचारलं, तू गणित आणि विज्ञान विषयांत नापास होणारा मुलगा, तू याच विषयांवर शिक्षकांची कार्यशाळा कशी घेऊ शकतोस, मुलांना हेच विषय कसे शिकवू शकतोस...पहिलाच प्रश्न प्रतिमा हनन करणारा होता, त्याच्या जागी दुसरा असता, तर संतापानं त्याचा तिळपापड झाला असता. पण तसं काही न होता राजीव म्हणाला, अग तू चुकतेस दीपा, मी विज्ञान, गणित या दोनच विषयात नाही तर संस्कृत, इंग्रजी अशा सगळ्याच विषयात नापास व्‍हायचो. नापास झालो म्हणून घरी मार.. आणि शाळेतही मार...त्यामुळे मला शाळा कधी आवडलीच नाही.
राजीवनं बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या की ज्याचा गांभीर्यानं विचार सर्वांनाच करावा लागेल. तो म्हणाला, कधीतरी एखादा मुलगा, ‘उद्या गणिताचा पेपर आहे अहाहा’ असं म्हणताना ऐकलंय का? का होतं असं? तसंच पालक मुलांवर ज्या अपेक्षा लादतात त्याविषयी बोलताना तो म्हणाला, आपण मुलांना जे सांगतो, प्रत्यक्षात आपण तसे वागतो का हे तपासायला हवं. मी जेव्‍हा बाहेर जायला निघतो, तेव्‍हा मुलानं कुठे चाललात असं विचारलं तर मी त्याच्यावर डाफरतो आणि म्हणतो, बाहेर निघताना कुठे चालला असं विचारू नये एवढी अक्‍कल नाही तुला, आता माझं काम होणार नाही, वगैरे वगैरे...पण त्याच वेळी मुलगा बाहेर जात असला तर हाच पालक म्हणतो, कुठे चाललास, कधी येणारेस, जायची गरज आहे का, बस घरातच....हे दुटप्पी वागणं किती योग्य आहे?
राजीवनं त्याच्या गंमतशाळेतले वेगवेगळे प्रयोग, युनिसेफमधलं काम, प्रथममधलं काम, पालक आणि शिक्षक यांचे वेगवेगळे किस्से याविषयी सांगितलं. मला स्वत:ला तर त्याचा सजीवनिर्जीवचा किस्सा कायमच आवडतो. आणि प्रत्यक्षात असं घडलेलं आहे. राजीव जेव्‍हा एका शाळेत गेला, आणि मुलांना पाठ समजला आहे की नाही बघण्यासाठी त्यानं आधी तो पाठ बघितला. त्यात सजीवांची लक्षणं काय दिली होती. सजीवाची वाढ होते, सजीवाला अन्न लागतं, सजीव हालचाल करतात वगैरे. मग राजीवनं विचारलं, तुमच्या शिक्षकांची वाढ होते का, मुलं म्हणाली, रोज तर ते तसेच दिसतात. त्यांच्यात वाढ झालेली आम्ही तरी बघितली नाही. मग राजीवनं विचारलं, त्यांना अन्न लागतं का, मुलांनी पुस्तकात सजीवांना अन्न लागतं याखाली खूप पदार्थ असलेली एक थाळी बघितली होती. तशी खाताना त्यांना त्यांचे शिक्षक कधीच दिसले नव्‍हते. त्यामुळे मुलं म्हणाली, ते डबा खातात. राजीवनं विचारलं, तुमचे शिक्षक सजीव आहेत की निर्जीव? मुलं म्हणाली, निर्जीव. नंतर राजीवनं एक फुगा घेऊन फुगवला, त्या वेळी मुलं म्हणाली, याची वाढ झाली हा सजीव आहे. या सजीवनिर्जीव प्रकरणानं इतका गोंधळ झाला की जेव्‍हा राजीवनं मुलांना सांगितलं, तुमच्या घरात बाबा, आई, काका, काकू कोण कोण सजीव आहे ते बघा, विचारा आणि लिहून आणा. दुसऱ्या दिवशी हातामध्ये सोन्याचं कडं, गळ्यात सोन्याची साखळी घातलेला एक राकट माणूस शाळेत आला आणि म्हणाला, मी टेल्कोमध्ये आहे. राजीव म्हणाला, ठीक आहे. आपल्याला त्याच्या टेल्कोत असण्याचं काय करायचंय हे त्याला कळेना. तो मनुष्य म्हणाला, राजीव तांबे तुम्हीच का, राजीवनं हो सांगितलं. आता हा आपल्याला मारणार की काय ही भीती मनात होतीच. तो म्हणाला, तुम्ही आमच्या मुलांना कायपण प्रश्न सोडवायला सांगता आणि मुलं आमचं डोकं खातात. कारण आदल्या दिवशी रात्री बारा वाजता ड्यूटी संपवून घरी आल्यावर त्याची वाट बघत असलेल्या मुलीनं लगेच त्याला विचारलं, तुम्ही सजीव आहात का, काका सजीव आहेत की निर्जीव... तो मनुष्य म्हणाला, हे बघा साहेब, असल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही एक सजीवनिर्जीव वर पुस्तक लिहून टाका. कसं?
हा एकच किस्साच नव्‍हे तर ९८१ भागिले ९ हा किस्सा देखील अनेक ठिकाणी गाजला होता. आठवी इयत्ता शिकणारे विद्यार्थी नव्‍हे तर बहुसंख्य शिक्षकांनी ९८१ भागिले ९ चं उत्तर १९ असं दिलं होतं. 
मुलांना त्यांची चूक दाखवण्यापेक्षा ते चांगलं काय करताहेत याचं कौतुक करायला हवं. पण पालक सतत तक्रारीचा पाढा त्यांच्यासमोर आणि त्यांच्यामाघारी वाचत असतात. मुलांना छ हे अक्षर शिकवताना राजीवनं शाळेच्या समोर लागलेल्या कुछ कुछ होता है हे पोस्टर बघून पाच वेळा लिहून आणायला सांगितलं. मुलांना छ हा कुछ कुछ होता है वरून कळला. मात्र अनेक पालक बिथरले. आपल्या इतक्या लहान मुलाला कुछ कुछ होता है कसं काय हा शिकवतो. त्यांनी राजीवला जाब विचारला, राजीवनं त्या वेळी कुछ कुछ होता है, हे तुम्हाला होतं, मुलांना नाही, असं सांगितलं. मुलं मनानं निरागस आहेत. त्यांना शिकवताना तू शाहरूख खान आहेस म्हटलं की ते खुश होतात आणि पटकन शिकतात. मुलांना उत्तेजन देण्यासाठी काय करायला हवं याच्या अनेक युक्त्या राजीवनं सांगितल्या. कमल पाणी भर, छगन पाणी भर यासारखी पाठ्यपुस्तकातली वाक्य वाचून किंवा लिहून मुलं पकतात. कारण कमल पाणी भर, छगन पाणी भर हे पाणी भरल्यानंतर काय करायचं हे त्यांना कळत नाही आणि त्यांना त्यात रसही नसतो. पण त्यांना त्यांच्या आवडीच्या इंटरेस्टिंग विषयावर लिहायला किंवा बोलायला सांगितलं की ते चटकन ती गोष्ट शिकतात.
कालच्या कार्यक्रमात ये दिल मांगे मोअर सारखी अवस्था प्रत्येकाची झाली. कार्यक्रम संपल्यानंतर मला अनेक व्‍हॉट्सअप मेसेजेस आले, फोनकॉल्स आले आणि सगळ्यांनी आपल्याला या कार्यक्रमातून खूप काही मिळालं असं सांगितलं. काही शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका सामील झाल्या होत्या, तर औरंगाबादहून माझ्या दोन मैत्रिणीही होत्या. नांदेडहून, पुण्यातून, बारामतीहून अनेकजण/जणी होतेच. काही पालकांनी आपलं कुठे चुकतंय हे आज कळलं सांगितलं, काहींनी इतक्या सहजपणे इतका महत्वाचा विषय हाताळला जाऊ शकतो याची आम्ही कल्पनाच केली नव्‍हती असंही सांगितलं. काहींनी स्वत:चे काही अनुभव मला सांगितले.  पालकांसाठी एक सत्र घ्यावं अशी आग्रहाची विनंती अनेकांनी केली. दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण राजीव तांबेंना घेऊन असा कार्यक्रम करूया असं आयोजकांनी सांगितलं.
कालच्या कार्यक्रमात राजीव छा गया था. त्याला थँक्यू कशाला म्हणायचं नाही का, कारण वो तो अपुनका दोस्त है ना. 
माझ्या मैत्रिणीची एक प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून देते. 
दीपा ,
कार्यक्रम खूपच उस्फुर्त आणि खळाळत्या उत्साहात झाला. अगदी धबधब्याखाली उभा राहून धुवून, घासून -पुसून,म्हणजे scrubbing होवून निघाले आम्हां पालकांचे मेंदू !! आणि ते ही हसत हसत।!! एवढा उत्साह एवढी ऊर्जा बाप रे .. अगदी लहान मुलांमधे असते तशीच energy  राजीव तांबे सरांकडे आहे ग. तू म्हणालीस तसं त्यांच्यामधे एक छोटं मूल आजही तसच आहे त्याचा अनुभव घेतला आज आम्ही सर्वानी. त्यांच्याशी खूप बोलायचे आहे मला या विषयांवर.
कारण या सगळ्यां व्यवस्थेवर वैतागूनच मीं जीविधाला घरी शिकवायला सुरुवात केली तीला शाळेत पाठवले नाही पहिलें काही वर्ष. पण सामाजिक द्रुष्टीने मुलं तयार व्हावीत आणि एका वयाच्या मुलांमध्ये त्यांची वाढ व्हावी म्हणून मुलांना शाळा असायलाच हवी. परंतु शाळा आणि शिक्षण कसे असावे हे फारच छान रीतीने तांबे सरांनी समजावले. त्यांचे कितीतरी असे अनुभव आणखीन ऐकतच रहावे असे वाटतं होते. खरोखरच आपण पालक म्हणून आधी स्वतःला प्रश्न विचारू यांत. स्वतःला सुधारू यांत.
आणि मीं माझ्या मुलीला तुझं चुकले आहे असे बहुधा म्हणत नाही परंतु कधी कधी अनवधानाने म्हटले असले, तरी इथून पुढे जाणीवपूर्वक तुझे हे  चुकले, हे असं नाही असं  हवं होतं असं कधीच म्हणणार नाही.
तू नेहमीच हसतखेळत आणि खुलवत समोरच्याला बोलते करते तसेच आजही केलेस. तुमच्या दोघांमध्ये बोलतांना औपचारिकपणा नसल्यामुळे आम्हालाही अत्यंत अनौपचारिक असा अनुभव मिळाला उगीचच गंभीर चेहरे करून प्रोटोकोल्स पाळत बसावे लागले नाही. त्यामूळे तुमचे दोघांचे  आभार.
राजीव तांबे सर यांच्या कामाबद्दल आदर होताच तो आणखीन वाढला. तुझे कौतुक तर आहेच.  पुढच पाऊल, मैफिल , ज्ञानेश्वर मुळे सर प्रफुल्ल सर, निवेदिता madam अश्या सुंदर कार्यक्रमासाठी आपले मनापासून आभार आणि पुढच्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा.
डॉ. सुवर्णसंध्या .
अशा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. सगळ्यांचे मनापासून आभार. शेवट करताना फक्त दोन गोष्टी सांगाव्‍या वाटताहेत. त्या सांगून थांबते....
आज सकाळी माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलेली ही गोष्ट. तिच्या अगदी जवळच्या व्‍यक्‍तीच्या घरात नुकताच घडलेला प्रसंग - त्या घरात ६-७ वर्षांच्या त्यांच्या मुलीसाठी त्यांनी तिच्या हट्टापोटी एक कुत्रा पाळायचं ठरवलं आणि एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घरात आलं. ही चिमुकली मुलगी केसांना लावतात ते हेअरबँन्ड घेऊन जमिनीवर बसली होती. ते दोन्ही रबरबँड तिनं काढून खाली ठेवले आणि तिथेच ती विसरून उठून निघून गेली. काही वेळानं तिनं बघितलं, ते छोटसं कुत्र्याचं पिल्लू आलं आणि ते रबरबँड त्यानं अन्न समजून खाल्ले. मुलीनं लगेचच आपल्या पालकांना ही गोष्ट सांगितली. त्यावरची प्रतिक्रिया म्हणजे, त्या मुलीला सगळ्यांनी शब्दांनी धो धो धुतलं. तुला कळत नाही का, तुझ्यासाठी ते पिल्लू घरात आणलंय ना, तुझ्यामुळे त्याला काही झालं तर, एवढी कशी साधी अक्कल तुला नाही, वगेरे वगैरे...ती मुलगी स्वत:ला अपराधी समजायला लागली आणि धाय मोकलून रडली. घरातल्यांनी मग त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या पोटात गेलेले रबरबँड काढण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन उलट्या होण्याची औषधं आणली आणि त्या इवल्याशा पिल्लाला पाजली. उलट्या करून करून ते पिल्लू दमून गेलं आणि अखेर ते रबरबँड उलटीद्वारे बाहेर पडले.
मैत्रीण खूप अस्वस्थ झाली होती. ती म्हणाली, दीपा, ती मुलगी आणि ते पिल्लू दोघंही किती लहान आहेत, त्यांना चांगलं वाईट काहीही कळण्याचं त्यांचं वय नाही. त्या मुलीकडून अनवधानाने ते रबरबँड जमिनीवर राहिले आणि त्या पिल्लालाही ते खाऊ नयेत ही समज नाही. अशा वेळी ही गोष्ट लहानच नव्‍हे तर मोठ्यांकडूनही घडू शकली असती. पण घरातल्या लोकांनी त्या मुलीला असं काही वागवलं की आयुष्यात या गोष्टीचा, घटनेचा तिनं धसका घ्यावा. तसंच त्या पिल्लाला जनावरांच्या डॉक्टरकडे नेऊन दाखवणं आणि विचारणं ही गोष्ट करण्याऐवजी मनानंच अघोरी उपाय करत बसले हे लोक. अगदी त्या पिल्लाच्या तोंडात बोट घालून त्याला उलटी करण्यासाठी उद्युक्त करत राहिले. काय म्हणावं यांना?
तिनेच सांगितला दुसरा प्रसंग खूपच शिकण्यासारखा आहे. एका बाईने एक कुंडी विकत आणून आपल्या बाल्कनीत ठेवली. या कुंडीतल्या रोपाला रोज फुलं यायला सुरुवात झाली होती. रोज एक कळी त्यावर यायची आणि तिचं फूल झालं की ती बाई आपल्या देवघरातल्या गणपतीच्या मूर्तीवर ते फूल वाहायची. तिच्या लहानशा मुलीनं विचारलं, तू असं का करतेस? त्या मुलीला आईचं रोज त्या झाडावर डुलणारं फूल तोडलेलं आवडत नव्‍हतं. तिची आई म्हणाली, अग, गणपतीला फूल मिळावं म्हणून तेवढ्यासाठी तर ती कुंडी मी त्या रोपट्यासह विकत घेतली. दुसऱ्या दिवशी त्या बाईनं पूजेची तयारी केली आणि बघितलं तर देव्‍हाऱ्यात गणपतीची मूर्तीच नाही. बाई घाबरली आणि शोधायला लागली. गणपतीबाप्पा कुठेच दिसेनात. आपल्या मुलीला हाका मारत ती बाल्कनीत आली, बघते तर काय, कुंडीमध्ये तिला गणपतीची मूर्ती दिसली, त्याच्या डोक्यावर कुंडीतल्या रोपट्याचं फूलही डुलत होतं. तिथेच तिची मुलगी उभी होती, मुलगी म्हणाली, बघ आता गणपतीलाही फूल मिळेल आणि झाडाचं फूलही तोडावं लागणार नाही!
दीपा देशमुख, पुणे.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.