विनोबा, गांधी आणि मनोविकास
पुस्तक वाचून एखादी व्यक्ती जेवढी उलगडत नाही, तितकी ती एखाद्याच्या वाणीतून उलगडते. असाच प्रत्यय ९ आणि १० जानेवारी या दोन दिवसांत डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून आला. महिन्याभरापूर्वीच अरविंद पाटकरांनी 'आम्ही सारे' आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्याविषयी मला विचारलं, तेव्हा येण्याचं मी कबूल केलं होतं.
डॉ. आनंद नाडकर्णीं म्हणजे उत्साहाचा अविरत कोसळणारा धबधबा! हा माणूस कधी थकतो असा प्रश्न मनाला पडतो. इतका सकारात्मक, इतका कार्यमग्न, इतका निर्मळ मनाचा ............अशी सद्गुणांची यादी वाढतच जाणारी. प्रत्येक वेळी डॉक्टरांबद्दल कितीही बोललं तरी आणखी काहीतरी बोलायचं राहिलंय असंच वाटत राहावं अशी ही व्यक्ती!
जगाच्या, भारताच्या, इतिहासात डोकावून बघायचं झालं, तर डॉक्टरांचं बोट पकडून त्या दालनात पाऊल टाकावं हे मात्र खरं! इतिहास रम्य, अद्भुत, शिकवणारा, घडवणारा कसा आहे हे डॉक्टर सहजपणे सांगून जातात.
गीताई वाचली होती, विनोबांविषयी काही लेख वाचले होते. मात्र अशा रीतीनं मला विनोबा कधीच समजले नसते, जे या दोन दिवसांत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी उभे केले.
डॉक्टरांना विनोबांनी कसं झपाटून टाकलं हे सांगताना त्यांनी विनोबांची अनेक वैशिष्ट्यं सांगितली. विनोबांची शब्दांची निवड आणि त्याचे अर्थ विलक्षण असत. साहित्य कशाला म्हणायचं...जे सहित राहतं ते साहित्य; हिंदू कोणाला म्हणायचं....हिंसेनं जो दुःखी होतो तो हिंदू....मोक्ष कशाला म्हणायचं...तर मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष; मोह कशाला म्हणायचं, उथळ, संकुचित देहबुद्धीचे विचार म्हणजे मोह.....सुख म्हणजे काय, ज्याच्या मनाचं आकाश विस्तीर्ण आहे तिथे सुख आणि ज्याच्या मनाचं आकाश मळभलेलं आहे ते दुःख.....अशा अनेक व्याख्या ऐकून 'अरे, हे किती सोपं आणि छान आहे' असे भाव मनात उमटत गेले. विनोबा म्हणत, 'माझ्याजवळ मतं नाहीत, माझ्याजवळ विचार आहेत आणि विचारांची देवघेव होत असते. विचार मोकळे असतात, त्यांना तटबंदी नसते. (विचारांची तटबंदी म्हणजे पूर्वग्रह!)' गुणाधीन - गुणातीत, सादर-निरादर अशा अनेक शब्दांत दडलेले अर्थ डॉक्टरांनी विनोबांच्या भाषेत सांगितले.
स्वतःमधल्या गुणदोषांकडे कसं बघावं हे सांगताना त्यांनी, न्यूनगंड आणि अहंगंड सांगताना कॅपिटल आय आणि स्मॉल आय यांच्यातला फरक सांगितला. या दोन आय मधले झोके जेवढे जास्त होतील, तेवढा माणूस अस्वस्थ असेल. देव आणि राक्षस या संकल्पनेबद्दल बोलताना डॉक्टरांनी 'देतो तो देव आणि राखतो तो राक्षस' अशी साध्या शब्दांत व्याख्या केली. समाधानामध्ये खरी समाधी असते. विनोबांचा खास शब्द 'वृत्ती' यावरही त्यांनी सांगितलं. पाठांतर आणि पाठ्यवृत्ती यातला फरक सांगितला.
आत्मविकासाविषयीचे विनोबांचे विचार सांगितले. 'ईश्वर म्हणजे सद्भावना, लहानशा वस्तूत सार्या विश्वाला अनुभवणं म्हणजे मूर्तिपूजा!' ते म्हणतात, 'योजनापूर्वक नवीन मूर्ती बनवून तिची स्थापना करण्याची माझी वृत्ती नाही. पण जमिनीतून हाती आलेल्या मूर्तीला दगड म्हणण्याइतपत मी दगड नाही.' जेवढे आत्मकेंद्री बनाल, तेवढे गुदमराल. 'मी' पणा कमी करायला हवा. विनोबांविषयी बोलताना मुक्ती, अंत्योदय, कार्यकर्ता, सौंदर्यदृष्टी आणि अब्राहम मॅस्लॉव्ह अशा अनेक गोष्टींबद्दल बोलणं झालं.
दुसर्या दिवशी गांधीजींबद्दल डॉक्टर बोलले. विशेषतः दांडीयात्रेबद्दल! गांधीजींमधला व्यवस्थापक कसा ग्रेट होता याविषयी त्यांचं नियोजन ऐकून थक्क व्हायला झालं. मार्टिन ल्यूथर किंगवर असलेला गांधीजींचा प्रभाव आणि त्यांच्या प्रेरणेतून त्याच्या हातून घडलेलं काम, आईन्स्टाईन गांधीजीविषयी काय म्हणत असे अशी सुरुवात होत होत डॉक्टरांनी दांडी यात्रेच्या आधीची त्या वेळची परिस्थिती काय होती हे आधी सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञान त्या काळी विकसित झालेलं नसतानाही संवादासाठी (कम्यूनिकेशन) गांधीजींनी कुठले प्रकार अवलंबले हे ऐकतानाही अचंबित व्हायला झालं. दांडीयात्रेसाठी गांधीजींनी मीठच का निवडलं, तसंच गांधीजींचं नियोजन हे कागदावर नसून ते त्यांच्या मनःचक्षुसमोर कसं तयार असायचं, याची रोचक कहाणी डॉक्टरांनी सांगितली.
मीठाच्या बाबतीत पहिल्यांदा कायदा करणारा राजा शिवाजी कसा होता हेही डॉक्टरांनी सांगितलं. दांडीयात्रेचं नियोजन करताना अगदी सुरुवातीला ते फक्त महादेवभाई देसाई, सरदार पटेल, मोहनलाल पंड्या आणि रवीशंकर या चौघांनाच ठाऊक होतं. त्यानंतर गांधीजी आपल्या आश्रमात याविषयी बोलले. दांडीयात्रेचा मार्ग निश्चित करणं, त्या मार्गातल्या खेड्यांतल्या लोकांना प्रशिक्षित करणं, यात प्रत्येकानं स्वइच्छेनं सामील व्हायचं, तसंच एखाद्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी काँग्रेसवर राहणार नाही हे स्पष्ट करणं (स्वतःच्या इच्छेनं यात सामील होणं, मृत्यूची तयारी) हे काम सुरू असतानाच त्या त्या मार्गावर संडासची निर्मिती, जखमींची सेवा-सुश्रुषा, कुठल्या वेळी यात स्त्रिया सामील झाल्या, असे अनेक मुद्दे डॉक्टरांनी उलगडून दाखवले. मायक्रो आणि मॅक्रो लेव्हलवरचं गांधीजींचं नियोजन किती सूक्ष्म होतं हेही डॉक्टरांनी सांगितलं. दांडीयात्रेतल्या जगाला माहीत नसलेल्या अब्बासनसारख्या अनेक लोकांचं दांडीयात्रेतलं योगदान याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं.
या दांडीयात्रेनं भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला स्वतःची इच्छाशक्ती दिली. डॉक्टरांनी अक्षरशः आपल्या वाणीतून त्या दांडीयात्रेतला एक एक दिवस समोर उभा केला. एखादी महफिल रंगत जावी तसा अनुभव आम्ही सर्वांनीच घेतला. विनोबा आणि गांधी यांना समजून घेताना डॉक्टरांच्या प्रत्येक बोलण्यागणिक श्रोत्यांमधून ‘वा’ अशी दाद आपसूक बाहेर पडत होती.
महाराष्ट्रातून विशेषतः विदर्भातून बहुतांशी लोक या कार्यशाळेसाठी आले होते. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर यांचा पुस्तकांचा स्टॉल दुसर्या दिवशी लागला होता. अनेकांनी 'भारतीय जीनियस' आणि 'तंत्रज्ञ जीनियस'चे संच विकत घेतले, तेव्हा अर्थातच 'फिल गूड'!
पुनश्च अशी कार्यशाळा झाली, तर जरूर जरूर अटेन्ड करा. गांधी विनोबा समजून घ्यायचे असतील तर ते डॉक्टरांच्या वाणीतूनच समजून घ्यावेत हे मात्र खरं!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment