आठवडी बाजार

आठवडी बाजार

तारीख

लहानपणी वडिलांबरोबर (वडलांना आम्ही दादा म्हणत असू) आठवडी बाजारात भाजी आणायला जात असे, त्यांच्याबरोबर भाजी आणायला जाणं म्हणजे रविवार आला की घरातले सगळे पळ काढत, त्या गर्दीत, गोंधळात जायची गरजच काय? किती पैसे वाचणार आहेत असं आई पुटपुटायची... पण त्यांना जाहीर विरोध करण्याची हिम्मत कोणातच नव्हती. रविवार आला की बाकीच्यांच्या छातीत धडधडू लागे, मला मात्र त्यांच्याबरोबर जायचा कधीही कंटाळा येत नसे, जवळ जवळ मी 12 वीत जाईपर्यंत हा कार्यक्रम अखंडपणे सुरु होता. आई कित्येकदा त्यांना हळू आवाजात म्हणायची, अहो त्या गर्दीत आपल्या वयात आलेल्या मुलीला घेऊन जाता, कशा कशा प्रकारची लोक असतात, धक्काबुक्की होते, कमीतकमी तिला तरी नेऊ नका.... ते ऐकायचे नाहीत आणि मीही, 'बाप तशी कार्टी ...' आई वैतागून म्हणायची!

हा आठवडी बाजार तेव्हाच काय पण आजही मला मोहात पाडतो, किती रसरसलेला, रंगीबेरंगी, सजलेला, किती वस्तू, शेतातल्या अवजारापासून ते खाण्याच्या पदार्थांपर्यंत!!! ती ताजी, रसरशीत भाजी,... दादांच्या प्रत्येक भाजीवाला किंवा भाजीवालीशी झालेल्या ओळखी... एकमेकांची विचारपूस आणि मग किलोच्या ऐवजी दोन किलो भाजी घेण्याचा झालेला आग्रह.... एखादी भाजी पटली नाही की दादा मला पार गोल गोल फिरवायचे, त्यांच्या मनासारखी कोथिंबीर किंवा मेथी मिळेपर्यंत हातातल्या जड पिशव्या सांभाळत गरगर फिरावं लागायचं. तेव्हा डोक्यावरचं चटकतं उन्ह, दुखणारा हात आणि पाय देखील, पोटातले भुकेने होणारे आवाज कधी कधी कंटाळा करायचे. माझा थकलेला चेहरा बघून एखादी म्हातारी दादांना अधिकारवाणीनं म्हणायची, भाऊ पार पोर सुकली की, टेकू द्या तिला इथं, तुमी जाऊन या म्होर.... भर उन्हात तो मायेचा आवाज सावली पांघरायचा.....

दिवस, वर्ष उलटत राहिली.... पण आज त्यातली मजा कळतेय, दादांबरोबरच्या त्या आठवडी बाजारातल्या फिरण्यानं भाजी कुठली चांगली, ती कशी निवडावी, अशा अनेक गोष्टी शिकता आल्या, पण त्याच बरोबर तिथल्या प्रत्येक भाजी विक्रेत्याशी त्याला न दुखवता संवाद कसा साधावा, माणसं कशी जोडावीत याचंही शिक्षण नकळत मिळालं.   दर आठ दिवसांनी होणारा हा संवाद आपसातलं नातंही घट्ट करायचा....आज दादा नाहीत, चल बेटा, भाजी आणायला जाऊ म्हणायला.... पण जेव्हा कधी प्रवास करताना रस्त्याच्या कडेला... मध्ये... आठवडी बाजार लागतो, तेव्हा माझ्यातली पोर फ्रॉक सावरत त्या गर्दीत सुसाट धावत दिसेनाशी होण्यासाठी व्याकुळ होते, पण त्याच वेळी - आज दादा नसले तरी कोणा म्हातारीचा, ये पोरी वाईच टेक जरा म्हणणारा आवाज ऐकू येतो.... गाडी पुढे गेलेली..... आणि मन मागे ...

-दीपा 27जुलै2016

दुपारी 4.40 वाजता

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.