डॉ. दिलीप घुले

डॉ. दिलीप घुले

तारीख

अंजली मालकर या मैत्रिणीचा संत नामदेवावर आधारित ‘नामा म्हणे’ या कार्यक्रमासाठी जाण्याच्या तयारीत असतानाच मोबाईलवर कार्यकर्त्या मित्राचा मेसेज आला, ’डॉ. घुले इज नो मोअर’. शब्द चटकन मेंदूत शिरेचनात. पंधरा मिनिटं सुन्नपणात गेला. डोकं कामच करेनासं झालं. मित्राला फोन केला, तोही माझ्यासारख्याच बधिर अवस्थेत होता. रिक्षातून जाताना ऍक्सिडेंट होतो काय आणि चालताबोलता, हसताखेळता माणूस एकाएकी आपल्यातून निघून जातो काय....! काय सांत्वन करणार एकमेकांचं .. फोन ठेवला...! 

कार्यक्रमाला गेले. ‘नामा म्हणे’ कार्यक्रम खूपच सुंदर झाला. नामदेवाचे शब्द, अंजली मालकर आणि शौनक अभिषेकींचा भावपूर्ण भिडणारा आवाज, ज्योती अंबेकर आणि गजानन परांजपे यांनी त्यांच्या कसदार अभिवाचनातून उलगडलेला नामदेवाचा जीवनप्रवास यामुळे काही काळ मी सगळं काही विसरून गेले.

घरी परतातना मात्र डॉ. घुले परत आठवू लागले. डॉक्टरांनी खूप कमी वेळात बघता बघता सहवासातल्या सार्‍यांना जीव लावला होता.  डॉ. घुलेंची आणि माझी ओळख झालेला तो प्रसंग आठवत होता. संध्याकाळची वेळ असावी. माझ्या एका कार्यकर्त्या मित्राची भेट झाली, तेव्हा त्याच्यासोबत  एक तलम, पांढराशुभ्र झब्बा घातलेला, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा कोणी एक सोबत होता. माझ्या मित्रानं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. ते होते, डॉ. दिलीप घुले. डॉक्टर घुले हे राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जवळजवळ बारा वर्षं अध्यक्ष म्हणून काम बघत होते. आरोग्यविषयक प्रश्‍न असतील किंवा काम करताना इतर डॉक्टरांना येणार्‍या अडचणी, समस्या यावर विशेषतः त्याचं काम!

त्यानंतर अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी, अनेक प्रसंगी डॉ. घुले भेटत असायचे. एकदा तर औरंगाबादला एका कार्यक्रमाला जाण्यासाठी आम्ही काही कार्यकत्यार्नी एकत्रच प्रवास केला. तेव्हा पुणे ते औरंगाबाद या प्रवासात त्यांचं आमच्यासोबत आमच्याएवढंच होणं, त्यांचं गाण्यातलं दर्दीपण, मृदू सौम्य स्वभाव लक्षात आला. त्यांच्याविषयी आदराची भावना वाढत चालली होती. मात्र कधी कधी मनाला प्रश्‍न पडे. राजकारणात प्रवेश केलेला हा माणूस इतका निर्मळ, इतका नितळ, इतक्या निरपेक्ष वृत्तीचा, इतका पारदर्शी कसा काय असू शकतो? का या सगळ्या गुणांची झूल यानं पांघरली आहे आणि आतला चेहरा काही वेगळा आहे? माझ्या शंका लगेचंच विरून जात. कारण त्यांचं प्रत्येक वेळचं माणुसकी जपणारं आश्‍वासक वागणं! डॉक्टर आतून बाहेरून एकसारखेच होते! कुठलाही मुखवटा त्यांनी धारण केलेला नव्हता.

मध्यंतरी अचानक माझं हिमोग्लोबिन (६.८ इतकं) खूप कमी झालं. थकवा खूप जाणवू लागला. चार पायर्‍या चढायच्या म्हटलं तरी शक्य होत नव्हतं. परावलंबित्वाची भावना मनाला नैराश्याकडे नेत होती. मला डॉक्टरांचा फोबिया असावा अशी मी डॉक्टरांकडे जायला टाळत होते. कोणाचंही ऐकत नव्हते. अशा वेळी माझ्या एका मित्राने डॉ. घुलेंवर माझ्या नकळत मी डॉक्टरांकडे जायला हवं ही जबाबदारी सोपवली. त्यांचा सकाळी सकाळी मला फोन! ‘‘काय म्हणताय? कशा आहात?’’ असं विचारत स्वतःच्या तब्येतीविषयी ते बोलू लागले. त्यांचं ऐकत असताना मला देखील काय त्रास होतोय हे मी त्यांच्याजवळ कधी शेअर केलं मलाही कळालं नाही. कुठलाही उपदेश न करता त्यांनी मला डॉक्टरकडे मी कसं जायला हवंय हे सांगितलं. मीही त्यांना नाराज करायचं नाही या भावनेतून ‘हो मी उद्या जाईन.’ असं सांगितलं.
दुसर्‍या दिवशी सकाळी फोन - मी डॉक्टरांकडे जाणार असल्याची आठवण देणारा! (प्रत्यक्षात मी कुठे जाणार होते!) मी काहीतरी कारणं सांगितली. पुन्हा तिसर्‍या दिवशी फोन, 'मी डॉ.  संजय गुप्ते यांच्याशी बोललो आहे. ते खूप सिनियर आणि चांगले डॉक्टर आहेत. जा.’

अर्थातच तरीही मी काही गेले नाही. चौथ्या दिवशी पुन्हा फोन, मी गेले होते की नाही हे बघण्यासाठी! शेवटी त्यांनी मी गाडी पाठवू का, अन्यथा मीच बरोबर येतो असं सांगितल्यावर मी डॉक्टरांकडे जायचं कबूल केलं आणि जाऊन आले. तिथून घरी परतताच पुन्हा फोन, काय झालं याची विचारणा करणारा! त्यांचा तो जबरदस्त पाठपुरावा आणि खाण्यापिण्याच्या काळजीनं टिप्स देणं यांनी माझ्यातल्या हट्टी मुलीने माघार घेतली. मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पाळायला सुरुवात केली. त्यानंतरही फोनवरून, मी गोळ्या घेतेय की नाही यासाठी फोन! त्या स्नेहमय दबावाखाली औषधं, नियमित पोष्टिक आहार यांनी अर्थातच माझं हिमोग्लोबिन वाढलं.

आज असे अनेक प्रसंग आठवताहेत. प्रत्येक कार्यकर्ता फोन करून त्यांच्या आठवणी शेअर करतोय. कुणाला आपल्या भावासारखे वाटणारे, कुणाला वडिलकीचा आधार देणारे, कुणाला अडचणीच्या काळात धीर देणारे  डॉक्टर आज नाहीत हे वास्तव सहन होत नाहीये. 

आज सकाळी बाबाचा (अनिल अवचट) चा फोन! मला विचारत होता, 'तू असं का लिहिलंस, 'डॉक्टर परत या’ म्हणून? मी गेल्यावर असं काही लिहायचं नाही हं.’ माझे भरलेले डोळे त्या एका क्षणाच्या शांततेनं जणूकाही इतक्या अंतरावरूनही बाबाला दिसले असावेत. लगेचंच तो म्हणाला, 'अग, माणूस आपल्यातून जातो कुठे? आठवणींनी तो आपल्या बरोबरच असतो ना! चल उठ, आणि तुला वाटणार्‍या त्यांच्याविषयीच्या भावना लिहून काढ.’

डॉक्टरांच्या जाण्यानं आपलं कुणीतरी आता या जगात नाही या भावनेनं मनाला अस्वस्थता आली होती. त्याचं आम्हा सार्‍यांशीच कुठलं नातं होतं? आम्ही त्यांना काय दिलं होतं? तरीही हा माणूस इतरांसाठी का झटत होता? बाबा, तू म्हणालास ते खरंय. आता लिहिताना मात्र डॉक्टरांच्या असण्याचीच जाणीव होतेय. डॉक्टरांचं वागणं, त्यांच्यातली मानवता, त्यांच्यातली त्रजुता रुजवण्याचा प्रयत्न करायला हवाय!

दीपा देशमुख 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.