सुहास शिरवळकरांची रूपमती, आयुष्य एका अंतराचे आणि स्टोरीटेल

सुहास शिरवळकरांची रूपमती, आयुष्य एका अंतराचे आणि स्टोरीटेल

तारीख

आज ठरवल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता पत्रकार भवनला जाऊन पोहोचले. सम्राट ( सुहास शिरवळकरांचा मुलगा, माझा मित्र आणि लेखक, संपादक)याच्या आईचं सुगंधा शिरवळकर यांच्या पुस्तकाचं आणि त्याचे वडील म्हणजेच सुहास शिरवळकर यांच्या रुपमती ऑडिओ बुकचं प्रकाशन होतं आणि 'मी येईन' असा शब्द दिल्यानं मला जाणं भागच होतं. 
प्रकाशन समारंभ म्हणण्यापेक्षा हा रसिकार्पण सोहळा होता. स्टोरीटेलच्या  टीमची लगबग सभागृहात सुरू होती.  व्यासपीठावर असलेल्या पडद्यावर मोबाईलच्या अ‍ॅपमध्ये असलेलं रुपमती आणि बाजबहाद्दर यांचं रंगीत छायाचित्र त्यांच्या प्रेमकहाणीची आठवण करून देत होतं, तर दुसर्‍या बाजूला सुहास शिरवळकरांचा बोलका चेहरा या कादंबरीविषयी आणखी काही सांगत होता. 
सुहास शिरवळकरांची आणि माझी लेखक आणि वाचक अशी ओळख झाली, ती वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून! घरात खूप पुस्तकं असत आणि त्यातच एकदा सुहास शिरवळकरांचं पुस्तक हातात पडलं आणि मग रहस्यकथा हा प्रकार किती भन्नाट आहे याची जाणीव झाली. झपाटल्याप्रमाणे प्रत्येक पुस्तक हातात आलं की त्याचा फडशा पाडणं कार्यक्रम सुरू झाला. 
१९७४ सालापासून लिखाणाला सुरुवात करणार्‍या सुशिंनी २५० च्या वर रहस्यकथा लिहिल्या. १७५ कादंबर्‍या लिहिल्या आणि सामाजिक दर्जाच्या कादंबर्‍या आणि बालकथा, कविताही लिहिल्या. त्यांच्या देवकी आणि दुनियादारी यावर आधारित चित्रपटही तयार झाले. दुनियादारीनं तर तरुणाईला वेडपिसं करून सोडलं. त्यांचं चाहते इतके होते आणि आहेत की सुशि म्हणत, 'मी कुठेही गेलो तरी प्रत्येक गावात मला माझा एक तरी चाहता भेटेल आणि मला हॉटेलात जेवावं लागणार नाही’ सुहास शिरवळकरांची लिखाणाची शैली अशी होती की वाचताना वाचक त्यात पुरता गुरफटून जातो आणि त्याच्यासमोर अख्खा प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो. 
मला त्यांची एक कथा आठवते, खूप वर्षांपूर्वी वाचल्यामुळे त्या कथेचं नाव आठवत नाही, पण त्यात एक मुलगा असतो आणि तो वयाच्या १२ व्या वर्षी आत्महत्या करतो. त्यानं आत्महत्या का केली याची सगळे चर्चा करत असतात, मात्र त्याला स्वतःला आपण स्वतःला का संपवलं हे चांगलंच ठाऊक असतं. जन्मल्यानंतर त्याची आकलनशक्ती इतकी जबरदस्त असते, की वयाच्या मानानं सगळं काही त्याला आधीच समजायला लागतं. जी गोष्ट आयुष्याच्या उत्तरार्धात समजायला हवी, ती इतक्या लहान वयात कळल्यानं आता पुढलं आयुष्य जगून तरी काय उपयोग असं त्याला वाटायला लागतं.....
माझ्या सुशिंच्या आठवणींमधून मी बाहेर आले कारण समोर व्यासपीठावर प्रसाद मिरासदार आपल्या प्रसन्न शैलीत बोलत होते. बोलताना त्यांनी देखील सुशिंची आणि त्यांची भेट आणि त्यावर झालेल्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चांबद्दल सांगितलं. सुशि वाचकाला आपल्या कथानकात खेचून घेत. आजही त्यांचे इतके चाहते आहेत की त्यांचं एक फेसबुक फेसही आहे. त्यावर ही तरुणमंडळी सुशिंचं लिखाण वाचल्यावर त्यावर बोलतात, लिहितात. त्यांच्या कवितांना तर एका चाहतीनं चाली लावून गाऊन त्या फेसबुक ग्रुपवर टाकल्या. असे अनेक उपक्रम हे चाहते वर्षभर करत असतात. सुशिंच्या या फेसबुक पेजचा एक प्रतिनिधी आणि सुशिंच्या लिखाणाचा वेडा असलेला अजिंक्य विश्वास हा तरुणही बोलला. आपण कॉलेजमध्ये असताना सुशिंना कसे भेटलो आणि ती भेट घेताना आपल्याला कशा प्रकारे एक्साईटमेंटनं घेरलं होतं....रात्री आठ वाजता त्यांच्या घरी गेलेलो आपण ११ वाजता घराबाहेर तृप्त मनानं पडलो. त्या वेळी सुशिंनी आपली केलेली विचारपूस आणि त्यांच्या लिखाणाबद्दल केलेली मनमोकळी चर्चा अजिंक्य आजही विसरला नव्हता. 
आजच्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे सुशिंची पत्नी सुगंधा शिरवळकर यांच्या ‘आयुष्य एका अंतराचे’ या कथासंग्रहाचंही प्रकाशन होतं. माझा मित्र सम्राट शिरवळकर यानंही आपलं मनोगत व्यक्त केलं, तेव्हा आपली आई लिहिते ही गोष्ट आपल्यालाच ठाऊक नव्हती असं सांगितलं. तिच्या कथा प्रेरणा देणार्‍या, प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करणार्‍या आणि स्त्रीपणाच्या चौकटीला पार करून पुढे जाणार्‍या आणि बोल्ड असल्याचं त्यानं सांगितलं. 
स्टोरीटेलच्या यशवंत यांनी स्टोरीटेलविषयी माहिती दिली. जग बदलत चाललं आहे, या व्यस्त दिनक्रमात प्रवासात आपण अनेक चांगली पुस्तकं ऐकू शकतो आणि तो वेळ खरोखरंच सार्थकी लावू शकतो हे जाणवलं आणि त्यात स्टोरीटेलची असलेली भूमिका उमगली. 'आयुष्य एका अंतराचे' या कथासंग्रहाचं आणि सुहास शिरवळकरांच्या 'रुपमती' ऑडिओ बुकचं प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी यांनी केलं. नुकतीच पुन्हा एकदा मांडूला जाऊन आल्यानं मांडूचा सगळा परिसर, त्याचा इतिहास आणि रुपमती आणि बाजबहाद्दर यांच्या प्रेमकहाणीच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात ताज्या होत्या. आज हे प्रकाशन झालेलं असताना सुशिंनी लिहिलेली रुपमती माझ्याकडून वाचायची राहूनच गेली होती. या ऑडिओ बुकमधला काही भाग तुषार दळवींनी वाचून दाखवला. संपूर्ण सभागृह त्यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध झालं होतं. जणूकाही त्यांच्यासमोर तो सगळा इतिहास पुन्हा उभा राहिला होता. मी तुषारकडे पाहत होते. अतिशय साधा, मात्र आवाजात अशी काही ताकद की ऐकणार्‍यानं इकडे तिकडे पाहूच नये. मराठीबरोबरच त्यात येणार्‍या उर्दू भाषेवरही तितकीच पकड! मात्र आपण या भाषांमधले तज्ञ असल्याचा कुठलाही अविर्भाव त्यांच्या बोलण्यात नव्हता. खरोखरंच संपूच नये असं ते वातावरण होतं. 
कार्यक्रम शेवटाकडे जाताना प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे या माझ्या मित्रांनी तुषार दळवी यांची मुलाखत घेतली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा, कॉलेजमध्ये सहजपणे नाटकात भाग घेतो आणि नंतर त्या नाटकाच्या वेडानं झपाटला जातो. घरून अर्थातच विरोध, आधी शिक, नोकरी कर आणि मग फावल्या वेळात नाटकं कर असं त्यांचं म्हणणं. तुषारच्या बँकेत असलेल्या बायकोनं मात्र त्याला भरभक्कम साथ दिली. त्याचं हे वेड जपण्यासाठी तिनं त्याला मी एक आघाडी सांभाळते, तू हे कर असे आश्वासक शब्द दिले. तुषारनं सुरु केलेला प्रवास कधी थांबला नाही. नाटक, मालिका आणि चित्रपट यांतून त्याची घौडदौड सुरूच राहिली. 
मला आणि अपूर्वला आम्हाला दोघांनाही तुषार दळवी हा अभिनेता खूप आवडतो. एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका तर आम्ही केवळ तुषार दळवीमुळे बघायचो. त्यानं केलेली बापाची भूमिका, तिला असलेले अनेकविध पदर, त्याचा बदलत जाणारा स्वभाव, त्याच्यातला अहंकार आणि अपराधीपणा, वात्सल्य, असं सगळं काही कधी संवादातून तर कधी देहबोलीतून प्रतीत होत होतं. 'देवराईम'धली त्याची भूमिकाही तितकीच लाजबाब! मी समोर बघत होते. तुषार दळवी अतिशय मोकळेपणानं बोलत होते. वेळ उलटून गेली होती, मात्र कार्यक्रम संपू नये असं वाटत होतं. मुलाखत संपली. 
स्टोरीटेलनिमित्त बेस्ट स्टोरीजचं एक छापील पुस्तक उपस्थितांना भेट देण्यात आलं. सुगंधा शिरवळकर यांनी मला त्यांचं 'आयुष्य एका अंतराचे' पुस्तक स्वतःच्या स्वाक्षरीनं मला भेट दिलं. हा आनंद खूपच वेगळा होता. अक्षरयात्रा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक खरोखरंच देखणं झालं आहे. 
कार्यक्रमाच्या वेळी सई तांबे भेटली. ती माझ्या मित्राची मुलगी असली, तरी तिच्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे तिची ओळख स्वतंत्रपणेच करावी लागते. तिचं सामाजिक भान, तिचं लिखाण, तिचा उत्साह मला नेहमीच थक्क करतो. थोडक्यात ही कार्टी मला आवडते. त्यानंतर माझे मित्र प्रसाद मिरासदार, संतोष देशपांडे यांच्याशी बोलणं झालं. रमा नाडगौडा ही गुणी आणि सुंदर सुस्वभावी अशी अभिनेत्री आणि लेखिका असलेली माझी मैत्रीण भेटली. माझी फेसबुक मैत्रीण आणि माझ्या लिखाणाची वाचक स्वाती देसाई हिच्या भेटीनं आनंद द्विगुणित झाला. 
सगळ्यांचा निरोप घेऊन परतताना तुषार दळवींशी पाच मिनिटं मस्त बोलणं झालं. त्यांच्या आवाजाच्या जादूतून पुरती बाहेर आलेच नव्हते. संतोषच्या मोबाईलमध्ये आमचा फोटो बंदिस्त झाला. समाधानानं मी सगळ्या आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला लागले. 
दीपा देशमुख, पुणे.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories