प्रिय गणेश,
तुला हे पत्र कधीच मिळणार नाही, तरीही लिहितेय.
पुस्तकांशी असलेलं आपलं नातं तोडून तू आज निघून गेलास.
तुला आठवतं ना, आपली भेट झाली ती २००९ मध्ये,
मनोविकास प्रकाशनाच्या नारायण पेठेतल्या ऑफीसमध्ये.
मग कामाच्या निमित्ताने आपण भेटत राहिलो वारंवार.
गुलाम पुस्तकापासून सुरू झालेलं आपलं काम मनात, मुसाफिर,
गणिती, झपुर्झा, कॅनव्हास, जीनियस, सिंफनी असं होत राहिलं.
प्रत्येक पुस्तकाच्या वेळी काम करत करत मारलेल्या गप्पा आठवताहेत.
प्रत्येक वेळी त्या त्या पुस्तकाच्या सगळ्या फाईल्स तुला दिल्या रे दिल्या की
तू माझ्यासमोरच एखाद्या जादूगारासारख्या त्या श्रीलिपीमध्ये कन्व्हर्ट करायचास.
मग एक एक अक्षर रिप्लेस करून सगळ्या फाईल्स निर्दोष करायचास.
आपल्या सगळ्याच पुस्तकांचं मग ते टायपिंग असो, प्रुफ रिडिंग असो,
ले-आउट लावणं असो, मुखपृष्ठ लावणं असो, फोटो लावणं असो,
की फोटोला कॅप्शन देणं असो, तू नेहमीच तयार असायचास.
हा फोटो नको, तो लावू या असं म्हटल्यावर
किती वेळा बदल करायचा? असं वैतागून एकदाही म्हणायचा नाहीस.
तुला आमच्याविषयी खूप आदर वाटायचा आणि तो आदर
तुझ्या बोलण्यातून, वागण्यातून सतत जाणवायचा.
मॅडम, तुमची सगळी पुस्तकं राजसाठी घेतलेली आहेत बरं का, असं सांगायचास.
राज, लहान असतानाच्या गमतीजमती कौतुकानं सांगायचास,
माझा कुठल्याही कर्मकांडावर विश्वास नाही, हे ठाऊक असूनही राजच्या
मुंजीचं निमंत्रण न विसरता दिलं होतस तेही घरी येऊन.
राजची प्रगती वेळोवेळी फोन करून सांगायचास.
मॅडम, तुमचं काम करताना मला खूप आनंद मिळतो असं म्हणायचास.
फोनवरून दुरूस्त्या सांगण्यापेक्षा, मॅडम ऑफीसला या ना असा आग्रह करायचास.
बस झालं मॅडम आता बाकीचं उद्या करू असं तू कंटाळून एकदाही म्हणाला नाहीस.
मध्यंतरी आर्किटेक्चरचं लिखाण शेवटाकडे आलं असताना टाईप करायचा खूप कंटाळा आला होता,
तेव्हा तुला फोन केला, तर तू ‘लगेचच मी करून देतो मॅडम’ असं सांगितलंस.
कधी पैशांवरून घासाघीस नाही की कामात कधी पाट्या टाकणं नाही.
मनोविकासमुळे मी कसा घडलो हे तू मला सांगितल्यावर तर
‘प्रथम’साठी मी तुझ्यावर लेखच लिहिला होता.
ऑफीसची साफसफाई करणारा मुलगा आपल्या कष्टाने कम्प्युटरचं शिक्षण घेऊन
पुस्तक निर्मितीच्या कामात कसा पारंगत झाला हे तू सांगत असताना मीही तुझ्याबरोबर तो सगळा प्रवास केला होता.
कॅनव्हासचं मुखपृष्ठ बदलल्यानंतर तुझ्या हातून मी नवी प्रत घेतली
तेव्हा तुझ्याबरोबर खूप उत्साहाने फोटो काढला होता.
आता ‘ग्रंथ’ या पुस्तकाचं कामही तूच करत होतास. वेळोवेळी आपण बोलत होतो.
तुझे वडील गेल्यानंतरही फोनवर आपण बोललो. मग २८ एप्रिलला अचानक तुझा फोन आला. खूप वेळ गप्पा मारल्यास. काळजी घ्या म्हणालास आणि
तू कुठे आहेस विचारल्यावर, ‘मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे,
पण काळजी करू नका लवकर येतो’ असं म्हणालास.
मग मीच वाट बघून ५ तारखेला तू कसा आहेस विचारायला तुला फोन केला.
तुला मेसेज केला. पण तो मेसेज तू बघितलाच नाहीस.
तू आता कधीच मेसेजचं उत्तर देणार नाहीस,
राजचं नाटकातलं काम कसं झालं ते सांगणार नाहीस,
पुस्तक प्रकाशन असो, साहित्य संमेलनातला स्टॉल असो,
आठवणीने फोन करून तू कधीच मला बोलावणार नाहीस.
१२ वर्षांचं आपल्यातलं हे नातं एका झटक्यात तोडून
तू आम्हा सगळ्यांना सोडून आज निघून गेलास...परत कधीही न येण्यासाठी.
अरे, वातावरण पुन्हा निरभ्र झालं, मोकळं झालं, की
मनोविकासच्या ऑफिस मध्ये यावं लागणारच आहे.
तेव्हा तुझी रिकामी खुर्ची आम्ही बघायची कशी?
गणेश, एखाद्या माणसाची सवय होते रे.
कामाला पर्याय मिळतील, राहिलेली कामंही यथावकाश पूर्ण होईल.
पण माणसाची रिप्लेसमेंट कधीच नाही होऊ शकत. तू तूच होतास.
मॅडम कशा आहात, म्हणून करशील का तिकडून फोन किंवा एखादा मेसेज?
तुझी, दीपामॅडम.
15/05/21
Add new comment