हर घडी बदल रही है रूप जिन्दगी...
मै हूँ ना....हर घडी बदल रही है रूप जिन्दगी......अतुल-प्राजक्ता भेट
काल बारामतीत असताना अतुलचा मेसेज आला, दीपा तू घरी आहेस का....मी ‘बारामती’ असं उत्तर दिलं.....मात्र अतुल पुण्यात आला असणार आणि म्हणूनच त्यानं असं विचारलं असणार हे नक्की होतं. पुण्यात आल्यावर आज सकाळी परत एक कार्यक्रम होता, पण अतुलची भेट ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे कार्यक्रमाला निघण्यापूर्वी मी आणि अतुलनं सकाळी सव्वा नऊ वाजता भेटायचं ठरवलं.
मी कार्यक्रमाला जाण्यासाठी तयार होऊन अतुलची वाट बघत होते. बरोबर सव्वा नऊ वाजता दारावरची बेल वाजली. दार उघडताच तोच अतुल नेहमीप्रमाणे समोर उभा होता, जो दहा हजार वर्षांपूर्वी शेगावला मला पहिल्यांदा भेटला होता. सोबतच प्राजक्ता (त्याची अर्धांगिनी!) होती.
मला सव्वा दहा वाजता घरातून कार्यक्रमासाठी निघायचं होतं. एक तास आमच्या हाती होता. आमच्या गप्पा सुरू झाल्या. शेंडा न बुडखा अशा त्या गप्पा....पण रंगत गेल्या. आता तर प्राजक्ताही त्यात सामील झाली होती. त्यामुळे दुग्धशर्करा योग होता!
मी आणि अतुल बालमित्र! न बोलताही एकमेकांची कितीतरी सुखदुःख समजून घेतली. कॉलेजचं जग स्वप्नवत असतं, सुंदर असतं, रंगिबेरंगी असतं....पण अतुल आणि माझ्यासाठी ते चढउताराचं होतं. माझ्यापेक्षाही जास्त अतुलसाठी! अनेक आघात या काळात त्याला सहन करावे लागले. आम्ही अकरावीत प्रवेश केलेला....म्हटलं तर अगदीच शाळकरी मुलं होतो....एकमेकांना काय समजवणार आणि काय धीर देणार? पण आमची पत्रं आमच्या वतीनं बोलायची.........ही पत्रंच धीर द्यायची....हेही दिवस जातील असं म्हणायची....अतुल इंजिनिअर झाला.....मग एअरफोर्समध्ये गेला.......माझाही स्वतःशी झगडत प्रवास सुरू होता....त्यात काही काळ हरवलो.....म्हणजे एकमेकांचे पत्ते हरवले........पण अतुलनं चंग बांधला....आणि मला शोधून काढलं....तो पुण्यात आला....आम्ही भेटलो...रात्री नऊ ते साडेबारा आम्ही शिवाजीनगरच्या हर्डीकर हॉस्पिटलपासून चकरा मारत बोलत होतो. मधल्या अनेक वर्षांचं बोलणं साठलेलं होतं.....आता हरवायचं नाही असं या भेटीत ठरलं.....मग पत्रं बंद झाली, पण मोबाईलवरून आणि प्रत्यक्ष भेटून संवाद सुरू राहिला....मला जेवढं त्याचं कौतुक आणि अभिमान वाटतो, तेवढच किंवा त्यापेक्षा जास्त कौतुक अतुलला माझं असतं! माझं लेखन, माझी पुस्तकं....माझ्या कविता, याविषयी त्याचे शब्द बोलत नाहीत, तर त्याचे डोळे बोलतात, त्याचा चेहरा बोलतो आणि मी.....'रंगाखुश' अवस्थेत असते! आजही अनेक प्रसंगात तो ‘मै हूँ ना’ म्हणत समोर उभा असतो!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment