व्ही स्कूल ॲपचं उद्घाटन
आत्ता व्ही स्कूल ॲपचं लाँचिंग झालं आणि एका सुंदर अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मिळाला. वोपाची टीम प्रफुल्ल, ऋतुजा, आदिती आणि वोपाचे सगळे स्नेही ज्यात हर्षल मोर्डे ही व्यक्ती नेहमीच चांगलं काम करू पाहणाऱ्याला आर्थिक मदतीचा आणि स्नेहाचा हात पुढे करत असते, दीपक पळशीकर हे तर वोपाचं पालकत्व घेतलेले, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी असोत वा जळगावचे सीईओ बी. एन. पाटील सर, ऑनलाईन का असेना, सगळ्यांना भेटून, बघून खूप छान वाटत होतं.
अतिशय नेटका झालेला असा हा कार्यक्रम - यात अझहरने सुरुवातीला म्हटलेलं गीत, वोपाचं ॲप वापरण्यासाठी उत्सुक असलेला विद्यार्थी आणि व्ही स्कूल ॲपची माहिती देणारा प्रफुल्ल, तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी ऋतुजा यांनी कार्यक्रमात बहार आणली. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याविषयी काय बोलावं? या तरुणानं प्रशासकीय कामाचाच भाग असल्याप्रमाणे वोपाच्या टीपला भरभरून सहकार्य केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही तर त्यांनी आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी जळगाव जिल्हा या शैक्षणिक ॲपमध्ये कसा सहभागी होईल् याची ग्वाही दिली. नाशिकचे शिक्षण विभागाचे उपसंचालक उपासनी यांनी देखील वोपाच्या तरुण टीमचं कौतुक करत आपण बरोबर असल्याचं सांगितलं. माझा अत्यंत आवडता गुणी अभिनेता ललित प्रभाकर यानं वॉचमनच्या मुलापासून ते घराघरात येणाऱ्या कामवाली मावशीच्या मुलांपर्यत हे ॲप कसं पोहोचेल आणि त्यात आपणही कसं सहकार्य करू याविषयी बोलत व्ही स्कूलला शुभेच्छा दिल्या. हर्षल मोर्ड आणि दीपक पळशीकर या दोन व्यक्ती अशा आहेत की एखाद्याला उभं करण्यासाठी इतकं काही करतात, पण तरीही सगळं काही पडद्याआडून. समोर येणं, श्रेयासाठी आतुर असणं त्यांच्या स्वभावातच नाही. ही दोन माणसं मला आधुनिक संत वाटतात. मलाही प्रमुख अतिथी म्हणून आजच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी माझ्या या धडपडणाऱ्या मुलांनी दिली त्याबद्दल खरोखरंच मला खूप छान वाटलं. मी च्या पलीकडे जाऊन काम करणारी माणसं नेहमीच मला माझी वाटत आली आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर नव्हे तर त्यांच्यातलीच एक आहे.
कार्यक्रम संपत असताना मी आणि माझा मुलगा अपूर्व याचा लाडका अभिनेता पुष्कराज चिरपुटकर (ज्याला बघितलं की आम्हाला आमच्या शास्त्रीची आठवण होते...) यानं आभार मानले. आपलाही सहभाग यात कसा असेल याविषयी सांगितलं. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे अगदी 45 मिनिटांत संपन्न झाला, पण मन झूमवरून दूर जायला तयार नव्हतं.
सर्व वयोगटातल्या माझ्या विद्यार्थी, शिक्षक, पालक मित्र-मैत्रिणींनो, व्ही स्कूलचं ॲप वापरा आणि आपल्यासाठी खुल्या केलेल्या ज्ञानाच्या दालनात प्रवेश करा.
‘व्ही – स्कूल’ मोबाईल ऍप्लिकेशन तयार झाले आहे.
हे मोफत शैक्षणिक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा व इन्स्टॉल करा.
http://edu.vopa.in/learn/
टीम ‘व्ही – स्कूल’.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment