प्रिय सुवर्णसंध्या, शुभेच्छा वाढदिवसाच्या
प्रिय सुवर्णसंध्या,
२१ ऑगस्ट हा दिवस माझ्या कायम लक्षात राहील. याचं कारण
माझे वडील - ज्यांना आम्ही दादा म्हणत असू ते याच दिवशी
आमचा निरोप घेऊन या जगातून कायमचे निघून गेले.
त्यांच्या जाण्याचं शल्य अनेक दिवस, अनेक महिने,
अनेक वर्षं मनात सलत होतं
आणि अचानक एके दिवशी तू भेटलीस,
जणू काही ती पोकळी भरून काढण्यासाठीच.
तुझा जन्मही २१ ऑगस्टचा. त्यामुळे दादा गेले आणि तू आलीस!
तू आलीस आणि माझ्या मनात आपलं स्थान पक्कं कोरून ठेवलंस.
आज मला आठवतेय ती सुवर्णसंध्या, जी मला पहिल्यांदा भेटली
आणि मग अखंड असा संवादयज्ञ सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे...
कधी मी बोलत राहिले रात्र-रात्र....तू कान झालीस, माझं सगळं ऐकण्यासाठी
कधी मी ऐकत राहते, आणि तू बोलत राहतेस तासन्तास...
कधी बुद्घ, कधी आंबेडकर, कधी फुले, तर कधी शाहू महाराज
कधी अंधश्रद्धेविषयी, तर कधी पर्यावरण आणि शेतीविषयी
कधी काहींच्या दुटप्पी वागणुकीविषयी, तर कधी जगातल्या सुंदर गोष्टीविषयी
आपल्या भेटीत वेळ भुर्रकन उडून जातो, बोलायचं बरंच शिल्लक राहतं,
तर कधी न बोलताही खूप बोलून, खूप सांगून होतं...
या वेळची भेटही खूप कमी वेळाची झाली, पण खूप भरभरून देऊन गेली...
आजूबाजूची हिरवी शेतं जणूकाही स्वागताला उभी होती,
रस्त्यावरून बागडणारी धष्टपुष्ट कुत्री जणू काही
रस्ता दाखवण्यासाठी वेगानं पळत होती
याही वेळी आपण काय काय बोललो, कुणास ठाऊक
काहीच आठवत नाही, आठवतं ते प्रसन्नपणे
स्वागताला उभं असलेलं घर, हातावर टाळी देणाऱ्या मम्मी,
अपूर्वबरोबर त्याच्या वयाचा होवून लगोरी खेळणारा शेखर,
खांद्यावर हात टाकत, आता मी तुझ्यापेक्षा मोठी झालेय सांगणारी जिवा,
आम्हीपण आलो आहोत असं सांगणारी दिनेश, ज्योती, ओनीची स्नेहभरी नजर,
दिवाळीसारखंच वातावरण होतं आजूबाजूचं...
आणि हो किती पदार्थ...
गरमागरम भाकरी खावी, की मऊसूत पोळी खावून बघावी?
मेथीची भाजी खावी, की पाटवडी रस्सा चाखावा?
गव्हाची खिर खावी की रवा-तांदळाची खिर खावी?
मग काहीच न सुचून मी चिकनरस्सा वाट्यांवर वाट्या पित राहिले...
आठवतंय ना तुला, घरी केलेल्या तुपालाही मी ‘तूप ये, ये, ये’
असं म्हणत होते आणि मग शेजारी बसलेला दिनेश ‘आलं तूप’ असं म्हणत
तुपाचं बुटलं माझ्याकडे सरकवत होता...
खीर ये माझ्याकडे म्हटलं की खीर येत होती, दिनेशच्या हाताचा आधार घेत
लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते म्हणणारी गलेलठ्ठ म्हातारी
मीच झाले, मीच वजनदार डुलत डुलत चालणारा हत्तीही झाले...
कपाट कपाट भरलेली पुस्तकं, ये जरा निवांतपणे बस आमच्याजवळ
म्हणत राहिली, मीही बघत राहिले त्यांच्याकडे कितिक वेळ..
तृप्तीची एक उबदार झुळूक अंगावरून गेली, आणि मी
नशा चढलेल्या अवस्थेत तुझ्याकडे बघत राहिले...
दोन वर्षांचा हिशोब चुकता करायचा होता तुला....
पाथफाइंडर्सचे दोन भाग, नारायण धारप,
आता येणारं ‘ग्रंथ’, अशा पुस्तकांचं सेलिब्रेशन
करायचं राहिलं होतं...मग तेही पार पडलं...
पुस्तकं आणि साडी...माझे दोन विकपॉइंट्स...
तरल, मखमली, धुक्यानं वेढलेले पडदे
एकामागून एक येत, सर्वांगाभोवती लपेटले जावेत
तसा अनुभव मी घेतला, माझ्या भेटवस्तूंना स्पर्श करताना...
मग विंदा आले, देणाऱ्याने देत जावे...म्हणत,
इतकं सगळं भरभरून देणारी मैत्रीण भेटल्यावर,
मी तुला काय द्यावं?
एक दिवस घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे......
सुवर्णसंध्या, आपल्या या मैत्रीचा उत्सव सतत साजरा होवो,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, तुझी प्रकृती उत्तम राहो
तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!
तुझीच, दीपा. २१ ऑगस्ट २०२१.
Add new comment