मैत्रीच्या 'सुसेगाद' वाटेवरचा गोवा
मैत्रीच्या 'सुसेगाद' वाटेवरचा गोवा
"गोव्याला माझ्याकडे चार दिवस राहायला ये गं..." माझी मैत्रीण उज्ज्वला आचरेकर गेली दहा वर्षे हा आग्रह धरत होती. अनेक वेळा जायचं ठरलंही, पण काही ना काही कारणांमुळे ते रद्द करावं लागलं. अखेर ८ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जाण्याचं नक्की केलं आणि तिकीटं काढली.
उत्तर गोव्यातील मोपा इथल्या मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तेव्हा स्वतः उज्ज्वला गाडी घेऊन स्वागताला उभी होती. तिला पाहताच मनाला उभारी आली. तिची गाडी पोरवोरिमस्थित तिच्या घराच्या दिशेने धावू लागली. वाटेत काय गप्पा झाल्या ते आठवत नाही, पण त्या संवादात भेटीचा निखळ आनंद ओसंडून वाहत होता.
माझी गोव्याची पहिली भेट औरंगाबादला शिकत असताना, शाळेच्या सहलीसोबत झाली होती. पण मीनल केळकर या मैत्रिणीचा गोवा ट्रिपमध्ये झालेला आजार आणि परल्यावर झालेला तिचा मृत्यू, यामुळे त्या लहान वयातला बघितलेला गोवा मनावर एक दाट सावली सोडून गेला होता. त्यानंतर अरविंद पाटकर, महावीर जोंधळे, इंदूमती जोंधळे, अरूणा सबाणे अशा दिग्गज साहित्यिकांसोबत गोवा पाहिला, त्या वेळी गोमंतकच्या कार्यालयाला भेट दिली होती, गोवन पद्धतीचं जेवण केलं होतं आणि बीचवरही गेलो होतो. शिवाय प्रवासात अनेक कॉलेजेस आणि संस्था इथे व्याख्यानांचे कार्यक्रमही केले होते. यावेळी मात्र अजेंडा स्पष्ट होता—फक्त मैत्री आणि निवांतपणा!
कोणाच्याही घरी पाच दिवस राहणं माझ्यासाठी तशी कठीणच गोष्ट होती, पण उज्ज्वलाच्या प्रेमळ आणि धडपड्या स्वभावाने हे दिवस कधी सरले कळलंच नाही. उज्ज्वला उत्तम सुगरण असलेली माझी मैत्रीण! तिच्या हातचं चिकन सँडविच, मटण खिमा आणि अस्सल गोवन पद्धतीची फिश करी यांची चव अवीट होती. विशेष म्हणजे, तिने मला प्रसिद्ध 'फ्लोरेन्टाईन' हॉटेलमध्ये नेऊन तिथली खास डिश 'चिकन कॅफ्रियल' ही डिश खाऊ घातली. कोथिंबीर, मिरच्या आणि मसाल्यांचा तो हिरवागार मसाला आताही जिभेवर रेंगाळतोय. तिने मला खरोखरंच इतकं जपलं की मी तिथे असेपर्यंत रोज बॉडी मसाजसाठी शबाना नावाची एक स्मार्ट तरुणी माझ्यासेवेसाठी उपलब्ध करून दिली आणि ‘ही माझ्याकडून तुला भेट’ असं म्हणत, शबानाची जे काही चार्जेस असतील, तेही परस्पर देऊन मोकळी झाली.
गोव्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सकाळी शांतपणे होणारी दिवसाची सुरुवात. उज्ज्वलाने स्वतःचे सगळे कार्यक्रम बाजूला सारून मला गोवा दाखवला. तिच्या नजरेतून गोवा मला अधिकच देखणा भासला. दुथडी भरून वाहणारी मांडवी आणि झुआरी नदी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज शैलीतील गडद रंगात नटलेली घरं... या घरांच्या स्वागताला उभी असलेली नारळाची माड पाहून मन प्रसन्न झालं. गोव्यातल्या रस्त्यांचं मला खूप कौतुक वाटलं. अरुंद रस्ते असूनही तिथे लोक विनाकारण हॉर्न वाजवत नव्हते किंवा घाई करत नव्हते. समोरून गाडी आली की शांतपणे थांबून जागा देण्याची त्यांची पद्धत मला गोव्याच्या 'सुसेगाद' म्हणजे समाधानी आणि शांत स्वभावाचं प्रतीक वाटली. तिथली माणसंही अगदी तशीच—गर्दीच्या प्रवाहातही स्वतःचा संथपणा आणि सौजन्य जपलेली. पणजी किंवा म्हापशाच्या मुख्य रस्त्यांपेक्षा, रस्त्यात लागणारी ती छोटी छोटी गावं मला जास्त भावली. सुक्कोर, गिरी, अदोना किंवा साल्वादोर-द-मुंद सारख्या गावांमधून जाताना दिसणारी ती रंगीबेरंगी घरं, तिथल्या नीटनेटक्या ग्रामपंचायती आणि समोरच्या मैदानावर खेळणारी मुलं... हे सगळं बघताना गोव्याचं खरं रूप गवसत होतं. प्रत्येक वळणावर एक नवं गाव आणि प्रत्येक गावाची एक वेगळीच शांतता होती.
याच दरम्यान गोव्यातल्या कला अकादमीच्या मैदानावर बुक फेस्टिव्हल एनबीटीने आयोजित केलं होतं. तिथे सातशेच्या वर पुस्तकांचे स्टॉल्स होते. खाद्यपदार्थांचेही स्वतंत्र स्टॉल्स होते. मी आणि उज्ज्वलाने मनोविकासच्या स्टॉलला भेट दिली आणि उज्ज्वलाने माझी सगळी पुस्तकं परत खरेदी केली. सगळीकडे उत्सवी वातावरण होतं. मला यावेळी मात्र आपण पुण्यात असल्याचाच भास झाला.
एके दिवशी सकाळी सकाळी कँडोलिम बीचवरची शांतता अनुभवली. त्यानंतर तिथून जवळ असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मिरची भजी आणि छोले-पुरीवर ताव मारला. ऐतिहासिक आग्वाडा किल्ला आणि तिथलं जुनं कारागृह बघणं हा एक अनोखा अनुभव होता. तिथून दिसणारा अथांग समुद्र आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून नजर फिरवताना मला अनेक चित्रपटांची आठवण आली. 'दिल चाहता है', 'रंग दे बसंती', 'गोलमाल' आणि 'धूम' सारख्या कितीतरी लोकप्रिय चित्रपटांचे कॅमेरे याच भिंतींच्या आणि समुद्राच्या साक्षीने फिरले आहेत की. त्यामुळे तो परिसर बघताना आपण स्वतः एखाद्या चित्रपटाच्या पडद्यावर आहोत असं वाटत होतं.
उज्ज्वला मला पणजी, म्हापसा अशा अनेक ठिकाणी घेऊन गेली. गोव्यातील माणसांचा स्वभाव खूपच मिळून-मिसळून वागण्याचा वाटला. दुकानदार असो वा रस्त्यावरचा माणूस, प्रत्येकजण आदबीने बोलत होता. प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या आर्ट गॅलरीला दिलेली भेट कायम स्मरणात राहील. तिथे गॅलरीबाहेर उभे असलेले त्यांचे कार्टून्सचे 'स्टॅच्यू' बघून मजा आली. तिथले किचन ॲप्रन, फ्रीज मॅग्नेट, कीचेन, टी-शर्ट, स्टोल आणि बॅग्स अशा वस्तूंवर त्यांची शैलीदार चित्रं बघताना त्यांच्या सर्जनशीलतेचं खूप कौतुक वाटलं. मारियो यांच्या पत्नीने सुरू केलेली आगळीवेगळी शाळा पाहून तर आपण पुन्हा लहान होऊन तिथे शिकावं असं वाटलं. पहिली ते चवथीपर्यंतची ही शाळा जीवनकौशल्यांवर भर देते. तिथली मुलं शाळेत येताना-जाताना पायऱ्यांऐवजी घसरगुंडीवरून जातात आणि पहिलीपासून पोहायला शिकतात, हे ऐकून त्यामागची आनंददायी शिक्षणाची दृष्टी लक्षात आली. शाळेची ती वास्तू म्हणजे जणू एखादी सहलच वाटत होती.
गोव्याची मंडई ही केवळ व्यापाराची जागा नाही, तर ती एक सामाजिक केंद्र आहे. तिथल्या स्त्रियांचं ते खणखणीत बोलणं, ताज्या ताज्या भाज्या आणि काजूंची खरेदी करताना एक वेगळीच ऊर्जा जाणवली. संध्याकाळचा झगमगणारा गोवा म्हणजे चैतन्याचा उत्सव! जिकडे तिकडे कॅसिनोची रोषणाई दिसली, पण त्याच वेळी जागोजागी दिसणाऱ्या चर्चमधील शांतताही तितकीच प्रभावी वाटली.
गोव्याच्या रात्रीचं ते विलोभनीय रूप आणि कॅसिनोमुळे मांडवी नदीला आलेली झळाळी याबद्दल काय सांगाव? संध्याकाळच्या वेळी पणजीच्या जेटीवरून दिसणारं गोव्याचं रूप तर अक्षरशः जादुई होतं. मांडवी नदीच्या पात्रात उभ्या असलेल्या त्या भव्यदिव्य कॅसिनोजनी संपूर्ण आसमंत उजळून निघाला होता. जणू काही आकाशातले तारेच नदीच्या पाण्यावर उतरले आहेत की काय, असा भास व्हावा इतकी ती रोषणाई विलोभनीय होती.
ते उत्सवी वातावरण, काचेसारख्या चमकणाऱ्या त्या जहाजांवरून येणारा संगीताचा मंद आवाज आणि पाण्याचे तरंग... हे सगळं बघताना एक वेगळीच नशा चढली. रात्रीच्या अंधारात मांडवीच्या संथ पाण्यावर पडणारं कॅसिनोच्या रंगीबेरंगी दिव्यांचं प्रतिबिंब गोव्याला खऱ्या अर्थाने 'पूर्वेकडचं रोम' बनवत होतं. जिकडे तिकडे एक प्रकारची ऊब आणि चैतन्य सळसळत होतं. गोव्याची ती शांत रात्र आणि या कॅसिनोंचा झगमगाट यांचा जो विरोधाभास आहे, तोच तर गोव्याचं खरं सौंदर्य आहे. तो रोषणाईचा उत्सव डोळ्यांत साठवून घेताना असं वाटलं की, हे शहर कधीच झोपत नसावं!
उज्ज्वलाने तिच्या पोरवोरिमच्या घरी माझ्यासाठी एक विशेष स्नेहमेळावा आणि गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर एखाद्याच्या घरी इतक्या निगुतीने कार्यक्रम होऊ शकतो, याचा वस्तुपाठच तिने घालून दिला. त्या संध्याकाळी तिच्या घरी गोव्यातील विविध क्षेत्रांतील ‘क्रीम क्राउड’ जमा झाला होता. तिथे आलेली मंडळी केवळ पद आणि पैशाने मोठी नव्हती, तर त्यांच्या कामाचा आवाका थक्क करणारा होता. कोणाचे पती गोव्याच्या राजकारणात मंत्री म्हणून कार्यरत होते, तर कोणी प्रथितयश डॉक्टर, प्रथितयश उद्योजक, पत्रकार आणि कौन्सिलर होते. साधारणपणे अशा वर्तुळात एक प्रकारचा बडेजाव असतो, पण इथे मात्र अगदी उलट होतं. ही सर्व मंडळी अत्यंत साधी, सुसंस्कृत आणि सामाजिक बांधिलकी जपणारी होती. प्रत्येकाकडे गोव्याच्या मातीबद्दल आणि तिथल्या प्रश्नांबद्दल एक व्हिजन होतं.
कार्यक्रमाचं स्वरूप माझ्या मुलाखतीचं होतं. उज्ज्वलाने अत्यंत अभ्यासू पद्धतीने माझी मुलाखत घेतली. प्रश्न विचारताना तिने माझ्या लेखनाचा आणि कामाचा जो धांडोळा घेतला होता, त्यावरून तिची विषयाची तयारी दिसून येत होती. समोर बसलेल्या श्रोत्यांनीही तितक्याच तन्मयतेने दाद दिली. त्या गप्पांमध्ये केवळ साहित्य किंवा समाजकारण नव्हतं, तर एक प्रकारची वैचारिक देवाणघेवाण होती.
सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं ते उज्ज्वलाच्या मॅनेजमेंटचं! एवढ्या मोठ्या लोकांसाठी वेलकम ड्रिंकपासून ते रात्रीच्या सुग्रास भोजनापर्यंतची सर्व व्यवस्था तिने एकटीने सांभाळली होती. हॉलमधील आसनव्यवस्था, उत्तम साउंड सिस्टम आणि जेवणाचा मेनू... हे सगळं करताना तिच्या चेहऱ्यावर कुठेही ताण नव्हता. इतका मोठा प्रमाणात स्वयंपाक आणि आदरातिथ्य हसतमुखानं करणारी ही माझी मैत्रीण म्हणजे अष्टभुजा देवीचं रूपच वाटली. त्या रात्री रंगलेल्या गप्पांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. गोव्याची ही बौद्धिक श्रीमंती आणि उच्चभ्रू समाजातील हे जमिनीवर असणं, माझ्यासाठी खूप काही सांगून जाणारं होतं.
उज्ज्वलाने आपल्या जोडीदारासमवेत-शामसमवेत गोव्यात अनेक वर्षं केलेली शेती, परदेशात जाणाऱ्या तरुणांसाठी सुरू केलेले कुकिंग क्लासेस आणि 'दिशा' सारखे विवाहोत्सुक तरुणाईसाठीचे उपक्रम... तिची ही धडपड आणि काळासोबत अपडेट राहण्याची वृत्ती थक्क करणारी आहे.
अखेर 12 फेब्रुवारी तारीख उजाडली. त्या दिवशी जेवणही नीटपणे घशाखाली गेलं नाही. घरातून पाय निघत नव्हता. विमानप्रवास अवघ्या ४० मिनिटांचा होता, तरीही मी उपाशी राहू नये म्हणून उज्ज्वलाने प्रेमाने चटणी सँडविच स्वत: तयार करून सोबत दिलं होतं. विमानतळावर सोडताना तिने मारलेली घट्ट मिठी आणि "राजा, पोहोचल्यावर मेसेज कर" ही तिची काळजी... हेच तर मैत्रीचं खरं संचित!
काही भेटी आयुष्यात कायमच्या कोरल्या जातात. उज्ज्वलाच्या आग्रहाखातर केलेला हा 'गोवा दौरा' केवळ पर्यटन नव्हतं, तर मैत्रीच्या अथांग प्रेमाचा अनुभव होता. 'सुसेगाद' गोवा, मारियो मिरांडांची कला आणि जुन्या मैत्रिणीचा मायेचा हात...! गोव्याचे ते शांत रस्ते, मांडवीचं संथ पाणी आणि मैत्रीचा तो उबदारपणा! तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गोव्याची ही सफर घडली आणि मनात कायमची घर करून बसली. मी पुण्यात पोहोचले, कामात गुंतले, पण डोळ्यांसमोर उज्ज्वला, शाम आणि तो निळाशार गोवा तरळतोय. उज्ज्वला आणि गोवा यासोबत शामची भेट हा एक वेगळा, स्वतंत्र आणि अनोखा विषय आहे, त्याबद्दल लवकरच सांगेन!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment