रोज नवी सुरुवात

रोज नवी सुरुवात

मनोविकास प्रकाशनातर्फे ‘रोज नवी सुरुवात’ हे डॉ. सविता आपटे लिखित पुस्तक वाचकांसाठी नुकतंच उपलब्ध झालं आहे.  डॉ. सविता आपटे या मानसशास्त्रज्ञ असून त्या ठाणे शहरातल्या आयपीएच (Institute for Psychological Health) या संस्थेत कार्यरत आहेत. आपल्या पीएचडीचा विषय घेताना त्यांनी स्किझोफ्रेनिया हा विषय जाणीवपूर्वक निवडला होता. स्किझोफ्रेनिया या विकाराला मानसशास्त्रात मानसिक आजारांचा ‘कॅन्सर’ असं संबोधलं जातं. आज जगात एक टक्क्याहून अधिक लोक या विकारानं ग्रस्त आहेत. हा विकार झाला की ‘आता सगळं संपलं’ ही भावना घेऊन चालण्यापेक्षा आपण या विकाराला समजून घेऊन पुढलं आयुष्य कसं सुकर करू शकतो  याविषयी या पुस्तकात उलगडा केला आहे. 
आयपीएच संस्थेत 'त्रिदल' नावाच्या उपक्रमात स्किझोफ्रेनिक रुग्णांना सहभागी करून घेण्यात आलं आहे. या रुग्णांना रुग्ण किंवा पेशंट न म्हणता शुभार्थी (जसं की विद्यार्थी) म्हटलं जातं, तर त्याची काळजी घेणार्‍या व्यक्तींना शुभंकर असं म्हटलं जातं. त्रिदलमध्ये असे अनेक शुभार्थी अनेक गोष्टींचं उत्पादन करण्यात गुंतलेले दिसतात. त्रिदलचा देखील एक वेगळा प्रवास आहे. स्किझोफ्रेनियाच्या शुभार्थींना जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास त्याची देखभाल करणार्‍या शुभंकर व्यक्तींनाही होतो. त्यासाठी शुभंकर व्यक्तीचं मनारोग्य चांगलं राहण्यासाठी देखील काम करणं आवश्यक असतं. त्रिदलतर्फे शुभंकरांसाठी सातत्यानं प्रशिक्षण, मेळावे आणि परिषदा संपन्न होत असतात. यामुळे शुभार्थी कामात गुंतले तर जातातच, पण त्यांच्यातला आत्मविश्वासही त्यांना साथ करत राहतो. प्रस्तावनेत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी स्किझोफ्रेनिया आणि त्रिदल यांची संक्षिप्त स्वरूपात पण अतिशय रोचक तर्‍हेनं माहिती दिली आहे. 
'रोज नवी सुरुवात’ या पुस्तकात डॉ. सविता आपटे यांनी स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांचे पालक यांच्याविषयी लिहिलं आहे. काही केसस्टडीज त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत स्किझोफ्रेनियाची वैज्ञानिक माहिती देखील सहजपणे समोर येत राहते. म्हणजे स्किझोफ्रेनिया कधी होतो, स्त्री-पुरुषांमधलं असणारं त्याचं जागतिक प्रमाण, त्याची लक्षणं, समाजाची मानसिकता, पालकांची मानसिकता, एकत्र कुटुंबपद्धतीमधली बलस्थानं, आपलं मूल स्किझोफ्रेनिक आहे कळल्यावर, 'आपल्यानंतर काय?' या प्रश्नानं कोसळलेला पालक, तसंच या प्रश्नाला सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसणं, अशा सगळ्या गोष्टींवर डॉ. सविता आपटे बोलतात. त्यामुळे या पुस्तकाला एक रूक्ष किंवा किचकट स्वरूप न राहता ते अतिशय संवादी बनलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात 'समोरचा रुग्ण आहे, पालक आहे अणि मी डॉक्टर आहे म्हणजेच मी तुम्हा दोघांपेक्षा कोणी वेगळी आहे' असा अविर्भावही कुठेच औषधालासुद्धा आढळत नाही. आपलंच माणूस आपल्याशी सहजपणे संवाद साधतं आहे इतका मोकळेपणा या लिखाणात जाणवतो. 
जागतिकीकरणानंतर एकत्र कुटुंब पद्धतीचा लोप होत गेला. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आपण सोडून इतरांसाठी काही करणं ही वृत्ती कमी होत गेली. शिवाय आपल्या एकुलत्या एक मुलाला सगळं काही पुरवत राहणं आणि एका टप्प्याला त्यानं चांगलं शिकून अमेरिकेला किंवा परदेशी जाणं यात इतिकर्तव्यता समजणार्‍या पालकांचा अट्टाहास आणि त्यातूनच आपल्या मुलामध्ये असलेल्या कमतरता, उणिवा यांना स्वीकारणं कमी होत गेलं असं लेखिकेनं म्हटलं आहे. स्किझोफ्रेनियाचे उपचार, औषधांच्या बाबतीतला अनियमितपणा कसा भोवू शकतो इथंपासून सामूहिक संवादाबरोबरच वैयक्तिक संवाद किती महत्वाचा आहे हेही लेखिकेनं या पुस्तकातून सांगितलं आहे. आस्था, निरपेक्ष प्रेम म्हणजे काय आणि अशा रुग्णांचा विनाअट आणि निरोगी स्वीकार कसा करायचा याविषयी लेखिका बोलते. 
'रोज नवी सुरुवात’ या पुस्तकात लेखिकेनं खूप चांगल्या पद्धतीने अनेक विषय गुंफले आहेत. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, मेंदूमध्ये जेव्हा न्युरोकेमिकल असमतोल होतो तेव्हा या विकाराची लक्षणं दिसायला लागतात. वास्तवाशी नातं अनेक वेळा तुटल्यामुळे अशा रुग्णांना वेगवेगळे भास व्हायला लागतात, अशा वेळी त्याची बदललेली वागणूक, त्या रुग्णाचा कुटुंबातल्या इतर व्यक्तीवर झालेला परिणाम आणि त्यांना येणारं नैराश्य, आजार न स्वीकारण्याची कुटुंबाची  मानसिकता आणि त्यावरचे उपाय, हे सर्व विषय लेखिकेने हाताळले आहेत. फक्त स्किझोफ्रेनिया घरात शिरला म्हणून नाही, तर सर्वसामान्यांना देखील कित्येक वेळा आकस्मिकपणे समोर आलेल्या परिस्थितीत कसं वागावं हे समजत नाही. अशा वेळी देखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. स्किझोफ्रेनियाचा खूप मोठा बाऊ न करता,  त्याला स्वीकारून पुढे कसं जायचं हे या पुस्तकात खूपच चांगल्या पद्धतीनं लेखिकेनं सांगितलं आहे. त्या सांगण्यात लेखिकेला रुग्णाविषयी आणि त्याच्या पालकांविषयी देखील आपुलकी आहे, स्नेह आहे आणि ममत्वही आहे. 
या पुस्तकाला डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. मुखपृष्ठ आणि आतली मांडणी राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांनी विषयाला साजेशी केली आहे. मनोविकासनं हे पुस्तक अतिशय देखण्या रुपात वाचकांसमोर आणलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर अनेक वाचकांचे गैरसमज दूर होतील हेही निश्चित! आपल्या घरात स्किझोफ्रेनियानं ग्रस्त व्यक्ती असो वा नसो, प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं!
दीपा देशमुख, पुणे. 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.