लेखकाची गोष्ट

लेखकाची गोष्ट

लेखकाची गोष्ट

देशमुख आणि कंपनी प्रकाशित आणि विश्राम गुप्ते लिखित (मार्च २०१९ म्हणजे नुकतंच प्रकाशित झालेलं) बहुचर्चित आत्मचरित्र आज वाचलं. संभा (संजय भास्कर जोशी) यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे अशी शिफारिश केली होती. पुस्तकाच्या मागे त्यांचा बर्ल्ब देखील आहे. आणि तो या पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल प्रामाणिक भावना व्यक्त करणारा आहे.

लेखकाची गोष्ट हे आत्मचरित्र जरा हटके पद्धतीनं लिहिलं आहे. यात वाचकांचं एक न्यायालय आहे आणि या न्यायालयाला उद्देशून लेखक विश्राम गुप्ते आपल्या मनातल्या अनेक भावना व्यक्त करत जातात. त्यातूनच त्यांचा प्रवास उलगडतो. विशेषतः एक वाचक म्हणून त्यांनी जे वेचलं आणि त्यातूनच ते लेखक म्हणून जसे घडले त्याचा हा प्रवास! ते म्हणतात, एक वाचक चांगला लेखक बनू शकेलच असं नाही, पण एक लेखक चांगला वाचक नक्कीच असतो. आत्मचरित्राबद्दलही ते सहजपणे सांगून जातात, 'आत्मचरित्र लिहिण्यासाठी एक तर ती लिहिणारी व्यक्ती प्रसिद्ध असायला हवी आणि तिला आत्मा असायला हवा. असा आत्मा जो अमर असेल. म्हणजे पाण्यानं ओला न होणारा, आगीनं न जळणारा, वार्‍यानं न हलणारा....’ विश्राम गुप्ते यांची ही वाक्यं अंतर्मुख करतात. प्रसिद्ध व्यक्तीनंच आत्मचरित्र लिहायचं का, की ज्याचे/जिचे (साध्या सर्वसामान्य माणसांचे) जगण्यातले जिवंत अनुभव त्यातून वाचकांसमोर आले पाहिजेत? त्यानंतर तर विश्राम गुप्ते सिक्सरच मारतात. ते म्हणतात, आत्मचरित्र लिहिणार्‍या व्यक्तीला आत्मा असायला हवा. प्रसिद्धीच्या पायर्‍या चढत एकदा ती व्यक्ती वर गेली, की तिच्याजवळ आत्मा शिल्लक राहतो का, असा प्रश्न मनाला पडला. आत्म्यावर चढलेली धुळीची पुटं बाजूला करून तिला तिथपर्यंत पोहोचता येतं का? आत्माविरहित ते आत्मचरित्र आत्मचरित्र असतं का? सुरेखशा भांड्यात ठेवलेला तो एक सजावटी पदार्थच जणू! लेखक म्हणतो, आपला आत्मा तर कुठल्याही बाह्य गोष्टींचा परिणाम न होणारा असा नाहीच. त्याच्यावर अन्यायाचा, वेदनेचा, सुखदुःखांचा अनेक गोष्टींचा परिणाम होतो. जे मनात उमटतं तेच ओठांतून बाहेर पडतं. खरं तर इतका प्रांजळपणा सध्याच्या वातावरणात माणसाला जपता येतोय का हाही प्रश्न मनाला पडतो.

लेखकाची गोष्ट ही फक्त विश्राम गुप्ते यांची गोष्ट नाही, तर ती प्रत्येक संवेदनशील माणसाची गोष्ट आहे. मग तो लेखक असो वा नसो. एका लेखकानं कसं असायला हवं याविषयी देखील ही गोष्ट सहजपणे बोलत जाते, मात्र यात कुठलाही उपदेश नाही. लेखक म्हणून घडताना लेखकाचा वाचनप्रवास कसा झाला याची गोष्ट येते. चांदोबा, कुमारपासून सुरु झालेला प्रवास पुढे कसकसा विस्तारत गेला याबद्दल लेखक लिहितो. हा प्रवास देखील अनेकांना आपला वाटण्यासारखा आहे. मला तरी तो प्रवास माझाच वाटला. जणूकाही हे सगळं माझंच मनोगत आहे आणि मीच लिहिलं आहे असं मला वाटत राहिलं.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते वाचन किती महत्त्वाचं होतं, त्या वाचनानं कसं झपाटलं होतं....हे सगळं लेखक सांगत असताना मलाही नारायण धारपांच्या पारंब्यांच्या जगानं कस स्तिमित करून सोडलं होतं आणि चंद्रकांत काकोडकरांच्या चुंबन, आरक्त, उरोज या शब्दांनी कसं कोड्यात पाडलं होतं ते आठवलं. बाबुराव अर्नाळकर असो, वा गुरूनाथ नाईक यांच्या कथांनी एक थरार निर्माण केला होता. मनातला डिटेक्टिव्ह जागा केला होता. श्यामची आई प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असा तो काळ होता. नैतिकतेचे संस्कार देणारी ती गोष्ट! प्रत्यक्ष जगणं इतकं प्रामाणिक असू शकतं का असा प्रश्न लेखकाला पडतो. नेहमी खरं बोलणं किती कठीण आहे हेही त्याला समजतं आणि म्हणूनच आपण जिवाची पर्वा करणारी साधी माणसं आहोत, संत नाहीत असं तो कबूल करतो.

जेम्स हॅडली चेसपासून लेखकाचं इंग्रजी वाचन सुरू झालं आणि त्यानंतर मित्राच्या भावानं इंग्रजी साहित्यातलं वेगळं दालन लेखकासमोर खुलं करून दिलं. इंग्रजी वाचनानं एका व्यापक जगाचा परिचय लेखकाला झाला. इंग्रजी पुस्तकं असोत वा मराठी पुस्तकं - लेखक या वाचलेल्या पुस्तकांचा सारांश देखील वाचकाला सांगतो. त्याला या पुस्तकांनी कसं झपाटून टाकलं हेही सांगतो आणि या पुस्तकांमुळे त्याच्या जगण्यावर झालेले परिणामही सांगतो. खरं तर लेखकाच्या संपूर्ण जगण्याचा प्रवास हा त्याच्या वाचनवेडातूनच पुढे पुढे सरकत जातो आणि कुठल्यातरी एका क्षणी तो लेखक बनतो. आपल्या अस्मितेचा शोध घ्यायचा ठरवलं तर आपल्याला आपल्या माणूसपणाचा शोध घ्यावा लागतो असं लेखक म्हणतो. हा माणूसपणाचा शोध घेणं सोपं काम नाही. ते करण्यासाठी आपण आपल्याशी प्रामाणिक असावं लागतं.

'लेखकाची गोष्ट' या पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी केलंय. मात्र हे मुखपृष्ठ अरूण शेवते यांच्या 'माझे गाव माझे जगणे' संपादित पुस्तकाच्या सतीश भावसार यांच्या मुखपृष्ठाची आठवण करून देतं. असो. 'लेखकाची गोष्ट' या पुस्तकाविषयी सांगताना ते सांगणं एका टप्प्यात होऊ शकत नाही. याबद्दल दुसर्‍या टप्प्यात लेखकानं वाचलेल्या पुस्तकांविषयी आणि त्या त्या लेखकांविषयी, जगण्याच्या तत्वज्ञानाविषयी बोलू. तोपर्यंत अर्धविराम! जरूर वाचा 'लेखकाची गोष्ट'!

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.