नोबेल पुरस्काराची पहिली स्त्री मानकरी - मेरी क्युरी

नोबेल पुरस्काराची पहिली स्त्री मानकरी - मेरी क्युरी

आज मेरी क्युरीचा जन्मदिवस ! आईनस्टाईन तिला प्रेमाने आणि आदराने 'अवर मादाम क्युरी' असं म्हणत असे.आज तिचं शास्त्रज्ञ म्हणून नाव असलं तरी तिच्यातली कणखर खंबीर स्त्री मला फार भावते. तिचं आपल्या कामातलं झपाटलेपण, तिचा साधेपणा, तिचं आणि तिचा जोडीदार प्येर यांच्यातलं उत्कट नातं, तिच्यातला मानवतावाद मला नेहमीच प्रेरणा देतो. आज तिच्याविषयी लिहिताना मुलांपर्यंत हे सगळ तळमळीने पोहोचवणारे दीपक पळशीकर Deepak Palshikar यांच्याबद्दलही मला तितकीच कृतज्ञता वाटतेय. आजची पोस्ट त्यांच्यासाठी आणि मुलांसाठी !!! नोबेल पुरस्काराची पहिली स्त्री मानकरी - मेरी क्युरी (7 November 1867 - 4 July 1934) पोलंडची शास्त्रज्ञ म्हणून जगभर नावाजलेल्या मेरी क्युरीचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ या दिवशी पोलंड देशाची राजधानी वॉर्सा इथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला.

मेरी क्युरीचं नाव घेतल्याशिवाय वैज्ञानिकांचं विश्‍व पूर्णच होऊ शकत नाही. नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यात केलेल्या संशोधनाबद्दल मेरी क्युरीला दोनदा नोबेल पारितोषिक मिळालं. दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत नोबेल पारितोषिक मिळवणारी ही पहिली स्त्री होती. तसंच युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसमधल्या प्रयोगशाळेतली ती पहिलीच स्त्री-प्रमुख होती. किरणोत्सर्ग (रेडिओऍक्टिव्हिटी) हा शब्द पहिल्यांदाच मेरी क्युरीनं प्रचारात आणला. मेरी, मेरीचा नवरा, मेरीची मुलगी आणि जावई या सार्‍यांनीच नोबेल पुरस्कार मिळवला आणि या कुटुंबानं जगासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला. मेरी क्युरीनं लिहिलेले लेख, आकृत्या, समीकरणं आणि सूत्रं बघितली तर सर्वसामान्य माणूस अवाक् होऊन जातो. तिचं बरंच संशोधन प्येर क्युरी या तिच्या नवर्‍याबरोबर होतं.

रेडियमच्या किरणांचे रासायनिक परिणाम, रेडिफेरस बेरियमच्या आण्विक वजनाविषयी, किरणोत्सारी पदार्थ आणि किरण, रेडियम किरणांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम, रेडियमचं आण्विक वस्तूमान अशा महत्त्वाच्या विषयांच्या मुळाशी जाऊन तिनं शोध घेतला. नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकार पाळत ठेवून मेरीला कसं गाठता येईल आणि तिला कधी बोलतं करता येईल, याविषयी प्रयत्न करत असत. मेरीचं साधेपण आणि कष्टदायक जगणं हाच सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय बनला होता. त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये फोटोंसहित तिच्याविषयी भरभरून कथोकल्पित वर्णनं रकानेच्या रकाने भरून येत असत. तिचं दिसणं, तिचा पोशाख, तिची मुलगी, तिची टपरीवजा असलेली प्रयोगशाळा यांच्याविषयी तर ते छापतच असत, पण तेवढ्यावर त्या पत्रकारांचं समाधान होत नसे म्हणून की काय पण मेरीच्या घरातल्या डिडी नावाच्या मांजरीचं वर्णनही छापायला ते कमी करत नसत. मेरी आणि तिचा नवरा प्येर ही दोघं इतकं साधं राहत की रस्त्यानं जात असताना हेच नोबेल पुरस्कार मिळवणारं जोडपं आहे यावर कुणाचाच विश्‍वास बसत नसे. एकदा एका अमेरिकन पत्रकारानं मेरीचा पत्ता कसाबसा मिळवला आणि तो शोधताना रस्त्यावर एका दाराच्या पायरीवर बसून बुटांतली वाळू साफ करणार्‍या स्त्रीला तो पत्ता विचारायला लागला.

त्या पत्रकाराला उत्तर देण्यासाठी त्या स्त्रीनं मान वर करून बघितलं आणि त्याच क्षणी जिला आपण शोधत होतो, ती हीच याची खात्री त्या पत्रकाराला तिच्या भेदक नजरेतून पटली. तो इतका गोंधळला की त्या क्षणी आपण काय करावं हेच त्याला सुचेनासं झालं. क्षणभरात स्वतःला सावरत त्यानं खांद्यावर लटकवलेल्या बॅगमधून आपली वही बाहेर काढली आणि तिच्या शेजारी बसून तो तिला प्रश्‍न विचारायला लागला. आता आपली सुटका नाही हे लक्षात येताच मेरीनं ‘हो, नाही’ अशी त्रोटक उत्तरं त्याला द्यायला सुरुवात केली. एव्हाना तिच्या बुटातली वाळू झटकून झाली होती. तिनं आपल्या खरचटलेल्या पायांवरून नजर फिरवली आणि त्याकडे दुर्लक्ष करत ते बूट पुन्हा पायात सरकवले. पत्रकाराला मात्र संशोधनापेक्षा तिच्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टीत खूप रस असल्यानं त्यानं तिचं लहानपण, तिची कामाची पद्धत आणि तिचं रोजचं जगणं याबद्दलचे प्रश्‍न विचारायला सुरुवात केली. पण मेरी आपला स्कर्ट झटकत उठली आणि तिनं एका वाक्यात त्या पत्रकाराला उत्तर दिलं, 'विज्ञानाच्या क्षेत्रात त्यातल्या वस्तू, त्यातलं संशोधन यात रस घ्यायला हवा, व्यक्तीत नाही.' एवढं बोलून ती चालायला लागली आणि तो पत्रकार मात्र स्तिमित होऊन तिच्या पाठमोर्‍या तडफदार आकृतीकडे बघतच राहिला!

४ जुलै, १९३४ या दिवशी रेडिएशनमुळेच झालेल्या ल्युकेमियानं (अप्लॅस्टि ऍनेमिया) मेरीचा जीव घेतला. रेडियम आणि त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी हा अतिशय महत्त्वाचा आणि एक कालखंड निर्माण करणारा असा मेरीनं लावलेला शोध होता. म्हणूनच मेरी क्युरीच्या संपूर्ण संशोधनानं भौतिक आणि रसायनशास्त्र यांच्यात संशोधनासाठी अनेक मुद्दे आणि आयाम निर्माण केले. याशिवाय महिलाच्या जगतातदेखील तिच्या कार्यामुळे आणि सन्मानामुळे वेगळे दृष्टिकोन मिळाले. मेरी द्रष्टी होती, स्वतंत्र होती आणि खर्‍या अर्थानं विदुषीही होती. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यात जी कामगिरी केली आहे तिला तोड नाही. तिला मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या प्रीत्यर्थ २०११ साल हे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्राचं वर्ष म्हणून जगभर साजरं केलं गेलं यातूनच ती किती महत्त्वाची शास्त्रज्ञ होती हे समजतं. तिचं जगणं आणि तिचं काम जरी समजून घेतलं तरी ते प्रचंड मोठं प्रेरित करणारं असंच आहे. मेरीच्या कार्याचं नित्य स्मरण व्हावं यासाठी अनेक प्रकारे तिची स्मारकं जागोजाग उभारली गेली.

आज एकशे सोळा मूलद्रव्यं विज्ञानाच्या जगाला माहीत आहेत. त्यातल्या ९६ व्या मूलद्रव्याला क्युरीयम हे मेरीच्या आठवणीदाखल नाव देण्यात आलं. काही किरणोत्सारी खनिजांना देखील क्यूराईट, स्क्लोडोवस्कईट, क्यूप्रोस्कोडोवस्काईट अशी नावं दिली गेली. पॅरिस विद्यापीठ आज प्येर आणि मेरी क्युरी विद्यापीठ या नावानंच ओळखलं जातं. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क आणि शिकागो इथल्या काही महाविद्यालयांनाही मेरीचं नाव देण्यात आलं आहे. मेरीच्या जीवनावर १९४३ साली मादाम क्युरी या नावाचा चित्रपटही प्रसिद्ध झाला आणि या अमेरिकन चित्रपटानं ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनंही मिळवली होती. पोलंड आणि फ्रान्सच्या नोटांवर मेरीचं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं. तिच्या आठवणीदाखल पोस्टाची तिकीटंही काढण्यात आली होती. मेरीचा विज्ञानवादी दृष्टिकोन असल्यानं तिनं कधीच देवावर विश्‍वास ठेवला नाही. ती जन्मभर निरीश्‍वरवादीच राहिली. मेरी आणि प्येर यांनी रेडियमचं पेटंट देखील घेण्याचा मोह कधी बाळगला नाही. आपले शोध त्यांनी राष्ट्राला मानवजातीच्या कल्याणासाठी अर्पण केले.

साधेपणा, मानवतावाद आणि विज्ञानाबद्दलची तळमळ यामुळे मेरीचं नाव विज्ञानाच्या आसमंतात कायमच चमकत राहील हे मात्र निश्‍चित! मेरीनं जरी हे जग सोडलं तरी जाण्यापूर्वी तिनं अणुविषयीच्या आपल्या कल्पना बदलण्यात प्रचंड मोठी कामगिरी बजावली. आपल्या आजारपणाचा गाजावाजा झालेलाही मेरीला मुळीच आवडत नसे. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेनुसार अतिशय साधेपणानं तिला प्येर क्युरीच्या समाधीजवळच दफन करण्यात आलंं. पोलंडहून आपल्या बहिणीला शेवटचा निरोप द्यायला आलेले जोसेफ आणि ब्रोन्या यांनी पोलंडची माती बरोबर आणली होती. ती मूठभर माती आपल्या लाडक्या बहिणीच्या शवटपेटीवर टाकताना त्यांच्या मनाला झालेल्या यातना विज्ञानविश्‍वातल्या सगळ्यांच्याच होत्या आणि म्हणूनच त्या व्यक्त करण्यासाठी कोणाकडेच शब्दही नव्हते! मेरी क्युरी आणि तिचा जोडीदार प्येर क्युरी यांनी आपल्या शोधाचं पेटंट घ्यायलाही नकार दिला होता. कारण स्वतःचा स्वार्थ जपण्यापेक्षा संपूर्ण मानवजातीला हे वैज्ञानिक शोध खुले करून ठेवले पाहिजेत असं त्यांना वाटे. विश्‍वाच्या कल्याणासाठी झटणार्‍या जगावेगळ्या मेरी क्युरी आणि प्येर क्युरी यांच्या कार्याला मनापासून सलाम!

दीपा देशमुख ७ नोव्हेंबर २०१७

 

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.