गॅलिलिओ गॅलिली
जंगलात राहणार्या एका माणसाच्या कानावर रात्रीच्या वेळी एक वेगळाच मधुर आवाज पडला. तो माणूस आवाजाच्या दिशेनं शोध घेत निघाला तेव्हा त्याला वाटेत अनेक प्रकारचं संगीत ऐकू आलं. रातकिड्यांची किणकिण, मंदिराच्या दाराच्या बिजागरींच्या आवाजातलं नादावणारं संगीत, गांधीलमाशीच्या पंखांच्या फडफडण्यातलं अवीट संगीत, नाकतोड्याच्या पायातून निर्माण होणारं लयबद्ध संगीत त्याला या वाटेत ऐकायला मिळालं. इतकंच काय पण पुढे दोन मद्य पिणार्या मद्यपींच्या नखाच्या टिचकीनं प्याल्यांवर निर्माण होणारं संगीतही त्या माणसाला खूपच जादुई वाटलं. तेवढ्यात त्या माणसाच्या हातावर चिकाला नावाचा एक कीटक येऊन आदळला. त्या चिकालामधूनही एक अनोखं संगीत बाहेर पडत होतं. चिकालाच्या कुठल्या अवयवातून आवाज येतोय हे बघण्यासाठी मग त्यानं चिकाल्याचे पंख, तोंड, बरगड्या असं दाबून बघितलं. शेवटी एका सुईनं त्याला टोचून बघितलं आणि त्यामुळे चिकाल्याचं हृदय फुटलं आणि तो मरण पावला. त्यानंतर मात्र आवाज थांबला. पण त्या संगीताचं उगमस्थान काही शोधू शकला नव्हता. माणूस म्हणून आपलं ज्ञान खूपच तोकडं आहे आणि या विश्वातल्या अनेक गोष्टीं आपल्यासाठी गूढच राहणार आहेत. त्यापैकी काहींचीच आपण उकल करू शकतो हेही त्याच्या लक्षात आलं.
ही गोष्ट होती, जगप्रसिद्ध वैज्ञानिक गॅलिलिओ गॅलिली लिखित ‘द आसेयर’ या गणिती भाषेतल्या महान ग्रंथामधली! आपलं म्हणणं सांगण्यासाठी तो अतिशय समर्पक, रसाळ आणि रोचक कथा रचून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे. त्याच्या प्रत्येक लिखाणातून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याची युक्तिवाद करण्याची शैली, त्याचं विचारसौंदर्य आणि हातोटी लक्षात येते. गॅलिलिओ एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि एक तत्त्वज्ञ असं सगळंच काही होता! गॅलिलिओला ‘आधुनिक खगोलशास्त्राचा, भौतिकशास्त्राचा आणि विज्ञानाचा पितामह’ असंही म्हटलं जातं. त्या काळी गॅलिलिओला ‘तार्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस’ असंही म्हणत. प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालून निष्कर्ष काढणारा गॅलिलिओ हा पहिलाच शास्त्रज्ञ होता.
‘सगळे प्राकृतिक नियम हे गणिती नियमांचं पालन करतात’ असं पहिल्यांदा गॅलिलिओनं म्हटलं. गॅलिलिओनं समुद्री यात्रा करणार्यांसाठी उच्चत्तम प्रतीचा एक उपयुक्त कंपास बनवला होता. त्यानं थर्मामीटर, सूक्ष्मदर्शक, पेंड्युलमचं घड्याळ, खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप अशा अनेक गोष्टींचे शोध लावले. गॅलिलिओनं भौतिकशास्त्रातले गतीचे नियम सिद्ध केले. त्यानं सांगितलेला जडत्वाचा नियम तर जगप्रसिद्ध आहे. वस्तूच्या खाली पडण्याचा वेळ हा त्याच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो हे सिद्ध करून दाखवलं. तसंच तापमान वाढलं की वायूचं आकारमान वाढतं आणि वाढत्या आकारमानाची नोंद घेऊन तापमान मोजता येतं; तसंच जोपर्यंत आपण लंबकाची लांबी बदलत नाही तोपर्यंत त्याच्या हेलकाव्याची वेळ स्थिर राहते किंवा दुर्बिणीच्या साहाय्यानं ग्रहगोलांचं अचूक निरीक्षण करता येतं, हे सगळं गॅलिलिओनं सर्वप्रथम मांडलं. तसंच चंद्रावरचे डोंगर, दर्याखोर्या आणि खड्डे यांचं दर्शन आपल्या दुर्बिणीतून पहिल्यांदा गॅलिलिओनंच आपल्याला घडवलं.
जवळ जवळ १६ व्या शतकापर्यंत कोपर्निकसचा अपवाद सोडला तर ख्रिस्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या अॅरिस्टॉटलपासून ते गॅलिलिओच्या जन्मापर्यंत जवळ जवळ २००० वर्षं अॅरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्वज्ञान आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रचंड पगडा पाश्चात्य विचारसरणीवर खूपच मोठ्या प्रमाणात होता. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते असं अॅरिस्टॉटल म्हणायचा. टॉलेमीनं देखील अनेक गोष्टीत अॅरिस्टॉटलचीच री ओढली होती. गंमत म्हणजे या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिम्मत नव्हती. ती हिम्मत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली.
त्या काळी इटलीवर रोमन कॅथॅलिक चर्चचा प्रचंड प्रभाव होता. तसंच अॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाच्या मते पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी किंवा केंद्रभागी असून अशा स्थिर पृथ्वीभोवती बुध, शुक्र, मंगळ, शनी आणि गुरू फिरतात असं तो म्हणायचा. त्या काळी अॅरिस्टॉटलला नावं ठेवणं म्हणजे बायबलचा अपमान केल्यासारखं समजलं जात असे. चर्चच्या किंवा अॅरिस्टॉटलनं मांडलेल्या विचारांच्या विरोधात कोणी बोललं तर लगेचच त्याच्या कृतीला धर्मद्रोह ठरवून कठोरातली कठोर शिक्षा करत. पोलंडमधला निकोलस कोपर्निकस यानं पहिल्यांदा अॅरिस्टॉटलच्या म्हणण्याला विरोध दर्शवला. पुढे कोपर्निकसच्या विचारांना पुढे नेण्याचं काम योहान केप्लर यानं केलं. पण १६२६ साली त्याचं घरही जाळून टाकण्यात आलं.
अशा सगळ्या वातावरणात गॅलिलिओचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ साली इटलीमधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे झाला. गॅलिलिओचे वडील संगीतशिक्षक होते. गॅलिलिओला त्यांनी ग्रीक आणि लॅटिन संगीत शिकवलं. होमर, दान्ते आणि व्हर्जिल यांची काव्यं गॅलिलिओला तोंडपाठ होती. आपल्या वडलांचं कलासक्त मन, झपाटलेपण, बंडखोरवृत्ती, पुरोगामी विचारांची कास, प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता या गोष्टींचा प्रचंड मोठा प्रभाव गॅलिलिओवर पडला. विज्ञान हे प्रयोगाच्या आणि निरीक्षणांच्या आधारावर उभं असलं पाहिजे असं त्याला वाटे. पिसामधल्या चर्चमधला छतावर लटकणारा नक्षीदार दिवा आणि त्या दिव्याच्या झोक्याचं लयबद्ध मागेपुढे होणं गॅलिलिओला अचंबित करून गेलं. झोका लहान असो वा मोठा किंवा लंबकाचं (पेंड्युलमचं) वजन कमी असो वा जास्त, जोपर्यंत लंबकाच्या दोरीची लांबी तेवढीच राहते, तोपर्यंत त्याच्या आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो असा निष्कर्ष गॅलिलिओनं प्रयोगांनंतर निरीक्षणं करून काढला. दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनासाठी लागणारा वेळ बदलतो हेही त्याला समजलं. याच पेंड्युलमचा वापर नंतर गॅलिलिओनं त्याचे ‘गतीचे नियम’ मांडण्यासाठी केला. आजही त्या कॅथीड्रलमधला एक दिवा ‘गॅलिलिओचा दिवा’ म्हणून ओळखला जातो.
याच दरम्यान घरच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे गॅलिलिओनं पिसाच्या विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. ‘जड वस्तू ही हलक्या वस्तूपेक्षा जमिनीवर आधी पडते’ यातलं सत्य पडताळण्यासाठी त्यानं १५९१ साली पिसाच्या मनोर्यावरून जड आणि हलकी वस्तू खाली टाकून बघायचं ठरवलं. ११७४ साली बांधलेल्या पिसाच्या मनोर्यावरून १७९ फूट उंचीवरून त्यानं एक ५० किलोचा, तर दुसरा १ किलोचा असे दोन तोफेतले गोळे एकाच वेळी खाली सोडले. जमलेले सर्व लोक श्वास रोखून ते नाट्य बघत होते. काहीच क्षणात दोन्ही तोफेचे गोळे जवळपास त्याच वेळी जमिनीवर येऊन पडले आणि २००० वर्षं चालत आलेल्या अॅरिस्टॉटलच्या मतांना धक्का दिला.
त्यानंतर गॅलिलिओनं पडुआ विश्वविद्यालयात १८ वर्षं नोकरी केली. त्याची कीर्ती ऐकून परदेशातूनही विद्यार्थी त्याच्याकडे शिकायला यायला लागले. १५९३ साली गॅलिलिओनं भौतिकशास्त्रातलं अत्यंत उपयोगी असं तापमापक (थर्मामीटर) हे साधन बनवलं. गॅलिलिओला ‘थर्मामीटरच्या कल्पनेचा जनक’ म्हटलं जातं. गॅलिलिओनं वेग (व्हेलॅसिटी) याची कल्पना वैज्ञानिक परिभाषेत मांडली. गॅलिलिओनं बल किंवा जोर (फोर्स) याचीही कल्पना मांडली. कुठलाही पदार्थ जोपर्यंत आपण त्यावर बाहेरून कुठलाही जोर लावत नाही तोपर्यंत त्याच वेगानं प्रवास करत राहतो आणि ही त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच असते असं गॅलिलिओनं मांडलं. १६०९ साली गॅलिलिओनं चक्क २४ तासांत डचांच्या दुर्बिणीपेक्षा तिप्पट शक्तिशाली दुर्बिण तयार केली. त्या क्षणापासून संपूर्ण विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला! या दुर्बिणीतून गॅलिलिओनं चंद्रावरचे डोंगर, दर्या, विवरं अशा अनेक गोष्टी न्याहाळल्या. चंद्रावर दिसणारे डाग हे डाग नसून तिथल्या डोंगराच्या पडणार्या सावल्या आहेत हे गॅलिलिओला जाणवलं. या सगळ्या शोधांवर मग गॅलिलिओनं ‘दी स्टारी मेसेंजर’ नावाचं पुस्तकही लिहिलं.
१६१० साली गॅलिलिओनं गुरुचं निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह आणि चंद्र शोधून काढले. गुरूला आणखी उपग्रह आहेत ही गोष्ट त्या काळी कोणालाच ठाऊक नव्हती. पण गॅलिलिओनं आपल्या दुर्बिणीतून गुरुच्या भोवती फिरत असलेले चार चंद्र शोधले. दिवसेंदिवस गॅलिलिओची कीर्ती अशा गोष्टींमुळे वाढतच चालली होती. पण पोपच्या दरबारातले अनेक जण गॅलिलिओवर जळत होते. इतके की गॅलिलिओवर धर्मद्रोही आणि पाखंडी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आणि त्याला पकडून सरळ एका अंधारकोठडीत डांबण्यात आलं. त्या काळी आरोप सिद्ध होण्यापूर्वी तुरुंगात डांबलेल्यांचा अतोनात छळही केला जात असे. त्यानं गुडघे टेकून माफी मागावी असा त्यांचा हेतू होता. कडक नजरकैदेत राहूनही गॅलिलिओनं ‘डिसकोर्सेस’ नावाचा आणखी एक ग्रंथ लिहून काढला. याच काळात त्यानं गणितावरचाही एक ग्रंथ लिहिला. अखेर गॅलिलिओनं पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही असं कबूल करून चर्चची माफी मागितली. त्यानंतर गॅलिलिओची सुटका झाली, पण त्याला नजरकैदेत ठेवण्याचा हुकूम मिळाला. या नजदकैदेतली त्याची वर्षं खूपच नैराश्यात गेली. त्याला त्यात संधिवात आणि किडनीचे असे बरेच रोग झाले. त्याची दृष्टीही अधू झाली होती.
८ जानेवारी १६४२ रोजी गॅलिलिओ मृत्युमुखी पडला. १७३७ सालार्पंत म्हणजे शंभरएक वर्ष गॅलिलिओचं स्मारक सुद्धा उभं राहिलं नाही. गंमत बघा! गॅलिलिओच्या मृत्यूनंतर तब्बल ३४० वर्षांनी म्हणजे १९८२ साली ‘सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो या विषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली. मग त्यावर १० वर्ष विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून १९९२ साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी ‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते’ हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मथळ्यावर झळकली होती! त्या अगोदर तीन वर्ष म्हणजे १९८९ साली झेप घेतलेलं ‘गॅलिलिओ’ नावाचं अंतराळयान १९९५ साली जेव्हा गुरुपर्यंत पोहोचलं तेव्हा विसाव्या शतकानं गॅलिलिओला केलेला तो सलामच होता! गॅलिलिओच्याच दुर्बिणीनं याच गुरुभोवती फिरणारे चार चंद्र बरोबर ३८५ वर्षांपूर्वी टिपले होते!
दीपा देशमुख
Add new comment