अल्बर्ट आईन्स्टाईन

अल्बर्ट आईन्स्टाईन

गबाळ्यासारखे काडे आणि निळी टोपी घातलेला एक माणूस प्रिन्स्टन- न्यू जर्सी इथल्या आपल्या घरातून ‘इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स स्टडी’मध्ये जायला निघायचा, तेव्हा त्याचे उडणारे, विस्कटलेले पांढरे वाढवलेले लांब केस आणि तोंडातला पाईप असा त्याचा तो अवतार बघून तो चक्क माळीच वाटायचा. पण तो होता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ- अल्बर्ट आईन्स्टाईन! ‘एखादी गोष्ट तुम्हाला सोपेपणानं सांगता येत नाही याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही’ असं आईन्स्टाईन म्हणायचा.

अल्बर्ट आईन्स्टाईन स्वातंत्र्य, न्याय आणि समता मानणारा एक पुरोगामी विचारवंत होता. आज विज्ञानात आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ओलांडून पुढेच जाता येत नाही. १९९९ साली ‘टाईम’ मॅगॅझिननं तर त्याला या शतकातला ’सर्वश्रेष्ठ माणूस’ म्हणून गौरवलं.

१४ मार्च १८७९ या दिवशी अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्म जर्मनीतल्या उल्म या शहरात हर्मान आणि पॉलीन या बुद्धिमान जोडप्याच्या पोटी झाला. अल्बर्ट ३१ मार्च १८८५ या दिवशी कॅथॅालिक एलिमेंटरी स्कूलमध्ये दाखल झाला. लहानाणी तो चक्क ‘स्लो लर्नर’ होता असंच अनेकांना वाटे. याचं कारण अल्बर्टची बुद्धी नसून शाळेतलं वातावरण होतं. त्याची लॅटिन शिकवणारी शिक्षिका त्याला म्हणाली होती, ‘तुला आयुष्यात कधीच काही जमणार नाही.’ खरं तर हे वाक्य नंतर लक्षावधी वेळा ‘कोट’ केलं गेलं आणि ती शिक्षिकाही अल्बर्टबरोबर वेगळ्या अर्थानं आणि कारणानं अजरामर झाली!

अल्बर्टला शाळेतली कडक शिस्त कधीच आवडली नाही. अल्बर्टला वयाच्या बारा वर्षापर्यंत धर्म आणि ईश्‍वर या विषयांची गोडी होती. पण पुढे निसर्ग हाच देव हेच त्याच्या मनात पक्क ठसलं. शेक्सपिअर, गटे यांचं लिखाण आणि ‘क्रिटिक ऑफ प्युअर रीझन’ हे इमॅन्युअल कँटनं लिहिलेल्या तत्त्वज्ञानावरच्या पुस्तकाचा अल्बर्टवर मोठा प्रभाव पडला. अल्बर्टचं शिक्षण चालू असताना त्याला मागं ठेवून अल्बर्टचं कुटंब म्यूनिकमधून इटलीत मिलानमध्ये व्यवसायासाठी जाऊन धडकलं. २९ डिसेंबर १८९४ या दिवशी अल्बर्ट आपलं शिक्षण अर्धवट सोडून थेट मिलानला पोहोचला. तिथल्या झूरिक पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेत तो नापास झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १८९६ साली स्वित्झर्लंडमधल्या झूरिक इथल्या ‘फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ इथल्या प्रवेश परीक्षेत पास होऊन त्यानं आपला गणित शिक्षक म्हणून डिप्लोमा पूर्ण केला. त्यानं आपलं जर्मन राष्ट्रीयत्व रद्द केलं होतं. त्यानंतर आईन्स्टाईननं २१ फेब्रुवारी १९०१ या दिवशी स्विस नागरिकत्व स्वीकारलं.

याच दरम्यान आईन्स्टाईनची मिलेव्हा मारिक या मूळच्या ग्रीसमधल्या आणि नंतर लहानपण हंगेरीत जाऊन स्वित्झर्लंडमध्ये आलेल्या विद्यार्थिनीशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. या काळात डिप्लोमा हातात असला तरी आईन्स्टाईनला कुठे नोकरीच मिळेना. आईनस्टाईनला आयुष्यात आपण प्रचंड अपयशी आहोत असं वाटायला लागलं. त्यानं अनेकदा या काळात आत्महत्येचाही विचार केला होता. त्याच्या मॉरिस सोलोव्हाईन या मित्राजवळ तर ‘आता पैसे मिळवण्यासाठी गळ्यात व्हायोलीन अडकवून चौकाचौकात वाजवत फिरावं की काय?’ असंही त्यानं बोलून दाखवलं होतं. स्विस सैन्यात भरती होण्याकरता दिलेल्या परीक्षेत त्याचे पाय सपाट असल्यानं तो नापास झाला! त्याच दरम्यानं आपल्या मुलाच्या-आईन्स्टाईनच्या-अपयशानं हाय खाऊन त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेचा आईन्स्टाईनच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

मग वर्षभरानंतर आईन्स्टाईनला अखेर एका शाळेत शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी मिळाली. शाळेतली नोकरी करता करता एकीकडे आईन्स्टाईनचं संशोधनाचं कामही सुरू होतं. शाळेतली ती नोकरी संपल्यावर त्यानं मार्सल ग्रोसमन या वर्गमित्राच्या मदतीनं बर्न इथल्या एका पेटंट ऑफिसमध्ये तृतीय श्रेणीची नोकरी मिळाली. ही नोकरी करत असतानाच त्यानं सापेक्षतावादावरचा अभ्यास केला. नोकरी मिळाल्यावर ६ जानेवारी १९०३ या दिवशी आईन्स्टाईन आणि मिलेव्हा यांचं लग्न झालं. पण आईन्स्टाईन आणि मिलेव्हा यांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. ’आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार’ याचीही आईन्स्टाईनला इतकी खात्री होती की त्यानं मिलेव्हाला घटस्फोटाच्या मोबदल्यात आपल्याला भविष्यात मिळणार्‍या नोबेल पारितोषिकातले पैसे देऊ केले होते!

१७ मार्च १९०५ या दिवशी आईन्स्टाईननं क्वांटम थिअरीवरचा पेपर पूर्ण केला. त्यानं लिहिलेल्या सहा प्रबंधातले ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’, ‘बाऊनियन मोशन’ आणि ‘सेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ हे तीन प्रबंध अतिशय महत्त्वाचे आणि युगप्रवर्तक होते! यातला रिलेटिव्हिटीवरचा प्रबंध तर त्यानं फक्त पाच आठवड्यात काम करता करता मधल्या फावल्या वेळात लिहिला होता! यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रबंधांसाठी आईन्स्टाईननं कुठलीही प्रयोगशाळा वाारली नव्हती. त्याचे प्रयोग वैचारिक असत (थॉट एक्सपरिमेंटस्). फक्त तर्काच्या जोरावर या अचाट माणसानं जग हलवून सोडलं होतं. ‘माझी प्रयोगशाळा (म्हणजे माझं फाउंटन पेन) माझ्या नेहमी खिशात असते,’ असंच तो म्हणायचा.

१९०४ साली त्याच्या ‘ऑलिंम्पिया अॅकेडमी’मधल्या मायकेल बेसो या मित्राबरोबर सहज गप्पा मारताना आईन्स्टाईनला सापेक्षतावादाचं (रिलेटिव्हिटीचं) कोडं सुटलं आणि e = mc2 हे जगप्रसिद्ध समीकरण समीकरण म्हणजेच आईन्स्टाईन इतकं ते गाजलं! यानंतर त्याचे फोटो, त्याची पोस्टर्स, त्याच्यावरचे अनेक लेख, पुस्तकं आणि इतर गोष्टींनी त्याचं नाव एल्व्हिस प्रीस्ले, मर्लिन मन्रो यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय बनलं होतं. आईनस्टाईन हा रातोरात खर्‍या अर्थानं ’मेगास्टार’ बनला होता. १९२१ साली आईन्स्टाईनला जेव्हा प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा नोबेल कमिटीचं ’थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’च्या संबंधी अजूनही एकमत होत नव्हतं. शेवटी मग यातून तोडगा म्हणून त्याला त्याच्या ’फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’साठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं!

१९१७ साली सतत काम आणि ताण यांच्यामुळे आईन्स्टाईनला यकृताचा विकार जडला आणि तो सपाटून आजारी पडला. या सगळ्या आजारपणाच्या काळात एल्सा लोवेन्थाल नावाची एक नर्स त्याची सेवाशुश्रुषा करायला लागली आणि त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी २ जून १९१९ या दिवशी लग्न केलं. ‘आपण एका मोठ्या माणसाची बायको आहोत याचा एल्साला अभिमान वाटे ’ असं चार्ली चॅप्लीननं म्हणून ठेवलंय. आईनस्टाईन जेव्हा क्वचित एखाद्या नाटकाला जाई, तेव्हा प्रचंड मोठ्या स्टार नटनट्यांपेक्षा तोच या प्रयोगातला सेलेब्रिटी ठरायचा. दोन अंकांमध्ये मोठमोठ्या नट्या स्टेजवरून खाली उतरून, वाकून आईनस्टाईनला अभिवादन करून परतायच्या तेव्हा एल्साला प्रचंड आश्चर्य आणि आनंद वाटायचा.

हिटलरच्या नाझी शिकवणुकीच्या तर आईन्स्टाईन विरुद्धच होता. नाझींनीही १९३३ साली त्याची सगळी पुस्तकं जर्मनीत जाळली. आईनस्टाईनला मारणार्‍याला एक हजार डॉलर्सचं बक्षीसही नाझींनी जाहीर केलं होतं. शेवटी नाझींच्या जाचाला कंटाळून आईन्स्टाईन अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठात शिकवायला लागला. आईनस्टाईन प्रचंड विसरभोळा असल्यामुळे प्रिन्स्टनमध्ये राहत असताना कित्येकदा तो स्वत:चं घरच विसरे. तसंच आईन्स्टाईनला उंची कपडे वापरणं, विनाकारण खर्च करणं, चैन करणं, गर्दी आणि प्रसिद्धी या गोष्टी आवडत नसत. आईन्स्टाईनच्या खिशात अनेक वस्तू खचाखच कोंबून भरलेल्या असत. पेनला लावलेला चाकू, बिस्किटांचे तुकडे, नोट्स लिहिण्यासाठी केलेले कागदाचे कपटे, तंबाखू, बसची जुनी तिकिटं, त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रं, कविता, गणिताची लिहिलेली अवघड सूत्रं, राजघराण्यातल्या लोकांनी दिलेल्या मौल्यवान भेटवस्तू वगैरे. गंमत म्हणजे खिशात ठेवलेल्या या वस्तूही आईन्स्टाईन नीट सांभाळून ठेवू शकत नसे. त्याच्या खिशातून निघालेली महत्वाची कागदपत्रं तर ओळखूही येणार नाहीत अशा वाईट परिस्थितीत बघायला मिळत.

आईन्स्टाईनला जगातून असंख्य पत्रं ‘जगातला सुपरहुशार माणूस’, ‘या विश्वाचा चीफ इंजिनिअर’, ‘देवदूत’ किंवा ‘मानवतेचा सेवक’ वगैरे नावांनी कित्येकदा पत्त्याशिवाय येत आणि तरीही ती त्याच्याकडे पोहोचत. आईन्स्टाईननं कधीही मदतनीस ठेवला नाही. ‘स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे’ असं तो म्हणायचा. प्रवास करताना तो कुठल्याही अनोळखी माणसाला लिफ्ट देऊन त्याच्याबरोबर मैत्री करून लगेचच हास्यविनोदाला सुरुवात करत असे. आईनस्टाईन शिकवतानाही खूप मजा करायचा.

आईन्स्टाईनला स्थळाकाळाचं बंधन पाळावं असं वाटत नसे. भूक लागेल तेव्हा खायचं आणि थकून झोप येईल तेव्हा झोपायचं हा त्याचा खाक्या होत्या. भौतिक सुखसोयींच्या बाबतीत लिहिण्याचं साहित्य, व्हायोलिन, टेबल-खुर्ची, अंथरूण इतक्या वस्तूंच त्याला आवश्यक वाटत. लहान मुलंही आईन्स्टाईनला आवडत असत. आईन्स्टाईन मोत्झार्टच्या संगीताचा निस्सिम चाहता होता. आईन्स्टाईनला न्यूटन, मॅक्सवेल, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि मोत्झार्ट यांच्याविषयी प्रचंड आदर होता.

आईन्स्टाईन पहाटे चार वाजता उठून तो लिहायला सुरुवात करत असे. त्याचा समाजवादावर विश्वास होता. त्याला समाजातली गरीब-श्रीमंत यांच्यातली प्रचंड दरी, पिळवणूक आणि युद्ध या गोष्टी त्याला मान्य नव्हत्या. त्याचा ’व्हाय सोशॅलिझम?’ हा खूप सुंदर निबंध आहे. आईन्स्टाईननं युद्ध, अणुयुद्ध, हुकूमशाही, राष्ट्रवाद, मानवी हक्क, कृष्णवर्णियांचे प्रश्‍न, माणसाच्या अस्तित्वामागचा हेतू, जागतिक अरिष्ट, संपत्ती, जागतिक शांतता आणि माणूस आणि विज्ञान अशा अनेक विषयांवर लेखन केलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ‘धर्म आणि विज्ञान’ या विषयावर आईन्स्टाईननं लिहिलेला लेख चांगलाच गाजला होता. माणूस भीतीमुळे धर्माचा स्वीकार करतो असं त्यानं म्हटलं होतं.

मॅनहॅटन या अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रॉजेक्टमध्ये आईन्स्टाईनची विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दुसरं महायुद्ध सुरू होण्याआधी युद्धाची भीती आणि त्यात जर्मनी अणुबॉम्ब बनवेल ही शक्यता आईन्स्टाईननं अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना एक पत्र लिहून कळवली होती. १९४५ साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते संपण्याच्या वेळी अमेरिकेनं जेव्हा जपानवर बॉम्ब टाकला तेव्हा त्याचा आईन्स्टाईननं तीव्र शब्दात निषेध केला. १९४८ सालच्या मे महिन्यात युनायटेड नेशन्सच्या पुढाकारानं इाायलची स्थापना झाली. आईन्स्टाईननं ज्यू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच हात पुढे केला होता. त्यामुळे इस्त्रायलनं आईन्स्टाईनला इस्त्रायलचा राष्ट्राध्यक्ष होण्याची विनंती केली. पण अतिशय नम्रपणे आईन्स्टाईननं या प्रस्तावाला नकार दिला. यानंतर आईन्स्टाईन जर्मनीला कधीच परतला नाही. अमेरिकेत प्रिन्स्टनमध्येच त्यानं संशोधन केलं. शांततेचा त्यानं कायम पुरस्कार केला. आईन्स्टाईन हा डिस्लेक्सिया विकारानं ग्रस्त असल्याचंही म्हटलं जातं. १८ एप्रिल १९५५ च्या पहाटे वयाच्या शहात्तराव्या वर्षी आईन्स्टाईनचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वीही तो डॉक्टरांची चेष्टामस्करी करत होता. आईन्स्टाईनची आठवण म्हणून ९९ क्रमांकाच्या धातूला ‘आईन्स्टाईनियम’ असं नाव देण्यात आलं आणि ते Es म्हणून ओळखलं जातं!

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.