चलो इक बार फिरसे...
नागपूरला १४, १५ आणि १६ सप्टेंबर २०१२ अशी तीन दिवसांची ‘चाईल्डहूड डिसअॅबिलिटी कॉन्फरन्स’ होती. मला या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी जायचं होतं. ‘पुणे टू नागपूर’ असं ट्रेनचं रिझर्वेशन झाल्यातच जमा आहे असं आयोजकांनी सांगितल्यामुळे मी निश्चिंत होते. प्रवासाआधी दोन-चार दिवस आधीच भली मोठी सुटकेस भरून ठेवली. खूप दिवसांनी जरा तब्येतीनं सामान घ्यावं असंही वाटलं....
जायच्या आदल्या दिवशीपर्यंत हाती तिकिट नाही, मेल नाही त्यामुळे थोडी काळजीत पडले आणि समजलं, तिकीट वेटिंगला आहे, वाटलं आता जायला नको. कारण प्रवासाच्या बाबतीत असलेला माझा फोबिया....अर्थात एकटीनं कुठेही जाताना तो उफाळून येतो....नकोच जायला.... मी जायचं नाही ठरवून बॅग न घेता ऑफीसला गेले. कारण बॅग घेऊनच ऑफीसला जायचं आणि तिथूनच रेल्वेस्टेशन गाठायचं असा आधी आखलेला कार्यक्रम होता............! ऑफिसची दैनदिंन कामं आटोपली आणि निघताना वृद्धाश्रमाकडे गाडी आपसुक वळाली. थोडा वेळ मिळाला की तिथे जायला बरं वाटतं. सायंकाळी त्या सगळ्या एकतर टेरेसवर किंवा खाली हॉलमध्ये शांतपणे येऊन एकत्र बसतात. फार बोलताना दिसत नाहीत.... मी गेले की - जिच्यासाठी गेले तिचा चेहरा फुलतो आणि बाकीच्या जास्तच गंभीर वाटायला लागतात. वाटतं, त्यांच्यासोबत इथेच बसावं, बोलावं, गोष्टी वाचून दाखवाव्यात, गाणीही म्हणावीत. त्याचं काही ऐकावं...! पण जिच्यासाठी मी गेले ती मात्र उतावीळ होऊन म्हणते, ‘दीशा, चल, जाऊ याना आपण आपल्या रूममध्ये!’ मी सगळ्यांकडे नजर टाकत त्यांचा मूक निरोप घेऊन निघते.... तिसरा मजला रूम नम्बर ३०६! तिथल्या केनच्या खुर्चीत मी बसते....छान प्रसन्न रूम! मी इथे येते, मलाही असंच पुढे इथंच रहावं लागलं तर, यांच्या वयापर्यंत मी पोचेन का? तोपर्यंत जिवंत असेन का, कदाचित नाही...पण पोचले तर मी हे एकाकीपण, परावलंबित्व कशी स्वीकारेन कोण जाणे! आम्ही दोघी काही काळ स्तब्ध! मग हळूहळू संवादाकडे....संवाद फारसा नवीन वेगळा नसतोच....कधी भूतकाळात डोकावणं...कधी वर्तमानाची काळजी.....कधी केलेलं वाचन......कधी तब्येतीच्या बारीकसारीक कुरबुरी...........ती सांगत राहते आणि मी ऐकत असते......मी नागपूरला जाणार म्हटल्यावर ती म्हणाली, ‘अग, तू जायचं असतानाही तू आठवणीनं माझ्यासाठी आलीस हेच खूप झालं, उद्या तुला प्रवास करायचाय, उशीर होईल. तुला आवरायचं असेल सगळं... तू जा.’
घरी येताच फोन खणाणला. माझं ट्रेनचं तिकीट कन्फर्म होत नाही असं दिसल्यावर दुसर्या दिवशी पहाटेचं नागपूरचं विमानाचं तिकिट आयोजकानं काढलेलं. ट्रेनचं कन्फर्म झालं नाही तर मी येणार नाही असं कळवूनही, आयोजकांनी विमानाचं तिकिट बुक केलेलं...शेवटी अति नाही म्हणणं म्हणजेही आपला हटवादीपणा दिसायला लागेल की काय असं वाटून मी त्यांच्या आग्रहापुढे निमूटपणे शरणागती पत्करली...फोन खाली ठेवला. पण मनातली भीती तशीच...मी एअरपोर्टला वेळेवर पोचेन का, जाग येईल का, तिथे गेल्यावर कसं विचारायचं, काय बोलायचं, कोणी हसेल का, काहीतरी राहून गेलं आणि फ्लाईट मिस झाली तर...आयोजकांचे पैसे तर वाया जातीलच पण आपल्याला किती अपराधी वाटायला लागेल ते वेगळंच!
तेवढ्यात बाबांचाही (वडिलांचा) काळजी करणारा फोन आला. मी दिवसभरात काय काय घडलं ते सांगत राहिले, ऑफीसमध्ये झालेली कटकट आणि त्या होणार्या त्रासाविषयी बोलले, तेव्हा ते म्हणाले, 'अग, तुला त्रास होतो एखाद्या गोष्टीचा, याचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्रास होणं हे माणसाच्या जिवंतपणाचं आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे. अशीच रहा. हो, जिवंत राहायचं असेल तर असे त्रास होत राहतील, जात राहतील....' मी शांत झाले. आपण आज वैतागलेलो असताना ऑफिसमध्ये कुणालातरी कठोरपणे बोललो त्याचं वाईटही वाटलं...खरं तर कोणतंही नातं फुलायला, बहरायला किती काळ जावा लागतो. तोडायला एक क्षण, एक सेकंद पुरेसा होतो...अशा उद्विग्न मनःस्थितीत शांत राहायला हवं, शिकायला हवं. कारण माणसं जोडायची आहेत का तोडायची आहेत...मग ते गाणं आठवलं...लहानपणापासून ते आवडतं. त्याही वेळी अर्थ कळला नाही, तरी त्यातला दर्द, व्याकूळ गहिरेपण मनाला कापत जायचा,
चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो......
खरंच, काही नात्यांना खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा!
विचार करतच मग स्वयंपाक केला आणि राहिलेली कामं आटोपून बॅग भरायला घेतली. आता भली मोठी सुटकेस काही कामाची नव्हती. आता विमानातनं जायचं म्हणजे छोटीशी सॅक पुरेशी आहे असं मनाशी म्हणत पूर्वी तब्येतीनं भरलेलं सामान बाजूला केलं. सगळं आवरेपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते. सगळयात महत्वाचा लॅपटॉप तो सॅकमध्ये ठेवला आणि गजर लावून झोपले. खरं तर मला विमानप्रवासाची भीती वाटत होती. यापूर्वी केलेला विमानप्रवास - पण त्या वेळी मी कुठे इकडेतिकडे बघितलं होतं? त्या वेळी बरोबर असलेली व्यक्ती सगळंकाही करत होतीच. मग मी आपली नेहमीप्रमाणे सोबतच्या व्यक्तींच्या मागे मागे. निश्चिंतपणे! आता एकटीनं हा प्रवास म्हणजे चेकइनपासूनचं सगळं चित्र दिसायला लागलं. ज्याची मला भयंकर भीती वाटत होती. मनाला तसं अधूनमधून मी समजवत राहिले, मुंबईत नाही का आपण सहजपणे लोकलमधला गर्दीतला तो प्रवास शिकलो. किती सरावलो होतो. आता नेमकं काय होतंय? मुंबईत आयुष्याला आलेली स्पीड पुण्यात आलं की काहीशी कमीच होत असावी. आयोजकांनी मला एअरपोर्टवर पोचवण्याविषयी, तसंच प्रवासाविषयी काय काय करायचं हे सविस्तरपणे सांगितलं होतं. मला एअरपोर्टला सोडायला देखील एक मित्र येणार होता. त्याप्रमाणेच मध्यरात्री साडेतीन वाजता बरोबर मित्राचा एसएमसही आला गूड मॉर्निगचा आणि तो आल्याचा! मी तयार झाले. लगेचंच निघालो. चार वाजता तर एअरपोर्टला पोहोचलोही!
पुन्हा मनात भीती दाटून आली. आता काही क्षणात हा मित्र निघून जाणार, मग मी एकटी! छे, हे बरोबर नाही. प्रत्येक क्षणी सोबत हवीच हे काय चाललंय आपलं? मनाला दटावलं. मित्रानं विंडोजवळ उभं राहून नम्बर येताच पिन नम्बर दिला आणि तिकिट मिळालं.. तो माझा पालक होऊन बाहेर आश्वासक नजरेनं समोर उभाच होता! तो दिसेनासा होईपर्यंत मी बाय केलं... माझ्या प्रवासाच्या फोबियामुळे त्याचं बोट पकडून थांबवून घ्यावं असंच वाटत राहिलं..!
आता पुढचा प्रवास माझा एकटीचा...सॅक, पर्स - चेक इन...मग आत आत ...मग वरती....त्या अनोळखी प्रदेशात- सगळे भल्या मोठ्या हॉलमध्ये वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये खुर्च्यांमध्ये वाट बघत बसलेले अनेक जण! ...मग मी पण त्यांच्यातली एक होऊन एका खुर्चीत जाऊन बसले.....मित्रानं आत गेल्यापासूनचं सगळं मला समजावून सांगितलं हेातंच...पण ते सगळं डोक्यातून भूरर्कन उडून गेलं होतं...पुन्हा मी कोरी झाले होते.. मला आता त्यातलं काहीही आठवत नव्हतं...सगळाच गोंधळ........त्या चकाचक वातावरणाचं दडपण येत गेलं मनावर....मग मीच एका काउंटरवर जाऊन त्यातल्या मला आश्वासक वाटणार्या एका स्मार्ट मुलीला ‘इन्डिगो इथूनच जाईल ना?’ असं विचारलं. ...ती ‘हो’ म्हणाली...तिनं कुठलंतरी डोअर मला दाखवलं. पण मला काहीच कळालं नाही. मी पुन्हा माझ्या खुर्चीत येऊन बसले...सगळे चेहरे टीपत...किती टापटीप वातावरण आणि माणसंही तशीच इस्त्री केल्यासारखी!
त्यातच नजर फिरत फिरत एका खुर्चीकडे गेली....आणि तिथेच स्थिरावली.....मी बघतच राहिले.
तो गोरापान, मध्यम उंचीचा, अंगात छानसा सूट घातलेला, हातात लॅपटॉप बॅग, आणि त्याचीही नजर माझ्याकडे गेली...दोघंही अनोळखी नजरेनं बघत राहिलो एकमेकांकडे! अचानक हदयात एकदम धडधडलं....एका अनोळखी व्यक्तित्वाचं रुपांतर ओळखीत झालं. मन भराभरा भूतकाळात शिरलं. अगदी कॉलेजच्या दिवसांत जाऊन पोचलं. नुकतीच दहावीची परीक्षा पास होऊन मी अकरावीत प्रवेश केलेला. हा तर, हो तोच होता...हो, तोच.....ज्याच्या प्रेमात मी वयाच्या १५-१६ वयाची असताना पडले होते....पहिलं प्रेम! नुकतीच शाळा संपलेली, आता फ्रॉक घालणं म्हणजे आपण लहान दिसतो आणि मग मोठं दिसण्यासाठीचे प्रयत्न! केसांना तेल लावणं सोडून शांपूने झुळझुळणारे केस, सगळं जग सुंदर वाटायला लावणारं वय आणि त्यातच त्याचं मला प्रपोज करणं....त्याच्या मित्रांचं चिडवणं..... बाल्कनीत उभं राहून त्याला शोधणारी माझी नजर आणि तो दिसताच दाराच्या पडद्याआडून त्याला निरखणं..... त्याचे ते सुंदर रंगाचे शर्ट....आमची एकमेकांना पत्र लिहिणं....हिरव्या शाईतली............कधी प्रत्यक्ष फारसं भेटता यायचं नाही... मोठ्या हिटलर भावाचे कडक पहारे असायचे..........पण पत्रांतून, त्या हिरव्याकंच्च अक्षरांतून आम्ही खूप जवळ आलो....मी ज्या स्टॉपवर उभी राहायची तिथल्या कँटिनवाल्याला सांगून तो ‘बहारो फूल बरसाओ’ अशी गाणी जेव्हा लावायचा तेव्हा मला महाराणी झाल्यासारखं वाटायचं...तो रस्ता फुलांचा गालिचा अंथरल्यागत वाटायचा...मग माझा बसरूपी रथ दौडत यायचा आणि त्या माझ्या मेहबूबला मनात साठवत मी पुढे जायची....किती सुंदर क्षण होते ते!
मी भूतकाळातून बाहेर येऊन कोर्या चेहर्यानं मग इकडेतिकडे बघितलं. त्यानंही तेच केलं. कदाचित त्याने मला ओळखलं नसावं. मग मी कसं ओळखलं? खरं तर तो तसाच होता....पहिल्यांदा भेटला होता, तसाच....! या मधल्या काळातल्या वयाच्या, परिस्थितीच्या खुणाही मला सापडत नव्हत्या त्याच्यात, का मला त्या दिसत नव्हत्या कुणास ठाऊक!...तो काळ पुन्हा तसाच उभा होता, माझ्यासमोर!
मग अनाऊन्समेंट झाली आणि मी सॅक घेऊन विमानाच्या रांगेत, शिस्तीत...मन घाबरलं, याची आणि माझी सीट शेजारीच आली तर...काय बोलायचं?...इतक्या वर्षांनी....भूतकाळाचा आढावा?...........आयुष्य एकत्र न काढता आल्याची खंत?............नेमकं काय बोलणं होईल? जास्त बोललो तर पुन्हा मन त्याच्याकडे ओढ घेईल का?....त्याच्या आणि आपल्या स्थिरावलेल्या आयुष्यात वादळ उठवेल का?.............नको रे बाबा.............असं काही नको घडायला! आपण आपले रस्ते वेगळे झाल्यावर इतकी वर्षं कधीही पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला नाही....आता कशाला उकरून पुन्हा तो भूतकाळ काढायचा?..............! नकोच ती शेजारी त्याची सीट वगैरे यायला...........!
मी विमानात शिरले....‘२२ डी’ या माझ्या सीट नम्बरवर जाऊन बसले. कुणाला काही विचारायची पाळी आली नाही म्हणून मग चेहर्यावर फुशारकीचे भाव उमटले. गोड आवाजात त्या हवाईसुंदरींनी माझं वेलकम केलं. माझी सॅक वरती ठेवायला मदतही केली. त्या सुंदर हसर्या बाहुल्या.....मला जमलं असतं का असं सुंदर आणि चटपटीतपणे वागायला? असं गोड हसून बोलायला....इतकं टापटीप रहायला....मी हवाई सुंदरी असते तर?...........पण माझ्या चेहर्यावर तर गंभीरपणा....टेन्शन..........छेः मला जमलंच नसतं....मी त्यांच्याकडे कौतुकानं पाहू लागले. जपानी बाहुल्यांसारख्या त्या किती गोड दिसत होत्या आणि कॉन्फिडन्टही!
मग त्यांच्या गोड आवाजातल्या त्या सूचना, प्रवाशांनी आपापले सीट बेल्ट लावणं.....मोबाईल स्वीचऑफ करणं....विमानानं टेक ऑफ घेतला आणि मी हळूच शेाधू लागले....हो त्यालाच....माझ्या त्या प्रियकराला.............बाजूच्या दिशेला नजर गेली....तो माझ्याच रांगेत पण त्या बाजूनं विंडोकडे आणि मी या बाजूच्या
विंडोकडे...आमच्या दोघांमध्ये चारजण! मी बघितलं...त्यानं नाकावर सोनेरी फ्रेमचा चष्मा सरकवलेला...मान खाली घालून काहीतरी वाचतोय...........वाटलं....तो बघेल आणि माझ्या सीटवरच्या या माणसाला रिक्वेस्ट करून जागा बदलवून घेईल आणि म्हणेल, ‘दीशाच ना तू? ओळखलंस मला?’....मी स्तब्ध! काय बोलू? मग तोही गप्प....खूप वेळ तसाच शांततेत........मी त्याच्याकडे पाहिलं....छे, त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं...उगाचंच मनाचे खेळ सुरू झालेत...मी खिडकीबाहेर बघितलं....पण मला दुसरं विमानच दिसायला लागलं...लगेच लक्षात आलं, की ते आपल्याच विमानाचे पंख आहेत....मग बाजूच्याच दुसर्या चिटुकल्या खिडकीतून बघितलं...पण मान दुखायला लागली....नको कल्पनेत रमणंही नको...तसंही गाडीत बसलं की मला पुढच्या पाच मिनिटांत झोप यायला लागते. विमानातही काही फारसं वेगळं घडलं नाही, मला झोप यायला लागली. मान दुखवण्यापेक्षा मी डोळे मिटले.....तशीही रात्री २ वाजता झोपले होते...अवघी दीडतास झोप झालेली....डोळे लगेच मिटले...पण मध्येच जाग आली, वाटलं हा प्रवास अवघ्या तासाभराचा ...नको झोपायला, जागं राहूया....मी खिडकीबाहेर बघितलं.............बापरे! मी काय बघत होते......अद्भूत, अचाट....कल्पनेपलीकडलं........अप्रतिम दृश्य!
मी स्वप्नात तर नाही ना...लहानपणी किती गोष्टी वाचलेल्या..........त्यातली परीची गोष्ट आठवली....परीचं ते ढगातलं घर......आणि इथे तर हे विमान ढगांच्या कितीतरी वर आलेलं.............खाली सगळे पांढरे ढगांचे मऊ मऊ पुंजके..........इतके ढग इतके ढग.........की गर्दी नुसती एकमेकांवर........आणि वर बघितलं तर तांबडं, केशरी आकाश....नीतळ स्वच्छ.....काय आहे हे...........मी स्वर्गात तर नाही................मला आनंदानं वेडं लागल्यागत झालं...वाटलं या खिडकीतून उडी मारावी या ढगांमध्ये...मऊ, मुलायम, सरकते हे ढग.....त्या ढगांच्या लेअर मध्येच दिसायला लागायच्या....त्याच्या खालची हिरवीगार जमीनही मधूनच दिसायची....इतकं सुंदर पारदर्शी दृश्य मी कधीही बघितलं नव्हतं..........मी कधी कल्पनाही केली नाही, असं सगळं...........आणि मी त्या चित्राच्या मधोमध माझं अस्तित्व!
मी सुखावले. डोळे वळवून पुन्हा हळूच बाजूला बघितलं...तो माझ्याकडेच एकटक बघत होता............बहुतेक माझ्यात ती जुनी ओळख शोधत होता, तीच जुनी ओळख...........मी त्याच्याकडे बघत नाहीये अशी बघत राहिले, डोळ्याच्या कोपर्यातून....तो म्हणायचा, ‘दिशाली’ हो, मी दीशा असूनही तो मला दिशाली म्हणायचा....सगळं विसरलेलं अचानक कसं आठवायला लागलं? तो म्हणायचा, ‘तू माझं ऐकत नाहीस, कशाला आर्टस घेते आहेस? अजूनही वेळ गेली नाही, सायन्स घे आणि डॉक्टर हो....नाही मेडिकलला नंबर लागला तर आयुर्वेद शाखा घे. म्हणजे माझ्याबरोबर राहशील कायमची! कामात मदत आणि शिवाय एकमेकांची सोबतही! दोघं मिळून खूप काम करू....पण हट्टीपणा करायचा नाही, मी म्हणेल तसं ऐकायचं.’ मी त्याला ‘हो’ म्हणायची...तो जे म्हणेल ते ‘होच’ असायचं तेव्हा! आता तो किती वर्षाचा दिसतोय बरं?.... पंचेचाळीस? कोट वगैरे घालून काय आलाय? कुठेतरी कॉन्फरन्सला चालला असणार, नागपूरला उतरेल की दिल्लीला....? छानपैकी तेव्हासारखाच टीशर्ट घातला असता तर? तेव्हा सायकलवरून आपल्याला भेटायला यायचा. हातात पटकन पत्र देऊन पसार व्हायचा. तो दिसेनासा होईपर्यंत मग त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहणं...सायकल ते विमान.....! बापरे! बघता बघता नागपूर येईलही मग मला मात्र उतरावं लागेल...उतरेपर्यंत असंच बसून राहिलो तर., मन पुन्हा पुन्हा म्हणायला लागलं, ‘ए दिशा, बोल ग बाई त्याच्याशी.’ पण छे, मला नाही जमणार.........खरं तर बोलायला हवं....उतरताना आपण पटकन आधी उठू आणि जाताना त्याच्या खुर्चीजवळ जाऊन म्हणूयात, ‘ए, तू सुदेश ना?’ तो मग बघत राहील माझ्याकडे....हळूहळू ओळखीचं....मग म्हणेल...‘इथे कशी काय? मी सोडू तुला?’ मी ‘होच’ म्हणणार...गाडीत बसल्यावर गप्पा...........पण काय? ‘तू कशी, मी कसा?’ नको....नकोच.....मी त्याच्याकडे बघणं सोडलं.
आणि पुन्हा डोळे मिटले.....पण दहाच मिनिटांत डोळे उघडले आणि खिडकीबाहेर बघितलं...आता खिडकीबाहेरचं दृश्य बदललं हेातं. आता ढगांच्या त्या लेअरखाली असंख्या लाल, हिरवी गर्द दाट झाडी दिसत होती. मधूनच पाण्याचे आहोळ..........हे सगळं दृश्य पुन्हा वेगळंच ............हे पुन्हा वेगळं काहीतरी घडतंय...कुठे गेली ती दाट स्वर्गीय ढगांची झाडी......मला पुन्हा खाली उडी मारावी वाटू लागली. त्या लाल, हिरव्या झाडांवर...........किती सुंदर आहे हे सगळं......मला हा विमानप्रवास संपून नये वाटू लागलं. त्या विमानप्रवासाची मी विनाकारण घेतलेली भीती दूर झाली होती. अभिजीतचे शंभरदा आभार मानावे वाटू लागले....मनातल्या मनात मानलेही...तेवढ्यात सूचना झाली. विमान लँडिंग करत असल्याची.....तो स्वर्गीय प्रवास संपल्याची चाहूल लागली!
मी सीटबेल्ट हळूच काढला...उभी राहिले......माझ्या शेजारची दोघंजण पुढे सरकले होते...त्यांना उतरायची घाई असावी...मी रेंगाळले होते....माझ्या कमी उंचीचा प्रश्न होता...वरती ठेवलेली सॅक काढायची होती.....कशी काढावी?....कोणाला बोलावं? एक मित्र नेहमी मला म्हणत असतो, ‘अग, काही अडलं, अडचण आली तर विचारत जा, लोक सांगतात, मदतही करतात’.....त्या मित्राचं बोलणं आठवत अखेर मी सॅक काढण्यासाठी हात वर केला, तेवढ्यात माझ्या हाताला एका हाताचा स्पर्श झाला....मी आश्चर्यानं वळून बघितलं,
हो, ‘तो’ माझ्यामागे माझ्यासाठी उभा होता.......मला काही सूचेचना, कल्पना करणं आणि प्रत्यक्षात सत्य समोर येऊन उभं ठाकणं.........वेगळंच सगळं....काय करू? पण मी काही बोलायच्या आत त्याने सॅक काढून दिली...मी घेतली....पुढे काय बोलावं कळेचना...त्याने मला ओळखलंय का, मी ओळख देऊ का? काय करू? आता काहीच क्षणात वाटा वेगळ्या होणार? काय करू, खूपच गोंधळून गेले....काहीतरी निर्णय घेणं आवश्यकच होतं!
पण मी कल्पनेतल्या जगाला पुन्हा बोलावलं नाही, मी स्वतःला सावरलं, आणि मी फक्त हसले आणि त्याच्याकडे बघितलं, तोही हसला छानसं, त्या विमानातून दिसणार्या ढगांसारखंच, खूप लेअर्स दिसल्या मला त्याच्यात आणि माझ्यातही! मी सॅकसहित पावलं टाकली विमानाच्या दाराकडे...मागे एकदाही न बघता..............,!
मनात गाणं सुरू झालं होतं,
चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो..................
आता या ओळी मला - माझ्या मनाला पूर्वीसारख्या कापत गेल्या नाहीत.....
एका नात्याला............... एक खुबसूरत मोड मिळून प्रवास संपला होता नागपूरचं एअरपोर्ट पावसाळी नजरेत माझं स्वागत करत प्रसन्नपणे उभं होतं!
Add new comment