भटक्यांचं विविधरंगी जग : क्लोई झाओ आणि फ्रान्सिस मॅक्डॉरमंड

भटक्यांचं विविधरंगी जग : क्लोई झाओ आणि फ्रान्सिस मॅक्डॉरमंड

चित्रपटजगातला सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर किंवा ॲकेडमी पुरस्कार. कोविड-१९ च्या संकटामुळे हा सोहळा प्रत्यक्ष होईल का आभासी तऱ्हेनं होईल याविषयी ६ महिने आधीपासूनच तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर कोविड-१९ च्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करून प्रत्यक्षात २५ एप्रिल २०२१ या दिवशी अमेरिकेतल्या लॉसएंजेलिस इथे ९३ व्‍या ऑस्कर सोहळ्याचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. 

हा सोहळा ऐतिहासिक होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे चीनची क्लिओ झाओ आणि अमेरिकेची फ्रान्सिस मॅक्डॉरमंड या दोन स्त्रिया ! क्लोई झाओ ही आशियातली ऑस्कर मिळवणारी पहिली स्त्री, तर जगभरातली दुसरी स्त्री दिग्दर्शक ठरली आहे. ती एक उत्तम दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माती आणि एडिटर आहे. कॅथरिन बिगेलो हिनं पहिली स्त्री दिग्दर्शक म्हणून ऑस्करचा पुरस्कार २०१० साली मिळवला होता. २०२० चा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक म्हणून क्लिओ झाओ हिला मिळाला, पण त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिचाच नोमॅडलँड हा चित्रपट ठरला. क्लोई झाओ आणि फ्रान्सिस मॅक्डॉरमंड नोमॅडलँड या चित्रपटाच्या निर्मात्याही आहेत.  ऑस्करच्या इतिहासात निर्माती आणि अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळवणारी फ्रान्सिस मॅक्डॉरमंड ही पहिलीच स्त्री ठरली आहे. तसंच अभिनयासाठी तीन वेळा ऑस्कर पारितोषिक मिळवणारी ती जगातली दुसरी स्त्री आहे.

२०१५ सालचा चित्रपट, माय ब्रदर टॉट मी, २०१७ चा द रायडर आणि यानंतरचा ऑस्करने गौरवलेला २०२० चा नोमॅडलँड अशा या चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन क्लिओ झाओनं केलं. नोमॅडलँड या चित्रपटानं तिच्यातल्या कुशल दिग्दर्शिकेवर शिक्‍कामोर्तब झालं आहे.  आशियातल्या तरुणींसाठी क्लिओ झाओ ही प्रेरणास्थान असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. नोमॅडलँड : सर्‍व्हाव्‍हिंग अमेरिका इन द ट्वेंटी फर्स्ट सेंन्चुरी या  जेसिका ब्रुडर लिखित नॉन फिक्शन पुस्तकावर आधारित नोमॅडलँड हा चित्रपट असून पटकथा, संक्षिप्तीकरण, निर्माता, दिग्दर्शक असं सबकुछ क्लिओ झाओनं केलं आहे.

पाच फूट पाच इंच उंची असलेली सडपातळ बांध्याची, लांबसडक पिंगट केसांची, चॉकलेटी डोळ्यांची आणि हसतमुख चेहऱ्याची ४० वर्षांची क्लोई झाओचं मूळ नाव झाओ टिंग असून तिचं टोपण नाव क्लोई झाओ असल्यानं पुढे तेच नाव सर्वत्र रूढ झालं. सध्या तिचं वास्तव्‍य  अमेरिकेत आहे. क्लोई झाओचा जन्म चीनमधल्या बिजिंग शहरात झाला असून एका स्टील कंपनीत क्लोई झाओचे वडील युजी झाओ हे जनरल मॅनेजर म्हणून काम करत. क्लिओ झाओ शाळेत असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि तिच्या वडिलांनी साँग दांडन या अभिनेत्रीशी दुसरं लग्न केलं. 

लहान असताना क्लिओ झाओ आणि तिचे वडील युजी झाओ एकत्र चिनी कविता म्हणत असत आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत असत. कधी कधी एकाने अर्धवट ओळ म्हणायची, तर दुसऱ्याने ती पूर्ण करायची असंही करत. लहान असल्यापासूनच क्लिओ झाओला चित्रपट बघायला आवडायचं. शाळेत असताना बंडखोर पण आळशी म्हणून ती ओळखली जात असे. त्या वेळी तिला मंगा प्रकारची चित्रं काढायला आवडत आणि ती गोष्टीही लिहीत असे. पाश्चिमात्य पॉप संस्कृती आवडत असून तिच्या घरातलं वातावरण खूप मोकळं असायचं. क्लोई झाओ ही प्राणिप्रेमी असून आज देखील तिनं ३ कोंबड्या आणि २ कुत्री पाळलेली आहेत.

क्लोई झाओचं शालेय शिक्षण लंडनमध्ये झालं. त्यानंतर तिनं मॅसॅच्युसेट्स इथल्या महिला कला महाविद्यालयातून पोलिटिकल सायन्स या विषयात पदवी मिळवली. याच काळात आपल्याला इतिहास या विषयात जास्त रस असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि त्यातूनच चित्रपट निर्मितीचा अभ्यास क्लोई झाओनं न्यूयॉर्क युनिव्‍हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये केला. इथे शिकत असताना प्रोफेसर स्पाईक ली या दिग्दर्शकाचा तिच्यावर खूप प्रभाव पडला. स्पाईक ली आणि क्लोई झाओ नेहमी तावातावानं एखादा मुद्दा घेऊन चर्चा करत असत. हळूहळू शांतपणे सुरू झालेली चर्चा उग्र रूप धारण करत असे आणि मग दोघांचेही आवाज तारसप्तकात जाऊन पोहोचत. दोघांचेही आवाज इतके टीपेला पोहोचत की घाबरून स्पाईक लीचा साहाय्यक अखेर धावतच आत येऊन सगळं आलबेल आहे ना हे बघून जात असे. दोघंही वाद-चर्चेत इतके गुंग झालेले असत, की त्यांना तो येउन गेला हेही लक्षात येत नसे. ते दिवस आठवले की आजही क्लिओ झाओ त्या आठवणींत रमून जाते. आपल्यासाठी ते दिवस अत्यंत आनंदाचे आणि शिकण्याचे होते असं तिनं म्हणून ठेवलंय.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच क्लिओ झाओनं अनेक छोट्यामोठ्या नोकऱ्याही केल्या. खरं तर २०१० साली प्रदर्शित झालेल्या डॉटर्स या माहितीपटामुळे ती सगळ्यांना माहीत झाली. तसंच बेस्ट स्टुडन्ट लाईव्‍ह ॲक्शन शॉर्ट हा पुरस्कार तिनं ‘डॉटर्स’ या माहितीपटासाठी पाम स्प्रिंग इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्‍हलमध्ये पटकावला. एवढंच नाही तर २०१०च्या सिनेक्वेस्ट फिल्म फेस्टिव्‍हलमध्ये तिने स्पेशल ज्यूरी प्राईझ मिळवलं. क्लिओ झाओनं या माहितीपटात चीनमधल्या खेड्यातली १४ वर्षांची एक मुलगी घरच्यांनी ठरवलेल्या लग्नापासून स्वत:चा बचाव कसा करते हे अतिशय उत्कृष्टरीत्या दाखवलं आहे. तिच्या या माहितीपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. या सगळ्यातून तिची प्रतिभा लोकांच्या लक्षात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये आलेल्या साँग्ज माय ब्रदर टॉट मी या या चित्रपटात एकटं राहणाऱ्या स्त्रीच्या दोन मुलांची गोष्ट क्लिओ झाओनं सांगितली. याही चित्रपटाने अनेक महोत्सवातली पारितोषिकं मिळवली. त्यानंतर द रायडर या चित्रपटानं तिला आणखी जास्त यश दाखवलं. या चित्रपटात एका गुराख्याची गोष्ट असून दक्षिण डकोटाच्या सिओक्स समुदायाच्या जीवनाचं दर्शन आहे. क्लिओ झाओला स्वत:ला अनोळखी प्रदेशांमध्ये भटकंती करायला, तिथल्या माणसांना भेटायला खूप आवडतं. 
आज क्लिओ झाओ हिचं वास्तव्‍य जरी अमेरिकेत असलं, तरी तिथे आपण आउटसायडर असल्यासारखं वाटतं असं ती सांगते. चौकटीतल्या कथांवर चित्रपट करण्याऐवजी चौकटीबाहेरच्या कथानाकाकडे मी जास्त खेचली जाते असंही क्लिओ झाओ म्हणते. क्लिओ झाओनं तिच्या प्रत्येक चित्रपटातून माणसातला चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाचं आयुष्य साधं असलं, तरी जगण्यातलं समाधान, सुख आणि आनंद कशात आहे हे सांगण्याचा प्रयत्न तिचे चित्रपट करतात. म्हणूनच ऑस्कर स्वीकारताही तिनं म्हटलंय, ‘सगळं जग चांगुलपणावर चाललेलं आहे आणि माणसांमधला हाच चांगुलपणा मला माझ्या आयुष्यात वेळोवेळी भेटत गेलाय. कठीण परिस्थितीतही आपल्यातला चांगुलपणा टिकवला पाहिजे.’

२०२१ च्या नोव्‍हेंबर महिन्यात क्लिओ झाओची सुपरहिरो मालिका इटरनल्स येणार आहे. इटरनल्स या कॉमिक बुकवर ती आधारित आहे. तसंच ॲमेझॉन स्टुडिओज तर्फे येणारी चरित्रपर बास रीव्‍हीज फिल्म ती करत आहे. 

ऑस्कर विजेता नोमॅडलँड हा चित्रपट २७ एप्रिल २०२१ या दिवशी वॉल्ट डिस्ने स्टुडिओज होम एन्टरटेंनमेंट द्वारा प्रदर्शित करण्यात आला. बॉक्स ऑफीसवर या चित्रपट यशस्वी झाला. अमेरिका, कॅनडा इथे लोकांनी चांगलीच दाद दिली. ऑस्कर विजेता ‘नॉमडलँड’ हा क्लोई झाओचा चित्रपट जिप्सीविषयीं बोलतो.  नोमॅडलँड या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नावलौकिक मिळाला. गोल्डन लायन हा व्‍हेनिस फिल्म फेस्टिव्‍हलचा पुरस्कार, टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्‍हलचा पीपल्स चॉईस् ॲवार्ड, आणि ऑस्करसह अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. 

नोमॅडलँड या चित्रपटातून फर्नचं पात्र जिवंत करणारी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉरमंड ही एक अमेरिकन अभिनेत्री असून ती ६४ वर्षांची आहे. तिचं मूळ नाव सिंथिया ॲन स्मिथ असून पुढे ती दत्तक गेल्यामुळे तिचं नाव फ्रान्सिस लुई मॅकडॉरमंड ठेवलं गेलं. फ्रान्सिसनं येल स्कूल ऑफ ड्रामा इथून मास्टर ऑफ फाईन आर्ट्सची पदवी घेतली. फ्रान्सिस मॅक्डॉरमंडने बहुतांश क्राईम थ्रिलर चित्रपट केले असून तिने साकारलेल्या बऱ्याच भूमिका वैविध्यपूर्ण आहेत. विचित्र, विक्षिप्त असलेल्या, ग्लॅमरस नसलेल्या भूमिका ती ज्या पद्घतीने रंगवते आणि कुठल्याही पात्रात जीव ओतण्याचं तिचं कसब वाखाणण्याजोगं आहे. चित्रपटात काम करत असूनही फ्रान्सिस मॅक्डॉरमंडला मेकअप करायला आवडत नाही. प्रसिद्घीच्या मागे लागणंही तिच्या स्वभावात नाही.

फ्रान्सिस मॅक्डॉरमंड हिने साकारलेल्या बहुतांश भूमिका प्रशंनीय असल्यातरी ‘ब्लड सिंपल’ या चित्रपटातली तिची ॲबीची भूमिका खूपच गाजली. आपल्या बायकोचं - ॲबीचं दुसऱ्या कुणाबरोबरतरी अफेअर असल्याचा संशय मार्टीला येतो आणि तो वायझर नावाच्या डिटेक्टिव्‍हची नेमणूक करतो. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणाऱ्या या चित्रपटात ॲबीची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या फ्रान्सिस मॅक्डॉरमंडनं अक्षरश: ॲबीचं पात्र जिवंत केलंय. या चित्रपटानंतर तिनं या चित्रपटाचा निर्माता/दिग्दर्शक/लेखक जोएल कोईन याच्याशी लग्न केलं. १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘मिसिसिपी बर्निंग’ या चित्रपटात नागरी हक्‍कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची हत्या, समाजाची उदासीनता, भ्रष्ट अधिकारी, एफबीआयचा तपास असं दाखवलं होतं. यात मिसेस पेलची भूमिका फ्रान्सिस मॅक्डॉरमंडने साकारली होती. त्यानंतर १९९६ साली जोएल आणि इथन कोईन यांच्या प्रदर्शित झालेल्या ‘फार्गो’ या ब्लॅक कॉमेडी प्रकारातल्या चित्रपटात फ्रान्सिसने सात महिन्यांच्या प्रेग्नंट असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली.  आपल्या सासऱ्याकडून पैसे उकळण्यासाठी आपल्याच बायकोला किडनॅप करायला लावणारा लालची सेल्समन कुठल्या थराला जाऊ शकतो, किडनॅप करणारे गुंड, आणि या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये होणारे खून हे सगळं चित्र.  या चित्रपटात अनेक कंगोरे बारकाईने दाखवले आहेत. यातल्या फ्रान्सिस मॅक्डॉरमंडला तिच्या संयतपणे साकारलेल्या भूमिकेबद्दल पुन्हा एकदा ऑस्करनं गौरवण्यात आलं. २००८ सालच्या ‘बर्न ऑफ्टर रिडिंग’ या चित्रपटात फ्रान्सिस मॅक्डॉरमंड ही एका जिममध्ये काम करत असते. तिच्या हातात एकाच्या आत्मचरित्राची कॉपी पडते आणि तो खूपच महत्वाचा दस्तावेज असल्याचं समजून त्याबदल्यात पैसे कसे मिळवता येतील याचा प्रयत्न ती करते. यानंतरचा २०१७ सालचा ‘थ्री बिलबोर्डस आउटसाईट एबिंग, मिसुरी’ या चित्रपटात आपल्या किशोरवयीन मुलीच्या हत्येचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करणारी आई तिनं साकारली आणि या भूमिकेसाठीचा ऑस्कर तिनं मिळवला.  

खरं तर तिच्या प्रत्येक चित्रपटाची प्रशंसा होत राहिली आहे. फ्रान्सिस मॅक्डॉरमंड हिने आजवर ४ ॲकॅडमी ॲवार्डस, २ गोल्डन ग्लोब ॲवार्ड्स, ३ बाप्टा ॲवार्ड्स, २ एमी ॲवार्ड्स, याशिवाय टोनी ॲवार्ड अनेक मानाचे पुरस्कार मिळवले आहेत. तिने आपल्या प्रत्येक भूमिकेतला भावनिक धागा जास्त बळकट केला. दृढनिश्चयी असणं, स्वावलंबी असणं, स्वतंत्र असणं, तिच्या नोमॅडलँडमधल्या भूमिकेतून क्षणोक्षणी जाणवत राहतं. 

‘नोमॅडलँड’ या चित्रपटाची निर्माती फ्रान्सिस मॅक्डॉर्मंड ही देखील आहे आणि तिनं या चित्रपटात फर्न वृध्दत्वाकडे चालणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली आहे. फर्नच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती जिथे काम करत असते ती कंपनी देखील बंद होते आणि बेघर झालेली फर्न आपलं गाव, सामान सगळं काही सोडून एक गाडी विकत घेते आणि आवश्यक तितकंच सामान बरोबर घेऊन कामाच्या शोधात ती एखाद्या जिप्सीसारखी अमेरिकेतल्या भागात भटकंती करते.  तिला या भटकंतीमध्ये जगप्रसिद्घ ॲमेझॉन कंपनीमध्येही हंगामी म्हणजे तात्पुरत्या स्वरुपाचं काम मिळतं. त्या निमित्ताने हिवाळ्यामध्ये ॲमेझॉनच्या आतल्या कामकाजाच्या गोष्टींचं दर्शन प्रेक्षकांना होतं. 

या प्रवासात फर्नला भेटलेले लोक, त्यांच्याशी तिचं निर्माण होणारं माणुसकीचं/प्रेमाचं नातं आणि या सगळ्या प्रवासात आपले सगळे मोह/पाश हळूहळू त्यागून, तग धरून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी ती कशी आत्मसात करते हे ‘नोमॅडलँड’ या चित्रपटात दाखवलं आहे. आजवर जपलेल्या अनेक वस्तू, त्यात दडलेल्या अनेक आठवणी यांना मागे सोडून फर्न जेव्‍हा निघते, तेव्‍हा त्यातल्या काही वस्तू मात्र ती आठवणीने बरोबर घेते, पण प्रवासात त्याही नष्ट होतात आणि त्याचा त्रागा फार वेळ न करता ती लगेच त्यातून बाहेर येते. यात स्वँन्की नावाची वृद्घा फर्नच्या गाडीचं टायर पंक्चर झाल्यावर तिला मदत करते, त्या वेळी तिला कॅन्सर झाल्याचं फर्नला समजतं. तिच्या उरलेल्या दिवसांतल्या चांगल्या आठवणी तिला या प्रवासातून शिल्लक ठेवायच्या असतात आणि त्यामुळेच स्वँन्की हॉस्पिटलमध्ये पडून राहण्याऐवजी प्रवासाचा पर्याय स्वीकारते. या प्रवासात अनेक छोटीमोठी कामं फर्न करत राहते आणि तिची अनेक वेगवेगळ्या तऱ्हेच्या लोकांशी जवळीक देखील निर्माण होते. स्थिरावलेलं आयुष्य जगताना त्यातले थोडेफार बदलही स्वीकारायला माणसं तयार होत नाहीत, अशा वेळी जगण्यात जिप्सीपण भिनत चाललेली, आयुष्याची संध्याकाळ झालेली फर्नसारखी व्‍यक्‍ती ज्या खंबीरपणे हा प्रवास करते तो केवळ अनुभवण्यासारखा आहे. 

नोमॅडलँड हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर क्लिओ झाओनं दिलेल्या एका मुलाखतीत चीनमध्ये मला सर्वत्र खोटेपणा आढळतो असं वक्तव्‍य केलं होतं. त्यामुळे नोमॅडलँड हा तिचा चित्रपट चीनमधल्या सगळ्या थिएटरमधून काढला गेला, इतकंच नाही तर ऑस्करच्या वेळी ती पुरस्कार स्वीकारतानाचा तितकाच भाग वगळून दाखवण्यात आला होता. ऑस्कर मिळाल्यानंतरही चीननं मात्र या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दाखवल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. असं असलं तरीही नोमॅडलँड या चित्रपटाची क्लिओ झाओची आणि फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिच्या अभिनयाची खूपच वाखाणणी झाली आणि २०२० ची सगळ्यात चांगली फिल्म म्हणून समीक्षकांसहित प्रशंसा केली. फ्रान्सिस मॅक्डॉरमंड हिचं वैशिष्ट्य असं की ती फर्न या व्‍यक्‍तिरेखेमध्ये पार विरघळून गेलीय. तिचा चेहराच तिच्याआधी बोलतो. क्लिओ झाओनं ‘नोमॅडलँड’ या चित्रपटातही खऱ्याखुऱ्या अनेक भटक्या लोकांना सहभागी करून घेतलंय.  फ्रान्सिस मॅक्डॉरमंडसारखी कसलेली अभिनेत्री आणि क्लिओ झाओ सारखी कुशल दिग्दर्शक यांच्यातली केमेस्ट्री खूपच चांगली जमून आलीय. 

क्लिओ झाओ आणि फ्रान्सिस मॅक्डॉरमंड या दोघींमधलं साम्य म्हणजे आपल्या कामाच्या बाबतीत दोघीही प्रचंड परिश्रम करणाऱ्या स्त्रिया आहेत. फ्रान्सिस मॅक् डॉरमंड हिच्या बहुतांश चित्रपटांना आयएमडीबी नं ७ च्या वर रेटिंग दिलेलं आहे. क्लिओ झाओचा नोमॅडलँड हा चित्रपट शांत पहुडलेल्या वातावरणातून प्रवास करणाऱ्या एखाद्या कवितेसारखा वाटतो. तसंच फ्रान्सिस मॅक्डॉरमंड हिनं साकारलेली फर्न जिप्सीचं जगणं जगत असली तरी ती आपला कायमचा निरोप न घेता, पुन्हा भेटू असंच म्हणणारी वाटते. त्यामुळे क्लिओ झाओ असो की फ्रान्सिस मॅकडॉरमंड या दोघींनीही ऑस्कर मिळवून जागतिक चित्रपटांच्या कारकीर्दीत एक मानाचा तुरा खोवला हे मात्र निश्चित!

https://www.loksatta.com/chaturang-news/oscars-2021-chinese-born-direct…

दीपा देशमुख, पुणे 
29 मे 2021 

Comments

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.