फारच टोचलंय
सुदर्शन हॉलचा परिसर गर्दीनं फुलून गेलेला. मी जरा धास्तावलेच, म्हटलं आता हॉलमध्ये जाण्यासाठी आणि पहिल्या रांगेत जागा मिळवण्यासाठी काय करावं लागेल कुणास ठाऊक? त्यातच आपल्या कमी उंचीमुळे आपल्याला मागून दिसणार नाही ते वेगळंच. मात्र अपूर्वनं काळजीनं माझ्या मनातलं ओळखून आधीच जागा पकडून ठेवल्यामुळे मी हुश्श केलं. आज धनूच्या दीर्घांकासाठी खूपच गर्दी म्हणजे अगदी जत्राच भरली होती. सातारा, वाई, औरंगाबाद, कणकवली असे कुठून कुठून नाट्यवेडे धनूसाठी आज आले होते. माझी शरद, ज्योती, वसंत/माधुरी दातार, चैतू, अनिरूद्ध, सुयश, संगीता, नुपूर, मंजू आणि अनेकांशी भेट झाली.
हॉलमध्ये तर मुंगी शिरायला जागा मिळू नये अशी अवस्था झाली होती. लगेचच ‘फारच टोचलंय’ला सुरुवात झाली. नाटकाबद्दल काय बोलावं? अॅब्स्ट्रॅक्ट शैलीत लिखाण करणं जसं कठीण तसंच ते मंचावर सादर करणं आणखीनच कठीण! आज दोन्ही गोष्टी खूप सहजगत्या यशस्वीपणे सादर झाल्या होत्या.
धनूनं अख्खा वेळ मंचाचा ताबा घेतला होता. एकट्यानं लढाई लढणं, त्यासाठी त्याची एनर्जी, त्याचे परिश्रम बघून काय दाद द्यावी तेच कळेनासं झालं होतं. परवा धनू म्हणाला होता, 'दीपा आपण नाटकात काम करायचो, तेव्हा मी कुठल्या तरी छोट्याशा साईड रोलमध्ये असायचो. तरीही मी ती भूमिका करायचो. कारण त्यातून मला खूप शिकायला मिळायचं. आज मात्र वातावरण बदललंय. प्रत्येकाला महत्वाची आणि मुख्य भूमिका हवीय.’ धनूच्या बोलण्याचा मी विचार करत होते. धनू बदलला का? तर नाही. तो आजही तसाच आहे. म्हणूनच तर समाजस्वास्थ्य मधली अगदी लहानशी भूमिका देखील तो तितकाच समरस होऊन करतो. कारण अतुल पेठे असो, की गिरीश कुलकर्णी मला या सगळ्यांकडून खूप शिकायला मिळालं - मिळतं असं तो म्हणतो. जरा भरकटणं झालं, पण पुन्हा 'टोचलंय'वर येते. यात धनूच्या रुपात एका सर्वसामान्य माणसाची घुसमट दिसत होती.
हा दीर्घांक धनूनंच लिहिलाय. यात्त सर्वसामान्य माणसाचं जगणं घाण्याच्या बैलासारखं त्याच त्याच चक्रातून फिरतं आहे. त्याचं धाडस, त्याचा उद्वेग, त्याचा जोष सगळा त्याच्या कवितेत, त्याच्या नाटकात, त्याच्या घोषणेत दिसला तरी तो फक्त कागदावर आहे किंवा विचारात आहे. प्रत्यक्षात तो एखाद्या गांडुळासारखा, कणा नसलेला, आगतिक माणूस आहे. त्याचं हे रूप त्याला नकोय. त्यापासून पळण्याचा तो आटोकाट प्रयत्नही करतो, पण त्याला ते शक्य होत नाही. त्याची अगदी साधीशी स्वप्नंही वास्तवाच्या फटकार्यानं मरून पडलेली! त्यातच नवीन तंत्रज्ञानाचं झालेलं अतिक्रमण आणि जुन्या गोष्टींशी चिटकून बसलेला तो भांबावून जातो. त्याला हे नवीन बदल पचनी पडत नाहीत. त्याला काळाबरोबर धावता येत नाही. त्याची दमछाक होते. त्याला मोकळा श्वास घ्यायचाय, त्याला पिसासारखं हलकं व्हायचंय पण ते शक्य नाही. मनोरंजनाच्या, सुखाच्या, आनंदाच्या व्याख्या देखील कृत्रिम आवरणाखाली बंदिस्त झालेल्या आहेत. ‘फारच टोचलंय’ यात निराशेचा सूर दिसत असला तरी आजचं हे वास्तव नाकारताही येत नाही. सामान्य माणूस किती हतबल आहे हेच या सगळ्यांतून दिसतं. त्याच्या हाती काहीही नाही. त्यामुळे फक्त फरफटत जाणं एवढंच तो करू शकतो, बघू शकतो. धनूनं ज्या ताकदीनं हा माणूस उभा केला, मी तर अचंबित होऊन बघतच राहिले. आजच्या भूमिकेला न्याय देताना धनुचा आवाज, त्यातले चढउतार, त्याच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव, त्याची देहबोली सगळचं त्याला त्या भूमिकेशी समरस करून गेलं.
थेंबे थेंबे ....म्हणतात तसं कुठलीही लहानमोठी कामं करत जाणारा धनू इतकं मोठं आव्हान लीलया पेलताना बघून खूप अभिमान आणि कौतुक दोन्हीही वाटलं. वयाच्या पन्नाशीतही ही ऊर्जा शाबूत ठेवणारा, खूप महत्वाकांक्षी नसलेला, कोणाशीही स्पर्धा न करणारा, सुयश सारख्या मुलांबरोबर राहून स्वतःला अपडेट करणारा, असा साधासुधा माझा मित्र! धनूचं हे टोचणं, ही अॅसिडिटी, ही मळमळ मंचावर तितक्याच ताकदीनं दिग्दर्शित करणारी रुपाली हिचंही खूप अभिनंदन. स्वप्नील पंडित याचं सुरुवातीचं निवेदन खूपच छान आवाजात ऐकायला मिळालं. ध्वनी, प्रकाश आणि संगीत एकदम ब्येस्ट! रोजच काही ना काही टोचतं, पण ज्या पद्धतीनं धनू, तू साकार केलंस, ते टोचणं सर्वांपर्यंत अनेक प्रयोगांनी पोहोचू देत या शुभेच्छेसह थांबते!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment