कॉफिन
आज ६ नोव्हेंबर, भरत नाट्य मंदिरला राज्य नाट्य स्पर्धेच्या फेरीतलं पहिलंच नाटक ‘कॉफिन’ होतं. चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि सुयश झुंझुर्के/अमेय महाजन दिग्दर्शित हे नाटक बघायचं होतंच. कारण मी धनू, सुयश यांना तसा शब्द दिला होता.
चैतन्य ऊर्फ चैतू यानं अभिनय/दिग्दर्शनाचं क्षेत्र निवडलं. मात्र त्याचबरोबर तो लेखनही करायला लागला. धनूच्या बालनाट्यात भूमिका करणारा चैतू बघता बघता कधी मोठा झाला कळलंच नाही. चैतूनं आपलं क्षेत्र निवडलं आणि तो मुंबईला जाऊन पोहोचला. मुंबईला पोहोचताच त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झळाळी आली. कॉफिन नाटक चैतूनं लिहिलंय म्हटल्यावर त्याचा विषय सिम्बॉलिक असणार हे उघडच होतं. व्यक्ती नाट्यसंस्थेतर्फे ही एन्ट्री होती. नाटक सुरू झालं आणि मूळ विषय चांगला, ताकदीचा आणि सकस असल्यावर इमारत कशी मजबूत होत जाते हे या नाटकाच्या दिग्दर्शनातून सिद्ध झालं.
सुयशने दिग्दर्शित केलेली काही नाटकं आणि एकांकिका मी बघितल्या आहेत. तो खूप चांगला दिग्दर्शक आहे आणि इतकंच नव्हे तर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याच कसब त्याच्यात आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे.
जन्माला आलेल्या मुलाबद्दलची स्वप्नं, समाजाच्या अपेक्षा आणि त्या मुलाला जाणून घेण्याऐवजी कधी वात्सल्यानं, कधी जगरहाटी म्हणून तर कधी मेंढराप्रमाणं त्या मुलानं वागावं अशा अपेक्षा वाडवडिलांपासून ते आजच्या पालकापर्यंत प्रत्येकजण करायला लागतो. त्या मुलाच्या मनात काय आहे, त्याला काय हवं आहे याचा विचारही कोणाच्या मनाला शिवत नाही. खरं तर जन्मतःच असं मूल मृत असतं कारण त्याच्यातलं चैतन्यच पालक आणि समाज मारून टाकतात. या नाटकात धनंजय सरदेशपांडे आणि सिद्धा (या गोड मुलीनं) अतिशय ताकदीचा अभिनय केला आहे. धनंजय तर अनेक वर्षांपासून अभिनय करतोय. पण त्याच्यासमोर त्याच्या आईचं काम करणारी ही गोड मुलगी खरंच खूप सहजसुंदर अभिनय करून गेली. तसं पाहिलं तर नाटकातली सगळीच पात्रं आपापल्या कामात रमली होती.
या नाटकातलं नेपथ्य सुरेख होतं आणि विशेष म्हणजे प्रकाश योजना अतिशय अप्रतिम होतं. कॉश्च्युम असोत वा संगीत सगळंच नेटकं आणि नाटकाच्या कथानकाला शोभेसं होतं. नाटकाचा विषय संथ गतीनं पुढे जात असला तरी बिटविन द लाईन्स कळण्याकरता ते आवश्यकही होतं. राज्य नाट्य स्पर्धेतलं सादर झालेलं हे पहिलंच नाटक....आणखी १६ संघ आपलं सादरीकरण करतील. या स्पर्धेत कॉफिनला यश किंवा क्रमांक कितवा मिळेल हे मी सांगू शकणार नाही कारण तो निर्णय परीक्षकांचा असेल. पण आज नाट्यगृहातल्या तुडुंब गर्दीनं, तरुणाईनं जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यातच त्याचं यश सामावलं आहे असं मला वाटतं. 'व्यक्ती’ टीमला खूप खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख
६ नोव्हेंबर २०१७.
Add new comment