राजकुमार रावचा 'न्यूटन'!
'न्यूटन’ बघितला. राजकुमार राव या अभिनेत्याची मी जबरदस्त फॅन आहे. म्हणूनच तर त्याचा कुठलाही चित्रपट असला तरी केवळ त्याच्यासाठी डोळस भक्तिभावाने बघते. त्यातच ‘दम लगा कै हैशा’मधला संजय मिश्रा हा अवलियाही यात असणार होता आणि रघुवीर यादवचं नाव राहिलंच की. हे सगळे म्हणजे मग काय सोने पे सुहागा वगैरेच!
आपल्या 'न्यूटन'चं नाव नुतनकुमार असल्यानं त्याला सगळे हसत असतात. मग हे महाशय आपलं नाव नुतनच्या ऐवजी न्यूटन करून टाकतात. सुरुवातीपासूनच थोडा आदर्शवादी, हट्टी, आपल्या मूल्यांवर प्रेम करणारा असा हा न्यूटन आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगांमधून कळत जातो. सरकारी नोकरीत असलेल्या न्यूटनचं लोकसभेच्या मतदान केंद्रासाठीचा निवडणूक अधिकारी म्हणून प्रशिक्षण सुरू होतं. छत्तीसगढच्या दुर्गम जंगलसदृश्य नक्षलवादी भागात मतदान केंद्र असतं. तिथे मतदान घेण्यासाठी आपल्या दोन साहाय्यक अधिकार्यांसह न्यूटन हेलिकॉप्टरनं पोहोचतो.
या चित्रपटात आदर्शवाद जपणारा आणि व्यवस्था बदलण्यासाठी सज्ज असणारा तरूण आपल्याला न्यूटनच्या रुपात भेटतो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात राहिल्यामुळे बिहार, छत्तीसगढ यासारख्या राज्यातल्या वास्तवापासून, लोकजीवनापासून आपण कोसो दूर आहोत हे आपल्याला हा चित्रपट बघताना कळतं. मराठीतल्या ‘कोर्ट’ या चित्रपटासारखाच ‘न्यूटन’ हा चित्रपट संथगतीनं पुढे जात राहतो. अर्थातच हवा तो परिणाम साध्य करण्यासाठी हीच गती आवश्यक आहे हेही निश्चित. या चित्रपटात बिटविन द लाईन्स म्हणतात त्याप्रमाणे शांतता खूप काही बोलत राहते. सुरुवातीला प्रामाणिकपणे डोळ्यामध्ये स्वप्नं घेऊन जगू पाहणारा न्यूटन आपल्या शंका कुशंका आपल्या अधिकार्याला विचारत राहतो. सरकारी यंत्रणेत मुरलेला संजय मिश्रा त्याला कधी सरळ, तर कधी उपरोधानं अनेक गोष्टी समजावून सांगतो.
या वेळी मला ‘निर्माण’मध्ये काम करताना डॉ. अभय बंग म्हणायचे त्या वाक्याची आठवण झाली. डॉ. अभय बंग तरुणांना म्हणायचे, 'तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करायचंय, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचं आहे, तर तुम्ही त्या वेळी त्यांच्यावर उपकार करत आहात असा आव आणू नका. तसंच त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं नाहीये. तुमच्या आनंदाचा भाग म्हणून हे काम स्वीकारायचं असेल तरच करा.’ इथेही संजय मिश्रा न्यूटनला तेच सांगतो. तो म्हणतो, 'प्रामाणिकपणाचा अहंकार बाळगू नकोस. तुझं काम तू प्रामाणिकपणे करत राहा देशाचा विकास आपोआप होत राहील.’ निसर्गाचे नियम श्रीमंत असो, वा गरीब सगळ्यांसाठी सारखेच कसे लागू पडतात हेही संजय मिश्रा न्यूटनला सांगतो. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर न्यूटन विरुद्ध लष्कर प्रमुख पंकज त्रिपाठी समोरासमोर उभे राहतात. आपल्या अनुभवामुळे यंत्रणा कशी हाताळायची, कधी काय डावपेच खेळायचे यात हा अधिकारी माहीर झालेला असतो. पण अनुभवानं आणखी कच्चा असलेला न्यूटन या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. तो आपल्या पुस्तकी मूल्यांवर आणि विचारांवर ठाम असतो. त्यात एका प्रसंगी पंकज त्रिपाठी न्यूटनला म्हणतो, 'न्यूटन हो, न्यूटनही रहो. आईन्स्टाईन बननेकी कोशीश मत करो.’
या चित्रपटात गावातली मालको नावाची एक आदिवासी शिक्षिकाही स्थानिक प्रतिनिधी म्हणून न्यूटनबरोबर असते. लहानपणापासून गरिबी, नक्षलवाद, सरकारी यंत्रणेला कंटाळलेले लोक हे सगळं ती अनुभवत असते. न्यूटनचा अतिरेकी हट्टीपणा पाहून ती त्याला समजवण्याचाही प्रयत्न करते, जसं जंगल एका दिवसांत बनत नाही, तसाच कुठल्याही ठिकाणाचा विकास एका दिवसात होत नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं झाली तरी देशातल्या कितीतरी भागात देश म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, शिक्षण कशासाठी खातात काहीही तिथे राहणार्या लोकांना ठाऊक नाही. लोकशाही म्हणजे काय हे तर त्यांना कळूही शकत नाही. निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार त्यांच्यासाठी अनोळखी आहेत. मतदान का करायचं हेही त्यांना ठाऊक नाही. मतदानाचं मशीन बिचार्यांनी कधीही बघितलेलं नाही.
या वेळचा एक प्रसंग खूपच बोलका आहे. लोकांना न्यूटन जेव्हा मतदान म्हणजे काय असतं इथंपासून समजावून सांगायला लागतो, तेव्हा त्याची भाषा, समोर बसलेल्या लोकांची भाषा यातला विरोधाभास आणि मुख्य म्हणजे त्यांना तो बोलतोय त्यातला एकही शब्द कळत नाही. न्यूटनकडे ‘बच्चा है’ अशा नजरेनं बघत पंकज त्रिपाठी बोलण्याची सूत्रं आपल्या हाती घेतो आणि समोर बसलेल्या लोकांना सांगतो, 'मतदान म्हणजे फक्त एक खेळ आहे. अजिबात घाबरू नका. खेळात जशा अनेक गोष्टी असतात, तशा या मशीनवर तुम्हाला खुर्ची, टेबल, घड्याळ, फूल, सायकल, गाडी अशा गोष्टी दिसतील. तुम्हाला जी आवडेल त्या बटणावर बोट दाबून मतदान करा. इतकी सोपी गोष्ट आहे.’ आदर्शवादी न्यूटनला मतदान प्रक्रियेला खेळ म्हणून बघितलेलं सहनच होत नाही. या चित्रपटात अनेक व्यंगात्मक प्रसंगही दाखवले आहेत. मात्र चित्रपटातली अनेक व्यंग, ती परिस्थिती अतिशय खुसखुशीतपणे चित्रित केली आहे.
मला हा चित्रपट आवडला तो यातल्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे! यातला सरकारी यंत्रणेतला पंकज त्रिपाठी हाही कठीण परिस्थितीतही तग धरून आहे. मालको ही शिक्षिकाही डोळ्यांत बदलाचे स्वप्नं घेऊन निर्भिडपणे पुढे जाते आहे. मुलांना शिकवताना त्यांची स्थानिक भाषा आणि पुस्तकातली प्रमाण भाषा यांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न करतेय. न्यूटनसारखा तरूण समोरची हतबल करणारी परिस्थिती असतानाही खंबीरपणे परिस्थितीला सामोरं जातो आणि स्वतः खचत नाही. हा सकारात्मक दृष्टिकोन आणि आशावाद या गोष्टी चित्रपटातून दाखवल्या आहेत. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. न्यूटनला तिथे किती यश मिळेल ठाऊक नाही, पण या वर्षातला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बघायचं असेल तर केवळ न्यूटनकडे बघावं लागेल! जरूर बघा. द ग्रेट राजकुमार राव ऊर्फ न्यूटन!
दीपा देशमुख
३० ऑक्टोबर २०१७.
Add new comment